Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ६ मार्च २००९

ऊर्जाबचतीसाठी ‘राष्ट्रीय सेवा योजने’चा पुढाकार
अविनाश पाटील / नाशिक

जिल्हा परिषद व ग्रामपंचायतींच्या सहकार्याने नाशिक तालुक्यातील २२ गावे हागणदारीमुक्त करणे, निफाड तालुक्यातील कोठुरे गावात वृक्ष संवर्धनासाठी विशेष मोहीम, तिरडशेतसारख्या आदिवासी गावाला ग्रामस्वच्छतेसाठी मिळालेल्या पुरस्कारात महत्वपूर्ण योगदान, ठिकठिकाणी गांवतळ्यांसह रस्त्यांची दुरूस्ती आणि ऊर्जा बचतीसाठी पुढाकार.. पुणे विद्यापीठातंर्गत नाशिक जिल्ह्य़ात या सर्व उपक्रमांमध्ये खंबीरपणे उभी राहिली ‘राष्ट्रीय सेवा योजना’. योजनेच्या श्रमसंस्कार अर्थात हिवाळी शिबिरांमुळे ही किमया साधली गेली.

निवडणूक प्रक्रियेवर नजर ठेवणार ‘मायक्रो ऑब्झर्वर्स’
प्रतिनिधी / नाशिक

आगामी लोकसभा निवडणूक पारदर्शक पद्धतीने व्हावी याकरिता निवडणूक आयोगाने संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी यंदा प्रथमच ‘मायक्रो ऑब्र्झव्हर’ अर्थात सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्याची अनोखी संकल्पना मांडली आहे. मतदान केंद्राचे बारकाईने निरीक्षण करण्याची प्रमुख जबाबदारी या सूक्ष्म निरीक्षकांवर टाकली जाणार असून ज्या मतदान केंद्रांवर ७५ टक्क्य़ांहून अधिक मतदान होईल, तसेच ज्या केंद्रांवर ओळखपत्रांचे वाटप कमी प्रमाणात वाटप झाले आहे, यासारख्या विविध ठिकाणी या माध्यमातून लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.

मंगल भव..
भावडय़ा : मंगल भव अमंगल हाऽऽ री.. राम, सियाराम ..
भाऊराव : आज सक्काळी सक्काळी भजन आणि तेही चक्क तुझ्या तोंडी,
होय रे भावडय़ा!
भावडय़ा : या इलेक्शनमध्ये आता भजनंच ऐकावी लागणार डॅड,
मंगल भव ..

भाऊराव : भजनाचा आणि निवडणुकीचा काय संबंध रे भावडय़ा?

‘लोकप्रतिनिधी किमान पदवीधर असावा’
आपल्या मतदारसंघाचा इतिहास, भूगोल, सामाजिक व आर्थिक प्रश्नांचा अभ्यास असणारा लोकप्रतिनिधी नाशिकसाठी सध्याच्या स्थितीत नितांत गरजेचा आहे. मतदारसंघातील शेती व्यवसायाशी निगडीत विविध समस्या, दळणवळणाच्या सोयी-सुविधांतील अडचणी, शिक्षण, आरोग्य, सहकार यासारख्या सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत विषयांचा तो जाणकार हवा. तरच त्या त्या विषयातील समस्या सोडविण्यासाठीच्या उपाययोजना, रखडलेल्या विविध कामांना गती देणे अशी कामे तो समर्थपणे करू शकेल.

नाशिक-नांदगाव बस मनमाड रेल्वे स्थानकात आणण्याची मागणी
नांदगाव / वार्ताहर

नाशिक ते नांदगाव ही रात्री साडेनऊ वाजता मनमाड येथे येणारी बस प्रवाशांच्या सोयीसाठी मनमाड रेल्वे स्थानकातून सोडण्यात यावी, अशी मागणी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य एम. सलीम अहमद यांनी केली आहे. रात्री नऊ ते दहा या कालावधीत नंदीग्राम एक्स्प्रेस, शटल, औरंगाबाद पॅसेंजर, नांदेड पॅसेंजर या गाडय़ा मनमाड रेल्वे स्थानकात येतात. या गाडय़ांमधून नांदगांव येथे उतरणाऱ्या प्रवाशांना मनमाड बस स्थानकात सदर बस पकडण्यासाठी धावपळ करावी लागते. त्यामुळे लहान मुले व महिलांची मोठी गैरसोय होते. बस मनमाड रेल्वे स्थानकातून सोडल्यास एसटीच्या उत्पन्नात वाढ होईल व प्रवाशांचीही सोय होईल, असे अहमद यांनी म्हटले आहे.

व्याख्यानातून गिरीश पिंपळेंनी घडविली चंद्राची सफर
नाशिक / प्रतिनिधी

नाशिक शिक्षक प्रसारक मंडळाच्या पुष्पावती रुंग्ठा कन्या विद्यालय व जु. स. रुंग्ठा विद्यालयात विज्ञान दिनानिमित्त आर. वाय. के. कॉलेजचे खगोलतज्ज्ञ प्रा. गिरीश पिंपळे यांचे ‘चांद्रयात्रा’ विषयावर व्याख्यान झाले. कार्यक्रमाला मुख्याध्यापक अरूण गायकवाड व डॉ. स्वाती टोकेकर उपस्थित होते. पिंपळे यांनी स्लाईड शो द्वारे भारताने ‘चांद्रयान’ अवकाशात पाठवितानाचे सर्व टप्पे, चंद्रावरील वेगवेगली छायाचित्रे याविषयी रंजक माहिती दिली. चंद्रावर अनेक खड्डे आहेत, चंद्र कसा तयार झाला, चंद्रावर वेगवेगळ्या धातूंचा शोध कसा लागला याविषयी स्लाईडद्वारे उद्बोधन केले. विद्यार्थ्यांना जणू चंद्राची सफरच घडवली. विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसनही त्यांनी केले. संस्थेच्या खजिनदारांनी पिंपळे यांचे आभार मानले.

बंजारा क्रांती दलातर्फे रास्ता रोकोचा इशारा
नंदुरबार / वार्ताहर

केंद्र आणि राज्य शासनाने केलेल्या अन्यायाची माहिती बंजारा क्रांती दलातर्फे राबविण्यात येत असलेल्या राज्य संदेश अभियानाद्वारे दिली जात असून रेणके आयोगाच्या शिफारशी मान्य कराव्यात यासाठी दलातर्फे १७ मार्च रोजी संपूर्ण राज्यात रास्ता रोको करण्यात येणार असून या आंदोलनात मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन दलाचे प्रदेशाध्यक्ष श्रावण चव्हाण यांनी केले आहे.
येथील लोकमान्य टिळक जिल्हा वाचनालयाच्या सभागृहात झालेल्या बैठकीत बंजारा क्रांती दलाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख सुभाष नायक, जिल्हाध्यक्ष कृष्णा राठोड, मुख्य संघटक बदुलाल राठोड, सरचिटणीस चंद्रकांत जाधव, प्रदेश संघटक डॉ. साईदास चव्हाण, सुरेश पवार आदी उपस्थित होते. गेल्या अर्धशतकापासून बंजारा समाजाने काँग्रेसवर प्रेम केले. परंतु रेणके आयोगा बाबत केंद्रामध्ये सत्ता असूनही विमुक्त भटक्यांसह बंजारा समाजासाठी चर्चा न होणे ही बाब खंत वाटणारी आहे, असे डॉ. चव्हाण यांनी सांगितले. आता मात्र रेणके आयोगाच्या शिफारशींचा सकारात्मक विचार न झाल्यास देशांतील १५ कोटी बंजारा आणि विमुक्त भटक्या समाजासह राज्यातील एक कोटी बंजारा समाज सरकार विरोधात मतदान करतील, असा इशाराही त्यांनी दिला. समाजाच्या स्थलांतराचा प्रश्न तसाच राहिला. समाजाला सत्तेमध्ये सामावून घेणाऱ्या पक्षास दल मदत करेल. रेणके आयोगाच्या शिफारशी मान्य न केल्यास १७ मार्च रोजी राज्यात बंजारा क्रांती दलातर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असे जिल्हाध्यक्ष कृष्णा राठोड, दिलीप राठोड, युवा आघाडीचे अध्यक्ष श्रावण चव्हाण यांनी केले आहे.

नंदुरबार जिल्हा स्काऊट गाईडतर्फे पारितोषिक वितरण
नंदुरबार / वार्ताहर

स्काऊट शिक्षकांनी प्रशिक्षणासाठी सदैव तयार राहाणे गरजेचे आहे, व्यक्तिमत्व विकासासाठी प्रशिक्षणाचा मोठा उपयोग होतो. त्याचा लाभ शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना होतो, असे प्रतिपादन स्काऊटचे जिल्हा मुख्य आयुक्त डॉ. राहुल चौधरी यांनी केले. नंदुरबार जिल्हा स्काऊट संस्थेतर्फे वक्तृत्व, निबंध, गीतगायन चित्रकला आदी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाहीर हरिभाऊ पाटील, गाईडच्या रत्ना रघुवंशी, व्ही. बी. इंदिरा आदी उपस्थित होते. चित्रकला स्पर्धेत ५१, निबंध स्पर्धेत ४२, गीतगायन स्पर्धेत चार गट, वक्तृत्व स्पर्धेत आठ जणांनी सहभाग घेतला. डॉ. रामय्या, सिंधु सावंत, सोमजी पटेल, अश्विन पाटील, प्रकाश सोनवणे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. स्काऊटमध्ये १० ते ३० वर्ष सेवा केलेल्या ३८ जणांना गौरव पदक देऊन सन्मानित करण्यात आले. जिल्हा संघटक महेंद्र वसावे, ज्ञानेश्वर सावंत, पी. एन. माळी यांनी संयोजन केले तर हेमंत पाटील यांनी प्रास्ताविक केले. राजेश शहा यांनी आभार मानले.

द्राक्षांसाठी मनमाडहून बोगी आरक्षित करण्याची मागणी
मनमाड / वार्ताहर

सध्या द्राक्षाचा हंगाम जोरात सुरू असताना मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकातून परप्रांतातील द्राक्ष, डाळींब पाठविण्यासाठी बोगी आरक्षित करूनही ती उपलब्ध होत नसल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. पुणे-हावडा, आजाद हिंद एक्स्प्रेस, कुर्ला-राजेंद्रनगर या गाडय़ांना तातडीने बोगी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी येथील कार्टिग एजंट व रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप नरवडे यांनी निवेदनाव्दारे केली आहे. मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकातून द्राक्ष व डाळींब परप्रांतात पाठविता यावेत. या मालाला चांगला भाव मिळावा यासाठी रेल्वेने पुणे-हावडा व आझाद हिंद गाडीस द्राक्ष हंगामासाठी बोगी देण्याचे मान्य केले होते. प्रत्यक्षात हंगाम सुरू असताना बोगी देण्यास प्रशासन टाळाटाळ करीत आहे. शेतकरी व व्यापारी यांचे रेल्वे अधिकाऱ्यांच्या गलथानपणामुळे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.

जागतिक महिलादिनी सुनांचा सत्कार
जळगाव / वार्ताहर

येत्या ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त येथे ९० वर्षांवरील सासू-सासऱ्यांना सांभाळणाऱ्या सुनांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. येथील ला. ना. शाळेतील भैय्यासाहेब गंधे सभागृहात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम होणार असल्याचे अक्षय वधू-वर सूचक मंडळाच्या संचालिका सुहासिनी देवळे यांनी कळविले आहे.