Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ६ मार्च २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

महाबळेश्वर साहित्य संमेलनात नवोदित कवींच्या काव्यसंमेलनासाठी आयोजकांकडे कवितांचा पाऊस!
संमेलन प्रतिनिधी नोंदणीची अंतिम तारीख १० मार्च
मुंबई, ५ मार्च / प्रतिनिधी

 

महाबळेश्वर येथे येत्या २० ते २२ मार्च या कालावधीत होणाऱ्या ८२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील नवोदितांच्या कवीसंमेलनासाठी आयोजकांकडे महाराष्ट्रातून कवितांचा पाऊस पडला आहे. नवोदितांच्या कवी संमेलनासाठी कवींनी आपल्या कविता आयोजकांकडे पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला महाराष्ट्रातील कवी मंडळींचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेची महाबळेश्वर शाखा आणि चौफेर यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात नवोदित कवींचे काव्यसंमेलन होणार असून त्यासाठी नवोदित कवींनी स्वत:च्या तीन नव्या कविता आपल्या आवाजात ध्वनिमुद्रित करून त्याची कॅसेट पाठवावी, असे आवाहन करण्यात आले होते. आलेल्या कवितांमधून तीस कवी आणि त्यांच्या कवितांची निवड केली जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र निवड समितीही स्थापन करण्यात आली आहे. कवयित्री नीता भिसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आलेल्या कवितांमधून निवडक कवितांची निवड केली आहे. काही कविता कॅसेटच्या माध्यमातून तर बहुतांश कविता या लिखित स्वरूपात आयोजकांकडे आल्या होत्या.
कविता पाठविण्याच्या आवाहनाला राज्याच्या विविध भागातून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. अगदी निपाणी व अन्य भागातूनही काही कविता आल्या. कविता पाठविणाऱ्यांमध्ये विविध क्षेत्रातील आणि वयोगटातील कवींचा समावेश असून आलेल्या सर्व कवितांमध्ये विषयांचे वैविध्य दिसून आले. स्त्री भ्रूणहत्या, स्त्रीजीवन, शेतकरी आत्महत्या, पर्यावरण आणि अन्य ज्वलंत विषयावरील कविता आल्याचे निवड समितीच्या भिसे यांनी सांगितले.
दरम्यान महाबळेश्वर येथील साहित्य संमेलनाच्या तयारीला वेग आला असून संमेलनाच्या आयोजनासाठी स्थापन करण्यात आलेल्या समित्यांचे काम सुरू झाले आहे. महामंडळाच्या मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद आदी घटक संस्थांमधून संमेलनाच्या प्रतिनिधींची नोंदणी सुरू आहे. नोंदणीची अंतिम तारीख १० मार्च अशी असून त्यानंतर उपस्थित प्रतिनिधींची नेमकी संख्या सांगता येऊ शकेल. मात्र प्रतिनिधी नोंदणीसाठी चांगला प्रतिसाद असल्याची माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या महाबळेश्वर शाखेचे अध्यक्ष बबन ढेबे यांनी दिली.