Leading International Marathi News Daily शनिवार, ७ मार्च २००९
  समतेसाठी पुरुषांचा पुढाकार
  स्त्री-पुरुष समतेचा गोफ
  स्त्रीत्वाचा सोयीस्कर अर्थ
  शाळेसह व्यापक कुटुंब
  थांब, माझ्या संसाराला...
  विज्ञानमयी
  गर्भासंबंधीचा कायदा
  'संवाद' सखी
  स्त्री-मनातले क्षितीज
  माळाकोळीतील दारूबंदी लढा!
  आगळीवेगळी क्षमा
  संसारकथा
  ताई आपटे : एक प्रेरणास्रोत
  मधुघटचि रिकामे
  कावळा
  प्रतिसाद
  हर्बिन : पूर्वेकडील मॉस्को!
  गाडी बुला रही है!

समानतेसाठी आम्ही!
स्त्री-पुरुष समानतेसाठी मी स्वत: काय करतो/ करते? लिंगविशिष्ट भूमिकांना मी चिकटून राहत नाही, लिंगभेद मानत नाही, हे आपण स्वत: कोणत्या कृतींतून व्यक्त करता? तुमचे स्वानुभव कमाल १५० शब्दांत १७ मार्चच्या आत लिहून कळवा. हे आवाहन महिला आणि पुरुष दोघांसाठीही आहे. मात्र प्रत्यक्षात अनुभव असा आहे की अशा आवाहनांना पुरुषांचा प्रतिसाद ३३ टक्के सोडाच, पण जेमतेम ३ टक्केही मिळत नाही. हे प्रमाण वाढावे, अधिकाधिक वाचकांनी स्वत:तील बदलाचे चाकोरीबाहेरचे ठोस दाखले प्रांजळपणे द्यावेत, ही अपेक्षा. घरातील मुला-मुलींना, महिलांना समानतेची वागणूक मिळावी, यासाठी तुम्ही स्वत: काय करता, हे स्पष्टपणे मांडणे अपेक्षित आहे. निवडक लेखनाला प्रसिद्धी दिली जाईल. आपले स्वानुभव कागदाच्या एकाच बाजूला सुवाच्य अक्षरात लिहून पाठवा.
पत्ता- ‘समानतेसाठी आम्ही’, चतुरंग पुरवणी, लोकसत्ता संपादकीय कार्यालय, एक्स्प्रेस टॉवर, नरिमन पॉईंट,
मुंबई ४०००२१.

  ‘रिकामे मधुघट’ नावाची कवी भा. रा. तांबे यांची एक गोड कविता आहे. अजिजी, आर्जव आणि कातरता यांचं मोठं मनोज्ञ मिश्रण तिच्यात झालं आहे.
मधु मागशि माझ्या सख्या, परी
मधुघटचि रिकामे पडति घरी!
कविता पुस्तकात वाचण्याआधी कानांनीच ऐकली होती. लताबाईंच्या आवाजातून पहिल्या वेळी भिडला होता तो तिचा सरळसाधा घरगुती गोडवा. कुणा सखीनं आपल्या प्रियकराचं केलेलं ते आर्जव होतं. एक प्रकारची विनवणीच होती ती. वाढत्या वयानं शरीर -मनातले रस आटून गेले आहेत. एके काळचा उत्फुल्ल बहर ओसरला आहे. ते पूर्वीचे मधुघट रिकामे पडले आहेत. आणि तो मात्र मागत राहिला आहे. त्याच्या गळ्यात अजून तहान आहे. हवेपणाची मागणी आहे. त्याची असोशी संपलेली नाही अजून.
प्रेमात, सहजीवनात असं होतं का? एका वयात हा प्रश्नही मनात आला नव्हता. वाढत्या आयुष्यानं पुष्कळ समजावलं. कागदावरची कविता पुन्हा पुन्हा उलगडत नेली.
आजवरी कमळाच्या द्रोणी
 
मधू पाजिला तुला भरोनी,
सेवा ही पूर्वीची स्मरोनी,
करि न रोष सख्या, दया करी
कमळाच्या द्रोणातून तिनं त्याला पूर्वी ती मधुरता पाजवली आहे. कमळ म्हणजेच खरं तर ती. तिचंच प्रतीक आहे ते. तिच्या स्त्रीत्वाच्या ऐश्वर्याचं, तिच्या असतेपणाच्या समृद्धीचं प्रतीक. एकेकाळी जगण्याच्या उर्मी भरभरून होत्या तिच्यात. आयुष्यातले सगळे रस ओसंडत होते. भरभरून येत होती ती. देतही होती.
आज ती रिकामी आहे. त्यानं ते समजून घ्यावं. तिची पूर्वीची सेवा स्मरून रागावू नये असं तिला वाटतं आहे. खरं तर तो सखा आहे तिचा. मग ही दयेची अपेक्षा आणि सेवेची भाषा कशासाठी? सख्यत्वात अपेक्षा असलीच तर ती नुसती समजून घेण्याची हवी. भाषा असलीच तर निकटतेतल्या निरपेक्ष आस्थेची हवी.
एकदा वाटलं की ही १९३३ साली लिहिलेली कविता. सत्तर-पंच्याहत्तर वर्षांपूर्वीचा तो काळ. शिवाय तांबे इंदूर-ग्वाल्हेरकडचे. पुरोगामी महाराष्ट्राचे वारे जिथे त्या काळी पोचत नव्हते अशा प्रदेशात त्यांचं आयुष्य गेलं. फार सुखी संसार होता त्यांचा. प्रेमाची कविता त्यांनी लिहिली ती त्या तृप्त, प्रेममय संसारामुळेच. आपल्या मित्रांना तसं त्यांनी पत्रातून लिहिलंही आहे. या सांसारिक प्रेमात सेवा अपरिहार्यपणे आली असणार. काळाचा विचार करता, वातावरणाचा विचार करता तेच स्वाभाविक आहे.
पण मग असंही वाटलं की, नवऱ्याला किंवा प्रियतम पुरुषाला देव मानणारी स्त्रीच फक्त सेवेची भाषा करेल असं नाही. खरं तर सेवा हा प्रेमाचाच एक हृद्य आणि सुंदर आविष्कार आहे. प्रिय माणसाला सुखावणारं जे जे काही आहे ते आनंदानं, सहजपणे करणं ही तर प्रेमाचीच एक रीत आहे. पंचकल्याणी घोडय़ावरून प्रियेला भेटण्यासाठी दुरून दौडत आलेल्या आणि थकलेल्या शिलेदाराला पाहताना आनंदानं फुलून येते त्याची प्रिया.
शालूच्या पदरानं पुसते मी पाय
खायाला देते मी साखर साय
आणखिन सेवा करू मी काय?
- असं विचारणारी शांताबाई शेळक्यांच्या लावणीतली प्रेमिका मला आठवली, पण त्याचबरोबर जयदेवाच्या ‘गीत गोविंदा’चीही आठवण झाली. त्या कवितेच्या बाराव्या म्हणजे अखेरच्या सर्गातही अष्टपदी म्हणजे प्रणयानंतर तृप्त राधेनं कृष्णाकडून हौसेनं करून घेतलेल्या त्या सेवेचंच वर्णन आहे. कारण सेवा म्हणजे प्रेमच. सख्यत्वात तरी ते प्रकट असं प्रेमच आहे. प्रेम नाही, तर मग सेवा म्हणजे कदाचित गुलामी असेल. जुलमाचा रामराम असेल. पण प्रेम आहे, तर मग सेवा म्हणजे जवळपणाचा गोडवा आहे.
तांब्यांच्या कवितेतल्या प्रियेजवळ आता कमळाच्या द्रोणातून प्रियतमाला मध पाजण्याइतकं बळच नाही. आता तिच्याजवळ नैवेद्याची दुधानं भरलेली लहानशी वाटी तेवढी आहे. धुंदी नाही. ओसंडणारी गोडीही नाही. थोडंसं दूध फक्त आहे. तेही नैवेद्यापुरतं. आणि फुलांचा मत्त शृंगारही नाही. आहे ती रंगीत पण गंधहीन कोरांटी. तिच्या तळाशी चुपून घेता येईल इतका अगदी कणभर मध असतो. तेवढंच आहे जवळ.
कासंडी भरभरून दूध देणारी गोठय़ातली गाय म्हातारी व्हावी आणि वैरणीची पेंडी तिच्यापुढे सोडताना तिचे डोळे बघता येऊ नयेत, फळांनी वाकून जाणारं जुनं झाड वठत गेल्यावर त्याच्या जवळून जाताना गळ्याशी आवंढा यावा, तसा या कवितेच्या ओळी वाचताना आत दुखत जातो आपण.
आणि या दुखरेपणात हळूहळू आणखी एक दु:ख मिसळत येतं. एका कवितेमागे आणखी एक कविता असते. ती हळूच पुढे येते आणि पहिल्या कवितेत मिसळते. प्रियेची जागा घेतो कवी. कलावंत. आणि प्रियतमाच्या जागी रसिक दिसायला लागतो. त्या दोघांचं नातंही असंच तर असतं. प्रेमिकांसारखंच. सख्यत्वाचं नातं.
प्रतिभावंत काही निर्माण करतो तेव्हा त्याच्या मनात रसिकांचा विचार नसतोच. त्याला जाणवलेलं, समजलेलं, भावलेलं काहीतरी असतं, जे त्याला पुनर्निर्मित करायचं असतं. कवीला कळलेलं आयुष्य असतं, जे त्याला शब्दात ठेवायचं असतं. कवी बोरकरांनी म्हटलं आहे,
आतल्या एकांतडोही गात आता डुंबतो
अर्थ शब्दांचा उदेता विस्मयाने थांबतो
पण मग आपण ज्या आशयाशी झोंबी घेतली तो शब्दांमधून उदयाला येताना वाटणारा विस्मय आणि होणारा आनंद एखाद्या रसिकांपर्यंत आपल्या अनुभवासकट पोचला तर कवी सुखावतोच. एका अर्थानं निर्मिती पुरी होता होता किंवा सृजनतंद्रीतून बाहेर येता येताच एका अनाम रसिकाची वाट पाहणं सुरू होतं. ‘माझा समानधर्मा कधी तरी कुठेतरी जन्माला येईलच. काळ अनंत आहे आणि पृथ्वी अफाट आहे असं भवभूती म्हणाला होता ते उगाच नव्हे-
उत्पस्यते ऽ स्ति मम कोऽपि समानधर्मा
कालो ह्य़यं निरवधिर्विपुला च पृथ्वी!
आपल्या सगळ्या संतांनी रसिकांशी संवाद करत करतच ग्रंथ रचनेची आव्हानं पेलली आहेत. लोककलावंतांनी ‘मायबाप रसिकां’ची आर्जवं केली आहेत. एक प्रकारे कवी आणि रसिक दोघंही एकमेकांना समृद्ध करत आले आहेत.
कलेच्या बहरात असतो कलावंत, तेव्हा रसिकांबरोबरचं त्याचं नातं फार सुंदर असतं. प्रेरक असतं. ओढ लावणारं असतं, धुंद करणारं असतं. कलावंत उधळत असतो. स्वत:ला आणि रसिक तृप्त होत असतो. त्याची ती तृप्ती, त्याची उत्कट दाद कलावंताला चेतवते, नव्या सर्जनाकडे खेचत नेते. त्या काळात कमळाच्या द्रोणातून रसिकांना मध पाजवतो कलावंत. कमळ हे सृजनशक्तीचंच तर प्रतीक आहे.
पण प्रतिभेचा बहर कधीतरी मंदावतो. रसरशीत संवेदना क्षीण होत जातात. संपत जाणाऱ्या शक्तींची जाणीव आतूनच होत जाते. जग तेच असतं भोवताली पण प्रतिसाद तोच, तसाच असत नाही. उत्कटता ओसरलेली असते. कधी कधी तर नव्याचं आकलन होत नाही. प्रवाहाबरोबर वेगानं पोहताही येत नाही.
आणि रसिक मात्र असतात दर्दी. जाणते. मर्मज्ञ. एके काळी कलावंतानं जे भरभरून, उदंड दिलेलं असतं, त्याच्या बळावरच वाढलेले. समृद्ध झालेले. त्यांना आणखी नवं हवं असतं. पूर्वीसारखंच, किंबहुना पूर्वीपेक्षाही अधिक प्रगल्भ, अधिक दर्जेदार, अधिक मौलिक हवं असतं आणि आता प्रतिभावान असतो ओसरलेला. सर्जनाची मावळती वाट चालू लागलेला. मंगेश पाडगावकरांच्या एका कवितेतला उद्गार आहे,
प्रथमच माझे शब्द पाहिले
एकांतात रिते मी
हे रितेपण भिववणारं असतं. सांजेच्या सावल्यांइतकंच कातर करणारं असतं. तांबे किती नेमकं बोलतात! खरं आणि व्याकुळही.
ढळला रे ढळला दिन सखया
संध्या छाया भिवविती हृदया
अता मधूचे नाव कासया
लागले नेत्र हे पैलतिरी
अरुणा ढेरे