Leading International Marathi News Daily शनिवार, ७ मार्च २००९
  समतेसाठी पुरुषांचा पुढाकार
  स्त्री-पुरुष समतेचा गोफ
  स्त्रीत्वाचा सोयीस्कर अर्थ
  शाळेसह व्यापक कुटुंब
  थांब, माझ्या संसाराला...
  विज्ञानमयी
  गर्भासंबंधीचा कायदा
  'संवाद' सखी
  स्त्री-मनातले क्षितीज
  माळाकोळीतील दारूबंदी लढा!
  आगळीवेगळी क्षमा
  संसारकथा
  ताई आपटे : एक प्रेरणास्रोत
  मधुघटचि रिकामे
  कावळा
  प्रतिसाद
  हर्बिन : पूर्वेकडील मॉस्को!
  गाडी बुला रही है!

समानतेसाठी आम्ही!
स्त्री-पुरुष समानतेसाठी मी स्वत: काय करतो/ करते? लिंगविशिष्ट भूमिकांना मी चिकटून राहत नाही, लिंगभेद मानत नाही, हे आपण स्वत: कोणत्या कृतींतून व्यक्त करता? तुमचे स्वानुभव कमाल १५० शब्दांत १७ मार्चच्या आत लिहून कळवा. हे आवाहन महिला आणि पुरुष दोघांसाठीही आहे. मात्र प्रत्यक्षात अनुभव असा आहे की अशा आवाहनांना पुरुषांचा प्रतिसाद ३३ टक्के सोडाच, पण जेमतेम ३ टक्केही मिळत नाही. हे प्रमाण वाढावे, अधिकाधिक वाचकांनी स्वत:तील बदलाचे चाकोरीबाहेरचे ठोस दाखले प्रांजळपणे द्यावेत, ही अपेक्षा. घरातील मुला-मुलींना, महिलांना समानतेची वागणूक मिळावी, यासाठी तुम्ही स्वत: काय करता, हे स्पष्टपणे मांडणे अपेक्षित आहे. निवडक लेखनाला प्रसिद्धी दिली जाईल. आपले स्वानुभव कागदाच्या एकाच बाजूला सुवाच्य अक्षरात लिहून पाठवा.
पत्ता- ‘समानतेसाठी आम्ही’, चतुरंग पुरवणी, लोकसत्ता संपादकीय कार्यालय, एक्स्प्रेस टॉवर, नरिमन पॉईंट,
मुंबई ४०००२१.

  ‘लालूप्रसाद यादवांचा बुलेट ट्रेनने प्रवास’ ही बातमी वाचली आणि खूप दिवस रखडलेली माझी जपानी प्रवास लेखाची गाडी पुन्हा रुळावर आली. गेल्या दोन वर्षांत माझी जपानमध्ये बरीच भ्रमंती झाली व त्यामुळे दळणवळणाची स्थानिक साधने खूप जवळून अनुभवता आली.
जपानमध्ये लोहमार्गाचे सर्व दळणवळण प्रकार सारख्याच ताकदीने चालू असतात. जमिनीवरून चालणारे जपान रेल्वे लाईन्सचे जाळे मोठय़ा शहरांमध्ये, जमिनीखाली वसलेले सबवे किंवा मेट्रो रेल्वेचे जाळे व जपानच्या पूवरेत्तर टोकापासून नागासाकी या नैऋत्येकडील टोकापर्यंत जाणारे शिनकानसेन अर्थात बुलेट ट्रेन मार्ग सेवेला तत्पर असतात. ऑफिसच्या वेळामध्ये या सर्व मार्गावर प्रचंड गर्दी असते, परंतु या गर्दीतही शिस्त, संयम व वक्तशीरपणा ही जपानी लोकांची वैशिष्टय़े उठून दिसतात.
प्रचंड संख्येने, प्रचंड लगबगीने परंतु मुंग्यांच्या शिस्तीने लोकांची ये-जा चालू असते. सुटाबुटातील इतकी माणसे एकाच वेळी पाहायची सवय नसल्याने आपल्याला एक प्रकारचा वेगळेपणा जाणवत राहतो. माणसांची गर्दी पदोपदी मुंबईची आठवण करून
 
देते; परंतु दुसऱ्याच क्षणी आपण जपानमध्ये असल्याची जाणीव होते. कुठेही बकालपणा, घाण, थुंकलेले नाही. कुठेही लोकांची वचवच किंवा आवाज नाही. मोठय़ाने मोबाईल संभाषणे नाहीत किंवा भांडणे नाहीत. गर्दीच्या वेळी फलाटावर लोक वेगवेगळ्या रांगा लावतात व रांगेनेच गाडीत चढतात. लोक गाडीत चढल्याची खात्री झाली, की गाडीचे दरवाजे बंद होतात. फलाटावर दोन्हीकडच्या कोपऱ्यात मोठाले बहिर्गोल आरसे अशा रीतीने लावलेले असतात, की ड्रायव्हर व गार्डला पूर्ण गाडी त्यात दिसू शकते.
सबवे किंवा जमिनीखालील मेट्रोचे जाळे हे मोठय़ा शहरांमध्ये- त्यातही टोकियो व ओसाकामध्ये मोठय़ा प्रमाणावर आढळले. टोकियोमध्ये १२ मेट्रो मार्ग आहेत तर ओसाकामध्ये साधारण त्याच्या निम्म्या. शहराच्या आठही कोपऱ्यांमध्ये जा-ये करता यावी, अशी साधारणपणे त्यांची रचना. मेट्रोच्या नकाशावर या १२ मार्ग वेगवेगळ्या रंगांत दर्शवलेल्या असतात. एकदा हा नकाशा समजून घेतला आणि मेट्रो स्थानकाची अंतर्गत रचना समजून घेतली, की तुम्ही टोकियोत फिरायला तयार झालात. या दृष्टीने सबवे मार्ग हे लंडनची टय़ूब किंवा पॅरिसची मेट्रो याच्या जवळ जाणारे आहेत, पण टोकियोचा मेट्रो पसारा शहराच्या आकारामुळे व लोकसंख्येमुळे जास्त मोठा वाटतो. एकमेकांना छेद देणाऱ्या अनेक मेट्रो मार्गामुळे शिन्जुकु, उएनो, शिम्बाशी ही स्थानकं ‘जंक्शन’ म्हणून गणता येतात. ही जंक्शन्स म्हणजे मुख्य शहराच्या पृष्ठभागाखाली वसवलेली मिनी मेट्रो नगरंच असतात. शॉिपग मॉल्स, उपाहारगृहे, पुस्तकाची दुकानं, इतकंच काय, आर्ट गॅलऱ्या पण इथे आहेत. नवख्या प्रवाशाला शॉिपगचा मोह आवरता येणे कठीण. काही स्थानकांवर ही शॉिपग संकुलं म्हणजे उंच उंच इमारती आहेत. टोकियोमधील ‘ओ-इडो’ नावाची मेट्रो मार्ग ही ‘रिंग रूट’ (म्हणजे शहरात गोल फिरणारी) मार्ग आहे व या मार्गवर ही सर्व मोठी जंक्शन्स वसलेली आहेत.
जपानी मेट्रो मार्ग या मुख्यत्वे खासगी कंपन्या चालवितात, तर बुलेट ट्रेन व इतर मार्ग ैखफछ' च्या आधिपत्याखाली येतात. कमीत कमी तिकीट १६० येन असते. मेट्रोचा दिवसभराचा पास, प्रीपेड कार्ड असे विविध पर्याय असतात. तिकीट खिडक्या, आरक्षणे वगैरे सर्व गोष्टी संगणकीकृत असातात. त्यामुळे कुठेही फार मोठय़ा रांगा नसतात. फलाटावर जाण्यासाठी सर्व दरवाजे पूर्णपणे स्वयंचलित असतात. या गेटवरील स्लॉटमध्ये तिकीट टाकल्याशिवाय दरवाजा उघडत नाही. तिकीट चुकीने कमी मूल्याचे घेतले गेले असेल, तर अ‍ॅडजस्ट करून देण्यासाठीची मशिन्सही असतात. योग्य तिकिटाशिवाय आत किंवा बाहेर जाणे अशक्य.
याशिवाय टोकियो शहरात शिंबाशी जपान स्टेशनवर उतरून यारीकामोम किंवा रिन्काइ मार्ग नावाची मोनोरेल घेता येते. हिचे दोन ट्रॅक्स असल्याने ती दोन्ही दिशांना एकाच वेळी चालू असते. या गाडीमधून होणारे टोकियोचे दर्शन अप्रतिम म्हणता येईल.
ही गाडी रेनबो ब्रिजवरून जाते, तेव्हा आपल्या हावडा ब्रिजची किंवा ‘गोल्डन गेट’ पुलाची आठवण येते. रेनबो ब्रीज हा पण रेल्वे, रस्ते एकत्रित असलेला व खाली आधार नसलेला टोक्योतील सुप्रसिद्ध पूल आहे.
मात्र या ‘सर्वाहूनही निराळी’ व जपानचे वैशिष्टय़ म्हणता येईल, अशी सवारी म्हणजे ‘बुलेट ट्रेन’. जपानी माणसाच्या हृदयातील एक कोपरा या बुलेट ट्रेनसाठी असतो. जपानमध्ये सारे तिला ‘शिनकानसेन’ म्हणतात. आपल्याकडे ‘डेक्कन क्वीन’ किंवा ‘राजधानी’चे जे महत्त्व अनेक वर्षे होते, ते जपानमध्ये या ‘शिनकानसेन’चे आहे. अर्थात आपल्या कोणत्याही रेल्वे प्रकाराच्या शेकडो योजने दूर ही बुलेट ट्रेन आहे. वेग, गाडय़ांची वारंवारता, बुलेट ट्रेन मार्गाचे जाळे व त्यांचे अचूक वेळापत्रक या सर्वाची एकत्रित बरोबरी करणारी सेवा जगात इतरत्र कुठेच नाही. शिनकानसेन म्हणजे ‘नवा रेल्वे मार्ग’. शिन म्हणजे नवा/ नवी. बुलेट ट्रेनचे लोहमार्ग हे सर्व लोहमार्गापासून स्वतंत्र, नव्याने टाकलेले व थेट मार्ग असल्याने हे नाव. ही ट्रेन सेवा १९६४ मध्ये सुरू झाली. जपानच्या उत्तर-पूर्वेच्या टोकापासून दक्षिण- पश्चिमेच्या टोकापाशी नागासाकीपर्यंत हे जाळे पसरलेले आहे. काही छोटे फाटे आहेत. जसा की ओसाकाहून हिरोशिमाला पश्चिमोत्तर जाणाऱ्या बुलेट ट्रेनच्या संपूर्ण मार्गावर दोन्ही बाजूला पूर्णपणे कुंपण आहे. २८० ते ३०० किमी प्रतितास एवढय़ा वेगाने जाणाऱ्या बुलेट ट्रेनच्या मार्गात प्राणी, माणूस वगैरे येऊ नयेत, म्हणून ही खबरदारी बऱ्याच गर्दीच्या स्थानकावर, फलाटावरसुद्धा संरक्षक रेलिंग लावलेले आहे. केवळ गाडी थांबल्यावर दरवाजाच्या ठिकाणचे रेलिंग आपोआप उघडले जातात. या भक्कम सुरक्षा व्यवस्थेमुळे १९६४पासून आतापर्यंतच्या प्रवास बुलेट ट्रेनला केवळ एक किरकोळ अपघात झाला. कॉर्पोरेट भाषेत याला ‘सिक्स सिग्मा परफॉर्मन्स’ म्हणता येईल.
बुलेट ट्रेनही अत्यंत गुळगुळीत व एअरोडायनामिक (म्हणजे कुठेही धारदार कोपरे नसलेली) अशी असते. यामुळे हवेच्या घर्षणाने होणारा प्रतिरोध कमीत कमी असावा. गाडीच्या ड्रायव्हरचा डबा हा दिसायला डॉल्फिन माशाच्या तोंडासारखा असतो. गाडी पूर्णपणे शुभ्र असते. त्यावर एक किंवा दोन छोटय़ा निळ्या पट्टय़ा रंगवलेल्या असतात. गाडीच्या आत सर्व अतिशय स्वच्छ व विमानाच्या आतील भागासारखे असते. गाडी सुरू होताना व वेग घेताना एक विशिष्ट प्रकारचा सूंऽऽऽऽ असा आवाज येतो. यावेळी तिचे ‘बुलेट ट्रेन’ हे नाव सार्थ वाटते. प्रत्येकी १०० आसनांचे १३ डबे या गाडीला असतात. युरोपातील वेगवान गाडय़ा या तुलनेत छोटय़ा लांबीच्या असतात. जेव्हा दोन बुलेट ट्रेन एकमेकीला छेदल्या जातात, तेव्हा हवेच्या दोन विरुद्ध झोतांच्या क्रिये-प्रतिक्रियेमुळे प्रथम हलायला होते.
या शिनकानसेनची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची वारंवारता व सातत्य. गर्दीच्या वेळी टोकियोपासून दूर १० मिनिटाला बुलेट ट्रेन्स सुटत असतात. वेगानुसार यांचे अत्यंत चपखल नामवर्गीकरण केलेले असते. सर्वात हळू जाणारी व वाटेत बऱ्याच ठिकाणी थांबणारी (आपल्या भाषेत ‘पॅसेंजर’) म्हणजे ‘कोडामा एक्स्प्रेस’, थोडय़ा कमी स्टेशन्सवर थांबणारी ‘हाकारी एक्स्प्रेस’ व अत्यंत कमी स्थानकावर थांबणारी सुपरफास्ट ‘नोझोमी एक्स्प्रेस’. कोडामा, हाकारी व नोझोमी ही कुठल्या जपानी नेत्यांची नावे नाहीत बरं का! या नावांमध्येही जपानी लोकांची कल्पकता पाहा. कोडामा म्हणजे ‘आवाज’ (आवाजाचा वेग असतो ०.३३ किमी/सेकंद), हिकारी म्हणजे ‘प्रकाश’ (प्रकाशाचा वेग ३ लक्ष किमी/सेकंद) व नोझोमी म्हणजे विचार (ज्याचा वेग अगणित) किती समर्पक नावे आहेत! टोकियो ते ओसाका हे ६०० किमीचे अंतर (साधारण मुंबई ते गोवा) हे अंतर ‘नोझोमी एक्स्प्रेस’ साधारण अडीच ते पावणेतीन तासांत पार करते. या प्रवासात टोकियो- शिनागावा- योकोहामा- नागोया-क्योटो- ओसाका एवढेच थांबे असतात. त्यातही शिनागावा व योकोहामा हे थांबे म्हणजे टोकियोच्या उपनगरातच, प्रवाशांच्या सोयीसाठी केलेले. सकाळी टोकियोहून निघून ओसाकाची बैठक आटोपून संध्याकाळी पुन्हा टोकियोला परत असा प्रवास आरामात करता येतो.
बुलेट ट्रेनच्या या नवीन मार्गामुळे जपानी दळणवळण अतिशय वेगवान, सोयीस्कर व दिमाखदार झाले आहे. खूप वेळा विमान प्रवास नाकारून व थोडा जास्त वेळ खर्च करून मी शिनकानसेनच्या प्रवासाला पसंती दिली. आपल्या कोकण रेल्वेसारखा शिनकानसेनचा मार्गही मुख्य शहरांच्या ठिकाणापासून थोडा दूर बांधला. खर्च व मार्गाची रचना, सुरक्षितता व सरळता या घटकांचा विचार यात केला गेला. त्यामुळे जुन्या शहरांपासून दूर असलेली ही स्थानकं नव्या नावाने ओळखू जाऊ लागली. जशी आपल्याकडे नवी मुंबई, नवीन पनवेल तसे तिकडे शिन-फुजी, शिन ओसाका इ. आहेत. शिन म्हणजे नवा/नवी/नवे.
जपानी रेल्वे व विशेषत: बुलेट ट्रेनच्या या सर्वागसुंदर कारभाराची गोम नक्की कशात असावी बरं! मला व्यक्तिश: याचं एकच उत्तर देता येईल व ते म्हणजे ‘व्यवस्था’. आखून दिलेली नियमावलीआणि ती पाळणारे कर्मचारी व प्रवासी. यातील कोणीही कुठेही शॉर्टकट घेणार नाही किंवा नियम मोडण्याचा प्रयत्न करणार नाही. जपानच्या प्रगतीचे कारणही हेच आहे. उदाहरणच द्यायचे तर, गाडीत मोबाईल बंद किंवा सायलंटवर ठेवायचा व बोलायचेच असेल तर दोन डब्यांच्या मधील पॅसेजमध्ये जायचे. माझ्या अनेक ‘बुलेट ट्रेन’ वाऱ्या झाल्या, परंतु हा नियम मोडणारा एकही जपानी माणूस मला भेटला नाही.
खटकणारी एक गोष्ट म्हणजे बुलेट ट्रेनमध्य ‘सेफ्टी बेल्ट’ नाही. सुरक्षेच्या छोटय़ा छोटय़ा चिंता वाहणारी जपानी मंडळी असे कसे करू शकतात, असे मात्र वाटून जाते. बुलेट ट्रेनचे तिकीट मात्र बऱ्यापैकी महाग असते व जवळपास विमानाच्या तिकिटाच्या आसपास असते. टोकियो-ओसाका तिकीट १०,००० येन (साधारण ५००० रु.) असते. जपानमध्ये सर्वच गोष्टींची अशी किंमत मोजावीच लागते. चांगली सेवा व चांगला दर्जा व लोकांचे चांगले उत्पन्न यामुळे महागाई तिकडच्या लोकांना जाचत नाही. अर्थात प्रत्येकाला परवडेल असे प्रवासाचे पर्याय तेथे उपलब्ध असतात.
लालूंच्या बुलेट ट्रायलची बातमी वाचली व माझ्या डोळ्यांसमोर उभी राहिली भारतीय बुलेट ट्रेन. मुंबई-पुणे हायवेसारखे आपले तेही स्वप्न साकार होईल. कोडामा, हाकारी व नोझोमीच्या ऐवजी काय बरं नावे असतील आपल्या बुलेट ट्रेन्सची! मंडळी, चालवा आपापली कल्पनाशक्ती! वेळ अजून बराच आहे, अच्छा! मुझे तो ‘शिनकानसेन’ बुला रही है।
डॉ. संदीप घरत
sanmandhan@rediffmail.com