Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

फिफ्टी-फिफ्टीची मागणी करणारे पवार सापडले ‘ट्वेंटी-२०’ मुळे कोंडीत!
नवी दिल्ली, ५ मार्च/खास प्रतिनिधी

 

लोकसभा, विधानसभेचे जागावाटप आणि मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसकडे फिफ्टी-फिफ्टीची मागणी करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ट्वेंटी-२० मुळे चांगलेच कचाटय़ात सापडले आहेत. श्रीलंकन क्रिकेट संघावर लाहोरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ऐन लोकसभा निवडणुकांदरम्यान होऊ घातलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या ट्वेंटी-२० स्पर्धेला सुरक्षा प्रदान करणे शक्य नसल्याची केंद्रीय गृहमंत्री चिदंबरम यांनी भूमिका घेतल्यामुळे आयपीएलचे आयोजक हवालदिल झाले आहेत. आयपीएलची दुसरी आवृत्ती रद्द होऊ नये म्हणून आयोजकांच्या वतीने पवार यांना पुढाकार घ्यावा लागत असल्यामुळे जागावाटपाच्या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसला रगडण्याची काँग्रेसला आयतीच संधी मिळाली आहे.
काँग्रेसने आपल्या पक्षाशी राष्ट्रीय पातळीवर आघाडी केली नाही तर त्याचे परिणाम महाराष्ट्रात दिसतील, असा इशारा पवार यांनी नाशिकच्या जाहीर सभेत रविवारी दिला. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्दैवाने दोनच दिवसांनंतर लाहोरमध्ये श्रीलंकेच्या खेळाडूंवर दहशतवाद्यांनी हल्ला चढविला आणि भारतातील आर्थिक-राजकीय समीकरणेच विसकटून गेली. क्रिकेटपटूंवर झालेल्या हल्ल्याचा संबंध भारतातील आयपीएलच्या दुसऱ्या आवृत्तीच्या आयोजनाशी चिदंबरम यांनी तत्परतेने जोडला. निवडणुकांच्या कामात व्यस्त असलेल्या निमलष्करी दलांअभावी आयपीएल स्पर्धेचे आयोजन अतिशय जोखमीचे ठरेल, असे वक्तव्य चिदंबरम यांनी केले. चिदंबरम यांच्या विधानामुळे सुमारे ७०० कोटी रुपयांच्या महसुलाकडे डोळे लावून बसलेल्या आयपीएलचे आणि २४-२४ जागांची आशा बाळगणाऱ्या राष्ट्रवादीचे गणितच कोलमडून पडले आहे. शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अन्य नेत्यांच्या फिफ्टी-फिफ्टीच्या मागण्यांकडे लक्ष न देणाऱ्या काँग्रेसला आता जागावाटपाविषयी सुरु असलेल्या चर्चेची फारशी चिंता उरलेली नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील जागावाटपाची चर्चा दोन-तीन जागांवर अडल्याचे सांगण्यात येत आहे. पण या चर्चेत आता कुठलेही पेच उरलेले नसून होळीनंतर जागावाटपाचे चित्र आणि सूत्र स्पष्ट होऊ शकेल, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. त्याचे ‘श्रेय’ काँग्रेसचे नेते अकस्मात संकटात सापडलेल्या आयपीएल स्पर्धेला देत आहेत. आज पवार यांनी कचाटय़ात सापडलेल्या आयपीएलची ‘सुटका’ करण्यासाठी परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी आणि चिदंबरम यांच्याशी चर्चा केली. ही स्पर्धा रद्द करावी लागली तर आयपीएलच्या आयोजकांना ७०० कोटी रुपयांच्या महसुलाला मुकावे लागेल, याकडेही त्यांनी मुखर्जी आणि चिदंबरम यांचे लक्ष वेधल्याचे समजते. या संधीचा फायदा घेऊन आता काँग्रेसचे नेते राष्ट्रवादीला जागावाटपाच्या चर्चेत अस्मान दाखविण्यासाठी सरसावले आहेत. हात पिरगळण्याची कला केवळ पवार यांनाच अवगत आहे असे नाही, अशी टिप्पणी काँग्रेसच्या वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे आम्ही २४-२४ जागा मिळवूच असे पवार यांच्या पक्षाचे प्रवक्ते डी. पी. त्रिपाठी उसने अवसान आणत असले तरी जागावाटपाच्या मुद्यावर आता स्वाभिमानी राष्ट्रवादी काँग्रेसला नको त्या घडीला ‘तह’ करण्याची वेळ आली असल्याचे म्हटले जात आहे.