Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ६ मार्च २००९

परीक्षित घेतोय दहावीची परीक्षा !
पनवेल/प्रतिनिधी

‘अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत आशा, किनारा तुला पामराला..’ कवी कुसुमाग्रज यांच्या या काव्यपंक्ती गुरुवारी पनवेलमधील परीक्षित दिलीप शाह या १६ वर्षीय विद्यार्थ्यांने अक्षरश: सार्थ केल्या. पनवेलमधील वि. खं. विद्यालयाच्या पटांगणात गुरुवारी सकाळी दहा वाजता दहावीच्या विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची लगबग सुरू असताना टिळक रोड मित्रमंडळाची जीवनरथ रुग्णवाहिका दाखल झाली आणि सर्वाच्या भुवया उंचावल्या गेल्या.

घणसोली येथे मलनिस्सारण केंद्रास ग्रामस्थांचा विरोध
बेलापूर/वार्ताहर :
घणसोली सेक्टर-१५ येथे सिडकोतर्फे मलनिस्सारण केंद्र (एचटीपी) उभारण्यात येणार आहे. या केंद्रास येथील ग्रामस्थांनी प्रखर विरोध दर्शविला असून, प्रसंगी सिडकोविरुद्ध आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.

दुरुस्तीसाठी पावणे उड्डाणपुलाची एक मार्गिका बंद
बेलापूर/वार्ताहर :
सिडकोने बांधलेल्या पावणे उड्डाणपुलाची पुरती दुरवस्था झाली असून, या पुलाच्या दुरुस्तीसाठी गुरुवारपासून वाशीहून ठाण्याकडे जाणारी मार्गिका चार महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या उड्डाणपुलाचे काम करताना सिडकोने योग्य खबरदारी न घेतल्यामुळे काही वर्षांतच उड्डाणपुलावरील सर्वात वरील काँक्रिटच्या थराला भेगा पडल्या होत्या. त्यामुळे या पुलावर मोठमोठे खड्डे पडून काँक्रीटमधील सळ्या बाहेर आल्या होत्या. या प्रकारामुळे अपघातांच्या घटनेत वाढ झाली होती. सिडकोने किरकोळ दुरुस्ती केल्यानंतर नुकताच हा पूल महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला होता. आता मनपाने हा पूल मोठय़ा दुरुस्तीसाठी घेतला असून, यासाठी एक कोटी ४० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. वाशी-ठाणे मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यावर ठाणे-वाशी मार्गिका दुरुस्तीसाठी घेण्यात येणार आहे. या पुलावरील सर्वात वरील काँक्रीटचा थर काढून त्यावर २५ मि.मी.चा मास्टिक सल्फाटचा थर टाकण्यात येणार आहे. या दुरुस्तीच्या कामामुळे एपीएमसीकडून पामबीचमार्गे ठाण्याकडे जाणारी हलकी वाहने कोपरी सिग्नल येथून डावीकडे वळण घेतील, तसेच जड व अवजड वाहने अरेंजा चौकातून उजव्या बाजूला वळण घेऊन ठाण्याकडे जातील, असे वाहतूक पोलीस विभागातर्फे सांगण्यात आले.

नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त संघटनेचा निवडणुकीवर बहिष्कार
बेलापूर/वार्ताहर :
प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्यासाठी वाजवी दर आकारला जात नसल्याने येथील खारी-कळवे बेलापूर विभाग शेतकरी समाज संघटनेने लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. १९९४ साली संघटनेचे प्रतिनिधी व मुख्यमंत्री, सिडको अधिकारी यांच्या बैठकीत अत्यल्प दरात गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याचे ठरले होते. मात्र २००४ साली सिडकोच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बाजारभावाप्रमाणे ही घरे नियमित करण्याचा ठराव मंजूर झाला. त्यास संघटनेने प्रखर विरोध केल्याने त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. त्यानंतर पुन्हा ऑक्टोबर २००८ मध्ये किमतीत फेरफार करण्यात आला; मात्र याहीवेळी प्रकल्पग्रस्तांची मागणी दुर्लक्षित करण्यात आली. आता याही ठरावास संघटनेने विरोध दर्शविला असून तो फेरविचारार्थ मंत्रिमंडळाकडे प्रलंबित आहे. नवी मुंबईत माथाडी तसेच अन्य घटकांचे योग्यरीतीने पुनर्वसन केले गेले; मात्र नवी मुंबई वसविण्यासाठी कवडीमोल भावाने जमिनी घेतलेल्या शेतकऱ्यांना उपेक्षित ठेवण्यात आल्याचे मत शेतकरी समाज संघटनेचे अध्यक्ष मोरेश्वर पाटील यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे अत्यल्प दरात घरे नियमित न केल्यास लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

पाडुरंग कांबळी यांचा अमृतमहोत्सव
प्रतिनिधी :
सहकार चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते पांडुरंग कांबळी यांचा अमृतमहोत्सव सोहळा येत्या १२ मार्च रोजी साजरा करण्यात येत आहे. या सोहळ्यासाठी आमदार जंयत पाटील, ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर, मीनल मोहाडीकर आणि गंगाराम गवाणकर उपस्थित राहणार आहेत. वल्लभ संगीत विद्यालय, गुरुकृपा हॉटेल समोर, सायन येथे हा सोहळा संध्याकाळी ६.३० वाजता होणार आहे. कांबळी यांच्या मित्रपरिवाराने उपस्थित राहण्याचे आवाहन स्मिता गोलतकर, पराग कांबळी यांनी केले आहे.