Leading International Marathi News Daily शनिवार, ७ मार्च २००९
  समतेसाठी पुरुषांचा पुढाकार
  स्त्री-पुरुष समतेचा गोफ
  स्त्रीत्वाचा सोयीस्कर अर्थ
  शाळेसह व्यापक कुटुंब
  थांब, माझ्या संसाराला...
  विज्ञानमयी
  गर्भासंबंधीचा कायदा
  'संवाद' सखी
  स्त्री-मनातले क्षितीज
  माळाकोळीतील दारूबंदी लढा!
  आगळीवेगळी क्षमा
  संसारकथा
  ताई आपटे : एक प्रेरणास्रोत
  मधुघटचि रिकामे
  कावळा
  प्रतिसाद
  हर्बिन : पूर्वेकडील मॉस्को!
  गाडी बुला रही है!

समानतेसाठी आम्ही!
स्त्री-पुरुष समानतेसाठी मी स्वत: काय करतो/ करते? लिंगविशिष्ट भूमिकांना मी चिकटून राहत नाही, लिंगभेद मानत नाही, हे आपण स्वत: कोणत्या कृतींतून व्यक्त करता? तुमचे स्वानुभव कमाल १५० शब्दांत १७ मार्चच्या आत लिहून कळवा. हे आवाहन महिला आणि पुरुष दोघांसाठीही आहे. मात्र प्रत्यक्षात अनुभव असा आहे की अशा आवाहनांना पुरुषांचा प्रतिसाद ३३ टक्के सोडाच, पण जेमतेम ३ टक्केही मिळत नाही. हे प्रमाण वाढावे, अधिकाधिक वाचकांनी स्वत:तील बदलाचे चाकोरीबाहेरचे ठोस दाखले प्रांजळपणे द्यावेत, ही अपेक्षा. घरातील मुला-मुलींना, महिलांना समानतेची वागणूक मिळावी, यासाठी तुम्ही स्वत: काय करता, हे स्पष्टपणे मांडणे अपेक्षित आहे. निवडक लेखनाला प्रसिद्धी दिली जाईल. आपले स्वानुभव कागदाच्या एकाच बाजूला सुवाच्य अक्षरात लिहून पाठवा.
पत्ता- ‘समानतेसाठी आम्ही’, चतुरंग पुरवणी, लोकसत्ता संपादकीय कार्यालय, एक्स्प्रेस टॉवर, नरिमन पॉईंट,
मुंबई ४०००२१.

  वास्तवातले क्षितीज आपण सगळेच पाहत असतो. स्त्री-मनातले क्षितीज मात्र स्त्रीच्या लेखनात कळत-नकळत प्रतिबिंबित झालेले असते. कसे आहे तिच्या मनातले क्षितीज? ते वास्तवाशी समांतर आहे, की नवीन वास्तव घडवण्यासाठीचं ते एक निमित्त आहे? स्त्रियांच्या प्रतिभेचे उन्मेष ज्यात व्यक्त झाले आहेत, त्या कलाकृतींची साक्ष काढली की स्त्री-मनातल्या क्षितिजाचे लौकिक- अलौकिकपण उजेडात येईल.
भारतीय भाषांमधले पहिले स्त्रीलिखित आत्मचरित्र आहे ‘आमार जीवन’. (१८७६) बंगालच्या राससुंदरी देवींनी ते लिहिले आहे. (वीणा आलासे यांनी त्याचा अनुवाद केला आहे.) हे आत्मचरित्र वाचताना लक्षात येते, ती स्त्रीची स्वप्नं प्रत्यक्षात आणण्याची चिवट ताकद! राससुंदरी देवींना एकदा स्वप्न पडले की, त्या चैतन्य भागवताची पोथी वाचत आहेत. त्यांना त्या क्षणी जाग आली आणि खूप आनंद झाला. कारण त्यांनी स्वत: कधीही न बघितलेली पोथी त्या वाचत होत्या. त्यांना साधं बाळबोध लिहिता-वाचताही येत नसताना त्या चक्क पोथी वाचत होत्या! आपले हे स्वप्न त्यांनी वास्तवाच्या भगभगीत प्रकाशात, संसाराच्या रामरगाडय़ातही जपले. त्या घरातल्यांपासून लपूनछपून वाचायला कशा तऱ्हेनं शिकल्या, हे मुळातूनच
 
वाचण्याजोगे आहे. शेवटी त्या आपले स्वप्न पूर्ण करू शकल्या. स्त्रीची स्वप्नं पाहण्याची आणि ती साकार करण्याची क्षमता जागी ठेवणारे हे आत्मचरित्र समस्त स्त्रीवर्गाला दिलासा देणारे आहे.
एकेकाळी स्त्रीला माजघरातच अडकून पडावे लागे. तेथेही सासू-सून, नणंद-भावजय अशा नात्यांचे काल्पनिक अडसर तिच्या वाटेवर उभे केलेले असत. नणंद-भावजयांच्या भांडणाच्या गोष्टी आपल्या कानावर आलेल्या असतात. अशा वेळी आपल्याला सुखद धक्का देणारी ही एक हकिकत आहे. असमीया साहित्यात कनकलता चहिला आणि कमलालया काकति या नणंद-भावजयांनी ‘घर जेडति’ हे नियतकालिक १९२८ ते १९३१ या कालखंडात चालविले. विशेष म्हणजे ते स्त्रीप्रश्नांना वाहिलेले होते. स्त्रीसंबद्ध नात्याचे हे किती मनोहारी रूप आहे!
या नात्यातून लेखनाला ऊर्जा शोधताना स्त्री जणू वाहून गेलेला काळ हातात पकडण्याचाच प्रयत्न करते. कमला दास या प्रख्यात इंग्लिश कवयित्रीने आपल्या मल्याळम् भाषेतील काव्यलेखनासाठी ‘माधवी कुट्टी’ हे आजीचे- आईच्या आईचे- टोपणनाव स्वीकारणे म्हणजे आपल्या भावविश्वात जुन्या काळच्या माजघराला जागा ठेवण्याची धडपड ठरते. त्या काळाची स्पंदनेही मग त्यांच्या कवितेत उतरतात.
आजी-नात नात्याविषयीची शकुंतला परांजपे यांची एक आठवणही नोंदवण्याजोगी आहे. त्यांनी आपली ‘घराचा मालक’ ही एकमेव कादंबरी त्यांच्या आजीला- ‘आजी सरस्वती हिला’- अर्पण केली आहे. ती अर्पणपत्रिका अशी आहे :
‘माझी लेखणी अडली की माजघरात येऊन मी तुझ्याशी भांडण उकरून काढीत असे. तू संतापलीस की तुझ्या मुखातून सरस्वतीचा इतका ओजस्वी प्रवाह बाहेर येई, की माझी लेखणी भरभर चालू होई. तू गेलीस, आजी, मी आता भांडू कोणाजवळ?’
स्त्रीला असे हक्काचे बोलाय-भांडायसाठी, शब्दांचे नाणे खणखणीतपणे वापरून पाहण्यासाठी लेखनाचाच आश्रय घ्यावा लागतो. ते भांडण कधी कुटुंबातल्या इतरांशी असेल, कधी समाजाशी असेल, तर कधी स्वत:शीच असेल! गौरी देशपांडे आपल्या एका कादंबरीत एका स्त्री-पात्राच्या माध्यमातून जे मत मांडतात, ते स्त्रियांच्या लेखनासंदर्भात विचारात घेण्याजोगे आहे. ‘निरगाठी’मध्ये त्या लिहितात, ‘मी कित्येकदा काहीही ‘म्हणायचं’ नसतानाही बडबड करते. ती का? केवळ आपला आवाज आपणच ऐकून आपल्या जिवात जीव आहे, ही स्वत:ची खात्री पटवायसाठी का?’
अस्तित्वाच्या लढाईत स्त्रीच्या बाजूने मनातल्या मनात का होईना, उभे राहणारे शब्द आज मोठय़ा प्रमाणावर अभिव्यक्तही होताना दिसत आहेत. कमल देसाई यांच्यासारखी कथाकार आणि वेगळ्या वाटेवरची कादंबरीकार जेव्हा संजय आर्वीकरांना मुलाखतीत स्पष्टपणे सांगून टाकते की, ‘व्यासासारखा नवरा हवा होता आपल्याला!’- तेव्हा स्त्रीमनातल्या क्षितिजाचे अथांगपण लख्खकन जाणवून जाते.
कमलताईंसारख्या चाकोरीबाहेरच्या स्त्रिया संख्येने कमी असतात. पण चाकोरीतल्या इतर स्त्रियांचे काय? इंदिरा संतांनी एका कवितेत म्हटले आहे -
‘तिचे स्वप्न दहाजणींसारखे
पण ते पडण्यापूर्वीच तिला जाग आली
आणि मग तिला झोप कधी लागलीच नाही!’
अशा चाकोरीत जगणाऱ्या, पण जाग आलेल्या स्त्रियांना मग सतत प्रश्न पडतात. पहिला प्रश्न असतो, तो ‘बाईमाणूस’ या शब्दाच्या अर्थाविषयी! बाई ही ‘माणूस’ असते की नाही? पद्मजा फाटक विनोदाच्या अवगुंठनाखाली त्याविषयी मार्मिक भाष्य करतात- ‘बायकांनी कशाला बाई माणसांसारखं वागायचं?’ हिने आपलं चाचरत ‘मी पण माणूसच आहे’, वगैरे केलं. पण उपयोग झाला नाही. स्त्रियांमध्ये तिला घेतलं नाही. फक्त पुरुषांमध्ये तिला करमलं नाही.’
एकेकाळी दोन्हीकडनं बाजूला पडलेल्या अशा स्त्रिया आता एकत्र येऊन मोठय़ा संख्येने पुढे येऊ लागल्या आहेत. स्वत:ला शोधत आहेत. समाजविकासाची स्वप्ने प्रज्ज्वलित ठेवत आहेत. कोकणी भाषेतील कवयित्री दीपा पै लिहितात-
‘आमीच सूर्या जावन,
पेंटुक लागतलें
आनी खरेल्या सूर्याक आमची नसाय जातली’
- आम्ही स्त्रियाच आता स्वयंभू, प्रकाशित सूर्य झालेल्या असू. इतक्या तेजस्वी, की खऱ्या सूर्यालादेखील मत्सर वाटू लागेल!
स्त्रीचे असे आत्मभान व्यक्त करणाऱ्या या शब्दांचे प्रतिध्वनी आता दहाही दिशांना घुमत आहेत. भारतातील विविध भाषांमधील स्त्रियांच्या, तसेच विकासाच्या टप्प्यावर मागे राहिलेल्या आदिवासी स्त्रियांच्या कवितांमध्येही या जाणिवा ऐकू येत आहेत. कुसुम अलाम या आदिवासी कवयित्री म्हणतात-
‘मी स्वत:ला अंधारकोठडीत कोंडून ठेवले होते
तेव्हा जाणिवेने चेतलेला माझा आत्मा म्हणाला-
वेळ टळून जायच्या आत
धुक्यातून मार्ग काढ.’
या स्त्रिया कशासाठी लिहीत आहेत? त्या कधी स्वत:ला व्यक्त करण्यासाठी लिहीत आहेत, तर कधी समाज बदलावा म्हणून लिहीत आहेत. पाऱ्यासारखं निसटणारं दूरचं क्षितीज शब्दांत पकडण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. वैदेही या कन्नडमधील आधुनिक लेखिकेने आपल्या लेखनामागची प्रेरणा सांगताना खूप हृद्य उद्गार काढले आहेत. ते असे- तिचे लेखन म्हणजे प्रेमाचा दिवा वाऱ्याने विझू नये म्हणून हात आडवा धरण्याची ही धडपड आहे!
स्त्रीमध्ये सुप्तरूपात असलेल्या शक्तीची तिला आता जाणीव होत आहे. रूढींच्या लक्ष्मणरेषेत बंदिस्त केलेल्या स्त्रीकडेही क्षितीज ओलांडणाऱ्या कल्पनाशक्तीची झेप असू शकते. किंबहुना बाहेरची दारे बंद केली की आतली दारे अधिकच खुली होतात. शंभर वर्षांपूर्वीच्या रुकय्या हुसेन या लेखिकेच्या लेखनात ही झेप दिसते. वास्तव जगण्याचे चित्र पालटावे म्हणून पुरुषांना ‘जनाना’मध्ये ठेवण्याची कल्पना तिने लढवली. त्यात वास्तवाचे उलटे प्रतिबिंब आले. त्यापेक्षा तिच्या कल्पकतेची झेप दिसते ती तिच्या फँटसीमधील इतर तपशिलांमध्ये! तिच्या ‘सुलतानाज् ड्रीम’ (१९०५)मधील नायिका ‘एअर-कार’ हे वाहन दैनंदिन जीवनात प्रवासासाठी सहज वापरताना दाखविली आहे. कुणी सांगावे, भविष्यात हे शक्यही होईल!
स्वत:च्या माणूसपणाची व त्यातील सत्वाची स्त्रीला येणारी प्रचीती आणि त्यातून उमटणारे भावना, कल्पना, संवेदना यांचे तरंग आज असे व्यक्त होत आहेत. यासंदर्भात मल्लिका अमरशेख यांची एक कविता आठवते. या कवितेत कवयित्री माणूसपणाचे भिंग मनाने बदलू पाहू धजते. ही या स्त्रीलेखनाच्या प्रवासातली वेगळी पायवाट आहे. कवयित्री लिहिते -
‘मला व्हायचं होतं झाडं तळं पक्षी
आणि कितीतरी आदिम प्राणी
सहज सोपे खरे
खरंच जग किती सुंदर दिसतं..
माणूसपणाचं भिंग बदलल्यावर..!’
स्त्रीला इतक्या मुक्तपणाने स्वप्नं पाहता आली तर तिच्या मनातलं अपार क्षितीज कागदावर आणि जमिनीवरही उतरेलच!
डॉ. नीलिमा गुंडी