Leading International Marathi News Daily शनिवार, ७ मार्च २००९
  समतेसाठी पुरुषांचा पुढाकार
  स्त्री-पुरुष समतेचा गोफ
  स्त्रीत्वाचा सोयीस्कर अर्थ
  शाळेसह व्यापक कुटुंब
  थांब, माझ्या संसाराला...
  विज्ञानमयी
  गर्भासंबंधीचा कायदा
  'संवाद' सखी
  स्त्री-मनातले क्षितीज
  माळाकोळीतील दारूबंदी लढा!
  आगळीवेगळी क्षमा
  संसारकथा
  ताई आपटे : एक प्रेरणास्रोत
  मधुघटचि रिकामे
  कावळा
  प्रतिसाद
  हर्बिन : पूर्वेकडील मॉस्को!
  गाडी बुला रही है!

समानतेसाठी आम्ही!
स्त्री-पुरुष समानतेसाठी मी स्वत: काय करतो/ करते? लिंगविशिष्ट भूमिकांना मी चिकटून राहत नाही, लिंगभेद मानत नाही, हे आपण स्वत: कोणत्या कृतींतून व्यक्त करता? तुमचे स्वानुभव कमाल १५० शब्दांत १७ मार्चच्या आत लिहून कळवा. हे आवाहन महिला आणि पुरुष दोघांसाठीही आहे. मात्र प्रत्यक्षात अनुभव असा आहे की अशा आवाहनांना पुरुषांचा प्रतिसाद ३३ टक्के सोडाच, पण जेमतेम ३ टक्केही मिळत नाही. हे प्रमाण वाढावे, अधिकाधिक वाचकांनी स्वत:तील बदलाचे चाकोरीबाहेरचे ठोस दाखले प्रांजळपणे द्यावेत, ही अपेक्षा. घरातील मुला-मुलींना, महिलांना समानतेची वागणूक मिळावी, यासाठी तुम्ही स्वत: काय करता, हे स्पष्टपणे मांडणे अपेक्षित आहे. निवडक लेखनाला प्रसिद्धी दिली जाईल. आपले स्वानुभव कागदाच्या एकाच बाजूला सुवाच्य अक्षरात लिहून पाठवा.
पत्ता- ‘समानतेसाठी आम्ही’, चतुरंग पुरवणी, लोकसत्ता संपादकीय कार्यालय, एक्स्प्रेस टॉवर, नरिमन पॉईंट,
मुंबई ४०००२१.

  एम. एस्सी.चा रिझल्ट लागला त्या दिवशीच तिचा साखरपुडा होता. अपेक्षेप्रमाणे उत्तम मार्कस् मिळवून ती एम. एस्सी. उत्तीर्ण झाली होती. पण त्या यशाच्या आनंदावर साखरपुडय़ाच्या गोड शिरशिरीने मात केली. सहज बोलता बोलता लग्न जमलं. चांगल्या घरचा, चांगला शिकलेला, चांगली नोकरी करणारा- म्हणजेच सर्वार्थाने चांगलं ‘स्थळ’ म्हणवलं जाईल असा नवरा आपल्या पायाने चालत आला. एकच छोटीशी गैरसोय होती. तेव्हाच्या वऱ्हाडातल्या एका आडगावच्या एका जिनिंग मिलचा तो कार्यकारी अधिकारी होता. त्यामुळे तिला मुंबई सोडावी लागणार होती. तिनं आनंदानं नसली, तरी फारशी कुरकूर न करता मुंबई सोडली. वास्तविक त्याकाळी तिला पीएच.डी.साठी स्कॉलरशिप सहज मिळू शकली असती. तिनं त्याकडे पाठ फिरवताना मनात म्हटलं, ‘हुशार व्यक्ती कुठेही जाऊन काहीही करू शकते. करायचं म्हटलं तर कुठेही काहीही करता येतं. एवढं काय मुंबई- मुंबई घेऊन बसायचं? पीएच. डी. पुढेही करू शकू. आज माझ्या संसाराला माझी जास्त गरज आहे!!’
यथासांग तिनं संसार मांडला. संसारातील प्रारंभीच्या नशेत आपली शाळा-कॉलेजातली हुशारीसुद्धा ती काही काळ विसरली. पीएच.डी.च्या प्रवेशाचा फॉर्म टरकावून टाकला आणि ती घर सजवायचं, उत्तमोत्तम पदार्थ रांधायचे, नवऱ्याला जिंकायचं,
 
सासरच्यांना खूश करायचं, या इरेला पेटली. मनात म्हणाली, ‘या गोष्टी सर करायचे हेच तर दिवस आहेत! करिअरच्या मागे लागून आजचा हा आनंद मी का गमावू?’
या आनंदाचं किंचित अजीर्ण होईल की काय, अशी शंका येतेय- न येतेय तोच तिला पहिल्या बाळाची चाहूल लागली. नवीन नातं अक्षरश: ‘सफळ’ होतंय, यानं ती हरखली. मनात म्हणाली, ‘या टप्प्यावर सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुदृढ, निरोगी बाळ जन्मणं. त्यापेक्षा महत्त्वाचं काही असूच शकत नाही. जरासे हात-पाय मारले तर जवळच्याच एका कॉलेजमध्ये नोकरी मिळवता येईलही, पण सध्या तो मोह नको. नुसतं लेक्चरर कशाला व्हा? मनात आणलं तर आपण विभागप्रमुखही होऊ शकतो.’
पुढचा काही काळ तिच्या मनात बाळाशिवाय काही आलंच नाही. सारखी व्यग्रता आणि सारखी स्वप्नं. ते जरा जाणतं झालं की सवड मिळेल.. ते पाळणाघरात.. शिशुवर्गात.. शाळेत जायला लागलं की सवड मिळेल.
तशात अवचित एकदम नवऱ्याची बदली झाली. त्या जुळवाजुळवीत दमछाक झाली. त्यातून नव्या ठिकाणी जरा स्थिरावत्येय तोवर दुसरं मूल! हवी होती तशी मुलगीच झाली. संसाराचा चौकोन फिट्ट बसला. पण सवडीचा गळाही घोटला गेला. आता तर काय, मुलीला वाढवायचं होतं. सुसंस्कारित की काय, ते करायचं होतं. स्वत:च्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या नादात मुलीकडे दुर्लक्ष केलं, हा ठपका तिला नको होता. उगाच आपल्या विषयाच्या संपर्कात राहावं म्हणून तिनं घरीच थोडय़ा शिकवण्या घ्यायला सुरुवात केली. पण कधी मुलांना सुट्टय़ा, कधी पाणी आलं नाही, कधी मोलकरीण रजेवर.. अशा अडथळ्यांच्या शर्यतीत त्या घेणंही त्रासदायक व्हायला लागलं. हळूहळू त्या बंद पडल्या.
दरम्यान, नवऱ्याला दोन र्वष परदेशात राहून त्याच्या उद्योगातलं नवं तंत्रज्ञान शिकून घेण्याची मौलिक संधी मिळाली. वास्तविक परदेशात तिलाही शिकण्यासारखं उदंड होतं. पण तिनं ‘तसले विचार’ मनाला शिवू दिले नाहीत. जनरीतीप्रमाणे नवऱ्याच्या भरभराटीतच तिनं आनंद मानला. त्याच्या अनुपस्थितीमध्ये त्याची माणसं, त्याचा संसार सांभाळण्यासाठी तिनं जिवाचा कोट केला.
परदेशच्या संधीचं नवऱ्यानं सोनं केलं. आपल्याला फार संधी दिसत नाहीत, यावर तिनं मौन पत्करलं. मुलं मोठी व्हायला लागली. घरातली म्हातारी माणसं आणखीच म्हातारी, जर्जर व्हायला लागली. स्वत:च्याही वाढत्या वयात या दोन टोकांना धरून राहण्याचा आटापिटा तिला पुरता अडकवून ठेवू लागला. त्यातूनही प्रचंड मनोनिग्रहानं तिनं एका प्रयोगशाळेत प्रोजेक्ट असिस्टंटची छोटी नोकरी मिळवली होती.. सुरूही केली होती. पण अवचित सासूबाईंना पक्षाघाताचा झटका आला आणि त्या अंथरुणाला खिळल्यावर ती पुन्हा एकदा घराला खिळली. त्यांच्याकडे दुसरं कोण बघणार होतं?
या सगळ्यात मुलगा एक वर्ष नापास होणं, धाकटय़ा नणंदेचा नवरा अकाली वारल्यानं तिच्याकडे लक्ष द्यावं लागणं, स्वत:ची नवी ‘बायकी’ व्याधी सांभाळणं, एका बिल्डरने फ्लॅट खरेदीच्या व्यवहारात फसवणं, भावाचा घटस्फोट होणं- असे प्रासंगिक अडथळेही होतेच. सगळे त्या- त्या वेळी, त्या- त्या ठिकाणी, त्यांच्या त्यांच्या परीने महत्त्वाचे होते. तिच्या सहभागाची मागणी करणारे होते. त्यांनी एक काम निष्ठेने केलं. ती ज्या सवडीची वाट बघत होती ती सवड तिला चुकूनही, कधीही जराही मिळूच दिली नाही. हे म्हणजे अगदी चिमणीच्या गोष्टीसारखं झालं. दरवेळी कावळा दार ठोठवायचा. दरवेळेला दार न उघडण्याचं नवं नवं कारण ती पुढे करायची. सबब नव्हे, कारण. तिच्या मते सज्जड कारण.
‘‘चिऊताई.. चिऊताई.. दार उघड.’’
‘‘थांब. माझ्या संसाराला सुरुवात करते.’’
‘‘थांब. माझ्या संसाराला वाढवते. जोपासते.’’
‘‘थांब. माझ्या संसाराला नटवते. सजवते.’’
‘‘थांब. माझ्या संसाराला वाचवते. जपते.’’
‘‘थांब. माझ्या संसाराला..’’
तिचं संसाराचं पुराण कधीच संपलं नाही. दार कधीच उघडलं नाही. त्या मेल्या कावळ्यालाच नव्हे, तर अगदी सोन्यासारख्या संधीलासुद्धा! कावळा असता तर लोचटपणे थांबून राहिला असता. संधी कशाला थांबतायत? त्या कधीच बेपत्ता झाल्या. ती फक्त घरदार धरून राहिली. ‘थांब.. थांब..’ म्हणत राहिली. स्वत:पुरतीच थांबली. यातली ‘ती’ कोण, हे विचारू नका. ‘ती’ला नाव नाही. ‘ती’ एक वृत्ती आहे; जी तुमच्या आसपास आणि तुमच्या-माझ्यात असते.. आढळते. आवडत नसेल तर प्रयत्नपूर्वक तिच्यावर मात करा. आवडत असेल किंवा ओलांडता येत नसेल, तर अधूनमधून कुरकूर करत तिच्यासोबत जगा. निवड तुमची! पण बाईला सवड मिळतच नसते. कधीही सहजासहजी मिळत नसते. ती झगडून मिळवावी लागते. कधी कधी व्यवस्थित किंमत मोजून घ्यावी लागते. कधी कधी तिच्यासाठी निष्ठुरपणे काही गोष्टींकडे पाठ फिरवावी लागते.. हे विसरू नका. कारण बाईसाठी सवडीइतकं महाग काही नसतं! ८ मार्चच्या स्त्रीदिनासाठी हा न मागितलेला सल्ला. संसारातल्या सवडीसाठी जन्मभर झुंजलेल्या एका सहप्रवासिनीचा!
मंगला गोडबोले