Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

महात्मा गांधी यांच्या साहित्यावरील ‘स्वामित्त्वधना’चा अधिकार संपुष्टात!
कोणत्याही प्रकाशकाला गांधीसाहित्य प्रसिद्ध करता येणार
मुंबई, ५ मार्च / प्रतिनिधी

 

महात्मा गांधी यांच्या साहित्यावर गेल्या काही वर्षांंपासून असलेला ‘नवजीवन ट्रस्ट’चा स्वामित्त्वधनाचा (कॉपीराइट) अधिकार नुकताच संपुष्टात आला आहे. यापूर्वी स्वामित्त्वधनाचे अधिकार नवजीवन ट्रस्टकडे असल्याने या ट्रस्टशिवाय अन्य कोणत्याही प्रकाशन संस्थेला गांधीजींचे साहित्य प्रकाशित करता येत नव्हते. मात्र हा अधिकार संपुष्टात आल्यामुळे आता महात्मा गांधी यांचे साहित्य कोणत्याही प्रकाशन संस्थेला किंवा गांधीप्रेमी मंडळींना प्रकाशित करता येणार आहे.
महात्मा गांधी यांच्या समग्र साहित्यावर असलेला नवजीवन ट्रस्टचा स्वामित्त्व अधिकार नुकताच संपुष्टात आला. अहमदाबाद येथील नवजीवन ट्रस्ट या संस्थेला महात्मा गांधी यांनीच आपल्या समग्र साहित्याचे अधिकार दिले होते. साहित्याच्या स्वामित्त्वधनाच्या अधिकारानुसार ज्या व्यक्ती किंवा संस्थेला हे अधिकार देण्यात आलेले असतात, त्यांनाच कॉपीराइट कायद्यानुसार हे साहित्य प्रकाशित करता येते. अन्य कोणी जर हे साहित्य प्रकाशित केले तर तो कॉपीराईट कायद्याचा भंग ठरतो. कॉपीराइट कायद्याचा भंग करणाऱ्याला भारतीय दंड विधानानुसार शिक्षा होऊ शकते. नवजीवन ट्रस्टकडे असलेल्या या अधिकारामुळे आजवर महात्मा गांधी यांचे जे काही साहित्य प्रकाशित झाले ते सर्व याच ट्रस्टने केले होते. मात्र असे असले तरी स्वामित्त्व अधिकाराच्या कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर साठ वर्षांनी त्या व्यक्तीच्या साहित्यावरील स्वामित्त्वधनाचा अधिकार संपुष्टात येऊन ती सार्वजनिक संपत्ती होते. ३० जानेवारी १९४८ मध्ये महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आली. कॉपीराइट कायद्यानुसार साठ वर्षांनंतर म्हणजे यंदाच्या वर्षी जानेवारीच्या अखेरीस नवजीवन ट्रस्टचा महात्मा गांधी यांच्या साहित्यावरील कॉपीराइटचा अधिकार संपुष्टात आला. हा अधिकार पुन्हा ट्रस्टलाच मिळावा म्हणून केंद्र शासनाला विनंती करण्यात आली होती. मात्र त्यावर सकारात्मक विचार करण्यात आला नाही. कॉपीराइटच्या कायद्यानुसार आता ट्रस्टचे स्वामित्त्व अधिकार संपुष्टात आल्यामुळे भारतातील किंवा जगातील कोणीही प्रकाशक किंवा व्यक्ती कोणत्याही भाषेत हे साहित्य प्रकाशित करू शकते.
दरम्यान मुंबई सवरेदय मंडळ-गांधी बुक सेंटरचे व्यवस्थापक प्रेमशंकर तिवारी यांनी सांगितले की, नवजीवन ट्रस्टकडे असलेला कॉपीराइटचा अधिकार संपुष्टात आल्यामुळे आता गांधीविचार आणि साहित्याचा जास्तीत जास्त प्रमाणात प्रसार होईल, असे वाटते.
एकाच संस्थेकडे हे अधिकार असल्याने महात्मा गांधी यांच्या विचारांवरील साहित्य प्रकाशित करण्यास त्या संस्थेलाही काही प्रमाणात मर्यादा येऊ शकतात. मात्र आता भारतातील कोणीही प्रकाशक कोणत्याही भाषेत हे साहित्य प्रकाशित करू शकेल.