Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ६ मार्च २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

ज्येष्ठ पत्रकार परेन जांभळे यांचे निधन
नवी मुंबई, ५ मार्च/प्रतिनिधी

 

ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक परेन शिवराम जांभळे यांचे आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास बेलापूर येथे निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुलगे आहेत.
काल सायंकाळी पायाला दुखापत झाल्यामुळे जांभळे एमजीएम रुग्णालयात गेले होते. आज सकाळी पुन्हा एकदा त्यांचा पाय दुखू लागल्याने त्यांनी रुग्णालयाचा रस्ता धरला. अचानक रक्ताची गुठळी तयार होऊन हृदयाच्या रक्तपुरवठय़ावर परिणाम झाल्याने त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच कोमसापचे नवी मुंबई कार्यवाह अशोक पाटील यांच्यासह संस्थेच्या पदाधिकारी, सदस्यांनी बेलापूर येथे धाव घेतली. सायंकाळी त्यांचे पार्थिव अंत्यविधीसाठी रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील डोलवी या त्यांच्या मूळ गावी नेण्यात आले. १५ मे १९४९ रोजी यांचा जन्मलेल्या जांभळे यांनी नवशक्ति या दैनिकात सहवृत्त संपादक या पदावर अनेक वर्षे काम केले. त्यांच्या ‘आत्मभोर’ या पुस्तकास शासनाचा केशवसुत पुरस्कार मिळाला होता. ‘बिंबवेध’ या पुस्तकास बालकवी पुरस्कार, तसेच ‘कृष्णधून’ या कविता संग्रहास कोकण मराठी साहित्य परिषदेचा आरती प्रभू हा पुरस्कार मिळाला होता. त्यांची ‘शिल्पायन’ ही ललित कादंबरी विशेषत्वाने गाजली.
नवी मुंबई परिसरात साहित्यिक चळवळ उभी करण्यात जांभळे यांचा मोलाचा वाटा राहिला होता. नवी मुंबई महापालिकेच्या साहित्य भूषण पुरस्कारानेही त्यांना नुकतेच गौरविण्यात आले होते. जांभळे यांचे माळडुंगाच्या कुशीत, निबीड, अथांग, रान, कृष्णचंद्र, बिलोरी, कातळपाणी हे कथासंग्रह, तर दीपरंग हा व्यक्तिचित्रण संग्रह साहित्यविश्वात नावाजले गेले. कथा, कवितांचे गुजराथी, हिंदी, तामीळ, कन्नड, इंग्रजी आणि फ्रेंच भाषांमध्ये अनुवाद करण्यात आले आहेत. मुकुलफुले हे त्यांचे व्यक्तिचित्रण प्रकाशनाच्या मार्गावर होते.