Leading International Marathi News Daily शनिवार, ७ मार्च २००९
  समतेसाठी पुरुषांचा पुढाकार
  स्त्री-पुरुष समतेचा गोफ
  स्त्रीत्वाचा सोयीस्कर अर्थ
  शाळेसह व्यापक कुटुंब
  थांब, माझ्या संसाराला...
  विज्ञानमयी
  गर्भासंबंधीचा कायदा
  'संवाद' सखी
  स्त्री-मनातले क्षितीज
  माळाकोळीतील दारूबंदी लढा!
  आगळीवेगळी क्षमा
  संसारकथा
  ताई आपटे : एक प्रेरणास्रोत
  मधुघटचि रिकामे
  कावळा
  प्रतिसाद
  हर्बिन : पूर्वेकडील मॉस्को!
  गाडी बुला रही है!

समानतेसाठी आम्ही!
स्त्री-पुरुष समानतेसाठी मी स्वत: काय करतो/ करते? लिंगविशिष्ट भूमिकांना मी चिकटून राहत नाही, लिंगभेद मानत नाही, हे आपण स्वत: कोणत्या कृतींतून व्यक्त करता? तुमचे स्वानुभव कमाल १५० शब्दांत १७ मार्चच्या आत लिहून कळवा. हे आवाहन महिला आणि पुरुष दोघांसाठीही आहे. मात्र प्रत्यक्षात अनुभव असा आहे की अशा आवाहनांना पुरुषांचा प्रतिसाद ३३ टक्के सोडाच, पण जेमतेम ३ टक्केही मिळत नाही. हे प्रमाण वाढावे, अधिकाधिक वाचकांनी स्वत:तील बदलाचे चाकोरीबाहेरचे ठोस दाखले प्रांजळपणे द्यावेत, ही अपेक्षा. घरातील मुला-मुलींना, महिलांना समानतेची वागणूक मिळावी, यासाठी तुम्ही स्वत: काय करता, हे स्पष्टपणे मांडणे अपेक्षित आहे. निवडक लेखनाला प्रसिद्धी दिली जाईल. आपले स्वानुभव कागदाच्या एकाच बाजूला सुवाच्य अक्षरात लिहून पाठवा.
पत्ता- ‘समानतेसाठी आम्ही’, चतुरंग पुरवणी, लोकसत्ता संपादकीय कार्यालय, एक्स्प्रेस टॉवर, नरिमन पॉईंट,
मुंबई ४०००२१.

  चिपळूणच्या काही होतकरू तरूणांनी एकत्र येऊन ‘संवाद’ ची स्थापना केली. चिपळूण तालुक्यातील दोणवली पंचक्रोशी हा अतिदुर्गम परिसर कार्यक्षेत्र म्हणून निवडला. त्या अंतर्गत गावात आरोग्यसखीच्या माध्यमातून त्यांनी ‘स्त्री आरोग्य’ हा विषय गांभीर्याने हाती घेतला.
शहराकडल्या लोकांना भुरळ पाडणाऱ्या कोकणातलं दैनंदिन जीवन वाटतं तेवढं सोपं नाही. वनश्रींनी नटलेले निसर्गाचे देखणे तुकडे वाकडेतिकडे रस्ते पायाखालून घातल्याशिवाय दर्शन देत नाहीत. डोंगरमाथ्यापासून पायथ्यापर्यंत पसरलेलं गाव कितीही आव आणला तरी प्राथमिक आरोग्य सुविधांपासून वंचितच आहे. विरळ लोकवस्ती, अंतरा-अंतरावर वसलेल्या वाडय़ा-वस्त्या, सोयीच्या दळणवळण सेवेचा अभाव, कच्चे व खडतर रस्ते, सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रांतील अपुऱ्या सोयी.. अशा अनेक अडथळ्यांचा रस्ता पार करून ‘आरोग्यसेवा’ दुर्गम भागांपर्यंत पोहोचणार तरी कशी?
चिपळूणच्या सुनीता गांधी, महेंद्र इंदुलकर, अनिल काळे, खालिद दलवाई, लीना खातू, शैलेश वरवटकर आणि अन्य युवकांनी १९९१ साली ‘संवाद’ ही संस्था स्थापन केली. ‘स्त्री-आरोग्य’ या विषयाचे गांभीर्य ‘संवाद’ला सुरुवातीपासूनच समजले होते.
 
चिपळूण तालुक्यातील दोणवली पंचक्रोशी हा अतिदुर्गम परिसर त्यांनी आपलं कार्यक्षेत्र म्हणून निवडला. त्यावेळेस बचतगटांची चळवळ नुकतीच अंग धरू लागली होती. या गावात त्यांनी स्त्रियांचे बचतगट स्थापन केले. त्यांच्या मासिक बैठका सातत्याने भरवल्या. बचतगटांच्या मदतीने स्त्रिया आर्थिकदृष्टय़ा सक्षम होतील, याची काळजी ‘संवाद’ने घेतलीच, त्याशिवाय या गटांचे उपक्रम हळदीकुंकू, तिळगूळ वाटप अशा सरधोपट कार्यक्रमांच्या चक्रात अडकवून न ठेवता भरीव सामाजिक उपक्रम कसे राबवता येतील, याकडे त्यांनी लक्ष दिले. सांस्कृतिक कार्यक्रम राबविताना त्यातूनही सामाजिक बदल करण्याचे प्रयत्न केले. हळदीकुंकू समारंभात विधवा स्त्रियांना समाविष्ट करण्याचा प्रयत्न त्यातूनच यशस्वी झाला.
स्त्रियांशी केलेल्या विचारविनिमयातून त्यांच्या गरजा नेमक्या काय आहेत, हे जाणून घेतले असता सर्वच स्त्रियांनी त्यांच्या आरोग्यावर ‘संवाद’ने काहीएक ठोस काम करावे, अशी एकमुखी मागणी केली. त्यातूनच सुनीता गांधी आणि महेंद्र इंदुलकर यांनी चिपळूणच्या डॉ. रीळकर, डॉ. मुश्रीफ, डॉ. अशोक केतकर, डॉ. विकास नातू, डॉ. सचिन देसाई, डॉ. यतीन जाधव यांच्या सहकार्याने स्त्रियांसाठी आरोग्यविषयक जाणीवजागृतीचे कार्यक्रम आखले. आरोग्य शिबिरे आयोजित केली. त्यांतून स्त्रियांचे नेमके प्रश्न काय आहेत, याची ‘संवाद’ला समज येत गेली.
या सर्व प्रक्रियेत कार्यकर्तीच्या रूपात दोणवलीच्या सुशीला पवार हा ‘हिरा’ संस्थेला सापडला. ग्रामीण परिसरातील स्त्रियांच्या बचतगटांना कायम ‘सरळ’ मार्गावर ठेवण्यासाठी प्रसंगी ‘वाकुड’पणा घेण्याचं काम त्या आजही नेटानं करत आहेत. दोणवली ग्रामपंचायतीचे सरपंचपद भूषवून राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करण्याचं कौशल्यही त्यांनी दाखवलं आहे. स्त्री-आरोग्याबाबतचे प्रश्न त्यांनी वेळोवेळी ‘संवाद’पुढे मांडले.
‘संवाद’ने १९९८ सालात डॉ. मारी डिसुझा व डॉ. सतीश गोगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्त्री-आरोग्य व त्यावर वनौषधींद्वारे उपचार’ या विषयावर स्त्रियांचे शिबीर घेतले. ‘संवाद’ने तेव्हापासूनच बचतगटांच्या मदतीने निर्गुडी तेल, अडुळसा कल्प, शतावरी कल्प, सर्जरस मलम ही औषधे उत्पादित करण्याचे काम सुरू केले. आज ‘संवाद’च्या कार्यक्षेत्रातील अनेक बचतगटांनी या निर्मितीला व्यावसायिक स्वरूप दिले आहे. महाराष्ट्रभर फिरून स्त्रीआरोग्यविषयक माहिती गोळा करताना सुनीता गांधींचा परिचय ‘नवम’ संस्थेच्या निर्मला पंडित यांच्याशी झाला. ‘साथीसेहत’ या संस्थेचीही त्यांना माहिती मिळाली.
‘बेअरफूट डॉक्टर’ या मूळ चिनी संकल्पनेवर आधारित ‘आरोग्यसखी’ प्रकल्पाची तपशिलात जाऊन आखणी करण्यात आली. अशाच प्रकारे सातारा जिल्ह्य़ात राबविलेला प्रकल्प अयशस्वी ठरला होता. तरीही सुनीता गांधींची दुर्दम्य इच्छाशक्ती पाहून कोकणात हा प्रकल्प तडीस नेण्यासाठी आर्थिक सहकार्य देण्याचा धाडसी निर्णय निर्मला पंडित यांनी घेतला. आरोग्यसखींना प्रशिक्षित करण्याची, त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याची तसेच उपक्रमातील वैद्यकीय तपशील ठरविण्याची जबाबदारी ‘साथीसेहत’च्या डॉ. अनंत फडके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उचलली. प्रकल्पाचा आर्थिक भार ‘नवम’ने उचलला. आरोग्यसखींची निवड करण्यापासून गावांमध्ये प्रत्यक्ष हा उपक्रम राबविण्याची जबाबदारी ‘संवाद’ने उचलली.
ज्या गावांत कोणतीही सरकारी वा खाजगी प्राथमिक आरोग्यसुविधा उपलब्ध नाही, अशा अतिदुर्गम अकरा गावांतून १९ महिलांची निवड करण्यात आली. गावातील सरपंचांकडे विषय मांडून कोणत्या महिला हे काम करू शकतील, याची पाहणी केली गेली. ग्रामपंचायत सदस्यांना प्रकल्पाची सविस्तर माहिती देऊन त्यांचा पाठिंबा मिळविण्यात आला. मग हे काम करण्यासाठी तयार झालेल्या महिलांना कामाचे स्वरूप समजावून दिले. त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांना या कार्यक्रमाची माहिती करून देण्यात आली.
‘साथीसेहत’ गेली अनेक वर्षे या विषयावर काम करत आहे. त्यांना अनुभवांतून कळले की, ग्रामीण भागातील ऐंशी टक्के आजार शहरातल्या डॉक्टरकडे न जाताही बरे होऊ शकतात. त्यासाठी फार महागडी औषधेही लागत नाहीत. मात्र, त्यासाठी प्राथमिक आरोग्यसुविधा योग्य प्रमाणात ग्रामीण पातळीवरच उपलब्ध करणे गरजेचे आहे. या कामासाठी गावातील स्थानिक सेवाभावी व्यक्ती पुढे येऊ शकते. तिला फक्त प्रशिक्षित करण्याची गरज असते. म्हणूनच आठवी पास झालेल्या कोणत्याही सामान्य व्यक्तीला समजेल अशा सुगम भाषेत समजणारा प्राथमिक आरोग्य काळजी, निदान व औषधयोजना यांची सविस्तर माहिती करून देणारा वैद्यकीय अभ्यासक्रम सचित्र पुस्तकरूपाने डॉ. अनंत फडके, डॉ. अभय शुक्ला, डॉ. समीर मोने आणि डॉ. अमिता पित्रे यांनी तयार केला आहे. अशिक्षित माणसालाही समजतील अशी साधीच, पण सुंदर रेखांकनं चंद्रशेखर जोशी यांनी केली आहेत. एस.एन.डी.टी. विद्यापीठाच्या बहि:शाल विभागाचा हा अधिकृत अभ्यासक्रम असून, जी व्यक्ती तो पूर्ण करील, तिला विद्यापीठाचे प्रमाणपत्र देण्यात येते.
आरोग्यसखींच्या प्रशिक्षणासाठी हा अभ्यासक्रम पायाभूत मानण्यात आला. ‘साथीसेहत’च्या डॉ. अभय शुक्ला, डॉ. नितीन जाधव, डॉ. धनंजय, डॉ. प्रशांत, कार्यकर्ते भाग्यश्री, अशोक जाधव यांनी मिळून एका वर्षांत दोन-दिवसीय बारा प्रशिक्षण शिबिरे घेतली. मार्च २००८ मध्ये त्यांची परीक्षा झाली. त्यात सर्व आरोग्यसखी समाधानकारक गुणांनी उत्तीर्ण झाल्या.
आपल्याला होणारे सर्वसामान्य आजार कोणते, शरीराची रचना कशी आहे, शरीर निरोगी ठेवण्यासाठी उपलब्ध स्थानिक अन्नघटकांतून दैनंदिन आहाराची कशी योजना करावी, आपल्या कोणत्या सवयी बदलल्यानंतर आपण अधिक आरोग्यदायी होऊ, रोग्याने सांगितलेल्या माहितीच्या आधारे व प्राथमिक तपासणीच्या मदतीने रोग्याला कोणता आजार झाला आहे, याचे निदान करून त्यावर प्राथमिक औषधोपचार कसा करावा, इथपर्यंत सखोल माहिती या आरोग्यसखींना देण्यात आली. जे आजार गंभीर वाटतात, ज्या आजारांवर प्राथमिक उपचार करता येणार नाहीत, अशा रुग्णांना डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला जातो. सामान्य आजारासाठी सलाईन वा इंजेक्शनची गरज नाही, हा मुद्दा या प्रशिक्षणातला महत्त्वाचा गाभा ठरला आहे. प्राथमिक उपाययोजनेतील औषधे लो-कॉस्ट ही गुजरातची कंपनी व यश फार्मा ही पुण्याची औषधांची एजन्सी अत्यंत किफायतशीर दरात उपलब्ध करून देते. या साऱ्या यंत्रणेमुळे दुर्गम भागात आरोग्यसुविधा स्वस्तात पोहोचवणे शक्य झाले आहे.
आजाराचे निदान करून औषधयोजना करण्याच्या प्रशिक्षणाच्या टप्प्यानंतर प्रत्येक आरोग्यसखीला प्राथमिक औषधांची आरोग्यपेटी देण्यात आली. त्यासाठी येणारा खर्च गावाने उचलला. त्यानंतर आरोग्यसखींनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. त्यावेळेस त्यांना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागले. ही बाई नीट तपासेल, याची गावकऱ्यांना खात्री वाटत नव्हती. ‘काय आजार झालाय, हे तिला समजेल का, ही बाई सुई टोचत नाही, सलाईन लावत नाही, मग आपण बरे कसे होणार?’ अशा अनेक शंकाकुशंका घेण्यात येऊ लागल्या. तेव्हा आरोग्यसखींनी स्वत:च्या घरातील रुग्णांना तपासणे सुरू केले. घरातले रोगी बरे केले. आता हळूहळू त्यांच्यावर गावाचा विश्वास बसायला लागला आहे. वर्षभराच्या कालावधीनंतर आता प्रत्येक आरोग्यसखी सरासरी २० ते २५ रोगी तपासून औषधे देत आहे. तथापि संपूर्ण गावाचा विश्वास संपादन करण्याचे आव्हान या आरोग्यसखींना पेलावे लागणार आहे.
या आरोग्यसखी पूर्णपणे सेवाभावी वृत्तीने हे काम करीत आहेत. फक्त औषधविक्रीतून त्यांना किरकोळ उत्पन्न मिळते. पण दुर्गम भागातील त्यांची पायपीट लक्षात घेता हे उत्पन्न खूपच अपुरे आहे.
प्रशिक्षण काळात आरोग्यसखी महिन्यातून दोन-दोन दिवस घरापासून दूर राहत. त्या काळात त्यांच्या पतींनी घर सांभाळून या उपक्रमाला सक्रिय पाठिंबा दिला.. स्वत:च्या वर्तनात बदल केला, असे अनेक आरोग्यसखींनी आपल्या मनोगतात सांगितले. काही आरोग्यसखी या प्रशिक्षणाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकटय़ाने घराबाहेर पडल्या. त्यांना शिबिराच्या माध्यमातून आरोग्यविज्ञानाचे ज्ञान तर मिळालेच, शिवाय जिवाभावाच्या मैत्रिणीही मिळाल्या. अनेकींना काम करण्याचा अनुभव आनंद देऊन गेला. आता तर बऱ्याच गावांत या आरोग्यसखींना गावकरी ‘आली हो छोटी डॉक्टरीण!’ असं कौतुकाने म्हणू लागले आहेत. काही नवऱ्यांनीही बायको आरोग्यसखी झाल्यामुळे आपली गावात पत वाढल्याचे उघडपणे मान्य केले.
आरोग्यसखींना प्रशिक्षण शिबिरातून परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे एस.एन.डी.टी. विद्यापीठाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यासाठी ‘संवाद’ने खास कौतुक सोहळा आयोजित केला होता. आपल्या पत्नीचे कौतुक पाहण्यासाठी बहुतेक सर्व आरोग्यसखींचे ‘सखे’ आवर्जून उपस्थित होते. आरोग्यसखींचे चेहरे तर नुसते फुलून गेले होते. त्यांच्या मनोगतातून समजत होते की, या उपक्रमाने त्यांना कोणताही मेहनताना दिला नसला तरी गावाने त्यांना आरोग्यरक्षकाचा बहुमान दिला आहे आणि तो राखण्याचे काम अवघड आहे, याचे भानही दिले आहे.
या प्रकल्पामुळे सर्वात महत्त्वाची एक गोष्ट घडली की, निवड झालेल्या १९ आरोग्यसखींच्या कुटुंबांमध्ये आरोग्यविषयक सजगता निर्माण झाली. या कार्यकर्त्यां गावातल्याच असल्यामुळे आरोग्यसुविधा २४ तास उपलब्ध झाली. ‘सुई टोचली’ किंवा सलाइन दिले तरच आजार बरा होतो, या गैरसमजातूनही गाव हळूहळू बाहेर पडायला लागला आहे. जिथे सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत, तिथे गेल्यावर आरोग्यसुविधा मिळाल्याच पाहिजेत, ही जाणीवही गावकऱ्यांत निर्माण होत आहे. ग्रामीण भागातही स्त्रिया समाजकार्यासाठी बाहेर पडत आहेत आणि या ‘सावित्रीं’ना घरातले ‘जोतिबा’ पाठिंबा देत आहेत, हे दृश्य स्त्रियांच्या सक्षमीकरणाला उत्साहाचे टॉनिक पुरवणारे आहे.
सरकारी पातळीवर उशिरा का होईना, या विषयावर उपक्रम राबविले जाऊ लागले आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन कार्यक्रमांतर्गत (ठं३्रल्लं’ फ४१ं’ ऌीं’३ँ ट्र२२्रल्ल) प्रत्येक गावात ‘आशा’ (अूू१ी्िर३ी िर्रूं’ ऌीं’३ँ अू३्र५्र२३) ची नेमणूक होणार आहे. ‘संवाद’च्या कार्यक्षेत्रात ‘आशा’ नेमणे आरोग्यसखी उपक्रमामुळे सोपे झाले आहे, हे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरोग्यसखींच्या कौतुक सोहळ्यात मान्य केले.
भविष्यात आणखी २० ते २५ दुर्गम गावांत ‘आरोग्यसखी’ तयार करण्यात ‘संवाद’ गुंतली आहे. सध्या कार्यरत असलेल्या आरोग्यसखींच्या गावांत या सुविधेचा फायदा जास्तीत जास्त ग्रामस्थांनी घ्यावा म्हणून आरोग्यसखींच्या मदतीने प्राथमिक शाळा व अंगणवाडय़ांमध्ये मुलांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्याची योजना आखण्यात येत आहे.
सातारा जिल्ह्यात या प्रकारचा प्रकल्प अयशस्वी झालेला असतानाही कोकणात मात्र स्त्रियांनी जिद्दीने २००६ सालात सुरू झालेला हा उपक्रम यशस्वी करून दाखवला आहे.
विद्यालंकार घारपुरे