Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ६ मार्च २००९
क्रीडा

टीम इंडिया टॉप गिअरमध्ये!
वेलिंग्टन, ५ मार्च / पीटीआय

न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघाने ‘वन डे’ मालिकेतील पहिल्याच लढतीत विजयाने शुभारंभ केला असून ही विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी पाहुण्या भारताची मदार पुन्हा एकदा त्यांच्या भक्कम फलंदाजीवरच राहणार आहे. न्यूझीलंडविरुद्धची दुसरी लढत उद्या, शुक्रवारी रंगणार असून वेगवान गोलंदाज इशांत शर्माच्या ‘फिटनेस’चा अपवाद वगळता भारतीय संघाला दुसरी कुठलीही काळजी नाही. ट्वेन्टी-२० मालिकेत ढेपाळलेली भारताची प्रसिद्ध फलंदाजीची फळी पहिल्याच एकदिवसीय लढतीत अचानक बहरली. वीरेंद्र सेहवाग, सुरेश रैना आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी या आघाडीच्या फलंदाजांनी झुंजार अर्धशतके झळकावले.

मॅक्युलमच्या दुखापतीमुळे न्यूझीलंड चिंतेत
वेलिंग्टन : ब्रेंडन मॅक्युलमला झालेल्या दुखापतीमुळे न्यूझीलंडचा कर्णधार डॅनिअल व्हेटोरी चिंताग्रस्त झाला आहे. जखमी असला तरी मॅक्युलम उद्याच्या सामन्यात खेळू शकेल अशी आशा त्याने आज व्यक्त केली. व्हेटोरी म्हणाला की, मॅक्युलमची फिटनेस चाचणी झाली आहे. त्यात तो उद्याच्या लढतीत खेळू शकेल, असे स्पष्ट झाले आहे.

प्रतिस्पध्र्याच्या आव्हानाचा मुकाबला करण्यास सज्ज
सेहवागचा निर्धार
वेलिंग्टन, ५ मार्च / पीटीआय
न्यूझीलंडला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही नमवण्यास सज्ज आहोत असा आत्मविश्वास भारताचा धुवाँधार फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने व्यक्त केला आहे. मात्र पहिल्या पराभवानंतर किवी संघ जोरदार तयारी करीत आहे, हे विसरुन चालणार नाही असेही तो म्हणाला. सध्या न्यूझीलंडचा संघ फॉर्मात आहे. त्यांच्यातील प्रत्येक खेळाडूला सूर गवसला आहे. त्यामुळे या दौऱ्यात प्रतिस्पर्धी कडवे आव्हान उभे करतील याची खात्री होतीच. मात्र हे आव्हान पेलण्यास आम्ही समर्थ आहोत,असे सेहवाग म्हणाला.

पलटवार करायला आफ्रिका सज्ज

दरबान, ५ मार्च/ वृत्तसंस्था

मायदेशामध्ये ऑस्ट्रेलियाला धूळ चारून क्रिकेट विश्वात नंबर वन बनण्याचे स्वप्न जोहान्सबर्ग येथील पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भंगण्याच्या मार्गावर असले तरी दरबान येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात त्यांच्यावर पलटवार करून मालिकेत बरोबरी साधण्यासाठी यजमान दक्षिण आफ्रिकेचा संघ सज्ज झाला आहे.

मालिकेतील बरोबरीचाच इंग्लंडपुढे पर्याय!
पोर्ट ऑफ स्पेन, ५ मार्च / पीटीआय

बार्बाडोसमध्ये मोठमोठय़ा धावसंख्यांनिशी चौथी कसोटी अनिर्णित राखल्यानंतर आता शुक्रवारपासून येथील क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर सुरू होणाऱ्या मालिकेतील पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याकडे पाहुणा इंग्लंडचा संघ जिंकण्याच्या निर्धारानेच पाहात आहे. यजमान वेस्ट इंडिज संघाने १-० अशी आघाडी घेतल्यामुळे मालिका बरोबरी सोडविण्याच पर्याय आता इंग्लंडपुढे उपलब्ध आहे. इंग्लंडच्या संघात स्टीव्ह हार्मिसनच्या परतण्याबाबतही प्रशिक्षक अ‍ॅन्डी फ्लॉवर यांनी साशंकता प्रकट केली आहे. वेस्ट इंडिजने मात्र चौथ्या कसोटीतील आपल्या संघात कोणताही बदल केलेला नाही.

‘सोलापूर खो-खो’च्या नावानं चांगभलं!
प्रशांत केणी
मुंबई, ५ मार्च

पद आणि सत्ता कुणाला नको असते. सोलापूर जिल्ह्यावर अधिराज्य गाजविण्याच्या याच इष्रेपोटी सोलापूर जिल्हा खो-खो असोसिएशन ह्या जुन्या-जाणत्या संघटनेला बहिष्कृत करण्यात आले. त्यानंतर सोलापूर जिल्हा हौशी खो-खो असोसिएशनच्या नावाने काही असंतुष्ट पदाधिकाऱ्यांनी सत्ता काबीज केली. परंतु मुंबई उच्च न्यायालयाने जुन्या संघटनेच्याच नावाला कौल दिल्याने, पुन्हा सोलापूर अ‍ॅमेच्युअर खो-खो असोसिएशन या आणखी नव्या संघटनेचे बीज रोवले गेले.

थरंगा-थिलान अद्यापही हॉस्पिटलमध्ये; अन्य खेळाडू उपचारानंतर घरी परतले
कोलंबो, ५ मार्च / पी. टी. आय.

लाहोरमध्ये अतिरेक्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या थरंगा परनविटाना आणि थिलन समरवीरा यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, त्यांना पूर्ण बरे होण्यास किमान सहा आठवडे लागतील, असे सरकारी डॉक्टरांनी म्हटले आहे. छातीत गोळी घुसलेला परनविटाना आणि उजव्या पायात गोळी शिरलेल्या समरवीरा हे काल येथे दाखल झाल्यानंतर तासाभरातच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या दोघांना आठवडय़ाभरात घरी सोडण्यात येईल. दुखापतग्रस्त अन्य खेळाडूंना मात्र उपचारानंतर घरी पाठविण्यात आले असून, येत्या दोन आठवडय़ात ते नियमित सरावाला करू शकतील, असे क्रीडा मंत्रालयाच्या वैद्यकीय विभागाचे महासंचालक डॉ. गीतांजना मेंडिस यांनी सांगितले. यष्टीरक्षक- फलंदाज कुमार संगकारा, फिरकी गोलंदाज अजंता मेंडिस, सुरंगा लकमल, थिलिना तुषारा आणि सहाय्यक प्रशिक्षक पॉल फॅरब्रेस यांना किरकोळ जखमा झाल्या होत्या.
लाहोरमधील श्रीलंकेच्या जखमी खेळाडूंना सहाय्य करण्यासाठी मेंडिस हे पाकिस्तानात गेले होते आणि तेथून परतल्यानंतर सर्वच खेळाडूंची वैद्यकीय तपासणी करून केवळ सहा खेळाडूंना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते.

आमच्याविषयीची माहिती दहशतवाद्यांना देण्यात येत होती- मुरलीधरन
मेलबर्न, ५ मार्च / पीटीआय

आमच्याविषयीची खडान्खडा माहिती दहशतवाद्यांना पुरवण्यात येत होती असा, संशय श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन याने व्यक्त केला आहे. पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या श्रीलंकेच्या क्रिकेट संघावर मंगळवारी दहशतवाद्यांनी जीवघेणा हल्ला केला होता. त्यात श्रीलंकेचे सहा खेळाडू जखमी झाले होते. आमच्या सुरक्षिततेसाठी बसमध्ये एकही बंदूकधारी पोलीस नव्हता याकडेही मुरलीने लक्ष वेधले. जर आमच्यासमवेत किमान एखाददुसरा बंदूकधारी असता तर आम्हाला बचाव करणे सोपे झाले असते असे तो म्हणाला. आमच्यासमवेत चार पाच वाहने होती, असे सांगत मुरलीने ‘तो’ प्रसंग कथन केला. ‘‘त्या दिवशी आम्ही सकाळी ८.३० ला हॉटेलमधून बाहेर पडलो. तर पाकिस्तानच्या संघाने ८.३५ ला हॉटेल सोडले. तेथूनच उभय संघांचे दोन गट पडले. त्यामुळे गद्दाफी स्टेडियमकडे जाताना आमच्या प्रवासाची माहिती दहशतवाद्यांना पुरवली जात असण्याची शक्यता आहे. अचानक कोठूनतरी गोळ्या बरसू लागल्या. बसच्या दोन्ही बाजूंनी गोळ्याच्या फैरी झाडल्या जात होत्या. दहशतवाद्यांचे लक्ष सुरवातीला बस चालक होता. त्या गोळीबारात थिलन समरवीरा, थरंगा परानवीताना जबर जखमी झालेत. थरंगाच्या तर थेट छातीतच गोळी घुसली. मला तर तो आता वाचणार नाही अशीच भीती वाटत होती. संगकाराचा खांदाही गोळीचे लक्ष्य झाला. सर्वदूर रक्तच रक्त होते. ते दृश्य फारच भयावह होते.’’ जखमी खेळाडूंना बुधवारी मायदेशात आणण्यात आले. लगेचच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या ते सुखरुप असल्याचे मुरली म्हणाला.

सुरक्षा योजनेची योग्य अंमलबजावणी होत नव्हती -इंतिखाब आलम
कराची, ५ मार्च/ वृत्तसंस्था

पाकिस्तान आणि श्रीलंका संघासाठी जी सुरक्षा योजना आखण्यात आली होती त्या योजनेची योग्य अंमलबजावणी होत नव्हती, अशी तक्रार पाकिस्तानचे प्रशिक्षक इंतिखाब आलम यांनी लाहोर कसोटीदरम्यानच केली होती, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. पाकिस्तान संघातील सूत्रांनी सांगितले की, दोन्ही संघांसाठीच्या सुरक्षा व्यवस्थेतील काही गोष्टींबाबत श्री. आलम हे समाधानी नव्हते. दोन्ही संघांना हॉटेलमधून मैदानात नेताना व मैदानातून हॉटेलकडे परत आणताना दररोज वेगवेगळ्या रस्त्यांचा वापर करावा, अशी सूचना आलम यांनी पोलीस अधिकाऱ्यांना केली होती. असे असूनही सलग दोन दिवस दोन्ही संघांना एकाच रस्त्यावरून नेण्यात आले होते.
पाकिस्तानचा कर्णधार युनिस खान याने श्रीलंका संघाने हॉटेल सोडल्यानंतर पाच मिनिटांनी आपल्या संघाला मैदानाकडे नेण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयामुळेच पाक खेळाडू हल्ल्यातून वाचले. पाकिस्तान संघ त्यादिवशी फलंदाजी करणार होता. म्हणूनच खान याने पाच मिनिटे उशिरा जाण्याचे ठरविले. जो संघ क्षेत्ररक्षण करणार असतो तो संघ सर्वसाधारणपणे नेहमीच्या वेळेपेक्षा अगोदर मैदानात जात असतो, असे या सूत्रांनी नमूद केले.

बांगलादेशचा पाकिस्तान दौरा अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलला
ढाका, ५ मार्च / पीटीआय

पुढील सप्ताहात पकिस्तानात होणारा बांगलादेश क्रिकेट संघाचा दौरा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला असल्याची माहिती , बांगलादेश क्रिकेट मंडळाच्या सूत्रांनी दिली. मात्र हा दौरा कोणत्या कारणासाठी पुढे ढकलण्यात आला आहे हे मात्र मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले नाही. सरकारच्या सूचनेनुसारच हा निर्णय घेण्यात आल्याचे मंडळाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. उभय संघामध्ये ८ मार्चपासून दोन ट्वेन्टी -२० व पाच एकदिवसीय सामने होणार होते. दरम्यान पाकिस्तानात श्रीलंकेच्या खेळाडूंवर मंग़ळवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर लगेचच हा निर्णय घेण्यात आला आहे. बांगलादेशातही सैनिकांनी केलेल्या बंडामध्ये ५६ लष्करी अधिकाऱ्यांसह ७४ जण मरण पावले होते.

सायना व चेतन आनंद पहिल्या फेरीतच पराभूत
लंडन, ५ मार्च/पीटीआय

भारताच्या सायना नेहवाल व चेतन आनंद यांना ऑल इंग्लंड खुल्या बॅडिमटन स्पर्धेतील पहिल्या फेरीतच पराभवाचा धक्का बसला. महिला विभागात जागतिक क्रमवारीत पहिल्या पाच खेळाडूंमध्ये स्थान मिळविण्याच्या दिशेने आगेकूच करणाऱ्या सायनास फ्रान्सची खेळाडू होंगयान पेई हिने २१-१५, २१-१६ असे पराभूत केले. पुरुषांच्या विभागात इंग्लंडच्या अ‍ॅन्ड्रय़ु स्मिथ याने चुरशीच्या लढतीनंतर चेतनवर ६-२१, २१-१७, २१-१२ असा विजय नोंदविला.खांद्याच्या दुखापतीमुळे सायनाने नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतून माघार घेतली होती.

उन्हाळी बॅडमिंटन प्रशिक्षण शिबीर
मुंबई, ५ मार्च / क्री. प्र.

प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही ठाणे महापालिकेची सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजना, तसेच ठाणे शहर व जिल्हा बॅडमिंटन असो. यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यात एप्रिल-मे २००९ दरम्यान, विशेष बॅडमिंटन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. ज्येष्ठ प्रशिक्षक श्रीकांत वाड यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या प्रशिक्षण शिबिरात मूलभूत व प्रगत अशा दोन्ही स्तरांवर विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असून, त्यामध्ये खेळाडूंची नोंदणी सुरू झाली आहे. प्रगत शिबिर खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल, दादोजी कोंडदेव प्रेक्षागृह येथे १९ एप्रिल ते ३० मे या सहा आठवडय़ांच्या कालावधीसाठी आयोजित होणार असून, त्यात आधुनिक बॅडमिंटनची सारी प्रगत तंत्रज्ञाने शिकविण्यात येतील, तसेच क्रीडा मानसशास्त्र, आहारतज्ज्ञ इत्यादींचे खास मार्गदर्शन करण्यात येईल. दोन्ही शिबिरांच्या नोंदणीसाठी, तसेच अधिक माहितीसाठी मयूर घाटणेकर (०९३२०६६४०४०), व सुधाकर गद्रे (०२२- २५३३७८४९) यांच्याशी खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉलमध्ये संपर्क साधावा.