Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ६ मार्च २००९

उत्सुक उमेदवारांच्या पक्षश्रेष्ठींसोबत ‘भेटीगाठी’
यवतमाळ, ५ मार्च/ वार्ताहर

पुनर्रचनेनंतर ‘यवतमाळ-वाशीम’ या नावाने अस्तित्वात आलेल्या लोकसभा मतदारसंघात उत्सुक उमेदवारांनी थेट मुंबई व दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींच्या भेटी घेतल्या आहेत. काँग्रेसतर्फे उमेदवारी मिळावी म्हणून भाजपमधून हकालपट्टी झालेले यवतमाळचे खासदार हरिभाऊ राठोड दिल्लीत राहुल गांधी, ऑस्कर फर्नाडिस आणि मोहन प्रकाश या नेत्यांना भेटून आले आहेत.

लोकसभा निवडणूक चंद्रपूर
भाजप व काँग्रेसचे यशापयश शेतकरी संघटना, बसपच्या हाती

देवेंद्र गावंडे, चंद्रपूर, ५ मार्च

युतीपासून वेगळी झालेली शेतकरी संघटना व बहुजन समाज पक्षांचे उमेदवार कुठवर मजल मारतात यावर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजप व कॉंग्रेसच्या यशापयशाचे गणित अवलंबून राहणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे हंसराज अहीर यांनी कॉंग्रेसचे नरेश पुगलिया यांचा साठ हजार मतांनी पराभव केला होता. कॉंग्रेसचा त्याग करून बसपच्या हत्तीवर स्वार झालेले राजेंद्र वैद्य यांनी एक लाख मते घेतल्याने कॉंग्रेसला पराभवाचा झटका बसला.

बुलढाण्यात जाधव-शिंगणे यांच्या तुल्यबळ लढतीची शक्यता
सोमनाथ सावळे, बुलढाणा, ५ मार्च

लोकसभा निवडणूक बुलढाणा
अनुसूचित जातीसाठी गेली तीन तपे राखीव असलेला बुलढाणा लोकसभा मतदारसंघ आता सर्वसाधारण वर्गासाठी खुला झाला आहे. गेल्या छत्तीस वर्षांत अर्जुन कस्तुरे, डी.जी. गवई व सुखदेव नंदाजी काळे यांच्या अल्पजीवी कारकीर्दीचा अपवाद वगळता जिल्ह्य़ाच्या खासदाराला दिल्लीचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाही.

सीमेवरील बारा गावांचा प्रश्न चर्चेत
चंद्रपूर, ५ मार्च/ प्रतिनिधी

महाराष्ट्र-आंध्रप्रदेश सीमेवरील वादग्रस्त बारा गावांचे प्रकरण न्यायालयात असतानाच दोन्ही राज्यात लोकसभा निवडणूक १६ एप्रिल या एकाच दिवशी होत असल्याने गावातील नागरिक नेमके कोणत्या राज्यात मतदान करतात? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या की महाराष्ट्र-आंध्रप्रदेश सीमेवरील महाराजगुडा, मुकद्दमगुडा, परमडोली, इंदिरानगर, अंतापूर, येसापूर, शंकरलोधी, कोंढा बु., कोंढा खु., सेवादासनगर या गावांची नावे चर्चेला येतात.

बाहेरच्या प्रचारकांना मतदारसंघात मुक्कामास मनाई
आचारसंहितेचा बडगा

यवतमाळ, ५ मार्च / वार्ताहर

निवडणूक काळात प्रचारासाठी परक्या मतदारसंघात आलेल्या राजकीय कार्यकर्त्यांनी प्रचार अभियान संपताच ताबडतोब तो मतदारसंघ सोडून स्वत:च्या मतदारसंघात परत गेले पाहिजे, परक्या मतदारसंघात मुक्काम करू नये, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. या आदेशाची संभावना आचारसंहितेचा अतिरेक या शब्दात केली जात आहे.

भारिप-बहुजन महासंघाचा निर्धार
भंडारा, ५ मार्च / वार्ताहर

भारतीय रिपब्लिकन पक्ष - बहुजन महासंघ भंडारा लोकसा मतदारसंघात सर्व शक्तीनिशी लढणार असल्याचे पक्षाचे सरचिटणीस अचल मेश्राम यांनी पत्रपरिषदेत सांगितले. भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारिप-बहुजन महासंघ महाराष्ट्रातील ४८ जागा लढत आहेत. प्रगती हे भारिप-बहुजन पक्षाचे सूत्र असून भंडारा जिल्हा लोकसभेची निवडणूक पक्ष लढवणारच, असे ते म्हणाले. या देशात काँग्रेस-भाजपने गरिबांवर अघोषित ‘अ‍ॅक्ट्रासिटी’ लावून गरिबांना, वंचितांना साठ वर्षांपासून दहशतीखाली ठेवले आहे, असाही आरोप त्यांनी केला. पत्रपरिषदेला डॉ. महादेवराव गोस्वामी, अ‍ॅड. रविराज रामटेके, अं.शि. रंगारी, आशा बोदेले, कौसल्या नंदेश्वर, हरिहर उके, डॉ. माणिक वैद्य, पांडुरंग नागदेवे, गणेश अंबादे, डॉ. विजय रामटेके, प्रतिभा पिंपळकर, शालू मोटघरे, अ‍ॅड. कांबळे, श्रीधर बांते, चंद्रकांत मंडपे, वामन तिरपुडे, ईश्वरदास जनबंधू आदी उपस्थित होते.

लोणार पालिका निवडणुकीसाठी १० अर्ज दाखल
लोणार, ५ मार्च / वार्ताहर

लोणार नगर परिषद निवडणुकीसाठी ३ मार्चला एकूण ७ उमेदवारी अर्ज दाखल झाले. यामध्ये वॉर्ड क्र. २ मधून बालचंद भिकाजी बच्छिरे, वॉर्ड क्र.५ मधून सुरेश उत्तम शिंदे व शे. हाशम शे. हातम, वॉर्ड क्र. ६ मधून विनायक गोपाळराव मापारी, वॉर्ड क्र. ९ मधून भूषण विश्वनाथ मापारी, वॉर्ड क्र. १७ मधून आनंद दशरथ पोटोळे व अंबादास रामभाऊ आरे यांचा समावेश आहे. यापूर्वी ३ अर्ज दाखल झालेले होते, त्यासह आता या निवडणुकीत एकूण १० अर्ज आतापर्यंत दाखल झाले आहेत.

विभागीय रेल्वे प्रबंधकांनी केले आमगाव स्थानकाचे निरीक्षण
गोंदिया, ५ मार्च / वार्ताहर

जिल्ह्य़ातील आमगाव रेल्वेस्थानकाला सुसज्ज करण्यास रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली असून ५० लाखाचे काम या स्थानकावर झाले आहे. उर्वरित कामे त्वरित पूर्णत्वास नेण्यात येतील व आमगाव रेल्वेस्थानकावर प्रवाशांना सर्व सुविधा लवकरच उपलब्ध होतील, अशी ग्वाही विभागीय रेल्वे प्रबंधक जेठी यांनी नुकत्याच आमगाव भेटीत दिली. विकासकार्याचा आढावा घेऊन विभागीय रेल्वे प्रबंधक जेठी यांनीसमाधान व्यक्त केले. या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख सतीश आकांत, भोला गुप्ता, डॉ. रितेश अग्रवाल, राधाकिसन चुटे, जितेंद्र कावळे, मुन्ना अग्रवाल, अविनाश सिंग, मकरंद देशपांडे, विजय नागपुरे आदी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेच्या शाळेत जाणीव जागृती कार्यक्रम
अकोला, ५ मार्च/प्रतिनिधी

रस्ता सुरक्षा प्रकल्पांतर्गत शिवर येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत जाणीव जागृती कार्यक्रम नुकताच पार पडला. ‘मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज’ आणि गुणवंत शिक्षण संस्थेच्यावतीने हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कल्पना टाले, रेखा लोडम, मेसरे, घनशाम धनोकार, तायडे, शिंगोकार, बिहाडे आदी उपस्थित होते. वाहतुकीचे नियम, थांबे, आदी नियमांची माहिती देण्यात आली. संचालन सतीश चक्रनारायण यांनी केले तर आभार नितू वानखडे यांनी मानले.

तंत्रनिकेतनमध्ये सांस्कृतिक महोत्सव
साकोली, ५ मार्च / वार्ताहर

येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन पत्रकार श्याम पेठकर यांच्या हस्ते नुकतेच झाले. संस्थेचे प्राचार्य प्रा. दीपक कुळकर्णी अध्यक्षस्थानी होते. जिमखाना उपाध्यक्ष प्रा. अ.ज. फुलझेले, सांस्कृतिक महोत्सवाचे प्रभारी अधिकारी प्रा. ज.दे. गोल्हर व विद्यार्थी प्रतिनिधी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून सावित्रीबाई फुले व सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला. संस्थेचे प्राचार्य प्रा. कुळकर्णी यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. सरस्वती वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. जिमखानाचा अहवाल विद्यार्थी प्रतिनिधी अशफाक खान यांनी सादर केला. कार्यक्रमाचे संचालन सचिन बडोले व मनीषा बनसोड यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आचारसंहिता अंमलबजावणी कक्ष
अकोला, ५ मार्च/प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून, जिल्हाधिकारी कार्यालयात आचारसंहिता अंमलबजावणी कक्ष आणि माहिती कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोद देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली हे दोनही कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती, महामंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारी वाहने जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मुथ्थुकृष्णन शंकरनारायणन यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या अंमलबजावणी कक्षाच्या माध्यमातून प्रचार, प्रसाराविषयी तसेच माहिती कक्षामधून आचारसंहिता, उमेदवारी अर्ज या विषयीची माहिती उपलब्ध होणार आहे.

जनता आर्थिक स्वातंत्र्यापासून वंचित -शिवणकर
भंडारा, ५ मार्च / वार्ताहर

काँग्रेसच्या चुकीच्या धोरणामुळे देशातील बहुसंख्य जनता आर्थिक स्वातंत्र्यापासून वंचित राहिली. पटेलांसारखे बिडी कारखानदार अब्जाधीश झाले. परंतु, बिडी कामगार देशोधडीला लागले, असा आरोप भाजपचे खासदार महादेवराव शिवणकर यांनी केला. लाखांदूर तालुक्यातील चिचळ बारव्हा येथे भीम मेळाव्यात शिवणकर बोलत होते.या भीम मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून सेना जिल्हा प्रमुख नरेश डहारे, माजी खासदार नामदेवराव दिवटे, जिल्हा परिषद सदस्य वामन बेंदरे, वसंत एंचिलवार, महाथेरो सदानंद, भन्ते प्रज्ञा ज्योती, चंद्रशेखर टेंभुर्णे, गीता कापगते, डी.एफ. कोचे, जयदेव खोब्रागडे, हर्षल मेश्राम, महेंद्र दहीवले, धनराज पडोळे, दीपक गजभिये आदी उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना शिवणकर पुढे म्हणाले, ६० वषार्ंनंतरही जनता आर्थिक गुलामगिरीतच जगत आहे. देशाला स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या तत्त्वावर आधारित राज्यघटना मिळाली. गांधीजींच्या देशभक्तीचा वारसा मिळाला. परंतु, स्वातंत्र्योत्तर काळात, सत्तेत मोठय़ा कालखंडात राहिलेल्या काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे जनता आर्थिक स्वातंत्र्यापासून दूर राहिली, असे शिवणकर म्हणाले.

जिल्हा नियोजन समितीची सभा
भंडारा, ५ मार्च / वार्ताहर

जिल्ह्य़ाचा मागासलेपणा दूर करण्यासाठी विविध यंत्रणांनी विकास योजनांचे योग्य पद्धतीने नियोजन करून जनतेला त्याचा लाभ देऊन जिल्ह्य़ाचा विकास साधावा, असे आवाहन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी नुकतेच केले. जिल्हा नियोजन समितीची सभा पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद सभागृहात नुकतीच झाली. या सभेला शालेय शिक्षण राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, आमदार मधुकर कुकडे, आमदार बंडू सावरबांधे, जिल्हा परिषद अध्यक्ष सुमेध श्यामकुंवर, जिल्हाधिकारी संभाजीराव सरकुंडे, जिल्हा पोलीस अधीक्षक सुरेश सागर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेंद्र पोयाम उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या शेतात सिंचनासाठी विहीर तयार करण्यासाठी लाभार्थ्यांची निवड ही ईश्वरचिठ्ठी पद्धतीने होणार आहे, अशी माहिती या वेळी देण्यात आली. यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य रामराव कारेमोरे, अरुण बडोले, सुरेश काटेखाये, नरेश डहारे, मनोहर सिंगनजुडे, पुष्पा गिरीपुंजे, अ‍ॅड. वसंत एंचीलवार, सुधा इखार, बाबुराव बागडे, नलिनी डिंकवार, राजकपूर राऊत, रेखा समरीत, चंद्रशेखर तुरकर, वीणा झंझाड उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हािधकारी संभाजीराव सरकुंडे यांनी केले, संचालन भालेराव यांनी केले.

‘अस्वस्थ वर्तमान’चे रविवारी प्रकाशन
अमरावती, ५ मार्च / प्रतिनिधी

लेखक आणि चित्रकार सुनील यावलीकर यांच्या ‘अस्वस्थ वर्तमान’ या कादंबरीचा प्रकाशन सोहोळा ८ मार्चला येथील मातोश्री विमलाताई देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
पुणे येथील मनोविकास प्रकाशन संस्थेने हे पुस्तक तयार केले आहे. कादंबरीचे प्रकाशन कवी प्राचार्य विठ्ठल वाघ यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखडे राहणार आहे. यावेळी साहित्यिक प्रा. वसंत आबाजी डहाके, पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. मनोहर जाधव, सकाळचे कार्यकारी संपादक श्रीपाद अपराजित, लोकनाथ यशवंत उपस्थित राहणार आहेत. ‘अस्वस्थ वर्तमान’ ही कादंबरी पूर्व प्रकाशनामुळे साहित्य वर्तुळात आणि वाचकांमध्ये चर्चेत आली आहे. बदलत्या जगातील व्यक्तींच्या आयुष्यातील स्थित्यंतरे कादंबरीचे लेखक सुनील यावलीकर यांनी टिपली आहेत. प्रकाशन सोहोळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन मनोविकास प्रकाशनचे अरविंद पाटकर, आशिष पाटकर यांनी केले आहे.

नगराध्यक्षांच्या पतीने रस्त्याचे बांधकाम रोखल्याचा आरोप
चिखली, ५ मार्च / वार्ताहर

आमदारांच्या स्थानिक विकास निधीमधून सुरू असलेले रस्ता क्राँक्रीटीकरणाचे काम नगराध्यक्षाच्या पतीने थांबवल्याचा आरोप आहे. गेल्या चार दिवसांपासून हे काम ठप्प आहे. बगाडिया मंगल कार्यालयाजवळील रस्त्याचे क्राँक्रीटीकरण आमदार निधीतून हाती घेण्यात आले आहे. रस्त्याच्या एकाच बाजूने नाली असल्याने रस्त्याच्या खालून पाईपलाईन टाकून समोरच्या नालीत पाणी सोडल्याने हे काम थांबवले गेल्याचे समजते. नगरपालिकेने नाली बांधली नसल्यानेच समोरच्या नालीत पाणी सोडल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या वादामुळे चार दिवसांपासून रस्त्याचे काम ठप्प झाले आहे. अपूर्ण रस्ता व विखुरलेले बांधकाम साहित्य यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

ब्राह्मण अधिवेशनाची शेगावात जय्यत तयारी
खामगाव, ५ मार्च / वार्ताहर

बहुभाषिक ब्राह्मण सभेचे अधिवेशन येत्या २२ मार्चला शेगाव येथे होत आहे. या अधिवेशनासाठी सहकार्य करण्याचे आवाहन अकोल्याचे आमदार गोवर्धन शर्मा यांनी येथे केले. रायगड कॉलनी संमेलनाच्या तयारी संदर्भात नुकतीच बैठक झाली, यावेळी शर्मा बोलत होते. या प्रसंगी जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष श्याम उमाळकर, माजी नगराध्यक्ष सुभाष देशपांडे, सतीश रोठे, सच्चिदानंद शेवडे, मोहन कुळकर्णी, कन्हैयालाल पारीख, गोपाल शर्मा, गोविंद मिश्रा, संजय शर्मा, मोहन जोशी, शेखर पुरोहित उपस्थित होते.समाज एकीकरणासाठी हे अधिवेशन अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे श्याम उमाळकर म्हणाले. या बैठकीला संजय शर्मा, आशीष सराफ, शिवाजी जोशी, ओंकार मिश्रा, पवन शर्मा, नंदू देशपांडे, चंदू कुळकर्णी, राजू जोशी उपस्थित होते.

शिवाजी विद्यालयात वार्षिक उत्सव
भंडारा, ५ मार्च / वार्ताहर

लाखांदूर येथील शिवाजी विद्यालयात विद्यालयाचा शालेय वार्षिकोत्सव नुकताच साजरा करण्यात आला. उत्सवाचे उद्घाटन आमदार नाना पटोले यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य वसंत एंचिलवार होते. याप्रसंगी भारतीय शिक्षण संस्थेचे कार्यवाह माजी खासदार नामदेवराव दिवठे, सहकार्यवाह श्रावण नाकतोडे, मुख्याध्यापक यु.बी. पारधी, पर्यवेक्षक भो.जे. राऊत, चंद्रशेखर टेंभुर्णे, संजय ठवरे, टी.बी. अंबादे, डॉ. राठी, सरपंच कन्हैयालाल नशिने, डॉ. अर्जुन ढोरे, किशोर मांदाळे आदी उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते देवी शारदा व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दीपप्रज्वलन करण्यात आले.

हात उसनवारीवरून मारहाण; गुन्हा दाखल
खामगाव, ५ मार्च / वार्ताहर

हात उसनवारी घेतलेल्या पैशाच्या कारणावरून हाणामारी झाल्याची घटना घाटपुरीवरील गोदावरी नगरात नुकतीच घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गोपाल सूर्यवंशी व सविता सूर्यवंशी हे दोघे हात उसनवारी घेतलेले पैसे मागण्यासाठी गेले. तेथे गजानन बोचरे यांना मारहाण करण्यात आली, असा आरोप आहे. या प्रकरणी उषा बोचरे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कोंढाळीत बचत गट महिला शिबीर
कोंढाळी, ५ मार्च / वार्ताहर

शासकीय योजनांचा लाभ घेऊन महिलांनी स्वावलंबी बनावे, असे आवाहन महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष प्रभा ओझा यांनी येथे केले. नारी शक्ती लोकसंचालित साधना केंद्राच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या महिला बचत गट शिबिरात त्या बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य योगिता देवतळे, मिलिंद देशमुख, दुर्गाप्रसाद पांडे, मुस्ताक पठाण आदी उपस्थित होते. याप्रसंगी महिला आर्थिक विकास महामंडळाकडून राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती ओझा यांनी दिली. या शिबिरात महिलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले. या शिबिरात काटोल तालुक्यातील सर्व बचत गटाच्या अंदाजे दोन हजार महिला सहभागी झाल्या. याप्रसंगी महिलांनी बनवलेल्या साहित्यांचे प्रदर्शनही भरवण्यात आले होते. ताजबी शेख, निर्मला बोरकर, कांता मिश्रा, कमला वाहणे यांची भाषणे झाली. यावेळी तारा लांजेवार, बेबी रक्षित, विजया रेवतकर, सुनील वाघधरे, प्रशांत राऊत, मनोज गुप्ता, चंद्रप्रभा वंजारी, देवका गोंडाणे, उषा काळे, सविता सूर्यवंशी, बेबीनंदा गजभिये, हेमलता पांडे उपस्थित होत्या.प्रास्ताविक भालचंद्र गावंडे यांनी केले. संचालन निर्मला बोरकर यांनी केले.