Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ६ मार्च २००९

दहावी व बारावीच्या परीक्षा काळात लोडशेडिंग राहणार नाही, असे आश्वासन ऊर्जामंत्री सुनील तटकरे यांनी देऊनही महावितरणच्या कल्याणमधील मुजोर अधिकाऱ्यांनी गुरुवारी पहिल्याच दिवशी दहावीच्या विद्यार्थ्यांचा अंत पाहिला. कल्याण-डोंबिवलीतील अनेक शाळांमधील बत्ती या काळात गुल होती. तक्रारी करूनही वातानुकूलित दालनात बसलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आम्ही मंत्र्यांनाही जुमानत नाही, हेच दाखवून दिले. महावितरणच्या पीआरओंचा नंबरही लागत नसल्याची तक्रार अनेकांनी केली.

टीएमटीत भत्तेच भत्ते चोहीकडे; वर्षांला तीन कोटींची लूट
संजय बापट

आर्थिक गर्तेत सापडलेल्या ठाणे परिवहन सेवेने (टीएमटी) महापालिकेकडे सुमारे ४३ कोटी रुपयांच्या अनुदानाची मागणी केली आहे. परंतु पालिकेकडून निधी घ्यायचा आणि त्याची सामूहिक लूट करायची, असा प्रघातच टीएमटीत पडला असून पाचवा वेतन आयोग लागू असतानाही प्रशासन आणि युनियन यांनी संगनमत करून तब्बल २१ भत्त्यांच्या माध्यमातून वर्षांला सुमारे तीन कोटी रुपये उकळण्याचा उद्योग सुरू केला आहे.

‘एशियाड’मुळे प्रवाशांची हाडे खिळखिळी!
ठाणे/प्रतिनिधी :
एस.टी. महामंडळाच्या ताफ्यातील एशियाड गाडय़ा एकेकाळी आरामदायी प्रवासासाठी प्रसिद्ध होत्या. आता मात्र या गाडय़ांमधून प्रवास करणे जिकिरीचे होत चालले असून, साध्या गाडीपेक्षा जादा भाडे देऊन प्रवाशांना शारीरिक अन् मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.२७ वर्षांपूर्वी दिल्ली येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने एस. टी. महामंडळाने पांढऱ्या चकचकीत एशियाड गाडय़ा रस्त्यावर आणल्या.

शहीद स्मारकाच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपतींना निमंत्रण!
ठाणे/प्रतिनिधी :
वाडा येथे उभारण्यात येत असलेल्या हुतात्मा स्मारकाचे काम प्रगतिपथावर असून या स्मारकाचे उद्घाटन करण्यासाठी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
हुतात्मा स्मारक समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश शर्मा यांनी ही माहिती दिली.मुंबईसह देशातील अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांचे भव्य स्मारक उभारण्याचा संकल्प स्मारक समितीने केला आहे. माजी जिल्हा पोलीस अधीक्षक नवल बजाज यांच्या हस्ते त्याचे भूमिपूजनही करण्यात आले आहे.त्यावेळेपासून स्मारकाचे काम वेगाने सुरू असून लवकरच ते पूर्णत्वास जाईल, असा विश्वास शर्मा यांनी व्यक्त केला आहे.

साईबाबा मंदिरात आर्थिक गैरव्यवहार
सहधर्मादाय आयुक्तांचा दोषारोप
ठाणे/प्रतिनिधी :
प्रति शिर्डी म्हणून प्रसिद्ध असलेल्या वर्तकनगरमधील साईबाबा मंदिरातील निधीचा गैरवापर, सरकारी जागेवर अनधिकृत बांधकाम केल्याचा दोषारोप सहधर्मादाय आयुक्त एन.व्ही. देशमुख यांनी साईभक्त सेवा समितीचे विश्वस्त तथा शिवसेनेचे नगरसेवक बळीभाई नईबागकर व इतर १३ जणांवर ठेवला आहे. त्यामुळे मंदिरावर लवकरच प्रशासकाची नेमणूक होईल. ठाण्यातील साईबाबा मंदिराचा हा वाद अनेक वर्षांपासून गाजत होता. मंदिराचे विश्वस्त व नगरसेवक बळीभाई नईबागकर यांच्या कारभाराविरोधात काँग्रेसचे विक्रांत चव्हाण यांनी भ्रष्ट्राचाराचे आरोप करून धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार करून पाठपुरावा केला. तसेच शासकीय जागेवर बांधलेल्या अनधिकृत बांधकामाविरोधात आवाज उठविल्याने मोठे वादळ उठले होते. अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी महापालिकेने साईभक्त सेवा समितीच्या विश्वस्तांना नोटीस बजावली होती. याबाबतची ठाणे सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी चौकशी करून विश्वस्तांवर ठपका ठेवला होता. हे प्रकरण मुंबईतील सहधर्मादाय आयुक्तांकडे गेल्यानंतर सुनावणी झाली. या सुनावणीत देशमुख यांनी मंदिरातील निधीचा गैरवापर झाला असून, शासकीय जागेवर अनधिकृत बांधकाम करण्याचा दोषारोप ठेवला आहे. यामुळे मंदिराचे विश्वस्त मंडळ बरखास्त होऊन प्रशासकाची नेमणूक केली जाण्याची दाट शक्यता आहे.

ठाणे शहरात मराठी भाषा दिन साजरा
ठाणे/प्रतिनिधी :
येथील मराठी ग्रंथसंग्रहालय, मराठी भाषा संरक्षण व विकास संस्था, महाराष्ट्र साहित्य परिषद, स्वा. सावरकर केंद्र आणि मॅजेस्टिक बुक स्टॉल यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा दिन मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या निमित्ताने एका जाहीर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ पत्रकार संजीव लाटकर, सुप्रसिद्ध इतिहास संशोधक डॉ. दाऊद दळवी आणि सुप्रसिद्ध कथाकथनकार अ‍ॅड. करुणा करंदीकर हे उपस्थित होते. अ‍ॅड. करुणा करंदीकर यांनी मराठी भाषेसाठी स्वा. सावरकरांचे योगदान यावर आपले विचार मांडले. डॉ. दाऊद दळवी यांनी सरकार दरबारी मराठी भाषेची होणारी गळचेपी यावर प्रकाश टाकला, तर संजीव लाटकर यांनी मराठीबरोबर इतर भाषांचाही वापर माणसाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे, असे सांगून मराठी ही प्रत्येकाने आपापल्या घरात लहानपणापासूनच शिकवली पाहिजे, असे सांगितले. मराठी भाषेचा विकास व संवर्धनासाठी ठाण्यात लक्षणीयरीत्या काम करीत असलेले शरद गोखले, सदाशिव टेटविलकर, स्मिता कुळकर्णी आणि कृष्णकुमार मराठे यांचा शाल, श्रीफळ व पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि संयोजन विद्याधर ठाणेकर यांनी केले. यावेळी पां.के. दातार, अ‍ॅड. गजानन चव्हाण, अ‍ॅड. श्रीकांत लेले उपस्थित होते.

विहंगच्या जंगल सफारी
ठाणे- येथील विहंग या संस्थेच्या वतीने आशियाई सिंहांचे एकमेव आश्रयस्थान असलेले सासनगीर नॅशनल पार्क, मध्यप्रदेशातील कान्हा व बांधवगड येथे उन्हाळ्याच्या सुट्टीत जंगल सफारी आयोजित करण्यात आल्या आहेत. या सफारीत पर्यटकांना वन्य जीवतज्ज्ञ व निसर्ग छायाचित्रकार युवराज गुर्जर यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीवन न्याहळता येणार आहे. संपर्क- २५३३०९५१.

विद्यार्थ्यांचे सुयश
डोंबिवली :
तंत्रशिक्षण मंडळातर्फे प्रायोजित राज्यस्तरीय प्रोजेक्ट स्पर्धा ‘टेक्नोफिलिया २००९’ मध्ये स. है. जोंधळे तंत्रनिकेतन डोंबिवली येथील विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले. या स्पर्धेत मेकॅनिकल शाखेमध्ये संतोष सोनावणे, वैभव शेटे, अमेय शिंदे व विकास थिटे या तृतीय वर्षीय मेकॅनिकल शाखेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘स्टेप इलेक्ट्रिसिटी जनरेटर’ या प्रोजेक्टला प्रथम पारितोषिक मिळाले. तसेच कॉम्प्युटर शाखेमध्ये या तृतीय वर्ष कॉम्प्युटर शाखेच्या विद्यार्थ्यांंनी तयार केलेल्या ‘डेटाबेस क्युरी थ्रु एस एम एस’ या प्रोजेक्टने प्रथम पारितोषिक पटकावले. वरील सर्व विद्यार्थ्यांना प्रो. चौधरी, जी. डी., प्रो. शेळके डी. डी., प्रो. विनोद ठोंबरे पाटील, प्रो. सोना चौधरी इत्यादींचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

मैत्रेयी पुरस्काराचे उद्या वितरण
बदलापूर/वार्ताहर-
येथील शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेच्या महिला शाखेतर्फे शनिवारी मैत्रेयी पुरस्कार वितरण तसेच व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, ७ मार्च रोजी सायंकाळी साडेचार वाजता ब्राह्मण सभा सभागृह, वडवली विभाग, अंबरनाथ (पू) येथे सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संस्थेतर्फे गेल्या वर्षांपासून सामाजिक कार्याला चांगले योगदान देणाऱ्या महिलेला मैत्रेयी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यंदा आपली स्वत:ची जागा अनाथ मुलांसाठी, कार्य करणाऱ्या ‘नीला बाल सदन’ सुरू करणाऱ्या नीला शर्मा यांना यंदाचा मैत्रेयी पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ‘सक्षम मी’ या विषयावर डोंबिवली येथील प्रतिभा बिवलकर यांचे व्याख्यानही होणार असल्याचे वंदना मुळे यांनी सांगितले.

पर्स हिसकावून पळणाऱ्या दोघांना जमावाने बदडले
डोंबिवली/प्रतिनिधी :
एमआयडीसीतील मिलापनगरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून महिलांजवळील पर्स, मोबाइल हिसकावून पळून जाणाऱ्या दोन चोरांना नागरिकांनी पकडून मानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. या दोन्ही चोरांना जमावाने पकडून बेदम चोपही दिला.
मिलापनगरमधील विशाखा काकुळते ही काल रात्री दुकानात चालली होती. सोबत तिच्या दोन मैत्रिणी होत्या. यावेळी पर्स, मोबाइल चोरीच्या प्रयत्नात असलेल्या हरेश भानुशाली (बदलापूर) व लक्ष्मण गुप्ता (पाथर्ली) या दोन चोरांनी विशाखाच्या हातामधील पर्स हिसकावून पळण्याचा प्रयत्न केला. तिने ओरडा केल्याने नागरिकांनी चोरांचा पाठलाग करून त्यांना पकडले व बेदम चोप दिला. त्यांना मानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. गेल्या अनेक दिवसांपासून एमआयडीसीत पर्स, मोबाइल चोरींच्या प्रकारांमध्ये वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले होते.