Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ६ मार्च २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

भ्रष्टाचाराबाबत महालेखापालांच्या आक्षेपांवर आज ‘म्हाडा’त बैठक
मुंबई, ५ मार्च / प्रतिनिधी

 

म्हाडातील भ्रष्टाचाराबाबत महालेखापालांनी घेतलेल्या आक्षेपाबाबत चर्चा करण्यासाठी गृहनिर्माण विभाग तसेच म्हाडातील सर्व मंडळांचे अतिवरिष्ठ अधिकारी यांची बैठक उद्या म्हाडा कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. महालेखापालांनी आपल्या अहवालात म्हाडातील विविध भ्रष्टाचारावर आसूड ओडताना काही प्रकरणांच्या फायली सापडत नसल्याचा उल्लेख केला आहे. याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.जुहूतील गृहस्वप्न या म्हाडा उच्चपदस्थांच्या सोसायटीसह अन्य चार सोसायटय़ांना दिलेला २.४ इतका नियमबाह्य एफएसआय याबाबत बी. के. अग्रवाल समितीने केलेली चौकशी आणि त्यानुसार सादर केलेला अहवाल, त्यावर गृहनिर्माण विभागाने सादर केलेला कृती अहवाल, १८ निलंबित भ्रष्ट अभियंत्यांवरील फौजदारी कारवाई, झोपडपट्टी सुधारणेच्या नावाखाली विकासनिधीत केलेला अपहार, संक्रमण शिबिरातील घुसखोरी, ४०० सरकारी अधिकाऱ्यांची तिरुपतीवारी, मुंबईतील घरांसाठी लॉटरी, म्हाडा अभियंत्यांच्या बिल्डर बनलेल्या बायका, म्हाडा वसाहतीतील एलआयजीवासीयांसाठी ३०० चौरस फूट इतका रिहॅब एरिया निश्चित करणे आदी विषयही यावेळी चर्चेला येणार असल्याचे या सूत्रांनी सांगितले.