Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ६ मार्च २००९

आठ तहसीलदारांची पदे रिक्त
बदल्यांना स्थगितीमुळे ‘महसूल’पुढे पेच
नगर, ५ मार्च/प्रतिनिधी
राज्य सरकारने केलेल्या महसूल विभागातील बदल्यांना निवडणूक आयोगाने दिलेली स्थगिती आजही कायम होती. ‘निवडणूककाळात स्थानिक रहिवासी असलेले अधिकारी नकोत’, या आयोगाच्याच निकषानुसार या बदल्या करण्यात आल्या होत्या. दरम्यान, आयोगाच्या या स्थगितीमुळे बऱ्याच जिल्ह्य़ांच्या महसूल विभागात अधिकारीच नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनीच पकडली कॉपी!
नगर, ५ मार्च/प्रतिनिधी

जिल्ह्य़ातील दहावी व बारावीच्या परीक्षांचे अहवाल रोज आपल्याला सादर करावेत, असा आदेश शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आज माध्यमिक शिक्षण विभागास दिला. दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांनी आज स्वत हिंगणगाव (ता. नगर) विद्यालयातील विद्यार्थ्यांस कॉपी करताना पकडले. अन्य एका केंद्रात भिंतीवर कॉपीचा मजकूर लिहिलेला त्यांच्या पथकास आढळला.

काडीमोड न झाल्याचा काहींना आनंद, काहींची निराशा
नगर, ५ मार्च/प्रतिनिधी

काडीमोड घ्यायचा नाही असा राज्य पातळीवर निर्णय झाल्याने शिवसेना-भाजप युतीच्या येथील काही पदाधिकाऱ्यांकडून आशेचे, तर काहींकडून निराशेचे सुस्कारे निघाले.
सेनेचे जोखड भिरकावून दिल्याशिवाय गेली २० वर्षे त्यांच्या कस्टडीत असलेला विधानसभा मतदारसंघ मोकळा होणार नाही अशी भाजपच्या बऱ्याच पदाधिकाऱ्यांची धारणा आहे. ‘आपण तर त्यांना सोडू शकत नाही, मग त्यांचे तेच चालले आहेत तर बरे झाले’ असे म्हणत हे पदाधिकारी काडीमोड होण्याकडे डोळे लावून बसले होते, पण त्यांची निराशा झाली.

वसुलीत कसूर करणाऱ्यांवर कारवाई!
नगर, ५ मार्च/प्रतिनिधी

फेब्रुवारीतील वीजबिल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात कसूर केल्याबद्दल नगर ग्रामीण, कर्जत व संगमनेर उपविभागातील वीज कर्मचारी-अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसे स्पष्ट संकेत आज महावितरणच्या वर्तुळातून देण्यात आले. कारणे दाखवा नोटीस, दंडात्मक निलंबन, सक्तीची रजा आदी स्वरूपात ही कारवाई असेल. वीज कर्मचाऱ्यांना मार्च एण्डिंगची डेडलाईन द्यावी, तूर्तास कारवाई करू नये असा मतप्रवाह स्थानिक वरिष्ठ अधिकाऱ्यांत आहे. कर्मचाऱ्यांत मात्र धास्तीवजा संभ्रम निर्माण झाला आहे.

मोटारीची रिक्षाला धडक बसून तीन साईभक्त ठार, सहा जखमी
चालकासह तिघे ताब्यात
कोपरगाव, ५ मार्च/वार्ताहर
अ‍ॅपेरिक्षास मोटारीची पाठीमागून जोराची धडक बसून रिक्षातील तीन साईभक्त जागीच ठार झाले, तर अन्य सहाजण जखमी झाले. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. नगर-मनमाड रस्त्यावर कोकमठाण शिवारात आज सकाळी नऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली. जखमींवर शिर्डीच्या साई सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी मोटारीच्या चालकासह तिघांना ताब्यात घेतले.

‘राहुल भेटीने पंतप्रधानपदासाठी पवार यांच्या नावाला पुष्टीच’
काँग्रेसमध्ये थैल्या देऊन पदे - आदिक
श्रीरामपूर, ५ मार्च/प्रतिनिधी
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या संमतीने युवा खासदार राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून साखर उद्योगाचे धडे घेतले. त्यामुळे पंतप्रधानपदासाठी पवार यांच्या नावाला वलय प्राप्त झाले, असा दावा ज्येष्ठ नेते गोविंदराव आदिक यांनी केला. काँग्रेसमध्ये निष्ठावंतांऐवजी गैरनिष्ठावंतांनाच संधी मिळते. दिल्ली ‘मॅनेज’ करणारे थैल्या देऊन पदे मिळवतात! त्यामुळेच त्या पक्षात राहायचे नाही, असे आपण ठरविले, अशी टीका करून पवार पंतप्रधान व्हावेत, यासाठीच ‘राष्ट्रवादी’त प्रवेश केल्याचे श्री. आदिक यांनी स्पष्ट केले.

जामिनावर सुटलेल्या शेखला पुन्हा अटक
तडिपारीचे उल्लंघन
राहाता, ५ मार्च/वार्ताहर
नगर व औरंगाबाद जिल्ह्य़ांतून तडिपार करण्यात आले असूनही शिर्डीत आज अचानक दिसून आलेल्या शिर्डीतील कुख्यात गुन्हेगार पाप्या शेख याला तडिपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्याला दुपारी येथील न्यायालयासमोर उभे केले असता, त्याची जामिनावर मुक्तता झाली. पोलिसांनी त्यास दुसऱ्या गुन्ह्य़ात पुन्हा अटक केली.

दोन दुकानांना आगीत पाच लाखांचे नुकसान
पाथर्डीच्या मध्यवस्तीतील प्रकार
पाथर्डी, ५ मार्च/वार्ताहर
शहराच्या मध्यभागी असलेल्या दोन दुकानांना आग लागून सुमारे ५ लाखांचे साहित्य जळून खाक झाले. काल रात्री घडलेल्या या प्रकारात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. जॉन मार्कस साबळे यांचे निर्गम फूटवेअर व सुनील पाथरकर यांचे कालिका भांडी भांडार ही दुकाने शहराच्या भरवस्तीत ऊर्दू शाळेसमोर आहेत.

गुराखी ते गणिती
वीस वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे. शाळेने हवेली तालुक्यातील गोगलवाडी या गावाला इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांचे समाजसेवेचे शिबिर आयोजित केले होते. शिबिरात गावात रस्ता तयार करण्याचे नियोजन होते. सकाळी ८ ते १२ पर्यंत विद्यार्थ्यांनी उत्तम काम केले. १२ ते १ जेवण व १ ते ३ विश्रांतीची वेळ होती. जेवण करून आम्ही शिक्षक झाडाच्या छायेत शांत पडलो होतो. तेवढय़ात ४/५ विद्यार्थी पळत पळत आमच्याकडे आले व सांगू लागले. ‘सर, तिकडे एक गुराखी आहे. गणितात एकदम भारी आहे, सर.. तीनतीन आकडय़ांचा गुणाकार तोंडीच करतोय सर तो! जन्मतारीख सांगितली की लगेच त्या दिवशी कोणता वार होता ते एकदम करेक्ट सांगतो.

हागणदारीमुक्तीची मोहीम नगर तालुक्यात थंडावली
ग्रामपंचायत सदस्यांचाच खोडा
नगर, ५ मार्च/वार्ताहर
पंचायत समितीचे पदाधिकारी, तसेच सदस्यांचेच अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने तालुक्यात हागणदारीमुक्ती मोहीम नावालाच उरली आहे. तालुक्यातील ९०४पैकी ३०४ ग्रामपंचायत सदस्यांनीच प्रशासनाला आव्हान दिल्याने मोहिमेबाबत प्रशासनही गंभीर आहे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तालुक्यात पंचायत समिती पातळीवर ही मोहीम राबविण्यात येते.

पेपर अवघड गेल्याने विद्यार्थ्यांची आत्महत्या
संगमनेर, ५ मार्च/वार्ताहर

पेपर अवघड गेला म्हणून बारावीच्या एका विद्यार्थ्यांने आज गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी त्याबाबत अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली.राहुल साहेबराव दराडे असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. मूळचा नळवाडीचा (ता. सिन्नर) असलेला राहुल येथील एका महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिकत होता. आपल्या दोन मित्रांसमवेत मालदाड रस्त्यालगतच्या भारतनगरमध्ये तो भाडय़ाच्या खोलीत राहत होता. आज त्याचे मित्र सकाळी जेवणाचा डबा आणण्यासाठी गेले होते. डबा घेऊन परत आल्यानंतर राहुलच्या आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. त्याला तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. राहुलच्या खिशात एक चिठ्ठी सापडली आहे. अभ्यास झाला नाही, पेपर अवघड गेल्याने आत्महत्या करीत असल्याचे त्यात लिहिले आहे. पोलीस याबाबतचा तपास करीत आहेत.

खेळत असताना सर्पदंशामुळे ११ महिन्यांच्या मुलाचा मृत्यू
श्रीरामपूर, ५ मार्च/प्रतिनिधी

खेळताना बिळात हात घातला आणि लहानग्याला आपला जीव गमवावा लागला. हरेगाव येथे हा दुर्दैवी प्रकार घडला. हरेगाव आऊटसाईट भागात कुंदन शांतिलाल कचरे राहतात. ते आठवडे बाजार करून उदरनिर्वाह करतात. काल ते नेहमीप्रमाणे बाजाराला निघून गेले. घराजवळ त्यांचा ११ महिन्यांचा मुलगा कृष्णा खेळत होता. त्याने घराजवळील बिळात हात घातला. त्याला बिळातील साप चावला. हा प्रकार घरच्यांच्या उशिरा लक्षात आला. कृष्णा याला स्थानिक रुग्णालयात हलविण्यात आले. प्रकृती गंभीर झाल्याने शहरात आणले. परंतु रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच कृष्णाचा मृत्यू झाला.कृष्णाचा मृत्यू होण्यापूर्वी त्याचे वडील कुंदन यांनी त्याला स्वतच्या हाताने शिरा खाऊ घातला. नंतर त्याला टाटा करून ते बाजाराला निघून गेले. परंतु दुर्दैवाने त्यांचा हा अखेरचा टाटा ठरला.

‘औद्योगिक सुरक्षिततेसाठी आधुनिक यंत्रसामुग्री वापरा’
नगर, ५ मार्च/प्रतिनिधी

नगरचे औद्योगिक क्षेत्र वाढत असताना औद्योगिक सुरक्षिततेसाठी प्रत्येक कामगार व अधिकाऱ्याने शिस्त अंगीकारणे आवश्यक असल्याचे मत लार्सन अॅण्ड टुब्रो कंपनीचे सहसरव्यवस्थापक कमलेश शुक्ला यांनी व्यक्त केले. एल अ‍ॅण्ड टी कंपनीतील औद्योगिक सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन काल शुक्ला यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. कंपनीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘वाहन चालवणे, सुरक्षितता व उपकरणे’ या पुस्तिकेचे प्रकाशन या वेळी करण्यात आले. औद्योगिकीकरणात वाढ होताना सुरक्षिततेचे उपायही तेवढेच महत्त्वाचे असतात. उद्योजकाने सुरक्षिततेच्या तोकडय़ा व्यवस्थेकडे दुर्लक्ष न करता जागरूकता वाढविण्यासह विविध उपाययोजना कराव्यात, आधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर करावा, असे त्यांनी सूचवले. सप्ताहानिमित्त आयोजित उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.सुरक्षा अधिकारी आर. एन. कुताळ यांनी प्रास्ताविक केले. कार्मिक अधिकारी सुधीर नाईक यांनी उपस्थितांना सुरक्षिततेची शपथ दिली. कंपनीचे अधिकारी सी. बी. कलापुरे, अरविंद पारगावकर, संदीप महाजन, किशोर वैकर, एस. पी. नावारकर, उदय भामेरकर, ईश्वर हांडे आदी या वेळी उपस्थित होते.

विश्व मराठी साहित्य संमेलनामुळे मराठीला वैश्विक चेहरा - पानतावणे
नगर, ५ मार्च/प्रतिनिधी

विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. गंगाधर पानतावणे यांनी अलीकडेच नगर महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रास सदिच्छा भेट दिली. अमेरिकेत झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनामुळे मराठी भाषेला वैश्विक चेहरा प्राप्त झाला. परंतु मराठी लेखक अजूनही स्वतच्याच कोषात आहेत. त्यांनी राष्ट्रीय आणि वैश्विक संवेदना जपणे गरजेचे आहे. यासाठी नवीन जीवनदृष्टीची गरज आहे. अमेरिकेत ओबामांच्या रूपाने परिवर्तनाचा नवा अध्याय सुरू झाला आहे, असे ते या वेळी म्हणाले. डॉ. पानतावणे यांचा सत्कार अभ्यास केंद्राचे समन्वयक प्रा. सुनील कवडे यांनी केला. डॉ. विजयकुमार पोटे यांनी त्यांची ओळख करून दिली. या वेळी प्रा. आनंद गायकवाड, प्रा. सुधीर वाडेकर, प्रा. तौफिक बागवान, प्रा. अनिकेत खत्री, प्रा. अभय शालिग्राम, प्रा. भुसारी, प्रा. योगेश विलायते, बेंजामिन गायकवाड व अभ्यास केंद्राचे विद्यार्थी उपस्थित होते.

मोबाईल चोरणाऱ्यास पकडले
निघोज, ५ मार्च/वार्ताहर

राळेगण थेरपाळ येथील रामभाऊ कारखिले यांचा मोबाईल काही दिवसांपूर्वी चोरीस गेला. आज सकाळी अकराच्या दरम्यान सांगवीसूर्या येथील बाळू झारू भोसले याला निघोजच्या ढाब्यावर अटक केली. पोलिसांना पाहताच त्याने पळण्याचा प्रयत्न केला. परंतु उपनिरीक्षक सुरेश चिचोंडीकर, सुखदेव दुर्गे, भुजबळ यांनी पाठलाग करून त्यास पकडले. कारखिले यांचा मोबाईल भोसले याने चोरल्याची माहिती पोलिसांनी दिली. संबंधित कंपनीशी पोलिसांनी संपर्क केल्यानंतर सांगवीसूर्या येथील सचिन साठे याच्याकडे हा मोबाईल असल्याचे समजले. पोलिसांनी साठे यांच्याकडे विचारपूस केल्यावर हा मोबाईल भोसलेकडून ४०० रुपयांत विकत घेतल्याची माहिती साठेने दिली.

गतिरोधकाबाबत दुर्लक्षाबद्दल संबंधितांवर गुन्हे नोंदवावेत’
नगर, ५ मार्च/वार्ताहर

तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील अपघातस्थळी १७ निरपराध लोकांचे बळी गेले. वास्तविक, या ठिकाणी गावकऱ्यांनी गतिरोधक बसविण्याची मागणी केली होती. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग व टोलवसुली करणाऱ्या रोहन राजदीप कंपनीवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी पंचायत समितीचे माजी सदस्य सुधीर भद्रे यांनी केली आहे.चिचोंडी पाटील येथे एस. टी. बस व मालमोटारीच्या अपघातात १७जणांचा मृत्यू झाला. गावची लोकवस्ती ७ हजारांच्या आसपास असून, या मार्गावरील धोकादायक वळणाजवळ प्राथमिक, माध्यमिक विद्यालये, आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय केंद्र, व्यावसायिक दुकाने व निवासस्थाने आहेत. येथे सतत वर्दळ असते. त्यामुळे बांधकाम विभाग, टोलवसुली करणाऱ्या राजदीप कंपनीकडे गतिरोधक बसविण्याची मागणी केली होती. आता १७जणांचे बळी गेल्यावर गतिरोधक बसविले आहेत. रस्त्यावर अनेक धोकादायक वळणे आहेत. अनेक ठिकाणचे चढ १०० फूट वाहन जवळ आल्यावरच दिसते. त्यामुळेही काही अपघात झाले आहेत.

तहानलेल्या हरणांची पाण्यासाठी भटकंती
राहुरी, ५ मार्च/वार्ताहर

उन्हाच्या तीव्रतेची झळ वन्यपशूंनाही बसत असून, तालुक्याच्या पूर्व भागातील हरणांचे कळप पाण्याच्या शोधात उन्हात भटकंती करीत असल्याचे दृश्य पाहावयास मिळते. वांबोरीकडील कातड्र, खुडसरगाव, पाथरे, लाख (पढेगाव) आदी भागात हरणांच्या कळपांची भटकंती सुरू असल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. खुडसरगाव येथील देठेवस्तीवरील विहिरीत पाण्याच्या आशेने हरिण पडले. वस्तीवरील रहिवासी, तसेच वन अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नातून या हरणाचे प्राण वाचविण्यात यश आले. गर्भगिरीच्या डोंगरभागात पाण्याची टंचाई आणि चाऱ्याचे दुर्भिक्ष्य असल्यानेच हरणांचे कळप राहुरी तालुक्याच्या पूर्व भागात आले असावेत, अशी प्रतिक्रिया वन्यपशूप्रेमींनी व्यक्त केली. पश्चिम भागातील डोंगराळ भागात हरणांबरोबरच तरस, लांडगा, कोल्हा, मोर आदी वन्यपशूंचे वास्तव्य आहे. वन विभागातर्फे तयार केलेल्या ८-१० वनतळ्यांमधील पाण्याचा आधार घेऊन हे वन्यपशू वावरतात.

वसंतराव देशमुख स्मृतिदिनी पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण
श्रीरामपूर, ५ मार्च/प्रतिनिधी

सांस्कृतिक विभागाच्या वतीने ज्येष्ठ संपादक दिवंगत वसंतराव देशमुख स्मृतिदिन व पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा मंगळवारी (दि. १०) सायंकाळी ५ वाजता आझाद मैदान येथे होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष संजय फंड यांनी दिली. स्मृतिदिनानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत सकाळचे संपादक संचालक आनंद आगाशे यांचे ‘माध्यमे व समाज’ या विषयावर व्याख्यान होईल. पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण श्री. आगाशे यांच्या हस्ते व महाराष्ट्र टाइम्सचे मुख्य वार्ताहर प्रताप आसबे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. आमदार जयंत ससाणे, उद्योगपती विक्रम सारडा, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा, प्रेस क्लबचे अध्यक्ष शंकरराव आगे या वेळी उपस्थित राहणार आहेत. पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन नगराध्यक्ष फंड, उपनगराध्यक्ष रवींद्र गुलाटी, महेंद्र त्रिभुवन, राजश्री ससाणे, मुख्याधिकारी हनुमंत भोंगळे, प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष नंदकुमार सोनार, कार्यवाहक अशोक तुपे, उपाध्यक्ष रमण मुथा, बाळासाहेब आगे, सचिव पद्माकर शिंपी, खजिनदार अनिल पांडे, संपर्कप्रमुख मिलिंदकुमार साळवे यांनी केले आहे.

राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत औरंगाबादचा संघ विजेता
श्रीरामपूर, ५ मार्च/प्रतिनिधी

वेस्टर्न फ्रेंडस् क्लबने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत औरंगाबादच्या एस. स्पीड क्लबने विजेतेपद पटकावले. द्वितीय क्रमांक नगरच्या नॉनस्टॉने, तर संगमनेरच्या एनएससीने तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण अभिनेते हेमंत बिर्जे व अलीखान यांच्या हस्ते झाले. अभिनेत्यांना पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. संयोजकांशी संवाद साधत आणि उपस्थित चाहत्यांना डायलॉग बाजीने साद घालत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. वेस्टर्न क्लबचे संस्थापक नगरसेवक अंजूम शेख यांनी प्रास्तविक केले. या वेळी आमदार जयंत ससाणे, भाऊसाहेब वाकचौरे यांची भाषणे झाली. कार्यक्रमास नगराध्यक्ष संजय फ ंड, जलीलभाई पठाण, रमजान शेख उपस्थित होते. प्रकाश खोले यांनी आभार मानले. स्पर्धेसाठी पप्पू मलिक, आरिफ बागवान, मुन्ना मलिक उपस्थित होते.

विषारी औषध पाजून विवाहितेचा खून
राहुरी, ५ मार्च/वार्ताहर

दुकान गाळा बांधण्यासाठी माहेराहून एक लाख रुपये आणावेत यासाठी सीमा रमेश मेहेत्रे (वय २८, मेहेत्रे मळा) या विवाहितेचा विषारी औषध पाजून खून करण्यात आला. याबाबत तिचा पती रमेश एकनाथ मेहेत्रे याच्यासह सातजणांना राहुरी पोलिसांनी अटक केली. किशोर बाबूराव होले (वय ४४, फत्याबाद, चांदेवाडी, तालुका श्रीरामपूर) यांनी फिर्याद दिली. दीड वर्षांपूर्वी रमेश एकनाथ मेहेत्रे याच्याशी सीमाचा विवाह झाला होता. तिने माहेराहून एक लाख रुपये गाळा बांधण्यासाठी आणावेत, यासाठी शारीरिक व मानसिक छळ करून वेळोवेळी उपाशी ठेवून त्रास दिला. शिवीगाळ व मारहाण करून बुधवारी रात्री नऊपूर्वी विषारी औषध पाजून खून केल्याप्रकरणी रमेश मेहेत्रे, सासरा एकनाथ रामचंद्र मेहेत्रे, सासू नर्मदा, दीर अशोक व संजय, जाऊ प्रतिभा अशोक मेहेत्रे व मनीषा संजय मेहेत्रे (मेहेत्रे मळा, स्टेशन रस्ता, राहुरी) या सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली.

शिर्डीत उद्यापासून तुलसी रामायण कथा
राहाता, ५ मार्च/वार्ताहर

श्रीसाईबाबा चावडी शताब्दी महोत्सव व संत तुकाराममहाराज जन्म चतुशताब्दीनिमित्त शनिवार (दि. ७)पासून शिर्डी येथे रामायणाचार्य रामरावमहाराज ढोक यांचा तुलसी रामायण कथा सोहळा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती नगराध्यक्ष कैलास कोते यांनी दिली. श्रीसाईसिद्धी ट्रस्ट व साईनिर्माण ग्रुपच्या वतीने आयोजित हा कथा सोहळा शिर्डी बसस्थानकाजवळील संस्थानच्या साईनगर प्रांगणात १३ मार्चपर्यंत चालणार आहे. रामरावमहाराज ढोक, जंगलीदासमहाराज, रमेशगिरीमहाराज, शिवानंदमहाराज, रसानंदमहाराज, रामानंदगिरीमहाराज, काशिनंदमहाराज, सोपानकाका करंजीकर, तसेच शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे, संस्थानचे अध्यक्ष आमदार जयंत ससाणे, जि. प. अध्यक्ष शालिनीताई विखे, कोते, बाबूराव गोंदकर आदींच्या हस्ते ग्रंथपूजन, दीपप्रज्ज्वलन करण्यात येणार आहे.

शंकरराव दिवसे यांचे निधन
निघोज, ५ मार्च/वार्ताहर

येथील जुन्या पिढीतील शिवणकाम करणारे प्रसिद्ध टेलर शंकरराव दिवसे यांचे अल्प आजाराने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या मागे ५ मुले, ५ विवाहित कन्या, सुना, नातवंडे, असा मोठा परिवार आहे. पठारवाडी येथील प्राथमिक शिक्षक मच्छिंद्र दिवसे यांचे ते वडील होत.

उंबरगावला रविवारी मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा
श्रीरामपूर, ५ मार्च/प्रतिनिधी

उंबरगाव येथील जागृत देवस्थान कालभैरवनाथ व श्रीजोगेश्वरमाता मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा येत्या रविवारी (दि. ८) सकाळी ८ वाजता होत आहे. काशी येथून आणलेली मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण ९ वाजता पूर्णाकृती व आरती, १० वाजता महेश व्यास यांचे प्रवचन व दुपारी १२ वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता सवाद्य मिरवणूक काढली जाणार आहे. त्याअगोदर ७ वाजता भैरवयाग व देवीयाग होणार आहे. मंदिराचा ग्रामस्थांनी १७ लाख रुपये खर्चून जीर्णोध्दार केला असून, पंचक्रोशीतील भाविक दर रविवारी पायी भैरवनाथाची वारी करतात.