Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

नौदलाच्या पहिल्यावहिल्या जागतिक सागर सफरीची धुरा मराठी माणसाच्या खांद्यावर!
मुंबई, ५ मार्च / प्रतिनिधी

 

भारतीय नौदलाच्या वतीने जागतिक सागर सफरीसाठी कमांडंट दिलीप दोंदे यांची निवड करण्यात आली असून विशेष म्हणजे भारताच्या वतीने अशी सफर पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली आहे.
सेल बोटीतून (हवेवर चालणारी बोट) दोंदे संपूर्ण विश्वाला समुद्रमार्गे वळसा घालणार असून या बोटीत ते एकटेच असणार आहेत. कोणताही कर्मचारी सोबत न घेता दोंदे यांनी आखलेली ही सागर सफर निर्विघ्न पार पडेल, असा विश्वास नेव्हीचे व्हाईस अ‍ॅडमिरल जे.एस. बेदी यांनी व्यक्त केला. दोंदे यांच्या या सफरीसाठी नेव्हीने साडेचार कोटी रूपये खर्च करून खास सेल बोट तयार केली आहे. त्या व्यतिरिक्त इतर दोन कोटी रूपयांचाही खर्च करण्यात येणार आहे. ‘म्हादेई’ असे या बोटीला नाव देण्यात आले आहे. ही बोट गोवा येथे बनविण्यात आली आहे. बोटीचा स्वागत सोहळा आज नौदलाने आयोजित केला होता. नौदलाने यापूर्वी अनेक साहसी मोहिमांमध्ये सहभाग घेतला आहे. परंतु जागतिक समुद्र सफरीची मोहीम भारताच्या वतीने आतापर्यंत हाती घेण्यात आली नव्हती. त्यामुळेच ही मोहीम आम्ही आयोजित केल्याचे बेदी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
येत्या १५ ऑगस्ट रोजी या मोहिमेला मुंबईतून प्रारंभ होणार असून सुमारे नऊ महिने ती चालेल. ऑस्ट्रेलिया, क्रिस्टचर्च, पोर्ट स्टॅनले, केप टाऊन या मार्गे दोंदे सागर भ्रमंती करणार आहेत. मुंबईकर असलेल्या दोंदे यांनी या सफरीसाठी कसून सराव केला आहे. सर्वप्रथम जागतिक समुद्र सफर करणाऱ्या रॉबिन नॉकजॉन्सन यांच्यासोबत दोंदे यांनी काम केले आहे. इंग्लंडलाही त्यांनी अशी सफर केली होती. १९८६ सालापासून ते नौदलाच्या नोकरीत आहेत. त्यांचे वडील लष्करी सेवेत होते. त्यामुळे लहानपणापासूनच आपल्याला साहसी मोहिमांमध्ये सहभागी होण्याची आवड असल्याचे दोंदे यांनी सांगितले. ही सफर करताना काही धोके जाणवणार नाहीत का, असे पत्रकारांनी विचारले असता, त्यावर दोंदे म्हणाले की, मुळातच सफरीला सुरूवात करताना पावसाळा आहे. पुढे पुढे जात असताना हवामानातील बदल, लाटा, वारे याशिवाय बोटीमध्ये बिघाड होण्याची शक्यता आहे. पण या सर्व गोष्टी गृहीत धरून आपण कसून सराव केला आहे. त्यामुळे ही सफर निर्विघ्नपणे पार पडेल, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. बोटीवर ब्रॉण्डबॅंड सेवा कार्यान्वित करण्यात येणार आहे. सोबत अन्नसामुग्री, पुस्तके, कॅमेरा इत्यादी साहित्य ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बोट आपल्याच देखरेखीखाली बनविण्यात आली असल्यामुळे काही बिघाड झाल्यास तो दुरूस्त करता येईल, असेही दोंदे यांनी सांगितले.