Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ६ मार्च २००९
विशेष

मोदींचा गुजरात..
अन् पवारांचा महाराष्ट्र..

गुजरातचे मुख्यमंत्री नरेन्द्र मोदी यांनी गेल्या आठवडय़ात महाराष्ट्रात तीन सभा घेतल्या आणि महाराष्ट्र भाजपाचं लोकसभा निवडणूक प्रचाराचं रणशिंग फुंकलं.. त्यांची पहिली सभा झाली गोंदियाला, दुसरी पिंपळगावला आणि तिसरी ठाण्याला.. या तीन सभांमधल्या पहिल्या दोन सभा थेट ग्रामीण भागातल्या होत्या, तर तिसरी शहर आणि ग्रामीण भागाच्या उंबरठय़ावरची होती.. मोदींनी या तीनही सभात लक्ष्य बनवलं ते शरद पवारांना.. ते स्वाभाविकही होतं..

विदर्भातला उन्हाळा म्हटला की, भल्याभल्यांच्या नाकाला रक्ताची धार केव्हा लागेल सांगता येत नाही. यंदा तर मागील वर्षी झालेल्या अपुऱ्या पावसामुळे या उन्हाळ्याचे आणि सोबतीला पाणीटंचाईचे चटके विदर्भाला सुमारे डिसेंबरपासूनच जाणवू लागले आहेत. आता तर मार्च महिना ४० अंशाकडे झेपावू लागला आहे. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, पुसद, अकोला आणि खामगाव अशा काही शहरांमध्ये पारा सहजतेने ४५ अंशापर्यंत दरवर्षीच गेलेला असतो परंतु, मागील वर्षी झालेल्या अपुऱ्या पावसामुळे हा उन्हाळा संतप्त झालेल्या साधूप्रमाणे जाणवेल, असे दिसते.

महात्मा गांधी यांच्या वापरातील काही वस्तूंच्या न्यूयॉर्कमध्ये होऊ घातलेल्या लिलावावरून भारतातील वातावरण ढवळले आहे. अहमदाबादच्या नवजीवन ट्रस्टने हा लिलाव रोखण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. महात्माजींचे पणतू तुषार गांधी तसेच काही काही अनिवासी भारतीयांनी या वस्तू घेण्यासाठी निधी उभारण्याचाही विचार मांडला आहे. केंद्र सरकारने मुत्सद्दी पातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. या सर्व पाश्र्वभूमीवर दस्तुरखुद्द महात्मा गांधी यांनी वस्तू व वस्तूसंग्रहाच्या निस्सारतेबाबत मांडलेल्या विचारांची आठवण झाली. विशेष म्हणजे ज्या नवजीवन ट्रस्टने न्यायालयात धाव घेतली आहे त्या ट्रस्टनेच १९६७ साली प्रसिद्ध केलेल्या ‘द माइंड ऑफ महात्मा गांधी’ या सुमारे सहाशे पानी ग्रंथात हे विचार ग्रथित आहेत. महात्माजींनी अनेक ठिकाणी केलेली भाषणे, त्यांचे लेख व मुलाखती यातून विषयवार वर्गवारी करून आर. के. प्रभू आणि यू. आर. राव यांनी हा ग्रंथ परिश्रमपूर्वक सिद्ध केला आहे. त्यात महात्मा गांधी म्हणतात- ‘राजकारणात येण्याआधी खऱ्या अर्थाने निरपेक्ष, सत्यवादी व नीतीमान होण्यासाठी काय करायला हवे याचा मी विचार केला. तेव्हा माझ्याकडे माझे म्हणून जे काही आहे त्याचा त्याग मी केला पाहिजे, हेच जाणवले. सुरुवातीला हा संघर्ष कठीण होता. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठीही. अर्थात हा विचार येताच मी माझ्याकडील वस्तुंचा तात्काळ त्याग करू शकलो, हेही खरे नाही. प्रथम त्या त्यागाची गती संथ होती. कित्येकदा तर क्लेशही झाला. पण जसजसे दिवस जाऊ लागले तेव्हा मला जाणवले की ज्या गोष्टींना मी माझे म्हणत व मानत होतो ते तर निव्वळ ओझे होते. या त्यागानंतर एकवेळ तर अशी आली की या त्यागाचा सकारात्मक आनंद मी उपभोगू लागलो. मग तर वस्तूच माझ्याजवळ फिरकेनाशा झाल्या. मला असा अनुभव येऊ लागला की माझ्या खांद्यावरचं ओझं उतरलं आहे. आता मी लोकसेवेचे कार्य अधिक मोकळेपणाने आणि आनंदाने करू शकत आहे. या आनंदाच्या कारणाचा शोध घेताना उमगले की जोवर मी माझे म्हणून काही जवळ बाळगत असेन तर अवघ्या जगापासून त्या गोष्टीचे रक्षण करण्याची धडपड माझ्या वाटय़ाला येते.. वस्तूंच्या मालकीमुळे त्या वस्तूंची भविष्यात वासलात लावण्याची जबाबदारीही नाहक माथी येते.’
अर्थात याचा अर्थ महात्माजींनी वापरलेल्या वस्तूंना ऐतिहासिक मोल नाही, असे नाही. त्या वस्तू जपल्या पाहिजेत पण आज या वस्तूंसाठी आटापिटा करणारे नेते गांधीजींचे जे कालसंगत विचार आहेत ते आपल्या जीवनात उतरवण्यासाठी काडीमात्र प्रयत्न का करीत नाहीत, हा प्रश्न सलू लागला आहे. या लिलावाला आणखी एक छटा आहे ती ‘स्लमडॉग’ची. या चित्रपटातील गरीबी पाहून मी व्यथित झालो. भारताने अशा गरीबांसाठी ठोस तरतुदीची हमी दिली तर या वस्तू मी भारताकडे द्यायला तयार आहे, असे या वस्तूंचा सध्याचा मालक जेम्स ओटिस याने म्हटले आहे. ‘स्लमडॉग मिलिऑनर’मध्ये अमेरिकन चलनी नोटेवरील छायाचित्र ओळखणाऱ्या नायकाला पोलीस कोठडीतला इन्स्पेक्टर भारतीय नोट दाखवून विचारतो, ‘इनको पहचानते हो?’ नायक नाही म्हणतो. इन्स्पेक्टर एक चपराक लगावून सांगतो ‘गांधीजी’. नायक म्हणतो, हा नाम तो सुना है! महात्माजींचे नाव केवळ चलनी नाण्यासारखे वापरले जाते पण प्रत्यक्ष कृती व विचारांमधून त्यांना हद्दपार केले जाते. राजकारणात त्यांच्याच वारसदारांकडून त्यांच्या विचारांची हत्या होते, याची बोच निर्माण करणारा हा प्रसंग. जे गांधीजी संपत्तीपासून जाणीवपूर्वक दूर राहिले त्यांची प्रतिमा केवळ भारतीय चलनी नोटांवर उरावी आणि तेवढय़ाच कारणाने ते रावापासून रंकापर्यंत आणि नेत्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वाच्या हृदयाशी जपले जावेत, हा दैवदुर्विलास आहे.
उमेश करंदीकर
umeshkaran9@gmail.com