Leading International Marathi News Daily शनिवार, ७ मार्च २००९
  समतेसाठी पुरुषांचा पुढाकार
  स्त्री-पुरुष समतेचा गोफ
  स्त्रीत्वाचा सोयीस्कर अर्थ
  शाळेसह व्यापक कुटुंब
  थांब, माझ्या संसाराला...
  विज्ञानमयी
  गर्भासंबंधीचा कायदा
  'संवाद' सखी
  स्त्री-मनातले क्षितीज
  माळाकोळीतील दारूबंदी लढा!
  आगळीवेगळी क्षमा
  संसारकथा
  ताई आपटे : एक प्रेरणास्रोत
  मधुघटचि रिकामे
  कावळा
  प्रतिसाद
  हर्बिन : पूर्वेकडील मॉस्को!
  गाडी बुला रही है!

समानतेसाठी आम्ही!
स्त्री-पुरुष समानतेसाठी मी स्वत: काय करतो/ करते? लिंगविशिष्ट भूमिकांना मी चिकटून राहत नाही, लिंगभेद मानत नाही, हे आपण स्वत: कोणत्या कृतींतून व्यक्त करता? तुमचे स्वानुभव कमाल १५० शब्दांत १७ मार्चच्या आत लिहून कळवा. हे आवाहन महिला आणि पुरुष दोघांसाठीही आहे. मात्र प्रत्यक्षात अनुभव असा आहे की अशा आवाहनांना पुरुषांचा प्रतिसाद ३३ टक्के सोडाच, पण जेमतेम ३ टक्केही मिळत नाही. हे प्रमाण वाढावे, अधिकाधिक वाचकांनी स्वत:तील बदलाचे चाकोरीबाहेरचे ठोस दाखले प्रांजळपणे द्यावेत, ही अपेक्षा. घरातील मुला-मुलींना, महिलांना समानतेची वागणूक मिळावी, यासाठी तुम्ही स्वत: काय करता, हे स्पष्टपणे मांडणे अपेक्षित आहे. निवडक लेखनाला प्रसिद्धी दिली जाईल. आपले स्वानुभव कागदाच्या एकाच बाजूला सुवाच्य अक्षरात लिहून पाठवा.
पत्ता- ‘समानतेसाठी आम्ही’, चतुरंग पुरवणी, लोकसत्ता संपादकीय कार्यालय, एक्स्प्रेस टॉवर, नरिमन पॉईंट,
मुंबई ४०००२१.

  नांदेड-लातूर रस्त्यावर लोह्य़ापासून बारा कि.मी. अंतरावर माळाकोळी हे गाव आहे. ११ हजार लोकसंख्या असलेल्या माळाकोळीत महिला मतदारांची संख्या आहे- २२१०. गाव प्रामुख्यानं शिल्पकारांचे, वास्तु-कारागिरांचे. सधन असणाऱ्यांची संख्या बरीच. गरीब मजुरांची संख्याही लक्षणीय. गावाला वारकरी संप्रदायाचा वारसा. धार्मिक, सामाजिक सजगता आणि वास्तुकला यांचा संगम असलेल्या या गावात महिलांनी नुकत्याच केलेल्या दारूबंदीसाठीच्या लढय़ाने स्त्रीशक्ती चळवळीला एक नवी दिशा दिली. या चळवळीत सहभागी अकरा महिला तुरुंगात गेल्या. नऊशे महिलांसह चारशेजणांवर दंगलीचे गुन्हे दाखल झाले. तरीही माळाकोळीतील दारूबंदी लढा बंद न पडता तो अधिकच तीव्र झाला. हा लढा थांबला तो गावात दारूबंदी करूनच!
रोजगारक्षम अशा सधन माळाकोळीत अलीकडच्या चार-पाच वर्षांत सार्वजनिक उत्सव, जयंत्यामयंत्या, लग्नं, मिरवणुका,
 
एवढेच नाही तर बारा ज्योतिर्लिगाच्या रथयात्रेतही मद्यपि गोंधळ घालू लागले होते. त्यातून हाणामारीचे प्रकारही घडत होते. या त्रासातून मुक्त होण्यासाठी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष गोपाळ तिडके, जालिंधर कागणे, भारत मस्के यांनी पुढाकार घेऊन दारूबंदी करण्याचा विचार ग्रामपंचायतीसमोर मांडला. २६ सप्टेंबर २००८ रोजी ग्रामपंचायत सदस्य सुशिलाबाई गंगाधर केंद्रे यांनी ग्रामपंचायतीच्या सभेत दारूबंदीचा ठराव मांडला. त्यास सखुबाई बालाजी मस्के यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर ३ ऑक्टोबर रोजी दारूबंदी कृती समितीच्या अध्यक्ष चंद्रकला रामजी तिडके व त्यांच्या सहकारी महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना माळाकोळीतील दारू दुकान, बीअर शॉप्स, बीअर बार बंद करून गाव दारूमुक्त करण्याचे निवेदन दिले. २ फेब्रुवारीला ग्रामसभा ठरली. ग्रामसभा यशस्वी करण्यासाठी चार दिवस गावात प्रबोधन सभा घेण्यात आल्या. तेव्हा दारूवाल्यांच्या बाजूने काहीजण उभे राहिले. त्यामुळे गावात दोन तट पडले. २ फेब्रुवारीला गटविकास अधिकारी आर. जी. कोल्हेवाड, दारूबंदी अधिकारी बबन देवकाते, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी यांनी ग्रामसभेला सुरुवात केली. या सभेकरिता ११०५ महिलांची उपस्थिती आवश्यक होती. ही सभा अयशस्वी व्हावी म्हणून दारूवाल्यांची लॉबी सक्रिय होती. दुपारी बारा वाजता ८८६ महिलांची नोंद झाल्याचे जाहीर करताच महिलांनी त्यास आक्षेप घेतला. प्रत्यक्षात १२०० पेक्षा जास्त महिला सभेस उपस्थित होत्या. गटविकास अधिकारी आणि दारूबंदी अधिकारी यांना महिलांनी याबद्दल जाब विचारला. दगडफेक झाली. पोलिसांनी महिलांवर लाठीमार केला. त्यानंतर महिलांनी दोन तास रास्ता रोको केला.
पोलीस उपअधीक्षक राजकुमार शिंदे यांनी माळाकोळीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व गटविकास अधिकारी यांना महिला दारूबंदी कृती समितीविरुद्ध तक्रार द्यायला लावली. दंगलीसारख्या गंभीर दोन स्वतंत्र गुन्ह्य़ांत महिला कृती समितीच्या अध्यक्षा चंद्रकलाबाई रामजी कागणे यांचा मुलगा जालिंदर कागणे, सून संगीता जालिंदर कागणे, गंगाबाई माधव तिडके यांचा मुलगा जनार्दन माधव तिडके, सुनंदा व्यंकटी केंद्रे, राजाबाई दासरे, कमलबाई केंद्रे, रमाबाई कांबळे, शारसबाई सुभाष हातगाळे, प्रयागबाई कांबळे , गंगाबाई चोपवाड या महिलांसह अकरा आंदोलक पुरुषांना पोलिसांनी ताब्यात घेतले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली. तर तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष गोपाळ तिडके यांच्यावरही दोन गंभीर गुन्हे दाखल झाले. आयुष्यात कधीही पोलीस ठाण्याची पायरी न चढणाऱ्या गावातल्या गृहिणी सामाजिक प्रश्नासाठी थेट गजाआड गेल्या. परंतु लढा इथेच थांबला नाही. माळाकोळी ते नांदेड अशी दारूबंदी जागर पदयात्रा काढली गेली आणि ती थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली.
माळाकोळीच्या रणरागिणींचा हा लढा मराठवाडय़ात सर्वत्र चर्चिला गेला. पण स्त्रीशक्तीच्या या सामाजिक लढय़ाला प्रशासनाने मात्र न्याय दिला नाही. एकही दारू दुकान बंद झाले नाही की लाठीमार करणाऱ्या आणि मतदार महिलांच्या संख्येत फेरफार करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली नाही. परंतु न्यायासाठी रस्त्यावर उतरलेल्या माळाकोळीच्या लेकींनी कोणत्याही पक्षाचे पाठबळ न घेता आपला हा दारूबंदी लढा अखेर यशस्वी केलाच.
१८ फेब्रुवारी रोजी २१६४ महिला मतदारांपैकी १३२४ महिलांनी ‘आडवी बाटली’साठी ग्रामसभेत भाग घेतला आणि गावातून दारू दुकाने पार हद्दपार केली. या ग्रामसभेसाठी गयाबाई बळी गीते (१०३), जनाबाई मस्के (१०२) आणि जिजाबाई तिडके (१०४) या शतायुषी वृद्ध महिलांनीही ग्रामसभेत दारूबंदीसाठी मत नोंदविले, हे विशेष.
दारूबंदी महिला कृती समितीच्या अध्यक्ष चंद्रकलाबाई कागणे यांनी ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव मांडला. सुरेखा तेलंग यांनी ठराव सुचवला. पुष्पा कागणे, लक्ष्मी कागणे यांनी त्यास अनुमोदन दिले. प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दारूबंदीचा हा ठराव एकमुखाने संमत झाला. आणि माळाकोळीच्या रणरागिणींनी एक नवा अध्याय घडविला. मंदिर शिल्पकारांच्या या गावात स्त्रीशक्तीचा झालेला हा विजय संपूर्ण मराठवाडय़ासाठी नवी दिशा देणारा ठरला.
हरिहर धुतमल