Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ६ मार्च २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

अ‍ॅड. राणे यांच्या मानवतावादाची मृत्यूनंतरही हृद्य प्रचीती
मुंबई, ५ मार्च/प्रतिनिधी

 

मानवतावादी मूल्ये आणि मूलभूत नागरी हक्कांच्या जपणुकीसाठी संपूर्ण हयात वेचलेले मुंबई उच्च न्यायालयातील ज्येष्ठ दिवंगत वकील एम. ए. राणे यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात करून ठेवलेल्या तरतुदीनुसार ‘अ‍ॅडव्होकेटस असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया’ (आवी) या अपिली शाखेच्या वकील संघटनेच्या बार रूमध्ये तसेच कीर्तिकर लॉ लायब्ररीत काम करणाऱ्या २५ सेवकांना प्रत्येकी दोन हजार रुपये रकमेचे वाटप बुधवारी करण्यात आले. राणे यांचे गेल्या जुलैमध्ये निधन झाले होते.
स्वत: वयाची पंचाहत्तरी ओलांडलेले राणे यांचे एक घनिष्ठ सहकारी अ‍ॅड. पी.एल. नाईक यांनी या रकमेचे वाटप करून आपल्या ‘सीनियर’च्या अंतिम इच्छेची पूर्तता केली. या बार रूम आणि लायब्ररीशी एम. ए. राणे यांचा तब्बल ५५ वर्षे घनिष्ठ संबंध होता. राणे मीतभाषी व नोकरांशीही आदबशीर वागणारे होते, याचा अनुभव सर्वाना होताच. पण त्यांनी हे जग सोडून जातानाही आपली तेवढय़ाच आपुलकीने आठवण ठेवली या भावनेने राणे यांनी ठेवलेली रक्कम स्वीकारताना सेवकवर्ग सद्गदित झाला. मुळात बार रूममधील ही कीर्तिकर लॉ लायब्ररी जुन्या जमान्यातील नामवंत वकील बॅ.कीर्तिकर यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांनी दान केलेल्या ग्रंथसंपदेतून उभी राहिली आहे.