Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ६ मार्च २००९
राज्य

प्रभातच्या सुवर्णकाळाचे साक्षीदार बापू वाटवे यांचे निधन
पुणे, ५ मार्च/विशेष प्रतिनिधी

मराठी चित्रपटसृष्टीचा चालताबोलता इतिहास म्हणून ओळखण्यात येणारे मुरलीधर रामचंद्र ऊर्फ बापू वाटवे यांचे वृद्धापकाळाने आज निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. प्रभात चित्रनगरीच्या सुवर्णकाळाचे साक्षीदार होण्याचे भाग्य त्यांना लाभले होते. वाटवे यांच्या मागे चिरंजीव आणि कन्या असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. चित्रपटविषयक दर्जेदार लेखन करण्यात त्यांचा हातखंडा असला तरी त्यांनी चित्रपटनिर्मितीच्या अनेक अंगांमध्येही लीलया संचार केला होता.

महाडच्या डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या देखभालीकडे दुर्लक्ष
महाड, ५ मार्च/वार्ताहर

महाडमध्ये राज्य शासनाच्या समाजकल्याण आणि सामाजिक न्याय विभागाने उभारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या देखभालीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याने स्मारकातील वायरिंग पूर्णपणे जळून गेले असून, स्मारकातील सभागृहाचा वापरही गेल्या काही दिवसांपासून बंद करण्यात आला आहे. स्मारकाच्या देखभालीकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद खांबे यांनी केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडमध्ये चवदार तळ्याचा सत्याग्रह केला आणि महाड शहराला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले.

दूषित पाण्याच्या पुरवठय़ामुळे कापसाळवासीयांचे आरोग्य धोक्यात!
धीरज वाटेकर
चिपळूण, ५ मार्च
शहरानजीक असणाऱ्या कापसाळ गावात ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी १५ लाख ३५ हजार रुपये खर्च करून ग्रामपंचायतीने स्वजलधारा कार्यक्रमांतर्गत नळपाणी पुरवठा योजना राबविली आहे. मात्र लाखो रुपये खर्च पडलेली ही योजना सध्या दूषित पाण्याचा पुरवठा करीत असल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

वैभवसंपन्न कोकणभूमीचे चित्रकारांना व कलाकारांना आकर्षण
संगमेश्वर, ५ मार्च/वार्ताहर

वैभवसंपन्न कोकणभूमीचे चित्रकारांना, कलाकारांना खास आकर्षण असल्यामुळे कलाकार विविध प्रकारच्या चित्र व शिल्पांची निर्मिती करू शकतो. याच कोकणभूमीने अनेक नामवंत चित्रकार व शिल्पकार दिले आहेत, परंतु हे सर्व महान कलाकार आपल्या व्यवसायातून मोठमोठय़ा शहरातच रमले व त्यांनी आपल्या निसर्गसंपन्न जन्मभूमीकडे दुर्लक्ष केले याची मला खंत वाटते. ही उणीव तरुण कला विद्यार्थ्यांनी चित्रनिर्मिती करत भरून काढावी, असे उद्गार कलातपस्वी शिवाजीराव तुपे यांनी सावर्डे येथे बोलताना काढले.

गजानाम् मंद गतीस्वम्..
बसपा उमेदवार महंत सुधीरदास
नाशिक, ५ मार्च / प्रतिनिधी
हत्तीची चाल संथ असली तरी तो न थकता सातत्याने चालत रहातो आणि कुठेही न थांबता आपले इप्सित स्थळ गाठतो. बहुजन समाज पार्टी देखील ‘गजानाम् मंद गतीस्वम्’च्या धर्तीवर नाशिक लोकसभेच्या निवडणुकीला सामोरी जाण्यास सज्ज असून पक्षाचे इप्सित साध्य करण्यासाठी प्रबोधनाच्या माध्यमातून प्रचारास सुरूवात करण्यात आल्याची माहिती आचार्य महामंडलेश्वर श्रीमहंत सुधीरदास महाराज यांनी दिली. नाशिक लोकसभा मतदार संघातून बसपाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ‘लोकसत्ता’शी बोलताना त्यांनी प्रचारात हायटेक तंत्राचा अवलंब केला जाणार असल्याचे स्पष्ट करताना मायावती यांच्यासह पक्षाची दिग्गज मंडळी प्रचारसभांमध्ये सहभागी होणार असल्याचे सांगितले.

नाशिकमध्ये महिलादिनानिमित्त जिल्हास्तरीय बचत गट मेळावा
नाशिक, ५ मार्च / प्रतिनिधी

जागतिक महिला दिनानिमित्त नाशिक जिल्हा महिला बचत गट विकास सहकारी पतसंस्था व जिजाऊ महिला सेवाभावी संस्था यांच्यातर्फे आठ मार्च रोजी येथे सकाळी अकरा ते तीन या कालावधीत जिल्हास्तरीय महिला बचत गट मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
उद्योजक हेमंत राठी, नाशिक इंडस्ट्रियल अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे मानद सचिव धनंजय बेळे आणि जनशिक्षण संस्थेच्या प्रिया बेर्डे यांच्या उपस्थितीत महिला बचत गटाच्या उत्पादनांचे प्रदर्शन आणि उत्कृष्ट कार्य केलेल्या गटांचा सन्मानही यावेळी करण्यात येणार असल्याची माहिती संस्थापिका अश्विनी बोरस्ते यांनी दिली.

अवैधरीत्या वृक्षांची तोड; चौकशीची मागणी
नाशिकरोड, ५ मार्च / वार्ताहर

बांधकाम करण्यात अडथळा ठरणाऱ्या तब्बल २५ वृक्षांची तोड केल्याचा प्रकार येथील वृक्षप्रेमींनी उघडकीस आणला असून वृक्ष तोडण्यासंदर्भातील सर्व नियम धाब्यावर बसविणाऱ्या या प्रकाराची चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. बिटको महाविद्यालयासमोरील भूखंडावर एका बांधकाम कंपनीचे मॉल बांधणीचे काम सुरू आहे. सदर भूखंडाभोवती पत्र्याचे आवरण असून या जागेत सुमारे २५ अतिप्राचीन वृक्ष होते. त्यात चिंच, कडुलिंब, सुबाभूळ, बूच या शिवाय चंदनाची झाडे होती. या झाडांची तोड झाल्याचे समजताच अचल राजे, राजेश पंडित, नितीन रूईकर व अविनाश थिंगे यांनी तेथे धाव घेतली. या प्रकरणी त्यांनी महापालिकेच्या उद्यान विभागाशी संपर्क साधून तक्रार केली असता संबंधित खात्यातील विसपुते हे अधिकारी घटनास्थळी आले. वृक्षप्रेमींनी त्यांना ही परिस्थिती दाखविताच सदर कंपनीने महापालिकेकडे वृक्षतोडविषयी परवानगी मागितली होती व काही अटींवर ती देण्यात आली होती, असे त्यांनी स्पष्ट केले. तथापि, महापालिकेच्या अटी व नियम धाब्यावर बसविण्यात आल्याची तक्रार वृक्षप्रेमींनी केली आहे. चंदन झाड तोडण्यासाठी वनखात्याची परवानगी आवश्यक असताना अशी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नसून या प्रकरणी विकासकावर कारवाई करण्याची मागणी संबंधितांनी केली.