Leading International Marathi News Daily शनिवार, ७ मार्च २००९
  समतेसाठी पुरुषांचा पुढाकार
  स्त्री-पुरुष समतेचा गोफ
  स्त्रीत्वाचा सोयीस्कर अर्थ
  शाळेसह व्यापक कुटुंब
  थांब, माझ्या संसाराला...
  विज्ञानमयी
  गर्भासंबंधीचा कायदा
  'संवाद' सखी
  स्त्री-मनातले क्षितीज
  माळाकोळीतील दारूबंदी लढा!
  आगळीवेगळी क्षमा
  संसारकथा
  ताई आपटे : एक प्रेरणास्रोत
  मधुघटचि रिकामे
  कावळा
  प्रतिसाद
  हर्बिन : पूर्वेकडील मॉस्को!
  गाडी बुला रही है!

समानतेसाठी आम्ही!
स्त्री-पुरुष समानतेसाठी मी स्वत: काय करतो/ करते? लिंगविशिष्ट भूमिकांना मी चिकटून राहत नाही, लिंगभेद मानत नाही, हे आपण स्वत: कोणत्या कृतींतून व्यक्त करता? तुमचे स्वानुभव कमाल १५० शब्दांत १७ मार्चच्या आत लिहून कळवा. हे आवाहन महिला आणि पुरुष दोघांसाठीही आहे. मात्र प्रत्यक्षात अनुभव असा आहे की अशा आवाहनांना पुरुषांचा प्रतिसाद ३३ टक्के सोडाच, पण जेमतेम ३ टक्केही मिळत नाही. हे प्रमाण वाढावे, अधिकाधिक वाचकांनी स्वत:तील बदलाचे चाकोरीबाहेरचे ठोस दाखले प्रांजळपणे द्यावेत, ही अपेक्षा. घरातील मुला-मुलींना, महिलांना समानतेची वागणूक मिळावी, यासाठी तुम्ही स्वत: काय करता, हे स्पष्टपणे मांडणे अपेक्षित आहे. निवडक लेखनाला प्रसिद्धी दिली जाईल. आपले स्वानुभव कागदाच्या एकाच बाजूला सुवाच्य अक्षरात लिहून पाठवा.
पत्ता- ‘समानतेसाठी आम्ही’, चतुरंग पुरवणी, लोकसत्ता संपादकीय कार्यालय, एक्स्प्रेस टॉवर, नरिमन पॉईंट,
मुंबई ४०००२१.

  आज २० ते ३५ वयोगटातल्या आणि उच्च मध्यमवर्गीय शहरी समाजातल्या तरुणींना न झगडता बऱ्यापैकी स्वातंत्र्य मिळाले आहे. ते त्यांनी जबाबदारीने पेलले पाहिजे. सोयीने स्त्रीपण अंगीकारण्याचा मोह कटाक्षाने टाळला पाहिजे..
परवा लोकलचं तिकीट काढायला रांगेत उभी होते. रांग लांबच लांब होती, पण पटापट पुढेही सरकत होती. तेवढय़ात कॉलेजच्या दोन मुली तिथे आल्या. ‘अरे यार, कितनी लंबी है ये लाईन! आज तो देर होनीही होनी है।’ पहिली म्हणाली. लगेच दुसरी म्हणाली, ‘अरे, वो तिसरे नंबरपे खडा है नां, उसको देख।’ दोघी हसल्या. पहिलीने तिसऱ्या नंबरवाल्या मुलाला सांगितलं आणि दोन मिनिटात त्याने तिचं तिकीट काढून दिलं. दोघीजणी पटकन गेल्यासुद्धा.
घरी आल्यावर सॉफ्टवेअर इंजिनीयरिंगचा रिझल्ट लागलेला माझा पुतण्या वैतागलेला होता. त्याच्या मित्राने थिअरी पेपर्समध्ये उत्तम मार्क मिळवले होते. पण प्रॅक्टिकल्स परीक्षेमध्ये अपेक्षेपेक्षा कमी मार्क मिळाल्यामुळे त्याचा फर्स्ट क्लास थोडक्यात हुकल्याबद्दल जोरदार चर्चा सुरू होत्या. माझा पुतण्या पार्थ आणि त्याचा मित्र अक्षय बोलता बोलता मला म्हणाले, ‘‘तुला ती नेहा माहितीए, तिला प्रॅक्टिकल परीक्षेतले प्रोग्रॅम्स अजिबात येत नव्हते. तिने रडून
 
दाखवल्यावर, ती गोड गोड रडक्या आवाजात बोलल्यावर लॅब असिस्टंटने तिला चक्क पेनड्राइव्हच दिला, ज्यात प्रॅक्टिकल परीक्षेत करायला सांगितलेले प्रोग्रॅम्स होते. तिने आमच्यासमोर एका मिनिटात प्रिंट आऊट्स काढून आणले. तिला ५० पैकी ४५ मार्क नि अक्षयने सगळा प्रोग्रॅम स्वत: लिहिला, त्याची आऊटपुट्सही बरोबर आली तरी त्याला फक्त ३५ मार्क. बघ, मुलगी असल्याचे फायदे! कसलं आम्हाला जेंडर बायसनेसबद्दल सांगत असतेस, त्या मुलींना सांग आधी!’’ दोघं मला तावातावाने सांगत होते.
हे सगळं कमी म्हणून की काय कोण जाणे, नवऱ्यानेही त्याच्या ऑफिसमधली घटना सांगितली. सॉफ्टवेअर कंपनीत एका प्रोजेक्टचा तो ग्रुपलीडर. ग्रुपमधली एक मुलगी बाळंतपणाच्या रजेवरून नुकतीच कामावर रुजू झाली होती. घरी लहान बाळ म्हणून मिनिटभर सुद्धा जादा थांबत नव्हती. तिची अडचण ओळखून उरलेले सगळेजण जादा थांबून प्रोजेक्टची डेडलाईन गाठण्यासाठी आटापिटा करत होते. तिला रजा/कन्सेशनही मिळत होती. याचवेळी कंपनीने नवीन प्रोजेक्टसाठी काही जणांना परदेशी पाठविण्याचं ठरवलं. नवऱ्याने विचार केला की या मुलीचं बाळ लहान. शिवाय गेल्याच आठवडय़ात नैरोबीचा प्रोजेक्ट तिने याच कारणासाठी नाकारला होता. त्यामुळे सॅनफ्रॅन्सिस्कोच्या प्रोजेक्टसाठी त्याने तिचं नाव कळवलं नाही. त्यावरून तिने नवऱ्याविरुद्ध तक्रार केली. कारण सॅनफ्रॅन्सिस्कोला जाण्यासाठी ती काहीही करायला तयार होती.
नवरा वैतागाने म्हणाला, ‘‘यापुढे मी मुलींना प्रोजेक्टमध्ये घेणारच नाही. यांच्या ‘सोयीने स्त्रीपण अंगीकारण्याच्या’ पद्धतीचा मला तिटकारा यायला लागलाय.’’
या घटना काही नवीन नाहीत. अर्थात हेही मान्य की अशा घटना म्हणजे नियम नाही आणि सर्वसामान्य समाजाचे प्रतिनिधित्वही त्या करीत नाहीत. समाजाच्या एका सुशिक्षित स्वतंत्र, बऱ्यापैकी सुरक्षित अशा उच्च मध्यमवर्गीय गटातल्या या घटना आहेत. पण खरं तर म्हणूनच या गटातल्या स्त्रियांवर थोडी जास्त जबाबदारी आहे. त्यांना स्त्री मुक्ती चळवळीचे, गांधी/ आंबेडकर/ कर्वे/ फुले यांच्या कष्टाचे फळ जन्मजात मिळाले आहे. न झगडता मिळालेल्या स्वातंत्र्याचा नीट, जबाबदारीने उपयोग करून घेऊन इतरांसमोर आदर्श ठेवण्याचे काम त्यांना आपल्या आचरणातूनच दाखवून द्यायचे आहे. स्वातंत्र्य मिळवणे जेवढे अवघड आहे त्याहून अधिक अवघड आहे ते विवेकाने वापरणे नि टिकवणे. आज मर्यादित का होईना मिळालेल्या स्वातंत्र्याचा एक माणूस म्हणून जबाबदारीने उपयोग करणे आपण शिकायला हवे आहे.
आज २० ते ३५ वयोगटातल्या आणि उच्च मध्यमवर्गीय शहरी समाजातल्या तरुणांमध्ये स्त्रीमुक्ती चळवळीबद्दल माहिती असणाऱ्यांची संख्या नगण्य आहे. त्यांच्यासमोर मुली/ स्त्रिया आपल्या वागण्यातून दाखवतील, तेच ‘स्त्रीत्व’ समाजासमोर येत राहणार आहे. स्त्री- पुरुष समानता बऱ्यापैकी रुजलेल्या या गटात पुरुषी व्यवस्थेविरुद्ध स्त्री- पुरुषांनी एकत्र काम केलं जातंय. अशा वेळी आपल्यालाही फक्त स्त्री/ मादी म्हणून ओळखले जाऊ नये असे खरोखरच वाटत असेल, तर त्यांनी एक माणूस म्हणून स्वत:ला व्यक्त केलं पाहिजे.
आपणच जर आपलं ‘स्त्रीत्व’ ‘चलनी नाण्या’सारखं वापरणार असू, तर समोरचा नेहमीच ते वापरून घेणार आहे. त्यामुळे तुम्हाला हवं तेव्हा तुमचा ‘स्त्री’ म्हणून नि तुम्हाला नको असेल तेव्हा तुमचा माणूस म्हणून स्वीकार कदापि होणार नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. उलट स्वत:चं स्त्रीत्व असं विनिमयाचं साधन केलं, तर तुमचं माणूसपण मात्र संपून जाईल. तुमची प्रतिमा फक्त एक स्त्री म्हणून उभी करणे किंवा एक माणूस म्हणून उभी करणे ही निवड स्वत:च करायची असते. त्यानुसारच समाजाच्या प्रतिक्रिया येणार असतात.
अगदी हॉटेलात गेल्यावर मुलींनी बिल न भरणे, आपले सामान पुरुष सहकाऱ्याला उचलू देणे अशा छोटय़ा छोटय़ा गोष्टींपासून ते स्त्री विभ्रमांचा, स्त्री- देहाचा आवश्यकतेनुसार उपयोग करून घेऊन तिकिटे काढून घेणे, मार्क मिळवणे, छोटय़ा- मोठय़ा सवलती, प्रमोशन्स इ. मिळवणे इथपर्यंत सर्व काही करण्यापर्यंतचा हा आवाका आहे.
मी स्त्री आहे म्हणून परंपरागत स्त्रीत्वाचे फायदे घेईन, कामाच्या ठिकाणी घरातल्या आणि घरी कामाच्या ठिकाणच्या अडचणी सांगून दोन्हीकडच्या जबाबदाऱ्या टाळेन, लग्नासाठी जोडीदार निवडताना स्वत:पेक्षा उंच, जास्त शिकलेला, श्रीमंत, वयाने मोठा इ. असण्याबद्दल आग्रही असेन, मित्र/ नवरा यांच्या कमाईतून अधिकाधिक भौतिक सुखे मिळवण्यासाठी आग्रही राहीन आणि ती मिळवेन.. अशा प्रकारच्या वागण्यामधून आपणच स्त्री- पुरुष समानतेच्या तत्त्वाशी विसंगत वागतो आहोत, याचे भानही आपल्याला राहात नाही.
कबूल आहे की आजही दिल्लीत भरदिवसा कॉलेज युवतीवर बलात्कार होताहेत. पबमध्ये मुलींनी गेल्याबद्दल त्यांना शिक्षा होताहेत. स्त्री-भ्रूण हत्येमध्ये महाराष्ट्राचा भारतात सहावा नंबर आहे. घर- व्यवस्थापन आणि अपत्य संगोपन ही आजही प्रामुख्याने बाईची जबाबदारी आहे. आजही महिलांना समानतेची प्रतीक्षा आहे.
अशा परिस्थितीत आपल्याकडून कळत- नकळत स्त्रीत्व वापरलंही जाऊ देऊ नये. अत्यंत तणावयुक्त आणि जीवघेण्या शर्यतीच्या या युगात घेतले थोडेसे स्त्रीत्वाचे फायदे तर काय मोठं बिघडलं, असंही कुणी वाटून घेऊ नये. क्षणिक मोहासाठी, आळशीपणा म्हणून, कसलेतरी मूर्ख बदले म्हणून, थोडी गंमत म्हणून इ. कोणत्याही कारणाने असे शॉर्टकट घेणे आपण टाळायचं ठरवूया. प्रवास लांबचा असेल कदाचित. खडतरही आहे. पण शेवटी स्वत: कष्टाने मिळवलेल्या गोष्टींची किंमत, स्वाभिमान, आत्मसन्मान या खूप मोठय़ा, मोजता आणि तुलना न करता येणाऱ्या गोष्टी आहेत. अवघड ध्येय गाठण्यातच तर खरी कसोटी आहे. म्हणूनच उद्याच्या महिला दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपण निव्वळ बाईपणाकडून माणूसपणाने जायला सुरुवात करूया.
मनीषा सबनीस