Leading International Marathi News Daily शनिवार, ७ मार्च २००९
  समतेसाठी पुरुषांचा पुढाकार
  स्त्री-पुरुष समतेचा गोफ
  स्त्रीत्वाचा सोयीस्कर अर्थ
  शाळेसह व्यापक कुटुंब
  थांब, माझ्या संसाराला...
  विज्ञानमयी
  गर्भासंबंधीचा कायदा
  'संवाद' सखी
  स्त्री-मनातले क्षितीज
  माळाकोळीतील दारूबंदी लढा!
  आगळीवेगळी क्षमा
  संसारकथा
  ताई आपटे : एक प्रेरणास्रोत
  मधुघटचि रिकामे
  कावळा
  प्रतिसाद
  हर्बिन : पूर्वेकडील मॉस्को!
  गाडी बुला रही है!

समानतेसाठी आम्ही!
स्त्री-पुरुष समानतेसाठी मी स्वत: काय करतो/ करते? लिंगविशिष्ट भूमिकांना मी चिकटून राहत नाही, लिंगभेद मानत नाही, हे आपण स्वत: कोणत्या कृतींतून व्यक्त करता? तुमचे स्वानुभव कमाल १५० शब्दांत १७ मार्चच्या आत लिहून कळवा. हे आवाहन महिला आणि पुरुष दोघांसाठीही आहे. मात्र प्रत्यक्षात अनुभव असा आहे की अशा आवाहनांना पुरुषांचा प्रतिसाद ३३ टक्के सोडाच, पण जेमतेम ३ टक्केही मिळत नाही. हे प्रमाण वाढावे, अधिकाधिक वाचकांनी स्वत:तील बदलाचे चाकोरीबाहेरचे ठोस दाखले प्रांजळपणे द्यावेत, ही अपेक्षा. घरातील मुला-मुलींना, महिलांना समानतेची वागणूक मिळावी, यासाठी तुम्ही स्वत: काय करता, हे स्पष्टपणे मांडणे अपेक्षित आहे. निवडक लेखनाला प्रसिद्धी दिली जाईल. आपले स्वानुभव कागदाच्या एकाच बाजूला सुवाच्य अक्षरात लिहून पाठवा.
पत्ता- ‘समानतेसाठी आम्ही’, चतुरंग पुरवणी, लोकसत्ता संपादकीय कार्यालय, एक्स्प्रेस टॉवर, नरिमन पॉईंट,
मुंबई ४०००२१.

  ‘पुरुषप्रधान समाजव्यवस्था’ हा शब्द आपण अनेकदा ऐकतो, वाचतो. ‘स्त्री-मुक्ती’ हा शब्दही असाच आपल्या परिचयाचा आहे. स्त्री-मुक्ती चळवळीचे नेमके म्हणणे काय आहे, हे व्यवस्थित समजून न घेता बऱ्याच वेळा त्यावर भाष्य किंवा टीका केली जाणे, हे तर आपल्या अंगवळणी पडले आहे. आठ मार्च या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आपण सर्वानीच याबाबत अधिक समजून घेणे, त्यावर चर्चा करणे उचित ठरेल. विशेषत: पुरुषांनी या विषयी अधिक संवेदनशीलपणे विचार करणे गरजेचे वाटते. कारण हा स्त्री विरुद्ध पुरुष असा लढा नसून दोघांनाही अधिक चांगला माणूस बनण्याच्या दिशेने नेणारा विचार आहे, हे आता समाजाने समजून घेणे आवश्यक आहे.
भारतात (आणि जगभरातही) ‘पुरुषप्रधान समाजव्यवस्था’ असल्याने पुरुष हे स्त्रियांपेक्षा ‘महत्त्वाचे’, ‘श्रेष्ठ’ मानले जातात. खरे पाहता या ‘मानण्याला’ काहीही आधार नाही. स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये निसर्गाने केवळ पुढची पिढी जन्माला यावी म्हणूनच केलेल्या जननेंद्रियांमधील भेदांचा आधार घेऊन समाजाने, स्त्री-पुरुषांनी कुटुंबात, समाजात कसे वागावे, असावे आणि कसे वागू, असू नये, याबाबत तयार केलेले नियम म्हणजे सामाजिक लिंग. यालाच ‘लिंगभाव’ असाही शब्द वापरला जातो.
या ‘लिंगभावा’नुसारच आपण सर्वजण आपापल्या ‘भूमिका’ पार पाडत असतो. स्त्री-पुरुषांची वेशभूषा, केशभूषा, हावभाव, वागणे, चालणे, बसणे, बोलणे, भावना व्यक्त करणे, खेळणे, इतकेच काय झोपणेही या ठरवून दिलेल्या भूमिकानुसारच होत
 
असते. याचे तोटे स्त्रियांना फार मोठय़ा प्रमाणात सहन करावे लागतात.
अनेक घरांमध्ये पुरुषांनी आधी जेवायचे आणि स्त्रियांनी त्यानंतर अशी पद्धत असल्याने पुरुषांना ताजे, गरम, हवे तितके व अगदी भुकेच्या वेळेला अन्न मिळते. त्यामुळे पोषणाची संधी मुली-स्त्रियांच्या तुलनेत मुला-पुरुषांना अधिक मिळते आणि मुली-स्त्रिया कुपोषित, अ‍ॅनिमिक राहतात. जिथे कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र जेवतात तिथेही स्त्रियांना, पुरुषांना व्यवस्थित अन्न मिळेल याची काळजी घ्यावीच लागते.
‘स्त्रियांचे केस लांबसडक असावेत’, अशी समजूत, विशेषत: ग्रामीण भागात आणि शहरातही काही वर्गात अजूनही आढळते. तिला काय सोयीचे होईल, तिची आवड, मत याचा विचार सहसा केला जात नाही. लांबसडक केस झुडुपांमध्ये अडकल्याने त्सुनामी लाटांच्या वेळी पुरुषांपेक्षा स्त्रिया अधिक प्रमाणात मरण पावल्या हे सत्य लक्षात घेतले म्हणजे ही केशभूषा (आणि त्याबरोबरीने साडी ही झाडावर चढायला सोयीची नसलेली वेशभूषाही) त्यांना कशी घातक ठरली, हे लक्षात येईल. अर्थात तरीही केशभूषा ही ज्याच्या त्याच्या पसंतीनुसार असावी, विशिष्ट अट्टहास नसावा.
‘स्त्रिया निसर्गत:च सहनशील असतात’, ‘स्वभावाने कोमल असतात’ या समजुती तर आपल्या रक्तात इतक्या भिनलेल्या आहेत, की त्या नैसर्गिक नसून सामाजिक आहेत, हे वास्तव स्वीकारायचीच अनेकांची तयारी नसते. स्त्रिया-मुलींना उठता-बसता त्यांनी कसे वागावे आणि वागू नये याची शिकवण दिली जाते. जर त्या निसर्गत:च सहनशील असत्या तर अशी शिकवण देण्याची गरजच पडली नसती! कारण नैसर्गिक गोष्टी आपोआपच होतात, त्या शिकवाव्या लागत नाहीत!! उदा. स्त्रियांना मासिक पाळी येणे, वयात आल्यावर मुलांचा आवाज बदलणे या नैसर्गिक गोष्टी न शिकवताच आपोआप होतच असतात. म्हणूनच ‘स्त्रियांची सहनशीलता’ ही नैसर्गिक नसून सामाजिक आहे, हे जाणीवपूर्वक लक्षात घेतले पाहिजे.
या ‘लिंगभाव भूमिका’ ही पुरुषप्रधान व्यवस्था चालू राहावी यासाठी निर्माण केल्या गेल्या. याचा परिणाम म्हणून स्त्रियांनी आर्थिकदृष्टय़ा कायम पुरुषांवर अवलंबून राहणे, विविध शारीरिक व मानसिक आजारांना बळी पडणे, घरात हिंसाचाराची शक्यता वाढणे, आत्मविश्वासाचा अभाव असणे, स्वत:ला माणूस म्हणून कमी लेखणे असे घडताना दिसते. पर्यायाने ‘माणूस म्हणून सन्मानाने वागणे’ या आपल्या देशाच्या राज्यघटनेने दिलेल्या हक्कापासून असंख्य स्त्रिया कितीतरी दूर असल्याचे आजही दिसून येते.
स्त्री-चळवळीमुळे निर्माण झालेला अवकाश, स्त्री-शिक्षणाचे हळूहळू वाढणारे प्रमाण, औद्योगिकीकरण यासारख्या कारणांमुळे स्त्रियांच्या या भूमिकांमध्ये बदल होताना दिसत असले तरीही या ना त्या रूपात पुरुषप्रधानता अस्तित्वात आहेच, असेही लक्षात येते. उदा. अजूनही बहुतेक मालमत्ता पुरुषांच्याच नावावर असणे, स्त्रियांना जोडीदार निवडीचे संपूर्ण स्वातंत्र्य नसणे, घरातील स्वयंपाक, मूल सांभाळणे व इतर कामे मुख्यत: स्त्रियांचीच आहेत असे समजणे, वगैरे. वय, जात, धर्म, शिक्षण, वैवाहिक स्थिती, आर्थिक स्थिती वगैरेंनुसार पुरुषप्रधानतेच्या स्वरूपात फरक पडतो, तरी बहुतांश स्त्रियांना आजही भेदभावाला तोंड द्यावे लागते.
पुरुषप्रधान व्यवस्थेत स्त्रियांवर बंधने असतात तशीच काही प्रमाणात ती पुरुषांवरही असतात. उदा. पुरुषांनी मोकळेपणाने आपल्या भावना व्यक्त करणे, रडणे हे कमीपणाचे मानले जाते. दु:खाचे योग्य रीतीने विरेचन न झाल्यामुळे पुरुषांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतात. पुरुषाने कायम ‘कमावता’, ‘कुटुंबप्रमुख’ असलेच पाहिजे ही अपेक्षा असल्याने काही वेळा आवडीचे शिक्षण न घेता भरपूर पैसे मिळवून देणारी नोकरी मिळेल अशा प्रकारचे शिक्षण घ्यावे लागते. कुटुंबात प्रेम करणारी आई आणि शिस्त (अर्थात कडकच!) लावणारे वडील अशी सरसकट विभागणी पुरुषप्रधान व्यवस्थेने केलेली असल्याने पुरुषांनी वात्सल्याची भावना मोकळेपणाने व्यक्त करण्यावरही बंधने येतात. अनेकदा पत्नीबरोबर प्रेमळपणाने वागावे असे वाटत असूनही आपल्याला ‘बाईलबुद्धय़ा’, ‘बायल्या’, ‘बायकोचा बैल’ वगैरे विशेषणे लावली जातील या धास्तीमुळे पुरुषांनी असे वागण्यावर कुटुंबातील ज्येष्ठांचे नियंत्रण असलेले दिसते. एखाद्या पुरुषाचे वागणे, बोलणे ‘आक्रमक’, ‘मर्दानी’ वगैरे टिपिकल ‘पुरुषी’ नसेल तर त्याला हिणवले जाते. स्त्रियांना जसे ‘स्त्रीत्वा’चे बेअरिंग घेऊन वावरावे लागते तसेच पुरुषांनाही ‘पुरुषत्वा’चे बेअरिंग कायम टिकवावे लागते.
गेल्या शंभर- दीडशे वर्षांत स्त्रियांना माणूस म्हणून सन्मानाने जगण्याचा अवकाश हळूहळू वाढताना दिसत असला तरीही हुंडय़ाची प्रथा, कौटुंबिक हिंसा, बालविवाह, एकटय़ा स्त्रियांचे प्रश्न वगैरे समस्यांची तीव्रता अजूनही कायम असल्याचे दिसते. आधुनिक तंत्रज्ञानात जुनी विषमता मिसळून निर्माण झालेल्या स्त्रीलिंगी गर्भपाताच्या प्रश्नाने उग्र रूप धारण केले आहे.
या स्थितीतही काही सुजाण पुरुष समानतेच्या दृष्टीने पावले उचलताना दिसत आहेत. स्त्री-पुरुष समतेचा पुरस्कार करणाऱ्या पुरुषांनी ‘उजळ माथ्याने’ तसे सांगणे आणि स्त्री-मुक्तीचा लढा हा अंतिमत: मानव-मुक्तीचाच लढा आहे, असे म्हणत त्यात सहभागी होणे आवश्यक आहे.
हे कसे करता येईल?
पती, पिता, पुत्र, मित्र, भाऊ अशा अनेक भूमिकांमधून पुरुष वावरत असताना पुढील गोष्टी करू शकतील-
सर्वप्रथम आपण एक माणूस आहोत हे लक्षात घेऊन मोकळेपणाने आपल्या भावना व्यक्त करणे. रडावेसे वाटल्यास रडणे! ‘पुरुषत्वा’च्या ओझ्याखाली न दबण्याचा निश्चय करणे. मुलगा रडत असल्यास ‘काय मुलीसारखा रडतोस’, अशी वाक्ये टाळता येतील.
आपल्या पत्नीला, मैत्रिणीला ‘नाही’ म्हणण्याचा हक्क आहे हे मान्य करावे.
घरातील महिला पुरुषांसर्वजण एकत्र जेवतील व अन्नाचे वाटप समतेवर आधारित होईल, हे पाहता येईल.
मुलीला, सुनेला आवडीचे शिक्षण घेण्याची, करिअर करण्याची संधी मिळण्यासाठी प्रयत्न करता येतील.
मुलींच्या व स्त्रियांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता त्यांना वेळीच आवश्यक ते औषधोपचार व सकस आहार मिळेल, याची काळजी घेता येईल.
घरातील सर्व कामांमध्ये आपला वाटा उचलता येईल. मुली व स्त्रियांना घरामध्ये पुरेशी विश्रांती व मनोरंजनास वेळ मिळतो आहे का, हे बघता येईल.
घरातील निर्णयप्रक्रियेत मुली व स्त्रियांचा सहभाग असेल, याची खात्री करता येईल.
मुलींनीही मैदानी खेळ खेळावेत तसेच सायकल, मोटारसायकल यासारखी वाहने चालवायला शिकावीत, यासाठी प्रोत्साहन देता येईल.
आपल्या परिसरात कुठेही बालविवाह होणार नाहीत, हुंडा दिला- घेतला नाही, याची काळजी घेता येईल. स्वत:चा जोडीदार स्वत:च निवडण्याची संधी मुलींना आणि मुलांनाही द्यावी.
स्त्रिया- मुलींवर हिंसा होत असेल तर ती थांबवण्याचा प्रयत्न करता येईल. सासरी न नांदण्याचा निर्णय घेतलेल्या स्त्रियांना माहेरी आधार देता येईल.
घर, जमीन, शेती यांवर पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांचाही हक्क मान्य करून घरावर, शेतीवर पती- पत्नी या दोघांचेही नाव लावून मालमत्ता, संपत्तीची वाटणी करावी, तसेच आपल्या बहिणीचा हिस्सा तिला मिळेल याची खात्री करता येईल.
मुली- स्त्रियांनाही मोकळेपणाने बाहेर फिरता येण्यासाठी सुरक्षित वातावरण राहील याची खबरदारी घेता येईल. शाळेत, महाविद्यालयात, सार्वजनिक जागी मुलींची छेडछाड थांबवण्याचा निश्चय करता येईल. स्त्रिया व मुलींना कमी लेखले जाईल, असे विनोद, शब्द, शिव्या वापरले न जाण्याची खबरदारी घेता येईल.
मिलिंद चव्हाण
milindc70@rediffmail.com