Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ६ मार्च २००९

मोठय़ा प्रकल्पात फक्त ११ टक्केच जलसाठा
नागपूर, ५ मार्च / प्रतिनिधी

गडचिरोली जिल्ह्य़ातील दिना प्रकल्प कोरडा
भंडारा जिल्ह्य़ातील चार मध्यम प्रकल्प कोरडे
इटियाडोह प्रकल्पात फक्त ६ टक्के पाणीसाठा
तीव्र पाणी टंचाई जाणवणार
विभागातील मोठय़ा प्रकल्पात फक्त ११ टक्के, मध्यम प्रकल्पात १३ टक्के तर लघु प्रकल्पात फक्त ८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच तारखेला मोठय़ा प्रकल्पात ४४ टक्के, मध्यम प्रकल्पात ३१ टक्के तर लघु प्रकल्पात २७ टक्के जलसाठा उपलब्ध होता.

‘हत्ती’ बिघडवणार विदर्भातील समीकरणे?
चंद्रशेखर बोबडे, नागपूर, ५ मार्च

उत्तर प्रदेशात स्वबळावर सत्तेत आल्यानंतर आता पंतप्रधानपदावर दावा करणाऱ्या मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने महाराष्ट्रावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या चार लोकसभा निवडणुकीतील या पक्षाला मिळालेल्या मतांचा वाढता आलेख पाहिला तर या निवडणुकीत अनेक प्रमुख पक्षाचे राजकीय गणित हा पक्ष बिघडवू शकतो अशी शक्यता आहे.महाराष्ट्रातील दलितबहुल मतदारसंघात पूर्वी रिपब्लिकन पक्षाचा एकाधिकार होता, मात्र नेत्यांच्या धरसोड वृत्तीमुळे ही ‘व्होट बॅंक’ हा पक्ष सांभाळू शकला नाही.

रेल्वे स्थानकावरील सुरक्षा व्यवस्था ४ महिन्यात ‘हायटेक’
नागपूर, ५ मार्च / प्रतिनिधी

८ कोटी मंजूर
अमरावती-नरखेड मार्ग २०११ पर्यंत पूर्ण.
अजनी कोचिंग कॉम्प्लेक्सच्या निविदा ९ एप्रिलला
नागपूर रेल्वे स्थानकाची सुरक्षा व्यवस्था ‘हायटेक’ करण्यासाठी रेल्वेने ८ कोटी रुपये मंजूर केले असून येत्या चार महिन्यात ही अद्ययावत यंत्रणा कार्यान्वित होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यस्थापक बी.बी. मोडगील यांनी दिली.

पाऱ्याने गाठली चाळीशी!
नागपूर, ५ मार्च / प्रतिनिधी

मार्च महिन्याच्या आरंभीच तापमानात झपाटय़ाने वाढ होत असून विदर्भाच्या अनेक भागात पारा ४० अंशांवर पोहोचला आहे. खरा उन्हाळा अजून यायचाच असला तरी उन्हाच्या चटक्यामुळे आतापासूनच दुपारी रस्ते ओस पडू लागले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून अनेक शहरांचे तापमान ४० अंशांपर्यंत पोहोचले आहे. उकाडा चांगलाच वाढल्याने कुलर्स, पंख्यांचा वापर वाढला आहे.

जी.एम. चे गृहपाठ अन् रेल्वेच्या स्थानिक समस्या..
राजेश्वर ठाकरे, नागपूर, ५ मार्च

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक बी.बी. मोडगील यांच्या निरीक्षण दौऱ्यामुळे स्थानिक प्रश्नांना न्याय मिळण्याबाबत नागपूरकरांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या पण, येथील प्रवाशांच्या प्राथमिक अडचणींसंदर्भात महाव्यवस्थापकांचे गृहपाठ न झाल्याने विभागीय व्यवस्थापकांच्या गुळमुळीत उत्तरांशिवाय काहीही हाती लागले नाही.चांदूर रेल्वे ते नागपूर दरम्यान महाव्यवस्थापकांनी आज निरीक्षण दौरा केला. यावेळी चांदूर, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम आणि नागपूर रेल्वे स्थानकांचे निरीक्षण केले.

शहरात विविध भागात पाणपोई
नागपूर, ५ मार्च / प्रतिनिधी

उन्हाळ्याची चाहुल लागताच शहरातील विविध भागात पाणपोई (प्याऊ)चे केंद्र सुरू होत आहे. रस्त्याने जाणारे पाणपोईवर येऊन तहान भागवित असतात. मार्चच्या पहिल्या आठवडय़ात उकाडा जाणवायला लागल्यामुळे शहरातील काही सामाजिक संघटनांनी पाणपोई केंद्र सुरू केले आहे. शहरातील काही भागात वर्षभर पोणपोई सुरू असले तरी उन्हाळ्यात मात्र त्याची संख्या मोठय़ा प्रमाणात असते.भर उन्हात फिरणारे किंवा मोलमजुरी करणारे अनेक नागरिक पाणपोईचा आसरा घेतल्याशिवाय समोर जात नाही.

समता साहित्य पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन
नागपूर, ५ मार्च/प्रतिनिधी

यवतमाळ शहरातील समता साहित्य अकादमीच्या वतीने, पुणे शहरात २५ मे रोजी राष्ट्रीय व राज्यस्तरीय गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. सामाजिक, धार्मिक, लेखन, समाजसेवा, कृषी, शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक, क्रीडा, कला, नवोदित कवी, लोककलावंत, विविध क्षेत्रातील दंडार व कला, कलावंत, रंगकर्मी, गायक, वादक, चित्रकार, पथनाटय़ कलावंत, कथाकार, छायाचित्रकार आदी क्षेत्रात नि:स्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष समता पुरस्कार, महात्मा ज्योतिबा फुले समता पुरस्कार, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले समता पुरस्कार, शिक्षकरत्न समता पुरस्कार, संत रविदास समता पुरस्कार, क्रांतिवीर बिरसा मुंडा समता पुरस्कार, संताजी जगनाडे महाराज समता पुरस्कार, कला व नाटय़ समता पुरस्कार, क्रीडा रत्न समता पुरस्कार असे राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.
पुरस्कारासाठी इच्छुकांनी त्यांचे प्रस्ताव भारती तांडेकर, १०४, आनंदनगर, यवतमाळ-४४५००१ या पत्त्यावर ३० मार्च २००९ पर्यंत पाठवावा, असे आवाहन अकादमीद्वारे करण्यात आले आहे.

दारू भट्टीवर पोलिसांचा छापा, एक लाखाचा ऐवज जप्त
नागपूर, ५ मार्च / प्रतिनिधी

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भिवसनखोरी येथील पाच मोठय़ा दारू भट्टय़ावर छापा घालून तीन महिलांसह सात जणांना अटक करून त्यांच्या ताब्यातून एक लाखाचा ऐवज जप्त केला. संजय नामदेव मोरे (३२), गौतम मनोहर सोमकुंवर (२९), जितू मनोज सोमकुंवर (४०), वैशाली राजू पाटील (३२), दीपाली रवींद्र गजभिये (२२), सुलोचना भीमराव कांबळे (४५) कल्पना सुभाष रामटेके (३३, सर्व रा. भिवनसनखोरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. भिवसनखोरी येथे मोठय़ा प्रमाणात मोहाफुलापासून दारू गाळण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेला प्राप्त झाली. या माहितीवरून पथकाने आज सकाळी तेथे छापा टाकला. मुंबई दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदवून वरील सात जणांना अटक केली व त्यांच्या ताब्यातून मोहाची दारू, मोहफुलाचा सडवा, लोखंडी ड्रम, जर्मनचे घमेले, प्लॅस्टिक नळ्या असा एकूण १ लाख ५०० रुपये किमतीचा ऐवज जप्त केला.

स्टेट बँक ऑफ इंडिया महाव्यवस्थापक आर.जे. घाटे यांचा सत्कार
नागपूर, ५ मार्च/प्रतिनिधी

सीए असोसिएशन, नागपूर शाखेच्या वतीने स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबईचे महाव्यवस्थापक आर.जे. घाटे यांचा सत्कार करण्यात आला. सीए असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद पटेल यांनी त्यांचा सत्कार केला. तत्पूर्वी नागपूर शाखेच्या कार्याबद्दल आणि सीएच्या योगदानाबद्दल व त्यांचा बँकेशी असलेल्या संबंधाबाबत घाटे यांना माहिती देण्यात आली. याप्रसंगी घाटे म्हणाले, बँकेच्या कुशल कार्यप्रणालीकरता व प्रगतीकरता सीएचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. बदलत्या काळात सीएंची भूमिका मार्गदर्शक व मित्रत्वाची राहणार आहे, असे घाटे म्हणाले. नागपूर शाखेच्या विविध उपक्रमांचीसुद्धा आर.जे. घाटे यांनी प्रशंसा केली. याप्रसंगी मिलिंद पटेल, समीर बाकरे, जुल्फेश शहा, महेश राठी, सतीश सारडा, शारदा सुरेश उपस्थित होते.

ब्रम्हाकुमारीज आश्रम येथे आरोग्य तपासणी शिबीर
नागपूर, ५ मार्च/प्रतिनिधी

लता मंगेशकर हॉस्पीटलच्यावतीने मधुमेह व मोतीबिंदूमुक्त नागपूर अभियानांतर्गत ब्रम्हाकुमारीज आश्रम येथे आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. शिबिराच्या उद्घाटन समारंभाला माजी आमदार विनोद गुडधे पाटील, राजयोगिनी पुष्पारानी दीदी, राजीव महाजन, आशिष देशमुख, डॉ. सुब्रजीत दासगुप्ता, राजयोगिनी सावित्री दीदी व रजनी दीदी उपस्थित होते. परिसरातील रुग्णांच्या सेवेसाठी आशिष देशमुख यांनी जे व्रत हाती घेतले आहे, ते ईश्वरसेवेपेक्षा कमी नाही, असे प्रतिपादन विनोद गुडधे पाटील यांनी केले. ब्रम्हाकुमारी आश्रम प्रमुख राजयोगिनी पुष्पा दीदी यांनी, आशिष देशमुखांच्या आरोग्य अभियानाची प्रशंसा केली. याप्रसंगी आशिष देशमुख व डॉ. दासगुप्ता यांनी सर्व रुग्णांना उपचारसुविधा उपलब्ध करून दिल्या. आश्रमाद्वारे सर्व उपस्थितांना ३६५ सुविचारांचा संच भेट म्हणून देण्यात आला. याप्रसंगी भाऊसाहेब भांगे, डॉ. मोहन गुप्ते, डॉ. डोईफोडे, डॉ. देशमुख, डॉ. प्रभात निचकवडे, डॉ. सुनिता घिके, डॉ. मंजिरी ओक, दिनेश छाबा, डॉ. शिल्पा ठाकरे, डॉ. ठवरे, डॉ. अनिरुद्ध देवके उपस्थित होते.

‘घायाळ पाखरा’ बालनाटय़ाला दुसऱ्यांदा निर्मितीचे पारितोषिक
नागपूर, ५ मार्च/प्रतिनिधी

राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने आयोजित राज्य बालनाटय़ स्पध्रेच्या अंतिम फेरीत नागपूर शहरातील वीरेंद्र गणवीर लिखित ‘घायाळ पाखरा’ या बालनाटय़ाने दुसऱ्यांदा निर्मितीचे पारितोषिक पटकावले आहे. ‘घायाळ पाखरा’ या बालनाटय़ास निर्मितीच्या द्वितीय पारितोषिकासह अन्य सहा पुरस्कारांमध्ये दिग्दर्शनाचा द्वितीय पुरस्कार सुहास खंडारे, नेपथ्य़ाचा दुसरा पुरस्कार सुरेंद्र वानखेडे यांना जाहीर झाला आहे. श्रृती लोखंडे हिला आई या भूमिकेसाठी तर, अतुल सोमकुंवर याला भिमाच्या भूमिकेकरता अभिनयाचे रौप्य पदक घोषित झाले आहे. तसेच, अभिनयाचे गुणवत्ता प्रमाणपत्र कुमार इंगळे यांना मिळाले आहे. गेल्या वर्षी वीरेंद्र गणवीर यांच्या ‘नगं रं बाबा शाळा’ या नाटकास राज्यातून प्रथम पारितोषिक मिळाले होते.

बावणे कुणबी समाजाचा २७ एप्रिलला सामूहिक विवाह सोहोळा
नागपूर, ५ मार्च / प्रतिनिधी

बावणे कुणबी समाजाच्यावतीने २७ एप्रिलला सामूहिक विवाह सोहोळा आयोजित करण्यात आला आहे. या १६ व्या सामूहिक विवाह सोहोळा कार्यालयाचे उद्घाटन माजी सचिव भगवान कानतोडे यांच्या हस्ते करण्यात आले. समाजातर्फे या कार्यक्रमासाठी संयोजक म्हणून भोजराज बानते यांची निवड करण्यात आली आहे. आतापर्यंत झालेल्या सामूहिक विवाह सोहोळ्यांमध्ये समाजातील २४८ जोडप्यांचे विवाह पार पडले. या सोहोळ्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी २ एप्रिलपूर्वी कार्यालयाशी संपर्क साधावा. उद्घाटन कार्यक्रमाला समाजाचे कार्याध्यक्ष राजेंद्र भुते, उपाध्यक्षा ममता भोयर, डॉ. विलास रेहपाडे, राजू गोडबोले, सुनंदा चामट, विष्णु भुते, सुनील कुकडे, डॉ. माधवी रेहपाडे, बळीराम झंझाड, निर्मला कानतोडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या विवाह सोहोळ्यात कुठल्याही शाखेतील कुणबी व मराठा बांधव सहभागी होऊ शकतात.

महिला दिनानिमित्त रविवारी कार्यक्रम
नागपूर, ५ मार्च / प्रतिनिधी

अखिल भारतीय महिला सांस्कृतिक संघटनेच्यावतीने रविवार, ८ मार्चला दुपारी १२.३० वाजता अयोध्यानगरातील जुन्या राममंदिरात जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेच्या जिल्हा सचिव संगीता पवार व मुख्य वक्तया म्हणून जिल्हा अध्यक्ष नंदिनी भोंडे उपस्थित राहतील. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून दीनानाथ ज्युनिअर कॉलेजच्या माजी प्राचार्य लीली मुखर्जी उपस्थित राहतील. महिलांनी या कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

फुटबॉल स्पर्धेत परिमंडळ दोनचा संघ विजयी
नागपूर, ५ मार्च / प्रतिनिधी

शहर पोलिसांतर्फे आयोजित जातीय सलोखा फुटबॉल स्पर्धेत परिमंडळ दोन संघ अव्वल ठरला. त्याने परिमंडळ तीन संघाचा पराभव केला. पोलीस मुख्यालयाच्या शिवाजी स्टेडियमवर रविवारी दुपारी अंतिम सामना झाला. परिमंडळ दोन व तीन या दोन संघात हा सामना रंगला. परिमंडळ दोनने २-०ने विजय मिळवला. अंतिम सामन्यात पहिला गोल निशांत कलाकोटी याने ४६व्या मिनिटाला तर, दुसरा गोल ५७ मिनिटाला सुशांत भिवगडे याने केला़ पोलीस जिमखान्यात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत पोलीस आयुक्त प्रवीण दीक्षित यांच्या हस्ते विजेत्या संघाला पुरस्कार देण्यात आला. सहपोलीस आयुक्त बाबासाहेब कंगाले, उपमहापौर किशोर कुमेरिया, अतिरिक्त पोलीस आयुक्त मधुकर गावित, अनूपकुमारसिंह, शांताराम वाघमारे, पोलीस उपायुक्त प्रकाश पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. विजयी व उपविजयी संघाला चषक व पारितोषिके प्रदान करण्यात आली़ सहायक पोलीस आयुक्त वामन खरात यांनी आभार मानले.

वर्षां उसगावकरच्या हस्ते शिल्पा दुबेचा सत्कार
नागपूर, ५ मार्च / प्रतिनिधी

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘स्पंदन’ युवा महोत्सवात नागपूर होमिओपॅथी महाविद्यालयातील विद्यार्थिनी शिल्पा संजय दुबे हिने वक्तृत्व आणि कार्टून स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला. तिचा वसंतराव देशपांडे स्मृती सभागृहात अभिनेत्री वर्षां उसगावकर हिच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. शिल्पा ही माजी आमदार कमलाप्रसाद दुबे यांची नात आहे. दिलीप गादेवार, डॉ. मधु अग्रवाल, डॉ. बालपांडे, डॉ. अभिलाष त्रिपाठी, डॉ. घुगे, डॉ. पंकज मेश्राम, डॉ. अश्विनी लक्षणे, डॉ. प्राची काणे आदींनी शिल्पाचे अभिनंदन केले.

तिरळे कुणबी समाजाचा वधू-वर मेळावा
नागपूर, ५ मार्च / प्रतिनिधी

तिरळे कुणबी समाजाच्यावतीने जगनाडे चौकातील शांतीदेवी सभागृहात नुकताच उपवर वधू-वर परिचय व पालक मेळावा संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर पुष्पा घोडे, माजी उपमहापौर रघुनाथ मालीकर, नगरसेविका कल्पना डवरे यांच्या हस्ते संत शिरोमणी तुकाराम महाराज व डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला हार घालून कार्यक्रमाला सुरुवात झाली. मेळाव्यामध्ये मराठय़ांना आरक्षण द्यावे पण, ओबीसींची आरक्षणातील टक्केवारी कमी करू नये, त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे, असा ठराव मांडण्यात आला. मेळाव्याकरिता प्रामुख्याने अमरावती, अकोला, नांदेड, मुंबई, छिंदवाडा, भोपाळ येथील समाजबांधव पाल्यांसह उपस्थित होते. उपवर वधूवरांच्या पालकांनी प्लॉट नं. १०२, शिवकृपा गरोबा मैदान, नागपूर, ९४२३६३६३६७ या भ्रमणध्वनी क्रमांकावर किंवा ६५०९४०३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.

भाच्याने केला मामाचा खून
नागपूर, ५ मार्च / प्रतिनिधी

आईला शिवीगाळ केल्याच्या कारणावरून एकाने मामाच्या डोक्यावर काठीने वार करून त्याला ठार केल्याची घटना अरोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खात येथे घडली. रणधीर उकाराम मेंढे (४५) असे मामाचे नाव असून विलास ईश्वर पटले (२८) असे आरोपी भाच्याचे नाव आहे. त्याला अटक केली आहे. सहा महिन्यापूर्वी रणधीर मेंढे यांनी वडिलोपार्जीत शेती विकली व आलेल्या रकमेतून बहिण भावंडात हिस्स्याची वाटणी केली. बुधवारी दुपारी १.३० वाजता रणधीर मेंढे आणि त्याचा भाचा विलास ईश्वर पटले हे दोघे गावातील गांधी चौकात उभे होते. याचवेळी विलासची आई सरस्वती तेथे आली. तिला पाहताच रणधीर मेंढे याने ‘तू शेतीचा हिस्सा घेणार नव्हती, आता कशी घेत आहे’ असे बोलून तिला शिवीगाळ केली. आईला होत असलेली शिवीगाळ पाहून ईश्वर संतप्त झाला व त्याने जवळील काठीने मामाच्या डोक्यावर वार केला. त्यात मामा रणधीर गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच मरण पावला. याप्रकरणी प्राप्त तक्रारीवरून अरोली पोलिसांनी खूनाचा गुन्हा नोंदवून विलास पटले याला अटक केली.