Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ६ मार्च २००९
व्यक्तिवेध

मुरलीधर रामचंद्र तथा बापू वाटवे यांनी चित्रपटात कधी हिरोची कामे केली नाहीत. त्यांनी चित्रपटही दिग्दर्शित केले नाहीत. चित्रपटाच्या निर्मितीतील तांत्रिक बाजूशीही त्यांचा फार जवळचा संबंध नव्हता. तरीही ते आयुष्यभर ‘रुपेरी’च राहिले. एखाद्या गोष्टीचा आयुष्यभराचा ध्यास असतो, तसा ध्यास बापू वाटवे यांनी घेतला होता. तो ध्यास होता भारतीय चित्रपटसृष्टीत सोनेरी पाने रंगवणाऱ्या प्रभात फिल्म कंपनीचा. नाशिकच्या दादासाहेब फाळकेंनी भारतीय चित्रपटसृष्टीत निर्माण केलेल्या इतिहासाच्या रेखीव आणि कलात्मक वास्तूवर ‘प्रभात’ने कळस चढवला. भारतीय चित्रपट रसिकांना जवळजवळ दोन दशके अक्षरश: गुंगवून ठेवले. चित्रपट बोलू लागल्यानंतर लगेचच म्हणजे दोन वर्षांत स्थापन झालेल्या प्रभात फिल्म कंपनीने त्या काळात

 

बोलपटांच्या या माध्यमावर कला आणि तंत्रज्ञान-विज्ञानाच्या साह्य़ाने उमटविलेला ठसा हा जागतिक सिनेमाकलेच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा होय. बापू वाटवे यांच्यासाठी प्रभातचा हा काळ आजही अगदी ताजातवाना होता आणि ते त्याच काळात रममाण होणे पसंत करत असत. एका अर्थाने बापूंनी प्रभातची प्रसन्न सकाळ, नेत्रदीपक माध्यान्ह, हुरहूर लावणारी संध्याकाळ आणि मन विषण्ण करणारा सूर्यास्त हे सारे अनुभवले होते. वाटवे यांचे मामा म्हणजे प्रभातचे एक संस्थापक विष्णुपंत दामले यांचे चिरंजीव अनंतराव. घरात जन्मापासूनच चित्रपटाचे वातावरण. हे वातावरण चित्रपटातल्यासारखे सोनेरी आणि फसवे नव्हते. प्रभात फिल्म कंपनीच मुळी अशा सोनेरी कल्पितापासून नेहमी अंतर राखणारी होती. व्ही. शांताराम, केशवराव धायबर, विष्णुपंत दामले आणि फत्तेलाल या चौघांच्या बरोबर सीताराम कुलकर्णी यांनी ही संस्था स्थापन केली. व्यावसायिकदृष्टय़ा यशस्वी संस्था निर्माण करण्याचे ध्येय ठेवणाऱ्या या संस्थापकांनी आपली कलात्मक आणि सामाजिक जाणीव कधीही ढळू दिली नाही. बापू वाटवे हे अशा वातावरणात लहानाचे मोठे झाले. प्रभातमध्ये त्यांनी सहदिग्दर्शनापासून पडेल ते काम केले. काही चित्रपटातून लहान मुलाच्या भूमिकाही केल्या. (अगदी अलीकडे ‘वास्तुपुरुष’ या चित्रपटातही त्यांचे दर्शन झाले होते.) तो काळ त्यांच्या जडणघडणीचा होता आणि मिळेल ते शिकण्याची तयारीही होती. १९३३ मध्ये सुरू झालेल्या या कंपनीचा अस्त १९५२ मध्ये झाला. बापू वाटवे हे, उण्यापुऱ्या एकोणीस वर्षांच्या या कालावधीत प्रभातने केलेल्या देदीप्यमान कार्याचे सर्वसाक्षी भाष्यकार होते. ‘एक होती प्रभातनगरी’ आणि ‘प्रभातचित्रे’ ही त्यांची दोन पुस्तके त्यांच्या या प्रभातप्रेमाचे प्रतीक आहेत. चित्रसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या कार्यावरील त्यांनी लिहिलेले पुस्तक नॅशनल बुक ट्रस्टने प्रकाशित केले आहे. मराठी वृत्तपत्रातून प्रभात या विषयावर त्यांनी आयुष्यभर लेखन केले. त्याच्या जोडीला हॉलीवूडचे चित्रपट, तेथील कलावंत, दिग्दर्शक या विषयावरही त्यांनी आवडीने लेखन केले. पण हे लेखन करतानाच्या काळात बापू वाटवे यांनी आपली आणखी एक ओळख साहित्यिक जगाला करून दिली. ते संपादित करत असलेले ‘कथालक्ष्मी’ हे केवळ कथा या साहित्यप्रकाराला वाहिलेले मासिक एकेकाळी वाचकांच्या नजरेतून सहसा सुटत नसे. या मासिकाच्या निमित्ताने त्यांनी मराठी कथाविश्वाला अनेक नव्या लेखकांचा परिचय करून दिला. त्यांचे हे योगदान मात्र अलीकडच्या वाचकांच्या नजरेतून सुटलेले आहे. प्रभात हाच बापूंचा आयुष्यभराचा ध्यास असल्यामुळे आकाशवाणीवरील भाषणे असोत की जाहीर कार्यक्रम असोत, बापू प्रभातच्या रम्य आठवणींत रमून जात. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयासाठी १९८४ मध्ये बापू वाटवे यांनी विष्णुपंत दामले यांचा मोनोग्राफ तयार करून दिला. प्रभातमुळेच त्यांची देव आनंदशी मैत्री झाली. ती अखेपर्यंत राहिली. पण या मैत्रीचा त्यांनी कधी उच्चार केला नाही की त्याचे भांडवल केले नाही. प्रभातच्या रम्य आठवणी हा बापू वाटवे यांच्यासाठी भूतकाळ नव्हताच. तो त्यांच्यासाठी आजपर्यंत वर्तमानकाळच राहिला. त्यांच्या निधनाने प्रभातकाळचा एक साक्षीदार हरपला आहे.