Leading International Marathi News Daily शनिवार, ७ मार्च २००९
  समतेसाठी पुरुषांचा पुढाकार
  स्त्री-पुरुष समतेचा गोफ
  स्त्रीत्वाचा सोयीस्कर अर्थ
  शाळेसह व्यापक कुटुंब
  थांब, माझ्या संसाराला...
  विज्ञानमयी
  गर्भासंबंधीचा कायदा
  'संवाद' सखी
  स्त्री-मनातले क्षितीज
  माळाकोळीतील दारूबंदी लढा!
  आगळीवेगळी क्षमा
  संसारकथा
  ताई आपटे : एक प्रेरणास्रोत
  मधुघटचि रिकामे
  कावळा
  प्रतिसाद
  हर्बिन : पूर्वेकडील मॉस्को!
  गाडी बुला रही है!

समानतेसाठी आम्ही!
स्त्री-पुरुष समानतेसाठी मी स्वत: काय करतो/ करते? लिंगविशिष्ट भूमिकांना मी चिकटून राहत नाही, लिंगभेद मानत नाही, हे आपण स्वत: कोणत्या कृतींतून व्यक्त करता? तुमचे स्वानुभव कमाल १५० शब्दांत १७ मार्चच्या आत लिहून कळवा. हे आवाहन महिला आणि पुरुष दोघांसाठीही आहे. मात्र प्रत्यक्षात अनुभव असा आहे की अशा आवाहनांना पुरुषांचा प्रतिसाद ३३ टक्के सोडाच, पण जेमतेम ३ टक्केही मिळत नाही. हे प्रमाण वाढावे, अधिकाधिक वाचकांनी स्वत:तील बदलाचे चाकोरीबाहेरचे ठोस दाखले प्रांजळपणे द्यावेत, ही अपेक्षा. घरातील मुला-मुलींना, महिलांना समानतेची वागणूक मिळावी, यासाठी तुम्ही स्वत: काय करता, हे स्पष्टपणे मांडणे अपेक्षित आहे. निवडक लेखनाला प्रसिद्धी दिली जाईल. आपले स्वानुभव कागदाच्या एकाच बाजूला सुवाच्य अक्षरात लिहून पाठवा.
पत्ता- ‘समानतेसाठी आम्ही’, चतुरंग पुरवणी, लोकसत्ता संपादकीय कार्यालय, एक्स्प्रेस टॉवर, नरिमन पॉईंट,
मुंबई ४०००२१.

  शिक्षणामुळे स्त्री केवळ साक्षर झाली नाही तर तिला एक नवी दृष्टी प्राप्त झाली. स्वत:कडे व आजूबाजूच्या परिस्थितीकडे ती डोळसपणे पाहू लागली. हे आत्मभान तिच्यात एक अनोखा उत्साह भरू लागले. पण पारंपरिक कुटुंबाला मात्र त्याची जराही गंधवार्ता नव्हती. म्हणूनच अशा शिक्षित स्त्रीच्या कुटुंबावर त्याचे निनाद उमटू लागले आणि तिच्या संसाररथाची चाके काहीशी कुरकुरू लागली. तरीही अनेक संसार तरले. काही सफल झाले तर काही विफल ठरले. अशा अगणित संसारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन संसारकथा ‘सांजवात’ आणि ‘दुर्दैवाशी दोन हात’.
‘सांजवात’ हे मराठा ज्ञातीत जन्माला आलेल्या आनंदीबाई शिर्के या नामवंत लेखिकेचे १९७२ साली प्रकाशित झालेले आत्मचरित्र. सुखवस्तू मराठा कुटुंबातील सनातनी व शैक्षणिकदृष्टय़ा मागास वातावरणात वाढत असताना अत्यंत बुद्धिमान व
 
शिक्षणाची विलक्षण आवड असणाऱ्या मुलीची होणारी कोंडी, उपवर मुलींची लग्ने जमवताना पालकांवर येणारा जबरदस्त ताण, एवढेच नाही तर मराठा समाजातीलच पण देशस्थ- कोकणस्थ अशा मिश्र विवाहामुळे समाजात निर्माण झालेले वादळ आणि संपूर्ण कुटुंबालाच त्याची बसलेली झळ या सर्वाचे वास्तव चित्रण लेखिकेने आपल्या आत्मचरित्रात केले आहे. पुढे सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडताना नि:संग आणि कलंदर वृत्तीच्या शिर्केना सांभाळून घेत मुलांना वाढवत असतानाच निर्माण होणाऱ्या आर्थिक विवंचनांना तोंड देताना आणि घरातल्यांची लहानमोठी आजारपणे काढताना लेखिकेची होणारी कुतरओढही यातून प्रभावीपणे व्यक्त होते.
मराठा ज्ञातीत जन्म झालेल्या आनंदीबाईंनी लहानपणापासूनच वाचनाची आणि लेखनाची आवड जोपासली. खरे तर त्यामुळेच त्याचे शिर्केशी ऋणानुबंध जुळले. पण पुढे संसाराच्या धबडग्यात लेखनकार्यासाठी लागणारी उसंत मिळून मनाची तल्लीनता साधणे त्यांच्यासाठी अशक्यप्राय होऊ लागले. तरीही संसाराचे ओझे वाहत असतानाही आपल्यातली लेखिका त्या मरू देत नाहीत. आयुष्याच्या उत्तरार्धात साहित्यक्षेत्रात मिळवलेले सन्माननीय स्थान आणि आयुष्यातल्या सर्व चढ-उतारांचे विचक्षण वृत्तीने केलेले साक्षेपी निवेदन आत्मचरित्राला सांजवातीचे मोल प्राप्त करून देते.
‘दुर्दैवाशी दोन हात’ ही दुर्दैवाच्या अनंत आघातांमुळे झालेल्या विकल मनातून उमटलेली सरोजिनी शारंगपाणी यांच्या जीवनाची हृदयद्रावक कहाणी. मुलीच्या शिक्षणाला उत्तेजन देणारे वडील आणि त्याचे चीज करणारी ही हुशार मुलगी, कृश शरीरामुळे अनेक ठिकाणी नाकारली जाते. अखेरीस जाड चष्मा असलेल्या, शिकलेल्या मुलाकडून होकार येतो. मुलाकडच्यांना घाई असल्याने गडबडीत लग्न उरकले जाते. आणि इथूनच पुढे नायिकेच्या संघर्षमय जीवनाची सुरुवात होते.
सासूचा दणका, तिच्याकडून मिळणारी अमानुष वागणूक आणि दृष्टी मंदावत चाललेला हेकेखोर नवरा यामुळे संसाराबद्दलच्या स्वप्नील कल्पनांना नख लागते. त्यातच सासरच्या आडमुठय़ा उपचारांमुळे पहिल्या अपत्याच्या वेळीच नवऱ्याची दृष्टी जाऊन त्याला कायमचे अंधत्व येते. पण त्याचे खापर मात्र नवजात बालक व सरोजिनीबाई यांच्याच माथ्यावर फोडले जाते. दुर्दैवाचे इतके घाव सोसूनही अंगच्या चिवट वृत्तीच्या जोरावर त्या जीवनाला भिडतात. पण नवऱ्याकडून होणाऱ्या अन्यायामुळे मात्र आतून फुटून जातात. त्याचा तिरसट, विक्षिप्त स्वभाव, स्वार्थी, स्वयंकेंद्रित प्रवृत्ती आणि बायकोला हक्काचा गुलाम समजणारी, रोमारोमात भिनलेली रगेल पुरुषी वृत्ती यामुळे रात्रंदिवस होणारी त्यांची असह्य़ तडफड आत्मचरित्राच्या पानापानातून प्रकट होते. याखेरीज आत्मचरित्राच्या शीर्षकाप्रमाणेच दुर्दैवाचे अगणित वार झुंजारपणे परतवून लावणारी सरोजिनीबाईंची खंबीर मनोवृत्ती, संसाराला जुंपल्यावर बालपणच्या व तरुणपणातल्या भावुक, हळुवार वृत्तींचा लोप होऊन त्या जागी संकटांना तोंड देण्यासाठी लागणारी कणखर, सडेतोड प्रवृत्ती यांचेही दर्शन आत्मचरित्रातून वारंवार होत राहते.
अखेरीस, आयुष्यभर झालेल्या अन्यायामुळे तडफडणारी नायिका शेवटी लग्नात नवऱ्याने केलेली फसवणूक सिद्ध झाल्याने पुरती उद्ध्वस्त होते. पण अखेरच्या टप्प्यात मात्र त्याच्या तालावर नाचायला नकार देते. स्वत:सारखी इतरांची फसगत होऊ नये म्हणून अंतरीच्या उमाळ्याने, काल्पनिक सखीला संबोधून केलेले हे निवेदन म्हणजे ‘दुर्दैवाशी दोन हात’.
या संसारकथा म्हणजे खरे तर पारंपरिक कुटुंबव्यवस्था जपण्यातून निर्माण झालेल्या स्त्री-जीवनाच्या व्यथाच होत. या कुटुंबरचनेत, स्त्रीने घरातील कर्तव्ये पार पाडावीत आणि पुरुषाने घराबाहेरची आव्हाने पेलावीत हा दंडकच असल्यामुळे स्वत:साठी नाही तर इतरांसाठी झिजणे हा स्त्रीचा जीवनप्रवास गृहीतच धरला जात असावा. त्यात ती काही वेगळे करते आहे असे इतरांनाही वाटत नसावे आणि खुद्द तिलाही वाटत नसावे. त्यामुळे एकूणच, स्त्रीमधील ‘आपण काय काय करू शकतो’ हे जाणून घेण्याच्या प्रक्रियेलाच स्वाभाविक मर्यादा पडत असाव्यात. क्वचितप्रसंगी, आपल्यातील कार्यशीलतेची यथायोग्य जाणीव स्त्रीला झाली तरी घराचा परिसर हेच तिचे कार्यक्षेत्र समजले जात असल्यामुळेच सरोजिनी शारंगपाणींसारख्या एखाद्या स्त्रीला नोकरी करून घरातील आर्थिक प्रश्न मिटवण्याची आस दाबून टाकावी लागते. या संदर्भात सरोजिनी शारंगपाणी आपल्या ‘दुर्दैवाशी दोन हात’ मध्ये आपला तडफडाट व्यक्त करताना म्हणतात-
उपासमार झाली तरी चालेल, पण मी नोकरी करून मिळवायचं नाही असा अट्टाहास. बायकोनं नोकरी केली नाही म्हणजे सर्व पुरुषार्थ सिद्ध झाला, मग एरव्ही तिला किती का कष्ट पडेनात? मी कधी गोष्ट काढली तर एकच उत्तर, ‘मी पोटाला मिळवू शकत नाही असं वाटलं की तुला सांगेन. मग तू नोकरी कर-’
खरे तर हा मुद्दा केवळ सरोजिनीबाईंच्या नोकरी करण्याच्या इच्छेला विरोध होण्याचा नसून केवळ पुरुषी अहंगंडातून स्त्रीला आपल्यातली कार्यक्षमता पारखण्याच्या संधीला मिळालेल्या नकाराचा आणि एकंदरीतच तिच्या कार्य करण्याच्या ऊर्मीचे खच्चीकरण होण्याचा आहे. घराघरांमधून स्त्रीचे होणारे असे खच्चीकरणच तिचा आत्मविश्वास घालवून टाकणारे आणि प्रतिभावंत स्त्रीमधील आत्मतेज मालवून तिच्यातली सारी प्रतिभाच विझवून टाकणारे असावे असे वाटते. मुळातच संसाराच्या व्यापात व प्रापंचिक जबाबदाऱ्यांत पिचून जाणाऱ्या नवऱ्याचे- मुलांचे, घरच्यांचे- दारच्यांचे करण्यासाठी, त्यांचे मन आणि त्यांची मर्जी सांभाळण्यासाठी अहोरात्र आपली काया झिजवणाऱ्या तमाम स्त्रियांना कोणत्याही कलेच्या साधनेसाठी आवश्यक असणारा निवांतपणा मिळणेच दुरापास्त.
यातील संसारचित्र स्त्रीची व्यग्रताच दाखवते असे नाही तर अनेक दरडीवरून चालत संसाराची कसरत साध्य करणे ही फक्त स्त्रियांचीच जबाबदारी मानणारा, दीर्घकाळ चालत आलेला स्त्रीविषयक संवेदनशील दृष्टिकोनही जाहीर करते. अनेक कुटुंबांमध्ये तर अशा व्यथांबरोबरच पुरुषी अरेरावीतून निर्माण झालेला जोडीदाराचा असमंजसपणा सहन करत राहणे हेच अनेक स्त्रियांचे प्राक्तन बनते.
स्त्री म्हणजे जणू कष्ट करणारं यंत्र आणि गृहिणी म्हणजे जणू घर सांभाळणारी, अखंड घरकामात अडकलेली आणि सदैव इतरांकडून गृहित धरली जाणारी स्त्री. आजही ‘गृहिणी’पणाचे हेच सूत्र कित्येक कुटुंबांमधून अगदी बिनदिक्कतपणे राबवलं जातं. अशा असमंजस व असंवेदनशील वातावरणात गुदमरून जाणाऱ्या व संसारचक्रात गरगर फिरण्यातच आपले संपूर्ण जीवन व्यतीत करावे लागणाऱ्या स्त्रीमध्ये मग आपल्या समग्र व्यक्तित्वाचा शोध घेण्याची, ते फुलवण्याची आस तरी कशी निर्माण व्हावी? सरतेशेवटी, स्त्री म्हणजे बुद्धिमत्ता, भावना, चेतना, उत्स्फूर्तता, सर्जनशीलता या सर्वानी मिळून तयार झालेलं मानवी मन आहे, हे कुटुंबातील घटकांनीच अमान्य केलं तर या ‘स्व’रूपाची खात्री तिला स्वत:ला तरी कशी पटावी?
डॉ. उज्ज्वला करंडे
ujwala.karande@yahoo.com