Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ६ मार्च २००९

कामगारांना चिंता टाळेबंदीची
वार्ताहर / धुळे

काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाने आपल्या अंतर्गत असलेल्या राज्यातील पाच कापड गिरण्या बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रात एकेकाळी सोन्याचा धूर काढणारी कापड गिरणी म्हणून नावलौकिक प्राप्त केलेल्या धुळे अर्थात प्रताप कापड गिरणीचाही समावेश आहे. त्यामुळे ही गिरणी कधीही कुलूपबंद होईल, अशी चिंता कामगारांना सतावत आहे. दरम्यानच्या काळात गिरणीची मालमत्ता टप्प्या-टप्प्याने विकली जात असल्याचा आरोप कामगारांनी केला होता. गिरणीची अवस्था चिंताजनक असल्याने शेकडो कामगार स्वेच्छा निवृत्ती स्वीकारण्यास इच्छुक असले तरी राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळ याबाबत कोणताही निर्णय घेण्यास तयार नाही. या विदारक परिस्थितीमुळे राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या मुंबईतील ज्या आठ कापड गिरण्या बंद पडल्या आणि त्यानंतर कामगारांना कित्येक वर्षे पगारापासून वंचित रहावे लागले.

उमेदवार निश्चितीचा घोळ सर्वच पक्षांमध्ये
धुळे / वार्ताहर

पुनर्रचनेत धुळे लोकसभा मतदार संघाचे पूर्णपणे दोन भाग झाले असल्याने धुळे व नाशिक जिल्ह्य़ात प्रभावशील असलेल्या उमेदवारांचा शोध सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केला आहे. आपली आघाडी किंवा पक्ष कसा योग्य आहे, याविषयीची ठोस अशी कारणेही त्यांच्यातर्फे जनतेसमोर ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी गेल्या वेळी झालेल्या विधानसभा, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचाही आधार घेतला जात आहे. लोकसभेच्या १९५७, १९९६ आणि १९९९ या तीन पंचवार्षिक निवडणुकांचा अपवाद वगळता धुळे जिल्ह्य़ावर काँग्रेसचीच सत्ता राहिली आहे. १९५७ च्या निवडणुकीत भारतीय जनसंघाचे उत्तमराव पाटील यांनी विजय मिळवला होता.

जळगाव पीपल्स बँक सलग तिसऱ्या वर्षी अव्वल
वार्ताहर / जळगाव

येथील जळगाव पीपल्स को-ऑप बँकेने आपल्या ठेवी आणि कर्जाचा मिळून एकूण सातशे कोटी रुपये व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. तसेच बँकेला सलग तिसऱ्या वर्षी नाशिक विभागातून उत्कृष्ट बँकेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या निकषानुसार या बँकेला अव्वल दर्जा देण्यात आला आहे. नुकतेच या बँकेच्या नव्या उद्घाटनप्रंसगी डॉ. अशुतोष केळकर व मोहन फालके उपस्थित होते. या बँकेला दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप बँक फेडरेशन तर्फे सलग तिसऱ्या वर्षी सहकार क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल नाशिक विभागातून वसंतदादा पाटील पुरस्कार देण्यात आला आहे. इनोव्हेशन सेल्फ सव्‍‌र्हिस अंतर्गत भारतात प्रथम पारितोषिक मिळविणारी जळगाव पीपल्स ही एकमेव बँक आहे.

अमळनेर तालुक्यातील शाळांमध्ये शौचालयांचे बांधकाम त्वरीत करण्याचे आदेश
वार्ताहर / अमळनेर

संपूर्ण स्वच्छता अभियानांतर्गत अमळनेर तालुक्यात १४४ शौचालयांचे बांधकाम २० मार्चच्या आत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहे. या शौचालयांमुळे तालुक्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. तसेच पिण्याच्या पाण्याच्या ४० टाक्यांचे कामही १५ मार्चच्या आत पूर्ण करण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत. तालुक्यात १३३ प्राथमिक शाळा आहेत. सर्व शिक्षा अभियानातंर्गत यापूर्वी काही शाळांमध्ये शौचालयांचे बांधकाम झालेले असले तरी अनेक शाळांमध्ये ही व्यवस्था नव्हती. त्यानंतर सर्वच शाळांकडून यासंदर्भातील माहीती मागवून संपूर्ण स्वच्छता अभियानातंर्गत शौचालयाची उभारणी करण्याचे प्रशासनाने ठरविले. त्यानुसार मुला-मुलींसाठी स्वतंत्र शौचालय अशा स्वरूपात १४४ शौचालयांचे बांधकाम अमळनेर तालुक्यात मंजूर झाले आहे. याशिवाय ज्या शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, अशा ४० शाळांचा प्रस्ताव मागवून तातडीने यापूर्वी मंजुरी देण्यात आली. पिण्याच्या पाण्याच्या टाकीसाठी शासन व लोकवर्गणीतून मिळालेल्या ३० हजार रूपयांच्या रकमेत एका टाकीचे बांधकाम केले जाणार आहे. तर एका शौचालयाच्या युनिटसाठी २० हजार रूपये शासनाकडून मिळणार आहे. पिण्याच्या पाण्याची टाकी व शौचालय बांधकामाची जबाबदारी संबधित शाळांच्या ग्रामशिक्षण समित्यांवर सोपविण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे व गट समन्वयक रामकृष्ण बावीस्कर यांनी दिली. शौचालय व पाण्याच्या टाकीमुळे अमळनेर तालुक्यातील सर्व शाळा स्वच्छतेत शंभर टक्के यशस्वी होणार आहेत. त्यामुळे २० मार्चच्या आत स्वच्छता अभियानात तालुक्यातील शाळा अग्रभागी राहतील, यासाठी कामांना सुरूवात झाली आहे.