Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

परीक्षित घेतोय दहावीची परीक्षा !
पनवेल/प्रतिनिधी

‘अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत आशा, किनारा तुला पामराला..’ कवी कुसुमाग्रज यांच्या या काव्यपंक्ती गुरुवारी पनवेलमधील परीक्षित दिलीप शाह या १६ वर्षीय विद्यार्थ्यांने अक्षरश: सार्थ

 

केल्या.
पनवेलमधील वि. खं. विद्यालयाच्या पटांगणात गुरुवारी सकाळी दहा वाजता दहावीच्या विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची लगबग सुरू असताना टिळक रोड मित्रमंडळाची जीवनरथ रुग्णवाहिका दाखल झाली आणि सर्वाच्या भुवया उंचावल्या गेल्या. या गाडीच्या पुढच्या सीटवर बसलेल्या विजया शाह आपल्या मुलाला घेऊन गाडीतून उतरल्या, तेव्हा त्याचे स्वागत करण्यासाठी मुख्याध्यापक के. डी. म्हात्रे पुढे सरसावले. हाडांच्या ठिसूळपणाची जन्मजात व्याधी असलेला परीक्षित दहावीच्या परीक्षेसाठी आला आहे, ही माहिती म्हात्रेसरांनी उपस्थितांना दिल्यानंतर सर्वजण अवाक झाले. त्यानंतर या जिद्दी विद्यार्थ्यांची कहाणी ऐकल्यानंतर सर्वानी त्याला मनोमन नमस्कारच केला. इतर मुले परीक्षा देतात, इथे परिक्षितच दहाव्या इयत्तेची परीक्षा घेत आहे.
शाळेने दिलेल्या विशेष वर्गखोलीत परीक्षितला नेण्यात आले, तेथे घालण्यात आलेल्या बिछान्यावर त्याला ठेवण्यात आले व त्याच्या आईने त्याची कहाणी सांगितली. या व्याधीमुळे परीक्षितची शारीरिक वाढ झाली नसली तरी बुद्धीने तो हुशार आहे. त्याला दरवर्षी सरासरी ८० टक्के गुण मिळतात हे त्यांनी सांगितल्यावर उपस्थित मंडळी थक्क झाली. परीक्षितचे चौथीपर्यंतचे शिक्षण गुजरातमधील जामनगर येथे झाले. पाचवीत पनवेलला आल्यानंतरही तो गुजरातीमध्ये शिकला. सहावीपासून मात्र त्याला वि. खं. विद्यालयाच्या मराठी माध्यमात घालण्यात आले. दरम्यान त्याच्या वडिलांचे अचानक निधन झाले, परंतु शिलाईकाम करून विजयाबाईंनी त्याचे संगोपन केले. परीक्षितचे मामा अशोक शाह व मामी हेमलता यांचे आजवर मोलाचे सहकार्य लाभले, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
नववीपर्यंत त्याला आपणच शिकवले. दहावीसाठी मात्र शिकवणी लावली. शिकवणीचे तसेच शाळेचे शिक्षक त्याला घरी नियमित येऊन शिकवत असे त्या म्हणाल्या. शाळेने त्याला शाळेत न येता घरी अभ्यास करण्याची सवलत दिली आहे, तसेच फीमध्येही पूर्ण सवलत दिली आहे. दहावीच्या परीक्षेसाठी त्याला तासाला वीस मिनिटे जास्त दिली जाणार आहेत, परंतु रायटरच्या मदतीशिवाय तो सर्व उत्तरपत्रिका लिहिणार असून ही कौतुकास्पद बाब आहे, असे म्हात्रेसरांनी नमूद केले. दहावीमध्ये किती टक्के गुण मिळवणार, असे विचारले असता ८५ टक्के, असे ठाम उत्तर परीक्षितने दिले. त्याचा हा आत्मविश्वास सर्वसामान्य विद्यार्थ्यांनाही लाजविणारा आहे. दहावीनंतर वाणिज्य शाखेत प्रवेश घेणार असून शेअर्स, व्यापार, राजकारण व ज्योतिषशास्त्र यात मला आवड आहे, असे सांगताना त्याचे डोळे आनंदाने चमकत होते.