Leading International Marathi News Daily शनिवार, ७ मार्च २००९
  समतेसाठी पुरुषांचा पुढाकार
  स्त्री-पुरुष समतेचा गोफ
  स्त्रीत्वाचा सोयीस्कर अर्थ
  शाळेसह व्यापक कुटुंब
  थांब, माझ्या संसाराला...
  विज्ञानमयी
  गर्भासंबंधीचा कायदा
  'संवाद' सखी
  स्त्री-मनातले क्षितीज
  माळाकोळीतील दारूबंदी लढा!
  आगळीवेगळी क्षमा
  संसारकथा
  ताई आपटे : एक प्रेरणास्रोत
  मधुघटचि रिकामे
  कावळा
  प्रतिसाद
  हर्बिन : पूर्वेकडील मॉस्को!
  गाडी बुला रही है!

समानतेसाठी आम्ही!
स्त्री-पुरुष समानतेसाठी मी स्वत: काय करतो/ करते? लिंगविशिष्ट भूमिकांना मी चिकटून राहत नाही, लिंगभेद मानत नाही, हे आपण स्वत: कोणत्या कृतींतून व्यक्त करता? तुमचे स्वानुभव कमाल १५० शब्दांत १७ मार्चच्या आत लिहून कळवा. हे आवाहन महिला आणि पुरुष दोघांसाठीही आहे. मात्र प्रत्यक्षात अनुभव असा आहे की अशा आवाहनांना पुरुषांचा प्रतिसाद ३३ टक्के सोडाच, पण जेमतेम ३ टक्केही मिळत नाही. हे प्रमाण वाढावे, अधिकाधिक वाचकांनी स्वत:तील बदलाचे चाकोरीबाहेरचे ठोस दाखले प्रांजळपणे द्यावेत, ही अपेक्षा. घरातील मुला-मुलींना, महिलांना समानतेची वागणूक मिळावी, यासाठी तुम्ही स्वत: काय करता, हे स्पष्टपणे मांडणे अपेक्षित आहे. निवडक लेखनाला प्रसिद्धी दिली जाईल. आपले स्वानुभव कागदाच्या एकाच बाजूला सुवाच्य अक्षरात लिहून पाठवा.
पत्ता- ‘समानतेसाठी आम्ही’, चतुरंग पुरवणी, लोकसत्ता संपादकीय कार्यालय, एक्स्प्रेस टॉवर, नरिमन पॉईंट,
मुंबई ४०००२१.

  ‘मुतालिक आणि तरुणाई’च्या निमित्ताने..
शुभा प्रभू-साटम यांचं कौटुंबिक आणि घरगुती विषयांवरचं हलकंफुलकं लेखन वाचायला मला आवडतं. ‘मुतालिक आणि तरुणाई’ (चतुरंग, २१ फेब्रुवारी) या त्यांच्या लेखात मात्र त्यांनी त्यांच्या नकळत एका राजकीय विषयाला हात घातलेला आहे. पहिल्या परिच्छेदात त्यांनी मुतालिक आणि मंडळींचा उपहास करून ‘मुतालिक हा संस्कृती वाचवण्यासाठी अवतरलेला जणू कलकीचा अवतारच आहे’, असं म्हटलेलं आहे. पण त्यांच्या सबंध लेखाचा उद्देश वेगळाच आहे. त्यांनी मुतालिक आणि त्यांच्या ‘श्रीराम सेने’ला विरोध करणारे सारेजण ‘पबमध्ये जाणं हा तरुणाईचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि कुणीही तरुणांना थांबवू शकत नाही’ असं जणू म्हणताहेत, असा समज करून लेखाची पुढली मांडणी केलेली आहे. ती मुळातच चुकीची आहे. शहाणी आणि सुजाण मंडळी जेव्हा मुतालिकला आणि त्यांच्या ‘श्रीराम सेने’ला विरोध
 
करतात, तेव्हा त्यांचा विरोध या तथाकथित ‘संस्कृतीरक्षकां’च्या तालिबानी वागण्याला असतो. विविध मतमतांतरांचा आणि विचारांचा आदर करणं हे उदारमतवादी हिंदू संस्कृतीचं महत्त्वाचं लक्षण आहे. ‘एखाद्या गोष्टीविषयी निरनिराळी मतं जाणून घेऊन माझा निर्णय मी घेणं’ हे सुजाण लोकशाहीचं लक्षण आहे. ‘मी म्हणतो म्हणून ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करू नका’ (कारण तो भारतीय संस्कृतीला मारक प्रकार आहे.) हा सरळसरळ ‘फतवा’ झाला. मग मायकेल जॅक्सन मराठी माणसाच्या छाताडावर नाचवणं हा मराठी संस्कृतीला पोषक प्रकार आहे की काय? पण ते विचारायचं नाही. हा सांस्कृतिक ‘शिवउद्योग’ ज्यांनी घडवून आणला ते आज ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’चे प्रमुख नेते आहेत. सबंध मुंबईत आपले खटले लढवण्यासाठी ज्यांना ‘दुबे’ हा एकमेव ‘भय्या’ वकील सापडतो, ते ‘मराठी भाषा आणि संस्कृती राखण्यासाठी कंबर कसून उत्तर प्रदेशाच्या आणि बिहारच्या ‘भय्यां’ना विरोध करा’ असं आक्रमक भाषेत सांगत आहेत. दहशतीच्या जोरावर मूठभरांनी आपल्याला वाटते ती संस्कृती लोकांवर लादणं, यालाच पहिला विरोध नोंदवला पाहिजे.
ही अरेरावी फक्त हिटलरवादी फॅसिस्ट प्रवृत्तीचे नेते करतात असं नाही. मागे आचार्य अत्रे यांनी ‘वासूनाका कांदबरी वाचू नका. ती वाईट कादंबरी आहे. तीवर बंदी आणली पाहिजे’ असं ‘मराठा’तल्या आपल्या अग्रलेखातून जेव्हा मांडलं होतं, तेव्हा दिलीप पुरुषोत्तम चित्र्यांनी त्याला कडाडून विरोध केलेला होता. ‘ती कादंबरी वाईट आहे की चांगली हे मला वाचून ठरवू द्या. माझा हा हक्क तुम्ही कोण नाकारणार?’ असं त्यांचं म्हणणं होतं. आजही या प्रकाराची पुनरावृत्ती समाजात घडताना दिसते आहे.
आपल्या ‘हिता’चे निर्णय हे दुसऱ्या कोणी तरी घेण्याची सवय लागली की पंचविशीतली डॉक्टरबिक्टर असणारी तरुणीसुद्धा ‘माझं लग्न माझे आई-बाबा ठरवतील, त्याच्याशीच होईल’ असं अभिमानानं सांगताना आढळते. माझ्या माहितीतल्या एका साठीच्या गृहस्थाचे वडील वारले, तर घरातले त्याचे नातेवाईक ‘त्याच्या वर लहान वयातच कशी जबाबदारी कोसळली’ याची चर्चा करत होते. सतत ‘लहान’ असण्याची ही सवय आपल्याला कशी लागते, याचं उत्तर २१ फेब्रुवारीच्याच ‘चतुरंग’ पुरवणीतील मंगला गोडबोले यांच्या ‘पण बोलणार आहे!’ या सदरातील ‘हे की ते?’ या हलक्या फुलक्या लेखात सापडते. त्या लेखात त्यांनी ‘मुलांना त्यांचे निर्णय त्यांनाच घेऊ देण्या’च्या अतिरेकावर टीका केलेली आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हास्यास्पदच असतो. परंतु लहान वयापासून मुलांना ‘स्वत:चे निर्णय स्वत:च घेण्याची सवय’ लावणं यात वाईट काय आहे? आई सांगते म्हणून ‘मॉलपेक्षा कोपऱ्यावरचा किराणा दुकानदार चांगला’ हे मुलाच्या मनावर मारून मुटकून ठसवण्यापेक्षा त्याच्या भिरभिरत्या नजरेला मॉल पाहायची इच्छा असेल तर त्याला तो पाहू द्यावा. दोहोंचे बरेवाईट परिणाम आपल्या कुवतीप्रमाणे त्याला समजावून द्यावेत आणि उपलब्ध पर्यायांमधून त्याला निवड करू द्यावी. प्रसंगी चुका करण्याचाही त्यांचा हक्क मान्य करायलाच हवा. हा ‘संस्कार’ जर मुलांवर लहानपणापासून केला तर ‘चांगलं काय आणि वाईट काय’ हे सांगण्यासाठी मोठेपणी त्याला कुठे कुण्या ठाकरे मंडळींची किंवा मुतालिकची किंवा कुण्या तालिबानी नेत्यांची जरूर पडणार नाही.
शुभा प्रभू-साटम आपल्या लेखाच्या शेवटी म्हणतात, ‘प्रमोद मुतालिक यांचा पवित्रा जेवढा आक्षेपार्ह आहे, त्यापेक्षा चिंता वाटावी अशी प्रतिक्रिया विरोधी गटाकडून उमटली आहे. हे कुठल्याही सुसंस्कृत, विचारी, प्रगल्भ समाजाचं द्योतक नाही आणि ज्या हिरीरीने तरुण पिढी यात सामील होत आहे, ते तर खचितच योग्य नाही.’
मला त्यांचं हे मत मान्य नाही. प्रमोद मुतालिकच्या तालिबानी पवित्र्याविरुद्ध भारतातल्या तरुण पिढीला कोणत्याही मार्गाने निषेध नोंदवावा असं वाटत असेल तर त्याचं स्वागतच करायला हवं. असा विरोध इथल्या तरुण पिढीला नोंदवावासा वाटतो, याहून अधिक सुसंस्कृतपणाचं, विचारीपणाचं आणि प्रगल्भ समाजाचं दुसरं कोणतं लक्षण असू शकतं?
- मुकुंद टाकसाळे, पुणे

सर्वच लेख आवडले
१७ जानेवारीच्या ‘चतुरंग’ पुरवणीमधील सर्वच लेख सुरेख आहेत. ‘चतुरंग’चे नवीन स्वरूप आवडले. वंदना सुधीर कुळकर्णी यांचा ‘लग्न करताय?..’ हा लेख छानच आहे. हल्लीच्या तरुण-तरुणींची मानसिकता त्यामधून चांगलीच अधोरेखित होते. मला अजून काही मुद्दे मांडावेसे वाटतात. लग्नाला ३०-४० वर्षे झालेले पालकच कधी कधी घरात असे वागत असतात की, ते बघून मुलांना लग्न नको, असे वाटायला लागते. आई सांगत असते, ‘कसला आमचा संसार, घटस्फोट घेतला नाही म्हणून केवळ निभावून नेत आहे.’ काही घरात आई-वडिलांची रोज भांडणे चालू असतात. हे बघून तरुण मुला-मुलींच्या मनावर परिणाम होतो. त्यांची मन:स्थिती द्विधा होते. तसेच हल्ली घटस्फोटाचे प्रमाणही वाढले आहे. आपल्या मित्र-मैत्रिणींचे घटस्फोट होताना मुलांनी बघितले की, त्यांना वाटते ‘लग्न करून जर असेच होणार असेल तर लग्न न करणेच छान.’ लग्न ही वैयक्तिक गोष्ट नसून तिला एक सामाजिक परिमाणसुद्धा आहे. या गोष्टीचा सर्वानी विचार करावयास हवा. तरुणांना त्या दृष्टीने मार्गदर्शन करावयास हवे.
- सरिता धर्माधिकारी, कल्याण

परिपूर्ण पुरवणी
‘चतुरंग’ने नव्या वर्षांत पदार्पण करताना घेतलेले रूप आकर्षक, लोभस आहे, अधिक वाचनीय आहे, लेखही उद्बोधक वाटले. असेच लेख वर्षभर वाचकांना वाचावयास मिळावे, अशी अपेक्षा. एक परिपूर्ण पुरवणी असे म्हणणे युक्त ठरावे!
‘विज्ञानमयी’ सदरातील माहिती अधिक विस्ताराने दिल्यास शास्त्रज्ञांचे योगदान समजण्यास सुलभ होईल. कवयित्री अरुणा ढेरे यांना उत्सुकतेपोटी असा प्रश्न विचारावासा वाटतो की, विरक्तीने तुकाराम महाराजांनी मुलेबाळे सोडून भंडाऱ्याच्या डोंगरावर विठ्ठलाच्या भक्तीत आपले उत्तर आयुष्य खर्ची घातले. मात्र जिजा ‘..घरी लाडक्या माझ्या गाया, चिलीपिली माजी घरी..’ त्यांना वाऱ्यावर सोडून मी तुमच्याबरोबर एकटी येऊ? असा प्रश्न वैकुंठाला निघालेल्या तुकाराम महाराजांना विचारते. सिंधुताई सकपाळ यांच्या जीवनकहाणीत असे वाचल्याचे स्मरते की, सिंधुताई वारकरी महिलांबरोबर पंढरीच्या वारीला जात व व्याख्यानात सवाल करीत की, तुकारामांप्रमाणेच जिजा मोठी नव्हे का? ‘तुकोबाची कान्ता सांगे लोकांपाशी/ येडा माझा जातो पंढरीशी/ फुटकाच टाळ/ तुटक्याच तारा/ करी येरझारा पंढरीच्या/ माझ्या माय बाये बरे नाही केले/ पदरी बांधले भिकाऱ्याच्या/ गाथेच्या रूपाने तुकाराम महाराजांनी मानवजातीला नीती-अनीती, विरक्ती, भक्ती, नाममहिमा, आर्थिक- सामाजिक व्यवहार अशा जिव्हाळ्याच्या विषयांवर अनंत काळ टिकणारे प्रबोधन केले आहे. गाथा हा भारतीयांचा अमूल्य ठेवा. तुकाराम महाराज आणि जिजा यांची तुलना होऊ शकते का? अरुणा ढेरे यावर भाष्य करू शकतील.
वि. शं. गोखले, पनवेल