Leading International Marathi News Daily शनिवार, ७ मार्च २००९
  समतेसाठी पुरुषांचा पुढाकार
  स्त्री-पुरुष समतेचा गोफ
  स्त्रीत्वाचा सोयीस्कर अर्थ
  शाळेसह व्यापक कुटुंब
  थांब, माझ्या संसाराला...
  विज्ञानमयी
  गर्भासंबंधीचा कायदा
  'संवाद' सखी
  स्त्री-मनातले क्षितीज
  माळाकोळीतील दारूबंदी लढा!
  आगळीवेगळी क्षमा
  संसारकथा
  ताई आपटे : एक प्रेरणास्रोत
  मधुघटचि रिकामे
  कावळा
  प्रतिसाद
  हर्बिन : पूर्वेकडील मॉस्को!
  गाडी बुला रही है!

समानतेसाठी आम्ही!
स्त्री-पुरुष समानतेसाठी मी स्वत: काय करतो/ करते? लिंगविशिष्ट भूमिकांना मी चिकटून राहत नाही, लिंगभेद मानत नाही, हे आपण स्वत: कोणत्या कृतींतून व्यक्त करता? तुमचे स्वानुभव कमाल १५० शब्दांत १७ मार्चच्या आत लिहून कळवा. हे आवाहन महिला आणि पुरुष दोघांसाठीही आहे. मात्र प्रत्यक्षात अनुभव असा आहे की अशा आवाहनांना पुरुषांचा प्रतिसाद ३३ टक्के सोडाच, पण जेमतेम ३ टक्केही मिळत नाही. हे प्रमाण वाढावे, अधिकाधिक वाचकांनी स्वत:तील बदलाचे चाकोरीबाहेरचे ठोस दाखले प्रांजळपणे द्यावेत, ही अपेक्षा. घरातील मुला-मुलींना, महिलांना समानतेची वागणूक मिळावी, यासाठी तुम्ही स्वत: काय करता, हे स्पष्टपणे मांडणे अपेक्षित आहे. निवडक लेखनाला प्रसिद्धी दिली जाईल. आपले स्वानुभव कागदाच्या एकाच बाजूला सुवाच्य अक्षरात लिहून पाठवा.
पत्ता- ‘समानतेसाठी आम्ही’, चतुरंग पुरवणी, लोकसत्ता संपादकीय कार्यालय, एक्स्प्रेस टॉवर, नरिमन पॉईंट,
मुंबई ४०००२१.

  एकदा काय झालं- पण थांबा, खरं तर ‘एकदा काय झालं’ ही या गोष्टीची सुरुवात नाही, तो शेवट आहे. तर गोष्ट आपण सुरुवातीपासून सुरू करू या..
डेहराडूनहून मुंबईला बदली झाल्यानंतर आम्हाला राहायला जे घर मिळालं त्यात दिल खूश करून टाकणारी एक जागा होती, ती म्हणजे तिथला व्हरांडा. भरपूर लांब, भरपूर रुंद आणि पूर्व-पश्चिम दोन्हींकडचं ऊन आणि वारा अंगावर खेळवणारा. वा! कपडे वाळत घालायची छानच सोय झाली की. व्हरांडय़ाला ग्रीलही लावलं होतं. मी भराभरा आधी दोऱ्या बांधून टाकल्या. कुंडय़ादेखील नंतर ठेवल्या. डेहराडूनला कपडे अंगणात वाळायचे. मोकळ्या उन्हावाऱ्यात वाळलेल्या कपडय़ांचं स्पर्शसुख मुंबईला मिळणार नाही याची मानसिक तयारी खरं तर मी केलेली होती. मुंबईला म्हणजे स्वयंपाकघराच्या
 
आणि पॅसेजच्या छताजवळ लावलेल्या दांडय़ांवर काठीने कपडे वाळत घालायचे आणि ते वाळण्याची पाहायची. त्यामुळे या व्हरांडय़ाचा आनंद त्याच्या अनपेक्षितपणामुळे द्विगुणित झाला.
एक आठवडा छान गेला. त्यानंतर एक दिवस संध्याकाळी वाळलेले कपडे दोरीवरून काढायला व्हरांडय़ात गेले तर मुलीच्या पी.टी.च्या शुभ्र ड्रेसवर काळसर- जाडसर रेषांचे डाग पडलेले दिसले. न ढूंढतादेखील दिसणारे ते डाग ‘अच्छे है’ असं तिच्या शिक्षिका मानणं शक्य नव्हतं. मुलीला रडू कोसळलं. मी वैतागले. मग हँडवॉशचे थेंब टाकून धुऊन टाकले. पण ते मुळात पडले कसे हे पाहायला पुन्हा व्हरांडय़ात आले, तर दोरीवर वाळणाऱ्या कपडय़ांच्या खालच्या फरशीवर पोळीचा तुकडा, माशाचे काटे पडलेलं दिसले. ही सलामी होती, हे तेव्हा माझ्या लक्षात आलं नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी कपडे वाळत टाकायला व्हरांडय़ात गेले, तर समोरच्या झाडावर एक कावळा बसलेला दिसला. तो माझ्या हालचालींवर पाळत ठेवून असावा असा मला का कोण जाणे पण संशय आला आणि तो खरा ठरला. माझी पाठ वळल्याबरोबर तो झाडावरून उडून ग्रीलच्या मोठय़ा चौकोनातून व्हरांडय़ात आला आणि जणू काही त्याच्या स्वागतासाठी सगळे स्वच्छ कपडे पसरले असावेत अशा थाटात त्यातल्या सगळ्यात पांढऱ्या शुभ्र कपडय़ावर स्थानापन्न झाला. त्यानं आपल्या चोचीत लालसर रंगाचं लोंबणारं काहीतरी आणलं होतं. ते पायात धरून चोचीनं ओढत बसला. ते एका मेलेल्या उंदराचं आतडं होतं हे लक्षात आल्यावर मी ‘ईऽऽ’ म्हणून किंचाळले. त्या किंचाळण्याचा त्याच्यावर ढिम्म परिणाम झाला नाही. हात उगारून पाय आपटत त्याच्याजवळ जाऊन धमकावलं तेव्हा कुठे तो तिथून उडाला. काहीतरी प्रतिबंधात्मक उपाय योजणं आता अपरिहार्य झालं होतं. ग्रीलचे मोठाले चौकोन लहान करण्यासाठी नायलॉनची जाड दोरी आत-बाहेर करून त्यांच्यामधून अडकवून टाकली. त्यामुळे ग्रीलच्या डिझाइनची शोभा बिघडली, पण इलाज नव्हता. समोरच्या झाडावरून कावळा माझ्या हालचालींकडे पाहत होता असं मला वाटलं. नवी गुंतागुंत कशी सोडवावी, असा विचार त्याच्या डोक्यात चालला असावा कदाचित. मीपण मनात म्हटलं, बघूच या.
पुन्हा काही दिवस सुरळीत गेले. एक दिवस दुपारी अगदी जवळून कावकाव ऐकू आली. शंका आली ती बरोबर ठरली. एका चौकोनातली दोरी चोचीनं ओढून ओढून सैल करून कावळा व्हरांडय़ात शिरला होता. इकडेतिकडे नाचत सगळ्या पसरलेल्या कपडय़ांवर बसून बघत होता. स्वत:चं किती कौतुक करून घेऊ असं त्याला झालं होतं. त्याला उडवून लावून मी पुन्हा दोरी घट्ट बांधली. पण याहून अधिक पक्का उपाय शोधणं भाग होतं. दरम्यानचे काही दिवस दिवसातून चार-चारदा कावळा आणि कपडे यांचे स्टेटस चेक करण्यात गेले. नंतरच्या शनिवारी आम्ही जुहूला गेलो. तिथल्या समुद्रकिनाऱ्यावर तऱ्हेतऱ्हेची खेळणी विकणारे फिरत होते. त्यात एक भिरभिरी विकणारा दिसला. संध्याकाळच्या उन्हात चमचमणारी त्याच्या खांद्यावरची ती भिरभिरी पाहून माझ्या डोक्यात एक कल्पना चमकली. त्याच्याकडून मी डझनभर भिरभिरी विकत घेतल्या आणि बरोबरच्या मंडळींच्या प्रश्नार्थक नजरांना उत्तर म्हणून म्हटले, ‘‘उद्या पाहा गंमत.’’
दुसऱ्या दिवशी सकाळी काकाच्या मुलीला हाताशी धरून ती सगळी भिरभिरी मी वर-खाली, डावीकडे-उजवीकडे, या कोपऱ्यात त्या कोपऱ्यात अशी ग्रीलभर रोवून टाकली. मध्यभागही विसरले नाही. भिरभिरी लावून झाली त्याच वेळेस वाऱ्याची एक बऱ्यापैकी झुळूक आली आणि सकाळच्या सोनेरी उन्हात चमचमणारी ती भिरभिरी एकदम सगळी गरागरा फिरायला लागली. कावळा समोरच्या झाडावर मान वाकडी करून ते दृश्य पाहत होता. त्याला यत्किंचितही सौंदर्यदृष्टी असती तरी हे चकित करणारे दृश्य पाहून त्याच्या चोचीतून आनंदाश्चर्याचा निदान अर्धस्फुट उद्गार तरी निघाला असता. पण तो तसाच टक लावून बघत राहिला. बहुधा त्याच्या डोक्यात विचारांचं चक्र सुरू झालं असावं. एरवी सतत कृतिप्रवण असलेला कावळा आज कधी नव्हे तो विचारात पडलेला पाहून आणि तो देखील माझ्या कृतिप्रवणतेमुळे, हे दृश्य पाहून मला आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्या. कावळा अजून त्याच जागी बसला होता आणि व्हरांडय़ाकडेच पाहत होता. थोडय़ा वेळानं तो आवाज न करता तिथून उडून गेला. उडण्यात भाव असा की ‘बघू या आता काय करता येते ते’. खरे म्हणजे तेव्हाच माझ्या लक्षात यायला हवं होतं. पण नाही आलं खरं. काय करणार, माणसाच्या आकलन क्षमतेला मर्यादा असतात.
असो. पुढचे काही दिवस चांगले गेले. कपडे दोन-दोनदा धुवावे लागत नव्हते. शिळ्या पोळीचे तुकडे, शिळ्या भाताची डिखळं, माशांचे काटे, तोंडातल्या चोथ्याची गोळी असं काहीही व्हरांडय़ात किंवा कुंडय़ांमध्ये पडत नव्हते. एकसारखं व्हरांडय़ात येऊन डॅमेज कंट्रोल करायची गरज भासत नव्हती. रोजच्या कामात एक छान ढिलाई आली होती. तर अशाच एका छानशा ढिल्या दुपारी जेवण आटोपून सुपारी चघळत मी वर्तमानपत्र हातात घेतलं आणि अंमळ लवंडले. सुपारी चघळून संपली. डोळ्यासमोरच्या वर्तमानपत्राची अक्षरं धूसर व्हायला लागली. सुखनिद्रा येऊ घातली होती. तिला दूर लोटण्याचं तसं काहीच कारण नव्हतं म्हणून येऊ द्यायचं ठरवलं आणि कुशीवर वळले- तर एकदम अशी कर्कश्श कावकाव सुरू झाली की मी ताडकन उठूनच बसले. त्या ‘कावकाव कावकाव’च्या आवाजातून विजयाचा उन्माद नुसता थुई थुई ओसंडत होता. माझ्या छातीत धस्स् झालं. धडपडत उठून खोलीच्या दारात येऊन मी व्हरांडय़ात डोकावले आणि पाहते तर काय ग्रीलभर बांधलेल्या, चमचम करत गरगर फिरणाऱ्या त्या चक्रावलीच्या केंद्रस्थानी विराजमान होणारा तो काकराज. आपल्या विजयाची द्वाही दाही दिशांत घुमवत होता. व्हरांडय़ाच्या आत प्रवेश करणे हे आता केवळ क्षणार्धाचं काम होतं आणि ते केव्हा करायचं ते त्याच्या मर्जीनुसार तो ठरवणार होता.
मी मनातल्या मनात त्या काकराजाला हात जोडले आणि हार पत्करली. आपल्या जीवनात नाही तर दिनक्रमात कावळा नावाच्या एका त्रासदायक अस्तित्वाचा वावर असणार ही वस्तुस्थिती स्वीकारून टाकली.
हा आहे कावळ्याच्या गोष्टीचा पूर्वार्ध. या गोष्टीला उत्तरार्ध देखील आहे, तो कलकत्त्याला घडून आला.
मुंबईहून आमची बदली कलकत्त्याला झाली. तसं पाहिलं तर कलकत्त्याचे कावळे मुंबईच्या कावळ्यांहून वेगळे असण्याचे काही कारण नाही. पण असं पाह्य़लं तर कारण आहेही. एक म्हणजे कलकत्ताभर घरीदारी मासे-कोंबडय़ा इत्यादी प्राणी रोजच्या रोज कत्ल केले जात असतात. त्यामुळे तिथल्या कावळ्यांची खाण्यापिण्याची चंगळ असते. त्यामुळे ते तसे आरामात असतात. उगीच कावकाव करत इकडेतिकडे उडत नाहीत. दुसरं म्हणजे कलकत्त्याच्या रस्त्यांवरून कायम लोकांचे मोर्चे ‘चोलबे ना, चोलबे ना’ अशा घोषणा देत चाललेले असतात. या घोषणांमुळे तिथले कावळे दबकून असतात. घोषणांच्या आवाजाच्या वर आवाज काढून कावकाव करणं एकूण जमण्यासारखं नसावंच. तर आपली गोष्ट घडली त्या दिवशी, अशा या निरुपद्रवी कावळ्यांच्या कलकत्ता शहरातली एक थंडीची दुपार होती. छान उबदार पिवळं ऊन पडलं होतं. चहा पिण्याची तलफ आल्यामुळे चहा करून तो मुरायला ठेवून मी स्वयंपाकघराच्या खिडकीत येऊन उभी राहिले. खिडकीच्या समोरच असलेल्या विजेच्या तारेवर दोन कावळे बसले होते. बहुधा ते दोन कावळे नसून त्यातला एक कावळा होता आणि दुसरी कावळी होती. बहुधा म्हणण्याचं कारण पु. ल. देशपांडय़ांप्रमाणेच मीदेखील कावळी काळी असते की गोरी ते कधी पाहिलेलं नाही. आपल्यासाठी सगळे कावळे हे कावळे असतात आणि सगळ्या चिमण्या या चिमण्या असतात. पण या जोडीमध्ये मात्र एक कावळा होता आणि दुसरी नक्की कावळी असावी. थंडीतल्या उन्हात ते एकमेकांना बिलगून बसले होते. सूर्याच्या तिरप्या सोनेरी किरणांमध्ये त्या दोघांच्या काळ्या पंखांवर सुंदर जांभळी चमक आली होती. त्यात मधूनच त्यांच्या हालचालींसरशी बारीकशी लालसर तपकिरी छटा उमटून जात होती. कावळा आपली बळकट धारदार चोच कावळीच्या मानेवरच्या मऊ परांमधून अगदी हळुवारपणे फिरवत होता आणि त्यांच्या गळ्यातून निघणारा स्वर- तो स्वर इतका काही कोमल, इतका आर्जवी, इतका प्रेमानं ओथंबलेला होता की तो तिला एवढं काय सांगत असेल ते कळून घेण्याची मला फारच उत्सुकता वाटायला लागली.
काय सांगत असेल तो तिला? काहीतरी समजावत असेल, की कसलं तरी आश्वासन देत असेल? मनातले बेत सांगत असेल, की भविष्याची स्वप्नं रंगवत असेल? तिच्या बावरलेल्या मनाला धीर देत असेल, की ‘तसल्या’ एखाद्या अपराधाबद्दल क्षमायाचना करीत असेल? कदाचित तिनं त्याला गोड बातमी दिली असेल आणि म्हटलं असेल की आता आपल्याला एक घरटं बांधायला हवं आणि तो म्हणत असेल, ‘‘काही काळजी करू नको. मी जमवीन एकेक वस्तू. या जवळच्या इमारतीतल्या बिऱ्हाडातून (म्हणजे आमच्याच!) काय काय पळवून आणण्यासारखं आहे, ते मी हेरून ठेवलेलं आहे.’’
आपल्याच विश्वात हरवून गेलेल्या त्या जोडीतला ‘तो’ आपल्या ‘तिला’ काहीही सांगत असला आणि मला जरी त्यातलं काहीही समजत नसलं तरी ते दृश्य पाहता पाहता एक गोष्ट घडली- कावळा या प्राण्याकडे (म्हणजे पक्ष्याकडे) पाहण्याची माझी दृष्टी बदलून गेली. सततच्या कावकावीनं डोकं उठवणारा, कचऱ्याच्या ढिगातून घाणेरडय़ा वस्तू घेऊन उडणारा आणि लोकांच्या व्हरांडय़ात बसून त्या चिवडणारा, दुसऱ्यांच्या वस्तूंवर टपून असणारा, कितीही हाकललं तरी परत परत घरात शिरायला पाहणारा असा हा लोचट, कर्कश, आक्रमक, उपद्रवी, कुरूप पक्षी. पण सतत माणसांच्या अवतीभवती राहण्याच्या प्रयत्नातून त्याच्यामध्ये माणसाचे गुण संक्रमित होत असावेत. (विशेषत: कलकत्त्याची माणसं जरा जास्तच भावनाप्रधान असतात- त्यांचा हा गुण तिथल्या कावळ्यांनादेखील लागला असावा!)
अर्थात ‘कावळा झाला तरी तो माणूसच नव्हे का’ असं काही या गोष्टीचं तात्पर्य नाही. तात्पर्य कदाचित उलटंदेखील असू शकेल!
नीलिमा भावे