Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ६ मार्च २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

विजयासाठी नवा ‘राज’ फॉम्र्युला : मनसे निवडक १५ जागांवर लढणार
संदीप आचार्य
मुंबई, ५ मार्च

 

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस तसेच शिवसेना-भाजप युती होणार हे स्पष्ट झाल्याने जास्तीत जास्त जागा लढण्याऐवजी निवडक जागा लढवून हमखास विजय मिळविण्याचा फॉम्र्युला वापरण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला आहे. त्यानुसार मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, धुळे, औरंगाबाद आणि सोलापूर जिल्ह्यातील १० ते १५ जागा लढविण्याचे निश्चित करण्यात आल्याचे विश्वसनीयरीत्या समजते.
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून शिरीष पारकर, मुंबई उत्तर- मध्य मधून अतुल सरपोतदार यांच्या पत्नी शिल्पा सरपोतदार आणि मुंबई दक्षिण मतदारसंघातून आमदार बाळा नांदगावकर यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. ठाणे शहर लोकसभा मतदार संघातून राजन राजे यांचे तर नाशिक येथून शिवसेनेचे माजी खासदार राजाभाऊ गोडसे यांचे पुतणे हेमंत गोडसे यांना तिकीट देण्यात येणार आहे. मनसेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पुणे लोकसभा मतदार संघातून सरचिटणीस दिपक पायगुडे यांचे नाव निश्चित करण्यात आले असले तरी पायगुडे हे निवडणूक लढविण्यास तयार नसल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात लोकसभेच्या उमेदवांराच्या नावांची घोषणा येत्या एक-दोन दिवसांमध्ये करण्यात येईल. मनसेच्या मोजक्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या आज झालेल्या बैठकीत नेमक्या जागा लढवण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुंबई उत्तरमधून मनसेचे सरचिटणीस प्रवीण दरेकर यांना लोकसभेचे तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती. दरेकर यांनी
गेल्या दोन वर्षांमध्ये उत्तर मुंबईत अनेक कार्यक्रम व आंदोलने केली होती. दरेकर हे लोकसभेसाठी इच्छुक होते तर मागठाणे विधानसभेसाठी मनसेचे नगरसेवक शिरीष चौगुले हे इच्छूक आहेत. मात्र शिरीष पारकर यांना उत्तर मुंबईतून तिकीट देण्याचे निश्चित झाल्याने दरेकर यांच्यावर आता पारकर यांच्या प्रचाराची जबाबदारी राहील. त्यामुळे आता दरेकर यांना मागठाणे येथून विधानसभेचे तिकिट दिले जाईल अशी शक्यता आहे. उत्तर- पश्चिम लोकसभा मतदार संघातून कोणाला तिकीट द्यायचे हे मनसेने अद्याप ठरवलेले नाही. तर मुंबई ईशान्य मतदार संघातून सरचिटणीस शिशिर शिंदे यांच्या नावाची चर्चा असून माजी मंत्री डॉ. वा. रा. शेरेकर यांचे चिरंजीव ऋषी शेरेकर हे इच्छूक आहेत. याशिवाय जळगाव, औरंगाबाद, मराठवाडा-विदर्भ आणि सोलापूर जिल्ह्यातील काही जागांची चाचपणी करण्यात येत आहे. दक्षिण मुंबईतून आमदार बाळा नांदगावकर यांना उमेदवारी देण्यात येणार असून पंचरंगी लढतीत बाळा नांदगावकर हे चमत्कार घडवतील, असा मनसेला विश्वास आहे. ठाणे शहरात कामगार क्षेत्रातील राजन राजे यांनी अलीकडेच मनसेत प्रवेश केला असून त्यांना लोकसभेचे तिकीट देण्याचे निश्चित झाले आहे. तर ठाणे जिल्ह्यातील उर्वरित तीन जागांबाबत उमेदवारांअभावी प्रश्नचिन्ह आहे. राजकीयदृष्टय़ा सध्या अस्पृश्य असलेल्या मनसेसाठी लोकसभा निवडणूक हा अस्तित्वाचा प्रश्न आहे. कोणत्याही परिस्थितीत पक्षाचे किमान दोन खासदार निवडून यायला हवेत, अशी रणनीती यामागे आहे. त्यामुळे मोजक्याच जागा लढवून आहे त्या जागांवर सर्व शक्ती एकवटण्याचा निर्णय झाल्याचे मनसेच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.