Leading International Marathi News Daily शनिवार, ७ मार्च २००९
  समतेसाठी पुरुषांचा पुढाकार
  स्त्री-पुरुष समतेचा गोफ
  स्त्रीत्वाचा सोयीस्कर अर्थ
  शाळेसह व्यापक कुटुंब
  थांब, माझ्या संसाराला...
  विज्ञानमयी
  गर्भासंबंधीचा कायदा
  'संवाद' सखी
  स्त्री-मनातले क्षितीज
  माळाकोळीतील दारूबंदी लढा!
  आगळीवेगळी क्षमा
  संसारकथा
  ताई आपटे : एक प्रेरणास्रोत
  मधुघटचि रिकामे
  कावळा
  प्रतिसाद
  हर्बिन : पूर्वेकडील मॉस्को!
  गाडी बुला रही है!

समानतेसाठी आम्ही!
स्त्री-पुरुष समानतेसाठी मी स्वत: काय करतो/ करते? लिंगविशिष्ट भूमिकांना मी चिकटून राहत नाही, लिंगभेद मानत नाही, हे आपण स्वत: कोणत्या कृतींतून व्यक्त करता? तुमचे स्वानुभव कमाल १५० शब्दांत १७ मार्चच्या आत लिहून कळवा. हे आवाहन महिला आणि पुरुष दोघांसाठीही आहे. मात्र प्रत्यक्षात अनुभव असा आहे की अशा आवाहनांना पुरुषांचा प्रतिसाद ३३ टक्के सोडाच, पण जेमतेम ३ टक्केही मिळत नाही. हे प्रमाण वाढावे, अधिकाधिक वाचकांनी स्वत:तील बदलाचे चाकोरीबाहेरचे ठोस दाखले प्रांजळपणे द्यावेत, ही अपेक्षा. घरातील मुला-मुलींना, महिलांना समानतेची वागणूक मिळावी, यासाठी तुम्ही स्वत: काय करता, हे स्पष्टपणे मांडणे अपेक्षित आहे. निवडक लेखनाला प्रसिद्धी दिली जाईल. आपले स्वानुभव कागदाच्या एकाच बाजूला सुवाच्य अक्षरात लिहून पाठवा.
पत्ता- ‘समानतेसाठी आम्ही’, चतुरंग पुरवणी, लोकसत्ता संपादकीय कार्यालय, एक्स्प्रेस टॉवर, नरिमन पॉईंट,
मुंबई ४०००२१.

  त्यादिवशी दुपारी विटांनी बांधलेल्या आमच्या शाळेच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरच्या खिडकीला अगदी चिकटूनच बसलो होतो. समोरच्या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक गाडीबरोबर माझं हृदयही धडधडत होतं. त्या दिवसाची मी अनेक आठवडय़ांपासून आतुरतेने वाटच बघत होतो. आमच्या चौथीच्या वर्गाच्या पेसबाईंची ती वर्षांअखेरची पार्टी होती. बाई वर्गामधल्या फळ्यावर पार्टीला किती दिवस उरले होते, असे उलटे अंक रोज लिहीत असत. जसा पार्टीचा शुक्रवार अगदी जवळ येऊ लागला तशी आम्हा नऊ वर्षे वयाच्या मुलांची दंगामस्ती वाढू लागली.
पार्टीसाठी घरून बिस्किटे कोण आणणार असं बाईंनी विचारल्यावर मी लगेच हो म्हणालो होतो आणि बिस्किटं बनवताना आईला आनंदाने मदतही केली होती. चॉकलेटचे तुकडे घालून तयार केलेली आईची बिस्किटे आमच्या शेजारी-पाजारीही खूप प्रसिद्ध होती. त्यामुळे माझ्या वर्गमित्रांना देखील ती खूप आवडणारच याची पक्की खात्री होती. पण दोन वाजून गेले तरी आईचा शाळेत पत्ता नव्हता. बाकी बहुतेक मुलांच्या आया येऊन त्यांनी आणलेल्या वस्तू- फळांचा रस, वेफर्स, छोटे केक्स इ. इ. देऊन त्या निघूनही गेल्या होत्या. माझी आई मात्र त्यांच्यात नव्हती.
 
‘रॉबी, काळजी करू नकोस तू. इतक्यात पोहोचेलच तुझी आई’, मी हिरमुसलेला होऊन रस्त्याकडे बघत असताना पेसबाई म्हणाल्या. मी भिंतीवरचं घडय़ाळ बघितलं व त्याचक्षणी मिनिट काटा सहावर सरकला. म्हणजे अडीच वाजलेले होते.
माझ्या अवतीभोवती मुलं आनंदाने पार्टीचा आनंद लुटत होती; पण मी मात्र माझी खिडकी सोडत नव्हतो. पेसबाईंनी मला तिथून उठवण्याचा बराच प्रयत्न केला, पण मी खिडकीला घट्ट चिकटून होतो. मनात एकच आशा होती की आमची ओळखीची गाडी येताना दिसेल आणि आतमध्ये शरमेने कावरीबावरी झालेली माझी आई हातात तिच्या सुप्रसिद्ध बिस्किटांचा डबा घेऊन बसलेली असेल.
तीन वाजताची शाळेची घंटा झाली व मी दचकून माझ्या विचारातून बाहेर आलो. माझ्या बाकापाशी जाऊन दफ्तर उचललं आणि घरी जाण्यासाठी जड पावलांनी दारातून बाहेर पडलो.
थोडी घरं सोडून आमचं घर होतं. चालता चालता मी वचपा घेण्याची एक योजना तयार केली. घरात जात असताना मी धाडकन दार बंद करणार होतो. आईने धावत येऊन मला जवळ घेण्याचा प्रयत्न केल्यास तिला नकार देणार होतो व तिच्याशी कधीच बोलायचं नाही अशी शपथ घेणार होतो.
पण मी घरी पोहोचलो तर घरात कोणीच नव्हतं. नेहमीप्रमाणे फ्रिजवर काही चिठ्ठी लावून ठेवली असेल व त्यावरून आई कुठे गेली होती हे समजलं असतं, पण चिठ्ठीही दिसत नव्हती. दु:खाने व संतापाने माझी हनुवटी थरथरायला लागली. आयुष्यात प्रथमच आईने मला तोंडघशी पाडलं होतं.
मी वरच्या मजल्यावरच्या माझ्या खोलीतल्या पलंगावर उशीत डोकं खुपसून पालथा पडलो होतो, तेव्हा समोरच्या दारातून आई आल्याचा आवाज आला.
‘रॉबी कुठे आहेस तू?’ तिने काळजीच्या स्वरात हाक मारली.
या खोलीतून त्या खोलीत ती मला शोधत होती. मी चुपचाप तसाच पडून राहिलो होतो. पटकन ती जिना चढू लागली होती व पायऱ्या चढता चढता तिचा वेग वाढल्याचं मला ऐकू येत होतं.
वरती माझ्या खोलीत येऊन ती पलंगावर माझ्याजवळ येऊन बसली. मी अजिबात न हलता तसंच उशीत डोकं खुपसून राहिलो.
‘ए राजा, सॉरी, मला माफ कर नं.’ ती म्हणाली, ‘मी कामात खूप व्यस्त होते आणि लक्षातच नाही राहिलं रे, अगदी खरं खरं सांगतेय तुला.’
मी तरीही तसूभर हललो नाही. ‘अजिबात माफ करू नकोस हिला’ मी स्वत:लाच बजावलं. ‘तिने तुझा अपमान केलाय. तुझी आठवण देखील राहिली नाही तिला. आता बस म्हणावं आणि भोग शिक्षा!’
आणि नंतर आई खूपच काहीतरी वेगळंच, अनाकलनीय वागली. ती चक्क हसायलाच लागली. हसता हसता तिचं अंग कापत होतं हे माझ्या लक्षात येत होतं. आधी जरा हळूहळू पण नंतर ते वेगाने वाढायलाच लागलं.
माझा विश्वासच बसत नव्हता. अशा वेळी तिला हसायला कसं सुचत होतं? मी कुस बदलून मुद्दामच तिच्याकडे तोंड केलं; कारण मग माझ्या डोळ्यांमधला संताप व निराशा तिला दिसली असती.
पण माझी आई तर अजिबात हसतच नव्हती मुळी. ती तर चक्क रडत होती. ‘खरंच मला माफ कर. मी चुकले रे बाळा.’ ती मुसमुसत म्हणाली. ‘मी तुला पूर्ण विसरले. माझ्या पिल्लाला मी तोंडघशीच पाडलं.’
गादीवर आडवी होऊन ती एखाद्या लहान मुलीसारखी रडायला लागली. माझी तर बोलतीच बंद झाली. आईला रडताना मी त्यापूर्वी कधीच बघितलेलं नव्हतं. माझ्या समजुतीनुसार, आई कधीच रडत नसते. नाही तिने मुळी रडायचंच नसतं. मी रडत असताना तिच्याकडे याच दृष्टीने बघितलं असावं का मी विचार केला.
कधी माझा गुडघा खरचटला वा अंगठय़ाला ठेच लागली तर ती माझी समजूत घालून कोणत्या शब्दात बोलत असे ते मी खूप आठवून पाहिलं. अशा वेळी तिला किती योग्य बोलण्यास सुचायचं. पण तिचे ते अश्रू बघून माझ्या तोंडातल्या धीराच्या शब्दांनी जणू पलायनच केलं होतं.
‘आई, ए आई अगं ठीक आहे’ कसंतरी चाचरत मी पुढे होऊन तिच्या केसांतून हळूवारपणे हात फिरवला. ‘आम्हाला त्या बिस्किटांची गरजच भासली नाही. खूप सगळा खाऊ होता नं म्हणून! तू रडू नको बरं. काही विशेष बिघडलेलं नाहीये. खरंच अगं!’
मला माझे शब्द अतिशय तोकडे वाटले, पण ते ऐकून आईला उठून बसण्याचं बळ आलं. तिने डोळे पुसले व रडण्यामुळे वाळलेल्या अश्रुभरल्या तिच्या गालावर स्मितहास्य पसरायला लागलं. मी पण ओशाळवाणा होऊन थोडा हसलो व त्याच क्षणी आईने मला तिच्या कुशीत ओढलं.
नंतर त्या विषयावरचं आमचं बोलणंच खुंटलं. आम्ही मायलेक एकमेकांच्या बाहुपाशात बराच वेळ चुपचाप विसावून राहिलो. नेहमी मी थोडय़ा वेळाने मिठीतून बाहेर पडतो, पण त्या वेळी मात्र मी ठरवलं की थोडा वेळ तसंच आईच्या मिठीत राहायचं!
रॉबर्ट टेट मिलर
स्वैरानुवाद- उषा महाजन