Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ६ मार्च २००९
नवनीत

जी व न द र्श न
जहालपणा

 

मक्का शहरात ज्यावेळी मुहम्मद पैगंबर साहेबांचा जन्म झाला त्यावेळी फक्त अरब देशांतच नव्हे, तर संपूर्ण जगात मानवतावादाचा अस्त झाला होता. जगाची सत्ता क्रूर आणि दुष्ट शासकांच्या हातात होती. जे धर्माच्या नावाखाली आम जनतेची पिळवणूक करत असत. जवळपास हीच परिस्थिती संपूर्ण अरब देश आणि मक्का शहराचीही होती. तिथल्या रहिवाशांना कअबागृहामुळे इतरांवर वर्चस्व प्राप्त झाले होते. मुहम्मद पैगंबर साहेबांचा जन्म ज्या कबिल्यात (टोळीत) झाला तो कुरैश. त्यांना आपल्या वंशाचा आणि कुलीनतेचा फार अभिमान होता, कारण ते प्रेषित हज़्‍ारत इब्राहिमचे वंशज होते. ते कअबागृहाचे मान्यवर विश्वस्त होते. दरवर्षी भरणारी हज्ज यात्रा त्यांच्या देखरेखीखाली पार पडायची. त्यांचे आपले कुलदैवत होते, कारण त्यांच्यात एकेश्वरवादाची संकल्पना असतानासुद्धा मूर्तिपूजाही प्रचलित होती. इतर सरदारांनीसुद्धा लूटमारचा पेशा म्हणून स्वीकार केला होता. त्यांना कष्टाची भाकर नको होती. त्यांना लुटीचा माल हवा होता, ते चक्रीव्याज घ्यायचे आणि कर्ज घेणाऱ्याच्या खानदानाची विल्हेवाट लावून टाकायचे. त्यांना स्त्रीसंतान नको होते. नवजात कन्यांना ते जमिनीत जिवंत पुरून टाकायचे. मद्यपान, जुगार, पैशाकरिता गोरगरिबांना लुटणे, वेठबिगार, गुलामगिरी, क्षुल्लक कारणावरून शंभर-शंभर वर्षे चालणारे युद्ध, युद्धकैद्यांना हाल-हाल करून ठार मारणे, मुले, महिला व वृद्धांचा आदर न करणे, चोरी, वस्तू खरेदी करून त्याची किंमत न देणे, व्यापाऱ्यांची फसवणूक करणे, आश्रय न मिळालेल्या आणि कमकुवत प्रवाशांना लुटणे, महिलांना बेअब्रू करणे, निषिद्ध असतानासुद्धा कअबागृहाच्या आवारात जनावरांची हत्या करणे आणि देवदेवतांना त्यांचे रक्त व मांस चढविणे, रंगभेद करणे आणि श्रीमंतांना उच्च सामाजिक दर्जा देणे वगैरे असंख्य गुन्हे होते. ज्यामुळे संपूर्ण मानवी समाजात हाहा:कार माजला होता आणि लोक एका संतुलित युगाची प्रतीक्षा करीत होते.
अनीस चिश्ती

कु तू ह ल
चंद्रकंप
पृथ्वीवर जसे भूकंप होतात तसे चंद्रावर ‘चंद्रकंप’ होतात का? चंद्रावर ज्वालामुखी आढळले आहेत का?
होय, चंद्रावरही भूकंप होतात! ‘नासा’ या संस्थेनं राबवलेल्या प्रत्येक अपोलो मोहिमेत चंद्रावर भूकंपमापन यंत्रं ठेवण्यात आली आहेत. अशी एकूण सहा यंत्रं चंद्रभूमीवर कार्यरत होती. त्यांनी याबाबतीत अतिशय मौलिक अशी माहिती पुरवलेली आहे. विशेष म्हणजे हे भूकंपमापक अगदी कमी तीव्रतेच्या भूकंपाचीही नोंद करू शकतात. याचं कारण म्हणजे चंद्रावर समुद्र नाहीत. त्यामुळे भरती-ओहोटी, त्सुनामी, वादळं - काहीच नाही. त्यामुळे चंद्राच्या पृष्ठभागाला या कारणांमुळे हादरे बसण्याचा प्रश्नच नाही. म्हणजे जे काही हादरे बसतील ते केवळ भूकंपामुळेच. हे हादरे दोन रिश्टरपेक्षा कमी असतात. कशामुळे होतात हे भूकंप? त्याची तीन कारणं सांगता येतील. पहिलं कारण म्हणजे चंद्राच्या पोटात होणारी हालचाल. याला आपण चंद्रावरचा नैसर्गिक भूकंप म्हणू शकतो. एखादा मोठा अशनी चंद्रावर येऊन आदळला तरीही सौम्य भूकंप होऊशकतो. म्हणजे हे झालं दुसरं कारण. अपोलो यानांमधून काही निरुपयोगी वस्तू चंद्राच्या पृष्ठभागावर टाकून देण्यात आल्या होत्या. या वस्तू मोठय़ा असल्यानं त्यामुळेही कृत्रिम भूकंप झाले होते. चंद्रावरच्या भूकंपाचं वैशिष्टय़ हे की, या लहरी पृथ्वीवरील लहरींप्रमाणे लगेच विरून जात नाहीत. त्या सुमारे एक तासभर सक्रिय असतात. त्यामुळे त्यांचं मापन करणं तुलनेनं सोपं असतं. चंद्राचा अंतर्भाग अगदी एकसंध किंवा सलग नसावा. त्यामुळे या लहरी अनेकदा परावर्तित होऊन आतल्या आत फिरत असाव्यात, असा अंदाज आहे. चंद्रावर सध्या कोणताही जागृत ज्वालामुखी नाही. पण एके काळी -म्हणजे काही कोटी वर्षांपूर्वी- तेथे अनेक ज्वालामुखी असले पाहिजेत. चंद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या विवरांवरून हा अंदाज निश्चितपणे करता येतो.
गिरीश पिंपळे
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
मायकेल अ‍ॅंजेलो
युरोपात प्रबोधनाच्या काळात साहित्याप्रमाणे कलेच्याही क्षेत्रात वास्तवता आली. या काळात संगमरवरी दगडात ‘डेव्हीड’चे शिल्प कोरून जरी तो थांबला असला तरी इतिहासात शिल्पकार म्हणून त्याचे नाव कायमचे कोरले गेले असते, त्या मायकेल अँजेलोचा जन्म ६ मार्च १४७५ रोजी इटलीत झाला. मातृत्वाच्या सुखाला तो जन्मत:च पारखा झाला. त्या काळातील विख्यात चित्रकार डोमेनिको यांच्या कार्यशाळेत तो दाखल झाला. या काळात फ्लॉरेटा शहराचा प्रमुख लॉरेन्झी याने त्याचे गुण हेरले आणि त्याला शिल्पकृती अभ्यासण्याची संधी उपलब्ध करून दिली. ‘बॅटल ऑफ लॅपिथ्झ अँड शेंटॉर्झ’ हे त्याचे पहिले शिल्प. या शिल्पातून त्याने मानवी विवेकाने पाशवी शक्तीचा केलेला पराभव शिल्पित केला. यानंतर त्याने ‘व्हॅटिकन पिएटा’, ‘डेव्हीड मोझेस,’ ‘डाईंग स्लेव्ट’ अशी एक नव्हे, दोन नव्हे २७ भव्यदिव्य शिल्पे संगमरवरी दगडात निर्माण केली. वास्तुशिल्पकार म्हणूनही तो जगविख्यात आहे. ‘पिआझा डेल कॅपिडोगलिओ’ या इमारतीचे त्याने नूतनीकरण केले. रोममधील ‘सेंट पीटर्स चर्च’ हे त्याच्या वास्तुशिल्पकलेच्या कामाचा कळस ठरला. चित्रकार म्हणूनही त्याने आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला होता. त्याचं ‘सिस्टाईन चॅपलचं’ छत व भित्तिचित्र जगप्रसिद्ध आहे. त्याच्यामध्ये एक कवीसुद्धा दडला होता. ‘कम्प्लीट पोएम्स अँड सिलेक्टेट लेटर्स ऑफ मायकेल अँजेलो’ हा त्याच्या कवितांचा संग्रह प्रसिद्ध आहे. वयाच्या ९० व्या वर्षी १४ फेब्रुवारी १५६४ रोजी त्याचा मृत्यू झाला.
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
चिमणा, चिमणी आणि पिल्ले
गळय़ावर काळा ठिपका मिरवणारा गलेलठ्ठ चिमणा आणि त्याची सडसडीत अंगाची शेलाटी चिमणी माझ्या घराची कसून तपासणी करत होते. माळय़ावर घर करायचे त्यांनी निश्चित केले. सुतळय़ांचे तुकडे, कापूस, काडय़ा, प्लॅस्टिकचे तुकडे आणून त्यांची वास्तू उभी राहू लागली. एके दिवशी सकाळी चहा पिताना बांगडय़ांच्या किणकिणाटासारखी नाजूक किणकिण कानावर पडली. चिमणी आणि नवे पाहुणे- बाळ-बाळंतीण सुखरूप होते. चिमणा तर कधी चिमणी बाहेर पडे. बाळांसाठी काहीतरी चोचीत घेऊन लगबगीने घरटय़ाकडे येत. पिलांना एकटे ठेवून फार काळ ते जात नसत. एके दिवशी सकाळी धप्पदिशी आवाज झाला. फडफडाट ऐकू आला. चिमणीचे एक पिल्लू माळय़ावरून खाली आपटले होते. घरटय़ाबाहेर का आले? माळय़ावरून कसे पडले कुणास ठाऊक? धडपडत आडोसा शोधत ते भांडय़ाच्या कपाटाखाली निपचित झाले. काय करावे? आर्याने छोटी टोपली आणली. त्यात मऊ कापड, कापूस घातला. वाकून कपाटाखाली हात घालून त्याला स्पर्श केला. तसे ते विलक्षण केकाटले. तो हात, तो स्पर्श, वास त्याला अनोळखी होता. धडपडत, फरफटत ते दूर सरकले. त्याचा एक पंख जायबंदी झाला होता. दुसरा पंख फडफडत होता. आम्ही दोघींनी त्याला अलगद रुमालात घेतले आणि टोपलीत ठेवले. पिलांचे आई-बाबा अले. पिलू घरटय़ात नाही म्हणून त्यांनी ओरडून, हाका मारून गोंधळ केला. अखेर त्यांना खाली टोपलीत ठेवलेले बाळ दिसले. त्या दिवसापासून चिमणा-चिमणी पिलाला टोपलीच्या कडेवर बसून भरवू लागले. जखमी पिलाला आधी भरवून ते माळय़ावरच्या पिलांना भरवायचे. आर्या शाळेतून आली की, स्वयंपाकघरातल्या टोपलीकडे धावायची. ते तिचे लाडके खेळणे झाले. पिलाला दिवसातून दोन-चार वेळा पाहिल्याशिवाय मलाही चैन पडत नसे. एके दिवशी संध्याकाळी मी बाहेरून घरी आले. आर्याने रडवेल्या सुरात धावत येऊन सांगितले, ‘आई, पिल्लू टोपलीत नाही.’ इकडेतिकडे गेले का म्हणून घरभर शोधले. पिलाचा पत्ता नव्हता. चिमणा-चिमणी पिलासाठी खाणे घेऊन परतली. नेहमीप्रमाणे आधी टोपलीपाशी आली. रिकामी टोपली पाहून दोघे बराच वेळ टोपलीभोवती घिरटय़ा घालत राहिली. मग मात्र त्यांनी नाद सोडला. माळय़ावरच्या पिलांना भरवून ती दोघे खिडकीतल्या गजावर जाऊन बसली. मग चिवचिवाट करत उडून बाहेर गेली. कदाचित लंगडय़ा पंखाचे पिलू समर्थपणे जगू शकणार नाही म्हणून हे घडले असावे. जगण्यास लायक तो जिवंत राहतो, हा जंगलचा कायदा इथेही पाळला गेला. चिमणा-चिमणी खचून गेले नाहीत. रोज येऊन माळय़ावरच्या पिलांना भरवत राहिले. काही काळाने पुन्हा माळय़ावर नाजूक किलबिल ऐकू आली. पुन्हा चिमणा-चिमणी पिलांना चोचीतून चारा आणून भरवू लागले.
या सृष्टीत काहीच कायमचे नाहीसे होत नाही. एक जाते, दुसरे जन्माला येते. वाटय़ाला आलेले जीवन, त्यातल्या निराशा, अपयश, दु:ख स्वीकारून पक्ष्यांसारखे आनंदाने गाणे गात नाही का जगता येणार?
आजचा संकल्प : मी अपयश, दु:ख, निराशा यांनी खचून जाणार नाही.
ज्ञानदा नाईक

dnyanadanaik@hotmail.com