Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ६ मार्च २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

कोपरखैरणे येथे महिला डॉक्टरची हत्या
नवी मुंबई, ५ मार्च / वार्ताहर

 

नवी मुंबईतील कोपरखैरणे या उपनगरात सेक्टर १८ परिसरातील चॅनल टॉवर या इमारतीत दंतचिकित्सक म्हणून व्यवसाय करणाऱ्या डॉ. नेत्रा तलाठी या ३५ वर्षीय महिलेची आज दुपारी तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या करण्यात आल्याने या भागात एकच खळबळ उडाली आहे. डॉ. तलाठी या चेंबूर येथे राहणाऱ्या असून, गेल्या दहा वर्षांपासून त्या कोपरखैरणे येथे व्यवसाय करीत होत्या. कोपरखैरणे येथील दि कराड को-ऑपरेटिव्ह बँकेस लागूनच त्यांचे क्लिनिक होते. या क्लिनिकमध्येच त्यांची हत्या करण्यात आली. दरम्यान, आज सकाळी ऐरोली सेक्टर-२ येथे सी. जी. जेकब या ३५ वर्षीय गृहिणीचा चारित्र्याचा संशय घेऊन तिचा पती जेकब नंगणी याने खून केला. दिवसभरात शहरात दोन हत्या झाल्या. आज दुपारी डॉ. नेत्रा घरी परतल्या नाहीत म्हणून त्यांच्या मावशीने क्लिनिकमध्ये दूरध्वनी करण्यास सुरुवात केली. मात्र, सायंकाळपर्यंत क्लिनिकमधील दूरध्वनी उचलला जात नाही, तसेच डॉ. नेत्रा घरीही परतल्या नाहीत म्हणून त्यांच्या मावशीने क्लिनिक गाठले. सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास क्लिनिकचा दरवाजा उघडताच आतमध्ये डॉ. नेत्रा मृतावस्थेत आढळल्या. डॉ. नेत्रा यांच्या क्लिनिकला लागूनच व्यवसाय करणारे डॉ. सेठ यांनी घटनेची माहिती कोपरखैरणे पोलिसांना दिली. काही मिनिटांतच पोलीस पथकाने घटनास्थळी पाहणी सुरू केली. डॉ. नेत्रा यांच्या डोक्यावर, तसेच मानेवर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्यांचा खून करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत नेत्रा यांचा मृतदेह क्लिनिक बाहेर काढण्यात आला नव्हता. ही हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली, याचे निश्चित धागेदोरे अजूनही हाती आलेले नाहीत, असे पोलिसांनी सांगितले.