Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ६ मार्च २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

उत्तरपत्रिका तपासणी बहिष्कावरून शिक्षक संघटना-शिक्षण मंडळ आमने-सामने
शिक्षण मंडळाकडून ७०० महाविद्यालयांना कारवाईच्या नोटिसा
मुंबई, ५ मार्च / प्रतिनिधी

 

‘मुंबई कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटने’ने केलेल्या आवाहनानुसार विविध महाविद्यालयातील शिक्षकांनी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यास मनाई केली आहे. शिक्षक उत्तरपत्रिका तपासत नसल्याची पत्रे महाविद्यालयांनी शिक्षण मंडळाला पाठविली आहेत. त्यामुळे या प्रकाराची गंभीर दखल घेत शिक्षण मंडळाने मुंबईतील सर्व ७०० महाविद्यालयांना नोटिसा पाठविल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष श्रीधर साळुंखे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
उत्तरपत्रिका तपासण्याचे काम अत्यावश्यक सेवेअंतर्गत येत असल्यामुळे शिक्षकांनी बहिष्कार घालू नये. जे शिक्षक उत्तरपत्रिका तपासणार नाहीत, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची सूचना या नोटिशीद्वारे महाविद्यालयांना देण्यात आली आहे. महाविद्यालयांनी शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई केली नाही तर, अशा महाविद्यालयांची मान्यता रद्द कण्याचा प्रस्ताव शिक्षण उपसंचालकांकडे पाठविण्यात येईल, असेही या नोटिसमध्ये नमूद करण्यात आल्याचे साळुंखे म्हणाले. शिक्षक संघटनेने मात्र मंडळाच्या या कारवाईला भीक न घालण्याचा चंग बांधला आहे. संघटनेने भौतिकशास्त्र भाग १ व २, रसायनशास्त्र भाग-१, मराठी व इंग्रजी या विषयांचे शिक्षक व मॉडरेटर्स यांच्यासोबत बैठक घेतली आहे. त्यात या विषयांच्या उत्तरपत्रिका तपासण्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय झाला आहे. इतर विषयांच्या बाबतीतही लवकरच निर्णय होईल, असे संघटनेचे अध्यक्ष अमरसिंग यांनी सांगितले. शिक्षण मंडळ व शिक्षक संघटना यांच्या आक्रमक भूमिकेमुळे हा प्रश्न आता चिघळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.एमव्हीएलयू व चिनॉय महाविद्यालयातील ४० शिक्षकांचे थकीत वेतन त्वरीत देण्यात यावे, पर्यावरण व गणित (प्रात्यक्षिक) विषय शिकविणाऱ्या राज्यातील एक हजार ७६६ शिक्षकांच्या पदांना मान्यता द्यावी, केंद्र सरकारप्रमाणे राज्यातील शिक्षकांना सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार वेतन द्यावे, मुंबईत एक वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या शिक्षकांचे निवृत्तीवेतन देण्यात यावे या मागण्या घेऊन शिक्षक संघटनेने उत्तरपत्रिका तपासण्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. या मागण्या लवकर मान्य झाल्या नाहीत तर ‘महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना’ही आंदोलनात उतरणार असल्याचे अमरसिंग यांनी सांगितले.