Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ६ मार्च २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

शिक्षणाच्या विकास पथावरील आणखी एक प्रयोग ‘शास्त्र शाळा’
नीरज पंडित
मुंबई, ५ मार्च

 

लहान मुलांना गोष्ट सांगताना त्यांचे पालक अनेकदा कृतीतून सांगतात. त्या मुलाला ही गोष्ट वाचून दाखविली तर जेवढी चांगली लक्षात राहणार नाही तेवढी कृतीतून दाखविल्यावर राहिल, हेच त्या मागचे कारण असते. अशाचप्रकारे शालेय विषयांचा देखील अभ्यास होऊ शकतो, हे ग्राममंगल या सेवाभावी संस्थेने दाखवून दिले आहे. सध्या त्यांचा हा प्रयत्न प्रायोगिक तत्त्वावर असला तरी तो शंभर टक्के यशस्वी होऊ शकतो, असे या संस्थेचे म्हणणे आहे.
वाईजवळील शहाबाग या गावातील रामकृष्ण चॅरिटीजच्या भारत विद्यालयात याचा पहिला प्रयोग सुरु करण्यात आला आहे. सध्या पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी मर्यादित असलेला हा प्रयोग येत्या जूनपासून पाचवीपुढील इयत्तांसाठी सुरु करण्यात येणार आहे. पाश्चात्य देशांमध्ये रुढ होऊ पाहणाऱ्या अशाच पद्धतीला ‘रचनावाद’ असे म्हटले जाते. प्रत्येक विषय म्हणजे एक शास्त्र असते. त्यामुळे प्रत्येक विषय प्रयोगातून शिकविता येणे शक्य आहे. या संकल्पनेतूनच ‘शास्त्र शाळा’ सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ‘ग्राममंगल’चे विश्वस्त डॉ. रमेश पानसे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. सर्व विषय एकमेकांशी निगडीत आहेत. असे असले तरी प्रत्येक विषयाचे स्वतंत्र अस्तित्त्व आणि शास्त्र आहे. या प्रयोगामुळे बंदिस्त वर्गात शिकविताना कठीण वाटणारे विषय देखील सोपे वाटू लागतात असा दावाही त्यांनी केला. सध्याच्या ज्ञानयुगात मुलांच्या गरजा समजून घेऊन शिक्षणपद्धतीत बदल करणे गरजेचे आहे. त्यानुसार जर बदल घडले नाहीत तर येत्या काळात एकतर शालेय शिक्षण पद्धती लोप पावेल वा प्रत्येक विषय शिकविणारे वेगवेगळे व्यावसायिक बाजारात उभे राहतील. या दोनही गोष्टी टाळायच्या असतील तर शाळांनी काळानुरुप शिक्षण पद्धतीत बदल करणे गरजेचे असल्याचे मतही डॉ. पानसे यांनी व्यक्त केले.
गेल्या १० वर्षांपासून डॉ. पानसे शिक्षण पद्धतीतील नवीन प्रयोगांवर कार्य करीत आहेत. यातूनच शास्त्र शाळेचा जन्म झाला. शास्त्र शाळेत प्रत्येक विषयासाठी वेगवेगळ्या ‘शास्त्र शाळा’ असणार आहेत. या शास्त्र शाळांमध्ये त्या-त्या विषयातील शक्य तितक्याबाबी प्रात्यक्षिकांद्वारे शिकविता येणार आहेत. या प्रयोगासाठी ग्राममंगल या संस्थेला होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र आणि एक्सप्लोझेन्टिव्ह या संस्था मदत करणार असल्याचे डॉ. पानसे यांनी सांगितले. ‘शास्त्र शाळा’ म्हणजे शिक्षणाच्या विकास पथावरील एक चांगला प्रयोग असणार आहे. पण हा प्रयोग मर्यादित न राहता त्याचे स्वरुप व्यापक होणे गरजेचे असल्याचे मत होमी भाभा विज्ञान केंद्रोचे संचालक प्राध्यापक हेमचंद्र प्रधान यांनी व्यक्त केले. या प्रयोगाचा सर्व शैक्षणिक संस्थांनी सकारात्मक उपयोग करुन घेतला तरच खऱ्या अर्थाने हा प्रयोग यशस्वी झाला असे म्हणता येईल असेही प्रधान यांनी सांगितले.