Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ६ मार्च २००९
प्रादेशिक

रिझव्‍‌र्ह बँकेच्या ‘रेट’कपातीनंतरही ‘सेन्सेक्स’मध्ये मोठी घसरण
मुंबई, ५ मार्च/ व्यापार प्रतिनिधी

गृहकर्ज, वाहनकर्जासह सर्व प्रकारच्या ग्राहककर्जावरील व्याजदरात वाणिज्य बँकांना कपात करता येईल यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने काल रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये केलेली अर्धा टक्क्यांची कपात आज शेअर बाजारात उत्साह निर्माण करू शकली नाही. आज झालेल्या व्यवहारात बाजाराचा निर्देशांक अर्थात ‘सेन्सेक्स’मध्ये २८४ अंशांची घसरण होऊन तो ४० महिन्यांपूर्वीच्या पातळीखाली म्हणजे ८,१९७.९२ वर बंद झाला.

ठाणे बंददरम्यान नुकसान झालेल्यांना राष्ट्रवादी तात्काळ मदत करणार
ठाणे, ५ मार्च/प्रतिनिधी

मुंबई महापालिका मुख्यालयासमोर कचरा टाकल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक झाल्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी पुकारलेल्या ठाणे बंददरम्यान ज्यांना इजा झाली असेल, त्यांना २४ तासांत नुकसानभरपाई देण्याची घोषणा पक्षाने केली आहे. ठाणे-मुंबईच्या सीमेवर हरिओमनगरात मुंबई महापालिकेचे डंपिंग ग्राऊंड असून, त्याची क्षमता संपल्यानंतरही तेथे दररोज ८०० टन घनकचरा मुंबई महापालिका टाकते.

कोपरखैरणे येथे महिला डॉक्टरची हत्या
नवी मुंबई, ५ मार्च / वार्ताहर

नवी मुंबईतील कोपरखैरणे या उपनगरात सेक्टर १८ परिसरातील चॅनल टॉवर या इमारतीत दंतचिकित्सक म्हणून व्यवसाय करणाऱ्या डॉ. नेत्रा तलाठी या ३५ वर्षीय महिलेची आज दुपारी तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या करण्यात आल्याने या भागात एकच खळबळ उडाली आहे. डॉ. तलाठी या चेंबूर येथे राहणाऱ्या असून, गेल्या दहा वर्षांपासून त्या कोपरखैरणे येथे व्यवसाय करीत होत्या. कोपरखैरणे येथील दि कराड को-ऑपरेटिव्ह बँकेस लागूनच त्यांचे क्लिनिक होते.

मुख्यमंत्र्यांच्या सहीविना झालेल्या घरवाटपातील लाभार्थींमध्ये ‘गृहनिर्माण विभाग’च आघाडीवर!
सचिवांचे पीए, उपसचिव, अवरसचिवांना घरे
निशांत सरवणकर
मुंबई, ५ मार्च

शासनाने विनियम १६ अंतर्गत वितरीत केलेल्या भूखंडावरील सोसायटय़ांमधील घरांचे वाटप करण्याबाबतच्या फायलींवर मुख्यमंत्र्यांची सही न घेता परस्पर सचिव पातळीवर घरांचे वाटप करताना सर्वाधिक घरे गृहनिर्माण विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी लाटल्याचे स्पष्ट झाले आहे. गृहनिर्माण विभागाच्या सचिवांचे स्वीय सहाय्यक, उपसचिव, अवर सचिव, वरिष्ठ स्टेनो आदींचा यामध्ये समावेश आहे.

सरकारने पाने पुसली तरी तेथेच पाठपुरावा करा
चैत्यभूमी राष्ट्रीय स्मारक
मुंबई, ५ मार्च/प्रतिनिधी
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पार्थिवावर जेथे अंत्यसंस्कार झाले त्या दादर चौपाटीवरील ‘चैत्यभूमी’ला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा आणि या स्मारकाचा विकास व विस्तार करण्यासाठी त्याला लागूनच असलेली ‘एनटीसी’च्या ‘इंदु मिल’ची ११ एकर जमीन देण्याचा केंद्र आणि राज्य सरकारला आदेश द्यावा, अशी विनंती करणारी अगणित आंबेडकरवाद्यांतर्फे केली गेलेली एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने आज फेटाळली.

महाबळेश्वर साहित्य संमेलनात नवोदित कवींच्या काव्यसंमेलनासाठी आयोजकांकडे कवितांचा पाऊस!
संमेलन प्रतिनिधी नोंदणीची अंतिम तारीख १० मार्च

मुंबई, ५ मार्च / प्रतिनिधी

महाबळेश्वर येथे येत्या २० ते २२ मार्च या कालावधीत होणाऱ्या ८२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील नवोदितांच्या कवीसंमेलनासाठी आयोजकांकडे महाराष्ट्रातून कवितांचा पाऊस पडला आहे. नवोदितांच्या कवी संमेलनासाठी कवींनी आपल्या कविता आयोजकांकडे पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला महाराष्ट्रातील कवी मंडळींचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे.

उत्तरपत्रिका तपासणी बहिष्कावरून शिक्षक संघटना-शिक्षण मंडळ आमने-सामने
शिक्षण मंडळाकडून ७०० महाविद्यालयांना कारवाईच्या नोटिसा
मुंबई, ५ मार्च / प्रतिनिधी
‘मुंबई कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटने’ने केलेल्या आवाहनानुसार विविध महाविद्यालयातील शिक्षकांनी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यास मनाई केली आहे. शिक्षक उत्तरपत्रिका तपासत नसल्याची पत्रे महाविद्यालयांनी शिक्षण मंडळाला पाठविली आहेत. त्यामुळे या प्रकाराची गंभीर दखल घेत शिक्षण मंडळाने मुंबईतील सर्व ७०० महाविद्यालयांना नोटिसा पाठविल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष श्रीधर साळुंखे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

निवडणुकांमुळे डीएडच्या अभ्यासक्रमांमध्ये बदल
मुंबई, ५ मार्च / प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकांच्या वेळापत्रकाचा डी.एड. अभ्यासक्रमाच्या परीक्षेला फटका बसला आहे. निवडणुकांच्या दिवशीच राज्यात डी.एड. अभ्यासक्रमाचीही परीक्षा असल्यामुळे आता डी.एड. परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय ‘महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे’ने घेतला आहे. सुधारित वेळापत्रानुसार ही परीक्षा आता २ ते १३ मे या कालावधीत घेण्यात येणार आहे. निवडणुकांमुळे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांवर परिणाम झाल्याने विद्यापीठाने परीक्षा वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता डी.एड.च्या परीक्षांमध्येही बदल करावा लागला आहे. जुन्या वेळापत्रकानुसार डी.एड.ची परीक्षा २१ ते ३० एप्रिल या कालावधीत होणार होती. सुधारित वेळापत्रकासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे परीक्षा परिषदेने कळविले आहे.

काँग्रेस हायकमांडने केला विलासरावांचा हट्ट पूर्ण!
मुंबई, ५ मार्च / खास प्रतिनिधी

नांदेड व लातूर वादापाठोपाठ निवडणूक व्यवस्थापन समितीचे स्वतंत्र अस्तित्व ठेवतानाच या समितीत मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह नारायण राणे यांचा समावेश करून काँग्रेस हायकमांडने माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना एकूणच झुकते माप दिले आहे. गेल्या आठवडय़ात काँग्रेसमधील फेरबदलांमध्ये विलासराव देशमुख यांच्याकडे महाराष्ट्र काँग्रेसच्या निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद सोपविण्यात आले. या समितीवर प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे अधिपत्य राहणार असल्यास तेथे काम करण्यास विलासरावांनी असमर्थतता व्यक्त केली होती. तशी बाब विलासरावांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या कानावर घातली होती. काँग्रेस हायकमांडने निवडणूक व्यवस्थापन समितीत मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, कार्याध्यक्ष जयंतराव आवळे, गुरुदास कामत यांच्यासह उद्योगमंत्री नारायण राणे यांचा समावेश केला आहे. विलासरावांची ज्येष्ठता मान्य करून पक्षाच्या केंद्रीय नेत्यांनी त्यांच्या नेतृत्वाखालील समितीत अन्य नेत्यांचा समावेश करून माजी मुख्यमंत्र्यांना झुकते माप दिले आहे.

इंदूरच्या शारदोत्सवाचे कुमार केतकर यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई, ५ मार्च/प्रतिनिधी

महाराष्ट्र साहित्य सभेचा ५१ वा शारदोस्तव येत्या ७ व ८ मार्च रोजी इंदूर येथे होणार असून त्याचे उद्घाटन ‘लोकसत्ता’चे संपादक कुमार केतकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मध्य प्रदेश सरकारमधील मराठी प्रभागाचे प्रमुख गणेश बागदरे हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रा. पी. व्ही. खडीकर, डॉ. शशिकांत तांबे, तु. सी. आमणापूरकर व कॉ. अनंत लागू या गुणीजनांचा सत्कार होईल. सायं. ७.३० वा. ‘नूपुर निनाद’ हा नृत्यमय कार्यक्रम होणार असून त्याचे दिग्दर्शन डॉ. सुचित्रा हरमळकर यांचे आहे. रविवार ८ मार्च रोजी सकाळी १० वा. ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संदर्भात प्रचार तंत्राच्या मर्यादा’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. यामध्ये कुमार केतकर , पत्रकार जयदीप कर्णिक , डॉ. मिलींद दांडेकर, डॉ. अनिल कुटुंबळ व न्या. प. दि. मुळे यांचा सहभाग राहिल. सायंकाळी ७.३० वा. संगीतकार मदनमोहन यांनी संगीतबद्ध केलेल्या रचनांवर आधारित मोहनवीणा व बासरीची सुरेल मैफल रंगणार आहे. यामध्ये पं. सतीश खानवलकर व प्रशांत अग्निहोत्री हे कलाकार सहभागी होतील. या शारदोत्सवास मराठी भाषिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन न्या. प. दि. मुळे, अशोक चितळे, मुकुंद कुलकर्णी, माधव साठे आदींनी केले आहे.

'संजीवनी बटी' ने घेतला न्यायमूर्तीच्या पत्नीचा बळी !
ठाणे, ५ मार्च/प्रतिनिधी

ठाण्यातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मनीष फटांगरे यांच्या पत्नी स्वाती यांची काल 'संजीवनी बटी' या गोळ्या खाल्ल्यामुळे प्रकृती खालावली आणि उपचार सुरू असताना आज पहाटे मृत्यू झाला. त्या १५ महिन्यांपूर्वीच विवाहबद्ध झाल्या होत्या. कोपरीमधील इंद्रायणी बंगल्यामध्ये राहणाऱ्या स्वाती मनीष फटांगरे (२९) यांच्या काल दुपारी पोटात दुखू लागले होते. म्हणून त्यांनी संजीवनी बटी नावाच्या गोळ्या खाल्ल्या. त्यानंतर त्यांना चक्कर आल्यासारखे वाटू लागल्याने उपचारांसाठी प्रथम डॉ. बेडेकर रुग्णालय, जय अनंत आणि कुंबला रुग्णालयात नेले. नंतर ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना पहाटे तीन वाजून १५ मिनिटांनी त्यांचा मृत्यू झाला, अशी नोंद वर्तकनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सिव्हिल रुग्णालयात करण्यात आलेल्या शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण उलगडणार आहे. त्यांचे वडील नागपूर येथे सरकारी वकील आहेत.

डीएड परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल
मुंबई, ५ मार्च / प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकांच्या वेळापत्रकाचा डी.एड. परीक्षेला फटका बसला आहे. निवडणुकांच्या दिवशीच राज्यात डी.एड. अभ्यासक्रमाचीही परीक्षा असल्यामुळे आता डी.एड. परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय ‘महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे’ने घेतला आहे. सुधारित वेळापत्रानुसार ही परीक्षा आता २ ते १३ मे या कालावधीत घेण्यात येणार आहे. निवडणुकांमुळे विद्यापीठाने परीक्षा वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता डी.एड.च्या परीक्षांमध्येही बदल करावा लागला आहे. जुन्या वेळापत्रकानुसार डी.एड.ची परीक्षा २१ ते ३० एप्रिल या कालावधीत होणार होती.