Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ६ मार्च २००९

चाकणमधील एक विवाह समारंभ..हॅलो, लांडेसाहेब येथे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आले आहेत. तुम्हीही लवकर या..असा कार्यकर्त्यांचा संदेश गेला आणि राष्ट्रवादीचे शिरूर लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार आमदार विलास लांडे समारंभाला पोहोचले आणि एकमेकांच्या विरोधात लढणाऱ्या या उमेदवारांची भेट झालीच. शिवाय दोघांनीही हस्तांदोलन करून एकमेकांना शुभेच्छाही दिल्या.

पवारांची पाठ वळताच शिरूरमध्ये इच्छुकांची रस्सीखेच
पुणे, ५ मार्च/विशेष प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची शिरूर मतदारसंघातून पाठ वळण्याचे संकेत मिळताच इच्छुकांची संख्या झपाटय़ाने वाढू लागली असून, आता शिरूरच्या जागेसाठी जोरदार रस्सीखेच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आमदार विलास लांडे यांच्या पाठोपाठ माजी आमदार सूर्यकांत पलांडे, पोपटराव गावडे आणि पुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रकाश म्हस्के यांनी त्यासाठी शड्डू ठोकला आहे.

बसपाच्या ‘सोशल इंजिनिअरिंग’मुळे बिघडली उमेदवार निवडीची ‘केमिस्ट्री’
पुणे, ५ मार्च/खास प्रतिनिधी

बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णीना उमेदवारी देऊन बहुजन समाज पक्षाने पुण्यात चालविलेल्या ‘सोशल इंजिनिअरिंग’च्या हत्तीमुळे इतर पक्षांच्या उमेदवार निवडीची ‘केमिस्ट्री’ बिघडली आहे! आता ‘मराठा’ऐवजी ‘ब्राह्मण कार्ड’चा पर्याय स्वीकारल्यास तो किती फायदेशीर ठरेल, याच्या विचारामध्ये ‘थिंक टँक’ गुंतले आहेत.

डीएसके गप्पा!
पुणेरी पाटय़ा जगभर प्रसिद्ध आहेत. इतकेच काय, त्यावर आधारित संकेतस्थळाला हजारो जणांनी भेट देऊन उदंड प्रतिसाद दिला आहे. अस्सल सदाशिवपेठी पुणेरी कॉमेंट्सबद्दलही काय बोलावे महाराजा! कितीही ‘सोशल इंजिनिअरिंग’चे वारे वाहिले, तरी ही सदाशिवपेठी संस्कृती म्हणजे पुण्यनगरीचा स्थायीभाव. आता हेच पाहा ना.. सार्वजनिक क्षेत्रातील प्रत्येक व्यक्ती, संस्थेची काही ना काही तरी वैशिष्टय़े असतात.

‘काँग्रेस, भाजपची ‘वोट बँक’ संपुष्टात’
पुणे, ५ मार्च/ प्रतिनिधी

‘‘सध्याची पिढी राजकारणाबाबत वेगळा विचार करीत असल्याने पुण्यात काँग्रेस व भाजपची ‘वोट बँक’ संपली आहे. या मतदार संघात बहुजन समाज पक्ष वेगळा प्रयोग राबवित असल्याने परंपरागत मते गृहीत धरण्याची या पक्षांची परंपरा खंडित होणार आहे,’’ असे मत पुणे लोकसभा निवडणुकीतील बसपाचे नियोजित उमेदवार डी. एस. कुलकर्णी यांनी आज ‘लोकसत्ता’ला दिलेल्या खास मुलाखतीत व्यक्त केले.

आयबीएम कंपनीच्या तरुणीवर सामूहिक बलात्काराची फिर्याद खोटी?
सलील ऊरूणकर, पुणे, ५ मार्च / प्रतिनिधी

आयबीएम दक्ष या बीपीओ कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी हवेली पोलीस करीत असलेला तपास अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. तर दुसरीकडे, संबंधित मुलीवर बलात्कार झाल्याचे आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाले असले तरी तिच्या सामूहिक बलात्कार झाल्याची फिर्याद हा बनाव असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.

बेफिकीर वाहन चालवून जखमी करणाऱ्यास सक्तमजुरी
पुणे, ५ मार्च / प्रतिनिधी

वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून हयगयीने वाहन चालविणाऱ्या राजेंद्र नथुराम जोशी (वय ३५, रा. कराड) याला तीन महिन्याची सक्त मजुरीची प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. बी. भागवत यांनी शिक्षा ठोठावली आहे. याबाबत अंकुश भिकू वायकर (रा. दहिसर) यांनी ही फिर्याद दिली. १९ जुलै २००६ रोजी पुणे बंगळुरू दृतगती महामार्गावर कात्रज बायपासवर अपघात घडला. आरोपी क ंटेनर चालक आहे. त्याने पुढे जाणाऱ्या एशियाड बसला वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून धडक दिली. त्या धडकेने बसमध्ये असलेले फिर्यादी जोशी यांच्यासह अन्य चारजण जखमी झाले. त्यांना जखमी केल्याप्रकरणी पोलिसांनी चालकाविरुद्ध खटला दाखल केला. त्याबाबत सहायक सरकारी वकील अ‍ॅड. लक्ष्मण मैंदाड यांनी चार साक्षीदार तपासले. न्यायालयाने विविध कलमांखाली एकत्रित शिक्षा भोगण्याचे आदेश देत तीन महिन्यांची सक्तमजुरीसह २६०० रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.

पिंपरीत ८३ पथारीवाल्यांवर कारवाई
पिंपरी, ५ मार्च / प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने िपपरी, मोरवाडी परिसरातील ८३ पथारी व्यावसायिकांवर आज कारवाई करण्यात आली. या वेळी दोन कंपन्यांच्या सीमािभतीही हटविण्यात आल्या.
आयुक्त आशिष शर्मा यांच्या आदेशानुसार पालिकेचे कार्यकारी अभियंता दीपक ठुबे यांच्या नेतृत्वाखाली दिलीप भोईटे, शशिकांत दवंडे, दिनेश पाठक, प्रवीण धुमाळ, रवींद्र सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली. या वेळी दोन जेसीबींचा वापर करण्यात आला. अतिक्रमण विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्यासह १२ पोलीस कर्मचारी आणि अतिक्रमण पथकातील दहा मजुरांचा सहभाग होता. िपपरी, फिनोलेक्स कंपनी, मोरवाडी, पिंपरी उड्डाणपूल परिसरातील व्यावसायिकांना आजच्या कारवाईत हटविण्यात आले. फिनोलेक्स केबल आणि बाफना मोटर्स या कंपन्यांच्या सीमाभिंती हटविण्यात आल्या. या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार नाही, याची खबरदारी घेण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

बॅग हिसकावून दीड लाखांची रोकड चोरली
पुणे, ५ मार्च / प्रतिनिधी

ज्येष्ठ नागरिकाच्या हातातील बॅग हिसकावून चोरटय़ाने दीड लाखांची रोकड चोरून नेल्याची घटना लष्कर भागामध्ये घडली. इस्ट स्ट्रीटवर आज दुपारी पावणेबाराच्या सुमारास ही घटना घडली.
नरसिंह चिंतामणी बाटले (वय ६०, रा. गंगापार्क, मुंढवा रस्ता) यांनी याबाबत लष्कर पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरटय़ाविरुद्ध गुन्हा दाखल केला. इस्ट स्ट्रीटवरील ‘थाउजंड ओक्स’ या हॉटेलसमोर बाटले हे रस्ता ओलांडत होते. त्या वेळीमोटारसायकलीवरील दोन चोरटे बाटले यांच्या हातातील बॅग हिसकावून पळून गेले. बॅगमध्ये दीड लाख रुपयांची रोख रक्कम होती. लष्कर ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आर.के. कळंबे या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

वयोवृद्ध महिलेला बसची धडक;संतप्त जमावाची बसवर दगडफेक
हडपसर, ५ मार्च/वार्ताहर

हडपसर गावात पुणे-सोलापूर रस्ता ओलांडत असताना वयोवृद्ध महिलेला पीएमपीएमएल बसची जोरदार धडक बसून दुपारी सव्वा दोनच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात सुशीला वाघ (वय ६६, रा. हिंगणेमळा, हडपसर) ही महिला गंभीर जखमी झाली. अपघातग्रस्त महिलेला रिक्षाचालक प्रवीण कांबळे याने तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी संतप्त जमावाने दगडफेक करून दोन बसच्या काचा फोडल्यामुळे भागात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी बसचालक माणिक बबन गंगावणे (रा. ताडीवाला रोड, पुणे) या बसचालकाला पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.
अपघातानंतरच्या दगडफेकीचे वृत्त समजताच हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत सोनवणे, त्यांच्या सहकाऱ्यांना घेऊन तातडीने घटनास्थळी आल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
अशा अनेक घटना वारंवार होत असल्यामुळे नागरिक संतप्त झाले होते. पीएमपीएमएलच्या बसचालकाचा बेदरकारपणा वाढत असल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

वृद्धेचे मंगळसूत्र हिसकावले
पुणे, ५ मार्च / प्रतिनिधी

पायी चाललेल्या महिलेच्या गळ्यातील २७ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात चोरटय़ांनी हिसकावून चोरून नेले. घोरपडी येथे बी.टी. कवडे रस्त्यावर आज सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. जयश्री शांताराम कुलकर्णी (वय ६३, रा. घोरपडी) यांनी याबाबत वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक साठे या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

दिघीत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला
पिंपरी, ५ मार्च / प्रतिनिधी

दिघी मॅगझिनच्या मोकळ्या जागेत गुरुवारी दुपारी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. हा खुनाचा प्रकार असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दिघी मॅगझिनच्या मोकळ्या जागेत एक मृतदेह असल्याची माहिती तेथील रखवालादाराने विश्रांतवाडी पोलिसांना दिली. मृत व्यक्ती ३० ते ४० वयोगटातील असून त्याच्या अंगावर धारदार शस्त्रांनी वार केल्याच्या खुणा आहेत. कोणीतरी खून करून मृतदेह या मोकळ्या जागेत आणून टाकला असावा, अशा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. रात्री उशिरापर्यंत ओळख पटविण्याचे काम सुरु होते. मयत व्यक्तीच्या अंगात राखाडी शर्ट आणि पांढरे पट्टे असलेली राखाडी पॅन्ट आहे. एक तंबाखूची पुडी घटनास्थळी सापडली आहे. या संदर्भात, कोणाला काही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक अनिल घुगे यांनी केले आहे.

बंद नळयोजनेसाठी संयुक्त मोजणीचे काम पूर्ण
पिंपरी, ५ मार्च / प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या बंदनळ योजनेसाठी आवश्यक जमिनीच्या संयुक्त मोजणीचे काम आज पूर्ण करण्यात आले आहे. पवना धरणातून निगडीतील सेक्टर क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत बंदनळ योजनेद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी िपपरी पालिकेच्या वतीने ही योजना राबविण्यात येणार आहे. जवळपास ३६ किलमोमीटर लांबीच्या या योजनेसाठी जवळपास ४०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक जमिनींच्या संयुक्त मोजणीला २० फेब्रुवारीपासून सुरुवात झाली होती, ते काम आज पूर्ण झाल्याची माहिती पालिकेने आज पत्रकारांना दिली.