Leading International Marathi News Daily शनिवार, ७ मार्च २००९
  समतेसाठी पुरुषांचा पुढाकार
  स्त्री-पुरुष समतेचा गोफ
  स्त्रीत्वाचा सोयीस्कर अर्थ
  शाळेसह व्यापक कुटुंब
  थांब, माझ्या संसाराला...
  विज्ञानमयी
  गर्भासंबंधीचा कायदा
  'संवाद' सखी
  स्त्री-मनातले क्षितीज
  माळाकोळीतील दारूबंदी लढा!
  आगळीवेगळी क्षमा
  संसारकथा
  ताई आपटे : एक प्रेरणास्रोत
  मधुघटचि रिकामे
  कावळा
  प्रतिसाद
  हर्बिन : पूर्वेकडील मॉस्को!
  गाडी बुला रही है!

समानतेसाठी आम्ही!
स्त्री-पुरुष समानतेसाठी मी स्वत: काय करतो/ करते? लिंगविशिष्ट भूमिकांना मी चिकटून राहत नाही, लिंगभेद मानत नाही, हे आपण स्वत: कोणत्या कृतींतून व्यक्त करता? तुमचे स्वानुभव कमाल १५० शब्दांत १७ मार्चच्या आत लिहून कळवा. हे आवाहन महिला आणि पुरुष दोघांसाठीही आहे. मात्र प्रत्यक्षात अनुभव असा आहे की अशा आवाहनांना पुरुषांचा प्रतिसाद ३३ टक्के सोडाच, पण जेमतेम ३ टक्केही मिळत नाही. हे प्रमाण वाढावे, अधिकाधिक वाचकांनी स्वत:तील बदलाचे चाकोरीबाहेरचे ठोस दाखले प्रांजळपणे द्यावेत, ही अपेक्षा. घरातील मुला-मुलींना, महिलांना समानतेची वागणूक मिळावी, यासाठी तुम्ही स्वत: काय करता, हे स्पष्टपणे मांडणे अपेक्षित आहे. निवडक लेखनाला प्रसिद्धी दिली जाईल. आपले स्वानुभव कागदाच्या एकाच बाजूला सुवाच्य अक्षरात लिहून पाठवा.
पत्ता- ‘समानतेसाठी आम्ही’, चतुरंग पुरवणी, लोकसत्ता संपादकीय कार्यालय, एक्स्प्रेस टॉवर, नरिमन पॉईंट,
मुंबई ४०००२१.

  नावाप्रमाणेच व्यक्तिमत्त्व असणं हा खरं तर दुर्मिळ योग. पण काहींचं व्यक्तिमत्त्व व त्यांचं कार्य मात्र आपलं नाव सार्थ ठरवणारं असतं. अशांपैकीच एक- कुल्र्याच्या शिक्षणरत्न प्रदीप सामंत शिक्षणसंकुलाच्या मुख्याध्यापिका विद्युत सामंत! शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून त्या काम करत असल्या तरी शाळेचं व्यवस्थापनही त्याच सांभाळतात. शाळेसाठी भूखंड मिळविण्यापासून शाळा नावारूपाला आणण्याचं काम त्यांचे पती प्रदीप सामंत यांनी केलं. त्यांच्या पश्चात् आता ही जबाबदारी विद्युत सामंत आत्मविश्वासाने पेलत आहेत.
‘खरं तर मला स्वत:ला आधी शिक्षण क्षेत्राची अजिबातच आवड नव्हती. चित्रकला, भरतकाम, विणकाम या कलांची मात्र होती. म्हणून आर्ट टीचर डिप्लोमा, टेक्स्टाईल डिप्लोमा करून मी कुल्र्याच्या शां. कृ. पंत वालावलकर शाळेत ‘लिव्ह व्हेकन्सी’वर नोकरीस लागले. याच दरम्यान शाळेच्या संस्थापकांच्या मुलाशी माझं लग्न झालं. आणि मग पदवी शिक्षण पूर्ण करून मी तिथंच कायम नोकरी करायला लागले.’
विद्युत सामंत यांचं कार्यक्षेत्र आज खूप विस्तारलंय. शाळेतली व बाहेरची कामं, वॉर्ड ऑफिस, महापालिका व शिक्षणाधिकारी कार्यालय इथे शाळेच्या कामांसाठी जाणं, शाळेत विद्यार्थी, पालक, शिक्षक तसंच इतर संबंधितांशी सुसंवाद साधणं, दैनंदिन
 
नोंदी, नवीन उपक्रमांसंदर्भातील चर्चा, बैठका या सगळ्या गोष्टी करत असतानाच शाळेत चालणाऱ्या तबला, कराटे, संगीत क्लासेसवर देखरेख करणं, हाही त्यांच्या कामाचा एक भाग आहे. त्यांच्या दिवसाची सुरुवात पहाटे लवकर उठून मुलींचे डबे करण्यापासून होते. दिवसभरातल्या व्यस्त वेळापत्रकानंतर रात्री साडेआठ-नऊला शाळेतली कामं संपवून त्या घरी परततात.
मराठी प्राथमिक विभागाची १६०० मुलं, इंग्लिश प्राथमिक विभागाची ११०० मुलं, ूेस्र्४३ी१ ूंंीिे८, शाळेचं व्यवस्थापनाची जबाबदारी आणि घर या सगळ्या गोष्टींचा मेळ त्या कसा साधतात, हा प्रश्नच आहे. यावर त्या म्हणाल्या, ‘प्रारंभी एकत्र कुटुंबात असताना शाळेतली शिक्षिकेची नोकरी सांभाळून घरची सगळी कामं मीच करायचे. मात्र, तेव्हा माझ्या पतीचा मला पूर्ण पाठिंबा असल्याने सर्व कामं करण्याची ऊर्जा मिळायची. कालांतराने आम्ही स्वतंत्र राहायला लागल्यावरही घरी नोकर ठेवता आले नाहीत. पतीवरच्या प्रेमामुळे, त्यांच्या माझ्यावरच्या विश्वासामुळे आणि कोणतंही काम सर्वस्व झोकून देऊन करण्याच्या माझ्या वृत्तीमुळे मी या सर्व जबाबदाऱ्या समर्थपणे निभावू शकले.’
शाळा हेच सर्वस्व मानणाऱ्या विद्युत सामंत यांना ‘विद्यार्थ्यांकडे लक्ष देताना आपल्या स्वत:च्या मुलांकडे दुर्लक्ष होतंय, त्यांच्यासाठी पुरेसा वेळ देता येत नाही, अशी खंत कधी वाटते का?,’ असं विचारता त्या म्हणाल्या, ‘अशी खंत अनेकदा वाटते. मुलांना आमच्यामुळे काही गोष्टी सोसाव्या लागल्या. काही क्षणांचं महत्त्व त्या- त्या वेळीच असतं. नंतर भरपाई करण्याचा प्रयत्न केला तरी ती उणीव भरून निघत नाही. पण आमच्या दोन्ही मुली खूप समजूतदार आहेत. मोठी नेहा बायोटेक करतेय, तर धाकटी ऋचा दहावीत आहे. दोघीही लहानपणापासून आमच्याबरोबर शाळेत येत असल्याने आम्ही दोघंही काय काम करतो, त्याचं स्वरूप काय आहे, याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. वडिलांच्या अकाली मृत्यूनंतर त्यांचे अंत्यसंस्कार व कार्य त्यांनीच केलं. त्यासाठी सामाजिक विरोधही पत्करला. मोठय़ा होऊन आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचं दोघींनी ठरवलंय.’
शिक्षण क्षेत्रात प्रारंभी रुची नसतानाही एम.ए.- बी.एड्.पर्यंत शिक्षण पूर्ण करून विद्युत सामंत यांनी शैक्षणिक क्षेत्रात आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वात अनेक बदलही केले. त्याविषयी त्या सांगतात, ‘पूर्वी मी मध्यमवर्गीय घरातून आलेली साधी मुलगी होते. नंतर मी जिद्दीने शिक्षण पूर्ण केलं. अन्याय सहन होत नसल्याने कार्यक्षेत्र विस्तारल्यावर काहीशी आक्रमकता माझ्यात आली. अगदी जाणीवपूर्वक नसले तरी कळत-नकळत हे बदल होत गेले. अर्थात शाळेत अधिकारपदावर असले तरी घरी मात्र कुटुंबीयांना हवं-नको बघणारी, घरातल्यांना सुखी, आनंदी ठेवण्यासाठी झटणारी अशी गृहिणी मी असते.’
घरातल्या सण-समारंभांविषयी विद्युत सामंत यांनी एक वेगळाच दृष्टिकोन मांडला. त्या म्हणाल्या, ‘सणवार घरी साजरे करायला आम्हाला वेळच नसतो. चार वर्षांनी एकदा गावी गणपतीसाठी जातो. दिवाळी मित्र व हितचिंतकांच्या घरी जाऊन त्यांना भेटवस्तू, फराळ देऊन हितसंबंध दृढ करण्यात जाते. भाऊबीजही आमच्याकडे दिवाळी संपल्यावर सवड काढून कधीतरी होते.’ शाळेला सुट्टय़ा असताना बाहेरगावी जाता का, या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, ‘दरवर्षी १६ मे’ला कुलदेवतेच्या उत्सवाला आम्ही गावी जातो. गेली दोन र्वष मात्र मुलींमुळे गणपतीपुळ्यालाही जाऊन आलो. अर्थात हे फिरणंही दोन-चार दिवसांचंच असतं. कारण सुट्टीत पालक नवीन प्रवेशासाठी येत असतात आणि सध्या मराठी माध्यमात शिकणाऱ्या मुलांची कमी होत जाणारी संख्या पाहता एकही अ‍ॅडमिशन परत जाऊ देऊ नये असं वाटतं. त्यामुळे जास्त काळ बाहेरगावी जाता येत नाही.’
शाळेसाठी समर्पित भावनेने काम करणाऱ्या विद्युत सामंत यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. आजवरच्या वाटचालीकडे पाहताना काय वाटतं, याविषयी त्या म्हणाल्या, ‘लग्नाच्या वेळी फक्त संसार हेच माझं स्वप्न होतं. पण नंतर जबाबदाऱ्या पेलत अनुभवांतून मी खूप काही शिकत गेले आणि आज माझं कुटुंबाचं स्वप्न विस्तारत शाळेइतकं मोठं झालंय. शाळेचं व्यापक कुटुंबही माझंच असल्याने ते नीट सांभाळायचं आणि नवं कॉलेज सुरू करण्याचं माझ्या पतीचं स्वप्न पूर्ण करायचं, हेच आता माझं आणि मुलींचंही ध्येय आहे.’
घर व करिअर दोन्ही सांभाळताना घर-संसाराची कक्षा व्यापक करून कार्यक्षेत्रातल्या सगळ्यांना त्यात सामावून घेणाऱ्या, शाळा हेच कुटुंब मानणाऱ्या विद्युत सामंत यांना त्यांच्या या स्वप्नपूर्तीसाठी शुभेच्छा!
अंजली कुलकर्णी
anjalicoolkarni@yahoo.co.in