Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ६ मार्च २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

रिझव्‍‌र्ह बँकेच्या ‘रेट’कपातीनंतरही ‘सेन्सेक्स’मध्ये मोठी घसरण
मुंबई, ५ मार्च/ व्यापार प्रतिनिधी

 

गृहकर्ज, वाहनकर्जासह सर्व प्रकारच्या ग्राहककर्जावरील व्याजदरात वाणिज्य बँकांना कपात करता येईल यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने काल रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये केलेली अर्धा टक्क्यांची कपात आज शेअर बाजारात उत्साह निर्माण करू शकली नाही. आज झालेल्या व्यवहारात बाजाराचा निर्देशांक अर्थात ‘सेन्सेक्स’मध्ये २८४ अंशांची घसरण होऊन तो ४० महिन्यांपूर्वीच्या पातळीखाली म्हणजे ८,१९७.९२ वर बंद झाला.
एका बाजूला महागाईच्या निर्देशांकात घसरण सकारात्मक असली, तरी सरलेल्या फेब्रुवारीत सलग पाचव्या महिन्यात निर्यातीत १३ टक्क्यांची दिसलेली घसरण ही नकारात्मक बातमीही बाजारात आली. निर्यातीबरोबरच सरलेल्या महिन्यात आयातीत १८ टक्क्यांची घट दिसून आली. विदेशी वित्तसंस्थांकडून बाजारात विक्रीचा सपाटा आजही सुरूच होता. देशांतर्गत म्युच्युअल फंड व वित्तसंस्थांनी काही प्रमाणात बाजारात समभागांची खरेदी केली असली तरी बाजाराची घसरण रोखण्याइतकी ती दमदार नसल्याचे आढळून आले. बाजारात सध्या असलेली मंदीवाल्यांची सरशी पाहता, ‘सेन्सेक्स’ आणि ‘निफ्टी’ हे दोन्ही निर्देशांक अनुक्रमे ८००० आणि २५०० या महत्त्वाच्या पातळ्या तोडून त्या खाली जाण्याच्या टप्प्यावर आले आहेत.