Leading International Marathi News Daily शनिवार, ७ मार्च २००९
  समतेसाठी पुरुषांचा पुढाकार
  स्त्री-पुरुष समतेचा गोफ
  स्त्रीत्वाचा सोयीस्कर अर्थ
  शाळेसह व्यापक कुटुंब
  थांब, माझ्या संसाराला...
  विज्ञानमयी
  गर्भासंबंधीचा कायदा
  'संवाद' सखी
  स्त्री-मनातले क्षितीज
  माळाकोळीतील दारूबंदी लढा!
  आगळीवेगळी क्षमा
  संसारकथा
  ताई आपटे : एक प्रेरणास्रोत
  मधुघटचि रिकामे
  कावळा
  प्रतिसाद
  हर्बिन : पूर्वेकडील मॉस्को!
  गाडी बुला रही है!

समानतेसाठी आम्ही!
स्त्री-पुरुष समानतेसाठी मी स्वत: काय करतो/ करते? लिंगविशिष्ट भूमिकांना मी चिकटून राहत नाही, लिंगभेद मानत नाही, हे आपण स्वत: कोणत्या कृतींतून व्यक्त करता? तुमचे स्वानुभव कमाल १५० शब्दांत १७ मार्चच्या आत लिहून कळवा. हे आवाहन महिला आणि पुरुष दोघांसाठीही आहे. मात्र प्रत्यक्षात अनुभव असा आहे की अशा आवाहनांना पुरुषांचा प्रतिसाद ३३ टक्के सोडाच, पण जेमतेम ३ टक्केही मिळत नाही. हे प्रमाण वाढावे, अधिकाधिक वाचकांनी स्वत:तील बदलाचे चाकोरीबाहेरचे ठोस दाखले प्रांजळपणे द्यावेत, ही अपेक्षा. घरातील मुला-मुलींना, महिलांना समानतेची वागणूक मिळावी, यासाठी तुम्ही स्वत: काय करता, हे स्पष्टपणे मांडणे अपेक्षित आहे. निवडक लेखनाला प्रसिद्धी दिली जाईल. आपले स्वानुभव कागदाच्या एकाच बाजूला सुवाच्य अक्षरात लिहून पाठवा.
पत्ता- ‘समानतेसाठी आम्ही’, चतुरंग पुरवणी, लोकसत्ता संपादकीय कार्यालय, एक्स्प्रेस टॉवर, नरिमन पॉईंट,
मुंबई ४०००२१.

  १९७५ हे आंतरराष्ट्रीय स्त्री वर्ष जाहीर होण्यापूर्वीच पाश्चात्य देशांत स्त्रियांच्या चळवळीने वेग घेतला होता. या चळवळीला तिकडे ‘विमेन्स लिब’ म्हणजे ‘विमेन्स लिबरेशन मूव्हमेंट’ म्हटलं जाई. तो शब्दही नीटसा माहीत नव्हता, तिथपासून इथवर बरीच वाटचाल झाली आहे. व्यक्तिश: माझी आणि भारतातल्या स्त्री-चळवळीचीसुद्धा! नारी समता मंचाची स्थापनाही स्त्री-वर्षांच्या दशकाच्या काळातली आहे. १९८२ साली सुरू झालेला मंच १९८७ साली रीतसर नोंदणी करून काम करू लागला, तो काळ ‘विमेन ओन्ली’चा काळ असतानासुद्धा मंचाची एक महत्त्वाची भूमिका होती: स्त्रियांवरील अन्याय-अत्याचाराच्या विरोधात स्त्रियांनी आणि पुरुषांनी एकत्रितपणे काम केलं पाहिजे. या भूमिकेची आमच्या घटनेत नोंद करण्यात आली आहे. हा धागा इतक्या वर्षांच्या वाटचालीत कधी तुटलाही नाही आणि कधी हातातून सुटलाही नाही. उलट कामाबरोबरचे अनुभव, त्यावरच्या चर्चा,
 
त्यानुसार कधी फेरविचार अशी प्रक्रिया घडत राहिली आणि मूळ धागा बळकट करण्यासाठी प्रयत्नात सातत्य राहिलं. मागे वळून बघताना आज लक्षात येतं, आज ज्या एका ‘समतेसाठी आपण पुरुष’ या कार्यक्रमात नारी समता मंच सहभागी होतो आहे, त्यात हा मूळचाच धागा अधिक बळकट बनून उठावदार झाला आहे.
मंचाच्या कामाची सुरुवात स्त्रियांसाठीच्या सहायता केंद्रापासून झाली. हे केंद्र सुरुवातीपासून स्त्रियांसाठीच मदत केंद्र म्हणून काम करत होतं. पुरुषांना इतरत्र सुविधा उपलब्ध असल्यामुळे त्यांच्यासाठी या केंद्रामध्ये आम्ही काम करत नसू. मंचाच्या केंद्रात येणाऱ्या स्त्रियांसाठी त्यांच्या अडचणींबाबतचे उपाय आणि उपचार करायचे आणि त्यापलीकडे स्त्रियांमध्ये आत्मसन्मानाची जाणीव निर्माण करणारे, त्यांचं स्वत्व जागं करणारे कार्यक्रम करायचे, असं दुपेडी पद्धतीने मंचाचं काम चालू होतं. कामाच्या काही वर्षांच्या प्रवासानंतर काही सभा-शिबिरांमधून स्त्रिया आणि तरुण मुली विचारायला लागल्या, ‘‘आम्हाला तुम्ही हे सारं सांगता ते हळूहळू पटायला लागलं आहे. पण ताई, आता पुरुषांना आणि मुलांना (मुलग्यांना) हे तुम्ही कधी सांगायला लागणार? आम्ही ऐकलं, ऐकतोच आहे. त्यांना कधी ऐकवणार?’’ प्रश्न महत्त्वाचा होता आणि कामाची फेरआखणी करायला लावणारा होता.
या टप्प्यावर प्रथमच कॉलेज वयातल्या तरुण मुलग्यांबरोबर आम्ही संवादाचे कार्यक्रम घेणं सुरू केलं. ‘दोस्ती झिंदाबाद’ या नावानं आम्ही एक प्रकल्पच घेतला. एकतर्फी आकर्षणातून मुलीबरोबरच्या मैत्रीचा प्रवास सुरू होतो. तिच्या नकाराचा स्वीकार करू न शकणारे मुलगे, प्रेयसीचा खून करण्यापर्यंत पोहोचतात! याचं पहिलं धक्कादायक उदाहरण होतं रिंकू पाटील. आणि त्या मालिकेचा शेवट अजून झालेलाच नाही! खून होताहेत, होतच आहेत! तेव्हा नुकत्याच घडलेल्या सांगलीच्या अमृता देशपांडे खुनाच्या घटनेचं निमित्त करून आम्ही विविध कॉलेज भेटी आणि मुलांबरोबरच्या संवाद सभा सुरू केल्या. शेवटच्या टप्प्यावर अमीर खान या लोकप्रिय अभिनेत्याला बोलावलं. हजारोंच्या संख्येनं जमलेल्या साऱ्यांना अमीर खानकडून शपथ घेण्याचा विलक्षण अनुभव सर्वांना दिला. या मेळाव्यातलं अमीर खानचं छोटंसं भाषण मुलांशी थेट संवाद साधणारं आणि परिणामकारक झालं. शिवाय या सभेसाठी अध्यक्ष होते, त्या वेळचे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण निगवेकर. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रसन्न दाभोळकर होते. अमृता देशपांडेची सख्खी बहीणही सभेला उपस्थित होते.
दरम्यानच्या काळात स्त्रियांच्या चळवळीतून येणाऱ्या मागण्यांच्या रेटय़ामुळे काही सकारात्मक गोष्टी नक्कीच घडू लागल्या होत्या. उदा. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३ टक्के आरक्षण, महिला धोरण, विशाखा निवाडय़ामुळे लैंगिक छळवादासंदर्भात नवी नियमावली, ४९८अ ही कायदा दुरुस्ती, कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण देणारा कायदा अशी स्त्रियांना मदतीचा हात देणारी कायद्याची वाटचाल सुरू झाली. मात्र यामुळेच, ‘स्त्रियांना न्याय म्हणजे पुरुषांवर अन्याय’ या भावनेतून पुरुषांच्या काही संघटना, काही मंच स्थापन झाले. एक मुद्दा इथे जरूर नमूद करायला हवा की, स्त्रियांसाठीच्या या कायद्यांचा क्वचित त्यांच्याकडून गैरवापर झालाही असेल. पण या स्त्रिया कुणाच्या बहिणी/मुली होत्याच. तेव्हा या प्रकारे कायदेशीर कारवाई करण्यात त्यांचे वडील किंवा भाऊ या नात्यातल्या पुरुषांच्या मदतीशिवाय तर त्या उभ्या राहिल्या नाहीत ना? तरीसुद्धा अशा निरपराध पुरुषांवर गुदरलेल्या या आपत्तीबाबत मला वाटणारं दु:ख व्यक्त करण्याची जबाबदारी मी मानतेच. पण अशा वेळी कायद्याच्या गैरवापराच्या शक्यता बंद करण्याचा विचार करायचा की, कायदाच रद्द करण्याची मागणी करायची? आजवर बहुतेक सर्व कायद्यांच्या गैरवापराचा अनुभव जमा झालेला आहे. तरीसुद्धा काही संघटना, पुरुषांना न्याय मिळावा यासाठी जोरदार आघाडी उभी करताना दिसतात. वाईट एवढंच वाटतं की, आजवर शेकडो, हजारो स्त्रिया बळी गेल्या, आयुष्यातून उठल्या, त्यांच्यासाठी या संघटनांनी ब्रही उच्चारला नाही! महाराष्ट्रात स्त्री-पुरुषसमतेचा विचार मांडणाऱ्यांमध्ये म. फुल्यांपासून, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत अनेक पुरुषांनीच तर पुढाकार घेतला आहे. ती वैचारिक समज बाजूला सारणारे पुरुषांचे असे काही प्रयत्न मनात अस्वस्थता निर्माण करतात.
१९८२ मध्ये शैला लाटकर आणि मंजुश्री सारडा यांच्या अनैसर्गिक मृत्यूच्या घटनांनी सारा महाराष्ट्र हादरून गेला होता. जिवंतपणी, मनातला, घरातला असह्य कोंडमारा आणि कल्लोळ त्या कुठेही बोलू शकल्या नाहीत. अशा व्यक्तीला, घराबाहेर मन मोकळं करण्यासाठी, एका ‘आश्वस्त जागेची’ गरज असते. हे ओळखून १९८३ साली पुण्यात मंचानं ‘बोलत्या व्हा’ केंद्र काढलं. वर्षभरातच त्याचं समुपदेशन केंद्रात रूपांतर झालं!
आता वेळ आली आहे पुरुष संवाद केंद्रासारखा उपक्रम सुरू करण्याची. पुरुषवर्गात गेल्या काही वर्षांत अस्वस्थता वाढीला लागली आहे! ते भांबावले आहेत. काही प्रमाणात स्त्रिया बदलत आहेत. त्या शिकताहेत, विचार करताहेत, धीट होताहेत. पुरुष हा एकमेव शास्ता, रक्षणकर्ता, आधार या कल्पनेला त्याच्याबरोबर राहूनही त्या पर्याय शोधू पाहताहेत. यामुळे अशा भांबावलेल्या, तराही बदलाची आस बाळगणाऱ्या पुरुषासाठीही आपण काहीतरी करणं गरजेचं आहे. यात पुरुषावर उपकार केल्याची भावना नाही. उलट स्त्री-पुरुषांच्या निकोप सहजीवनाची ही गरज आहे, हे लक्षात घेऊन आम्ही कामाला लागलो. सुरुवातीच्या काही बैठकांमध्ये मंचाचे एक संस्थापक सदस्य डॉ. सत्यरंजन साठेही सक्रिय होते. पुढे त्यांचं अनपेक्षित निधन झालं. त्यानंतर डॉ. सत्यरंजन साठे यांच्या नावानेच पुरुष संवाद केंद्राची स्थापना झाली. त्यालाही आता दोन वर्षे होत आली. मंचाच्या कार्यालयात दरमहा शेवटच्या शनिवारी आमची बैठक होते. दर आठवडय़ातला एक दिवस पुरुष समुपदेशनासाठी खुला आहे. पुरुष संवाद केंद्रामुळे, नारी समता मंचाच्या इतरांबरोबरच्या संपर्कासाठी एक दार नव्यानं खुलं होत आहे.
पुरुषांबरोबर काम करणाऱ्या संघटनांचे पुरुष कार्यकर्ते यांच्याशी देवघेव घडू लागली आहे. यातूनच ‘सम्यक्’ संस्थेचा आनंद आणि ‘मासूम’ संस्थेचा मिलिंद यांच्याकडून एक अतिशय चांगली सूचना आली. त्यानुसार कार्यक्रम ठरला. तमाम पुरुष अजूनही आठ मार्चबाबत चेष्टेचा किंवा कुचेष्टेचा सूर लावतात. महिलादिनाच्या पूर्वसंध्येला- म्हणजे आज सायंकाळी पुण्यात योजलेला हा कार्यक्रम आहे- ‘समतेसाठी, आपण पुरुष’. यात पुरुषांना निमंत्रण आहे, आवाहन आहे, विनंतीही आहे सहभागी व्हावं यासाठी.
सुरुवातीलाच उल्लेख केलेला मंचाचा सर्वसमावेशकतेकडे नेणारा धागा आता अधिक बळकट होतो आहे. अधिक पुरुषांना सहभागी करून घेतो आहे. पारंपरिक प्रतिमेच्या चाकोऱ्यांमधून बाहेर पडू बघणाऱ्या साऱ्यांसाठी ही केवढी चांगली संधी आहे. ‘बाई असो की पुरुष, आम्ही सारे मुळात माणूस, एक माणूस!’ असं म्हटलं तर धागे एकत्र येणार, आपलेपणानं जवळ येणार, विणले जाणार आणि त्यांचा सर्व पातळ्यांवरच्या नात्यांचा सहजसुंदर गोफही तयार होणार.. त्यासाठीच तर सारा खटाटोप!
विद्या बाळ
saryajani@gmail.com