Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ६ मार्च २००९
विविध

शस्त्रसंधीस श्रीलंका सरकारचा नकार; एलटीटीईही शरणागती न पत्करण्यावर ठाम
जयललिता करणार १० मार्चला उपोषण
कोलंबो, ५ मार्च/पीटीआय
एलटीटीईचे प्राबल्य असलेल्या प्रदेशावर पुन्हा कब्जा मिळविण्यासाठी श्रीलंका लष्कराने कारवाई अधिक तीव्र केली असून, त्या पाश्र्वभूमीवर एलटीटीईने शस्त्रे खाली ठेवण्यास व शरणागती पत्करण्यास सपशेल नकार दिला आहे. तर श्रीलंका सरकारनेही कोणत्याही परिस्थितीत एलटीटीईबरोबर शस्त्रसंधी करण्यात येणार नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान श्रीलंका सरकार व एलटीटीईमध्ये त्वरित शस्त्रसंधी व्हावा यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत या मागणीसाठी अण्णाद्रमुकच्या प्रमुख व तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता येत्या १० मार्च रोजी एक दिवसाचे उपोषण करणार आहेत.

भारताचा हात असल्याचा पुरावा कुठे आहे?
पाकिस्तानी प्रसारमाध्यमांचा सरकारला सवाल
लाहोर, ५ मार्च/वृत्तसंस्था
श्रीलंकेच्या क्रिकेट संघावर परवा झालेल्या हल्ल्यात भारताचा हात होता या आरोपाला पुरावा कुठे आहे, असा सवाल पाकिस्तानातील प्रसार माध्यमांनीच करण्यास सुरुवात केली आहे. उलटपक्षी असा निराधार आरोप सतत होत राहिला तर दोन्ही देशांमधील मतभेदांची दरी अधिकच रुंदावत जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. या हल्ल्यामागे भारताचा हात आहे आणि मुंबई हल्ल्यांचा सूड घेण्यासाठी भारताने हा हल्ला घडवून आणला, असा जावईशोध पाकिस्तानच्या जहाज वाहतूक खात्याच्या राज्यमंत्र्यांनी केला होता. पाकिस्तानातील तथाकथित भारतविरोधी भावना भडकाविण्यासाठी केलेला हा अपप्रचार होता.

माफिया बबलू श्रीवास्तवचे निवडणुकीचे स्वप्न भंगले
नवी दिल्ली, ५ मार्च/खास प्रतिनिधी
खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कुख्यात डॉन बबलू श्रीवास्तव याने लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. दहा वर्षांपूर्वी कस्टम्स अधिकारी अरोरा यांचा खून केल्याच्या आरोपावरून बबलू अलाहाबादच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे. लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदीनुसार निवडणूक लढण्यासाठी दोन वर्षांंपेक्षा जास्त शिक्षा झालेल्या गुन्हेगाराला न्यायालयात याचिका करून शिक्षेला स्थगिती मिळवावी लागते. त्यानुसार यंदा उत्तर प्रदेशातून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी बबलूने ही याचिका केली होती. खुनाच्या आरोपावरून शिक्षा झालेले क्रिकेटपटू खासदार नवज्योतसिंग सिद्धूप्रमाणे आपली शिक्षा स्थगित करण्यात यावी, अशी विनंती बबलूने आपल्या याचिकेत केली होती. पण सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अल्तमस कबीर यांनी बबलूची याचिका फेटाळून लावली होती. बबलू श्रीवास्तव याच्याविरुद्ध अनेक खटले प्रलंबित आहेत. २००४ साली शिक्षा होण्यापूर्वी त्याने उत्तर प्रदेशातील सीतापूर मतदारसंघातून निवडणूक लढविली होती.

विवेक कुंद्रा अमेरिकेचे नवे मुख्य माहिती अधिकारी
वॉशिंग्टन, ५ मार्च/वृत्तसंस्था

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी देशाचे मुख्य माहिती अधिकारी म्हणून मूळ भारतीय वंशाचे माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ विवेक कुंद्रा यांची नियुक्ती केली आहे. कुंद्रा हे आता अमेरिकेच्या प्रशासनातील भारतीय वंशाचे सर्वात मोठे अधिकारी ठरणार आहेत.
कोलंबिया जिल्ह्याचे मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी म्हणून सध्या ३४ वर्षीय कुंद्रा हे कार्यरत आहेत. जिल्ह्यातील ८६ एजन्सींना ते माहिती आणि तंत्रज्ञानविषयक धोरणांबाबत सातत्याने मार्गदर्शन करीत असतात. टेक्नोक्रॅट सॅम पिट्रोडा यांच्याप्रमाणेच कुंद्रा यांनाही या क्षेत्रातील गाढा अनुभव आहे. विवेक कुंद्रा यांच्यामुळे या क्षेत्राला अनुभवी मार्गदर्शक मिळत असून अमेरिकेच्या सरकारचा खर्च कमी करूनही ही सेवा चांगल्या पध्दतीने कशी देता येईल याची काळजी ते वाहतील, अशी अपेक्षा बराक ओबामा यांनी व्यक्त केली.

डॉ. हरबर्ट बेन्सन यांना मणिभौमिक पुरस्कार
वॉशिंग्टन, ५ मार्च/पी.टी.आय.

लेझर तंत्रज्ञानाचे एक जनक आणि प्रसिद्ध भारतीय-अमेरिकन वैज्ञानिक मणि भौमिक यांच्या स्मृत्यर्थ ठेवण्यात आलेल्या पुरस्कारासाठी हारवर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. हरबर्ट बेन्सन यांची निवड करण्यात आली आहे. येत्या १८ मार्च रोजी हा पुरस्कार त्यांना देण्यात येणार आहे. मेंदू व सजग मन यासंदर्भात संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञाला दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.