Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ६ मार्च २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

पालिकेच्या अर्थसंकल्पावर आचारसंहितेची तलवार
मुंबई, ५ मार्च / प्रतिनिधी

 

मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज पालिका सभागृहात मांडण्यास पालिका आयुक्तांनी नकार दिला. लोकसभा निवडणुकीची आचार संहिता असल्याने अर्थसंकल्प मंजूर करता येणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. मात्र अर्थसंकल्पाला आधीच स्थायी समितीने मान्यता दिली असल्याने आता सभागृहाने अर्थसंकल्प मंजूर केल्यास आचार संहिता भंग होत नाही, असा हरकतीचा मुद्दा सभागृह नेते सुनील प्रभू यांनी मांडला होता. यावर आता प्रशासन उत्तर देणार असून केंद्रीय निवडणूक सचिवांना या प्रकरणी विचारणा करण्यात येणार आहे.
सुमारे १९ हजार कोटींचा अर्थसंकल्प पालिका आयुक्त जयराज फाटक यांनी सादर केला आहे. स्थायी समितीने या अर्खसंकल्पावर चर्चा करून अर्थसंकल्पाला मंजूरी दिली आहे. मात्र अर्थसंकल्पावर अंतिम मोहर सभागृहाने लावणे बंधनकारक आहे. आज सभागृह सुरू होताच हा प्रश्न उपस्थित झाला. पालिका आयुक्तांनी अर्थसंकल्प मांडता येणार नाही, कारण आचार संहिता लागू झालेली आहे, असे स्पष्ट केले. मात्र प्रभू यांनी वेगळी भूमिका मांडली. अनेक महत्वाच्या प्रकल्पांसाठी निधी देणे आवश्यक असल्याने अर्थसंकल्प मंजूर करावा, अशी मागणी त्यांनी केली. पालिका अधिनियम १२५ अन्वये स्थायी समितीने अर्थसंकल्प मंजूर केला आहे. आता हा अर्थसंकल्प मुंबईकरांची मालमत्ता झालेला आहे. अर्थसंकल्पातील तरतूदी मुंबईकरांना माहित झालेल्या आहेत. त्यामुळे पालिका सभागृहाने अर्थसंकल्प मंजूर केल्यास आचार संहितेचा भंग होणार नाही, असा प्रभू यांचा दावा होता. मात्र हा दावा प्रशासनाने मान्य केला नाही. महापौरांनी प्रभू यांचा मुद्दा राखून ठेवला. आचार संहिता लागू असताना प्रशासन अधिकाऱ्यांच्या बदल्या कशा काय करीत आहे, असा प्रश्न आशिष शेलार यांनी विचारला. आता केंद्रीय निवडणूक सचिवांना या संदर्भात विचारणा करण्यात येणार आहे.