Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ६ मार्च २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

ठाणे बंददरम्यान नुकसान झालेल्यांना राष्ट्रवादी तात्काळ मदत करणार
ठाणे, ५ मार्च/प्रतिनिधी

 

मुंबई महापालिका मुख्यालयासमोर कचरा टाकल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक झाल्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी पुकारलेल्या ठाणे बंददरम्यान ज्यांना इजा झाली असेल, त्यांना २४ तासांत नुकसानभरपाई देण्याची घोषणा पक्षाने केली आहे.
ठाणे-मुंबईच्या सीमेवर हरिओमनगरात मुंबई महापालिकेचे डंपिंग ग्राऊंड असून, त्याची क्षमता संपल्यानंतरही तेथे दररोज ८०० टन घनकचरा मुंबई महापालिका टाकते. त्याविरोधात विविध मार्गांनी केलेल्या आंदोलनानंतर गेल्याच आठवडय़ात शहर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुंबई महापालिका मुख्यालयासमोर कचऱ्याचा डंपर मोकळा केला होता. याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी आमदार आव्हाड, नगरसेवक मिलिंद पाटील यांच्यासह १५ जणांना काल अटक केली. मात्र त्यांनी जमीन नाकारल्याने सर्वांची ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शहरात बंदची हाक देत तोडफोड केली होती.
आज नगरविकास राज्यमंत्री हसन मुश्रीफ यांनी या डंपिंग ग्राऊंडला भेट दिली व आठवडाभरात या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर आव्हाड यांनी जामीन घेतला व दुपारी सर्वांची सुटका करण्यात आली. त्यानंतर पक्षकार्यालयात पत्रकारांशी बोलताना आव्हाड यांनी पोलीस आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली, तर बंददरम्यान लोकांना झालेल्या त्रासाबद्दल ठाणेकरांची माफी मागितली, तसेच बंदमध्ये ज्या लोकांना इजा झाली असेल, अथवा नुकसान झाले असेल, त्यांचा सगळा खर्च आपण या २४ तासांत लोकांना देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली. त्याचप्रमाणे डंपिंग ग्राऊंडची क्षमता संपल्यानंतरही तेथे कचरा टाकला जात असल्याबद्दल मुंबईच्या महापौर आणि आयुक्तांविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात उद्या गुन्हा दाखल करणार असल्याचेही आव्हाड यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी केलेल्या बेदम मारहाणीबाबतही त्यांनी पोलीस उपायुक्त विक्रांत देशमाने यांचे उपरोधिकपणे आभार मानताना यापुढेही पोलिसांनी याच पद्धतीने आंदोलने मिटवावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचप्रमाणे देशमाने यांनी केलेल्या मारहाणीत संजय लडकर या कार्यकर्त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला असून, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आर.आर. पाटील जखमींची विचारपूर करण्यासाठी येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिवसेनेवर जोरदार टीका करताना गेली ४० वर्षे तोडफोडच करणाऱ्या शिवसेनेने राष्ट्रवादीचे आंदोलन स्टंट ठरविण्यापूर्वी जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांनी आपल्या इतिहासाचा अभ्यास करावा आणि सुरेश मंचेकरसोबत हत्यारे घेऊन फिरणाऱ्या प्रताप सरनाईकांनाही कोणत्या आंदोलनात कोणते गुन्हे दाखल होतात हे माहीत नाही का, असा सवाल केला. एकनाथ शिंदे व प्रताप सरनाईक यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना आव्हाड यांची टर उडविली होती. बंटीवर ४२० चा गुन्हा दाखल करावा, असे सरनाईक यांची मागणी होती.
तत्पूर्वी राज्यमंत्री हसन मुश्रीफ यांनी डंपिंग ग्राऊंडला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. या डंपिंग ग्राऊंडची मुदत संपली असून, विधीमंडळातही अनेक लोकप्रतिनिधींनी त्याविरोधात आवाज उठविला होता. नागरिकांच्या जीवनाशी निगडित हा प्रश्न असून, येत्या आठ दिवसांत मुंबई महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन हे ग्राऊंड बंद करण्याबाबत सूचना केली जाईल. मुंबई पालिकेचे अधिकारी गेंडय़ाच्या कातडीचे असल्याची टीकाही त्यांनी केली.