Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
व्यापार-उद्योग

थायलंडला यंदाच्या पर्यटन हंगामात १८ अब्ज डॉलरचा महसूल अपेक्षित
व्यापार प्रतिनिधी: साऱ्या जगाला कवेत घेणाऱ्या आर्थिक मंदीच्या तावडीत अद्याप तरी पर्यटन उद्योग सापडला नसला, हे जगभर महत्त्वाच्या पर्यटनस्थळांवर लोटणारे पर्यटकांचे लोंढे पाहता दिसून येते. दक्षिण-पूर्व आशियातील थायलंडही दुष्परिणांमापासून वंचित असून, यंदा सुरू होत असलेला पर्यटन हंगाम हा आधीच्या वर्षांपेक्षा अधिक उत्तमपणे साजरा होईल, अशी अपेक्षा केली जात आहे. किंबहुना थाई सरकारने यंदाचे वर्ष हे ‘व्हिजिट थायलंड वर्ष’ जाहीर करून आक्रमक प्रचार मोहिम आखली आहे. यंदाच्या पर्यटन हंगामात विदेशी पर्यटकांची संख्या वाढून १६० लाखांवर जाईल आणि एकंदर महसूल १८ अब्ज अमेरिकन डॉलरचा पल्ला पार करेल, असे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.

भारतीय शीतसाठा खाद्यपदार्थ रिटेल क्षेत्रात ‘अलायन्स फूड्स’ कंपनीचे पदार्पण
व्यापार प्रतिनिधी: जलचर संवर्धन (अ‍ॅक्वाकल्चर) क्षेत्रातील आघाडीच्या ‘अलायन्स फूड्स प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीने आता भारतीय शीतसाठा खाद्यपदार्थ (इंडियन फ्रोझन फूड्स) रिटेल क्षेत्रात पदार्पण केले असून गोठवलेल्या कॅम्बे टायगर प्रॉन्सचा ‘फ्रिश’ हा पहिला ब्रँड सादर केला आहे. ‘अलायन्स फूड्स’ हीा सागरी खाद्य क्षेत्रातील एक प्रमुख कंपनी असणाऱ्या मुंबईस्थित ‘अ‍ॅक्वाअलायन्स’चा स्थानिक शीतसाठा खाद्यपदार्थ व्यवसाय विभाग आहे. पुण्यात हे उत्पादन भांडारकर रोडवरील फ्रोजन या दालनात उपलब्ध आहे.

‘सीआयआय-महाराष्ट्र’च्या अध्यक्षपदी प्रमोद चौधरी यांची निवड
व्यापार प्रतिनिधी: ‘प्राज इंडस्ट्रीज’चे अध्यक्ष प्रमोद चौधरी यांची ‘कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज’च्या (सीआयआय) महाराष्ट्र राज्य परिषदेच्या अध्यक्षपदी वर्ष २००९-१० साठी निवड झाली आहे. प्रमोद चौधरी यांनी १९७१ मध्ये आयआयटी मुंबई येथून यंत्र अभियंता (मेकॅनिकल इंजिनिअर) म्हणून पदवी घेतली. त्यांनी १९८४ मध्ये ‘प्राज इंडस्ट्रीज’ची स्थापना केली. ही कंपनी इथेनॉल व बायोडिझेलवर भर देत हरित इंधन निर्मितीसाठीचे तंत्रज्ञान व प्रकल्प उभारून देते. ‘प्राज’चे संस्थापक या नात्याने चौधरी यांनी नेहमीच आव्हानात्मक संधीचा शोध घेतला आहे. ते हार्वर्ड बिझनेस स्कूलचे माजी विद्यार्थी असून, तंत्रज्ञान अभिनवतेबाबत नेहमीच आकांक्षा बाळगली आहे. हवामानातील बदलांचे दुष्परिणाम नाहिसे करण्यासाठी पर्यावरण सुरक्षित ऊर्जा (ग्रीन एनर्जी) व तंत्रज्ञानाचा पाठुपरावा केल्यास त्यातून केवळ व्यवसायांनाच नव्हे, तर एकूणच पर्यावरणाला शाश्वतता प्राप्त होईल. या दृढ विश्वासाने चौधरी कार्यरत आहेत. केंद्रीय नियोजन आयोगाच्या जैवइंधने विकास समितीचे सदस्य या नात्याने त्यांनी राष्ट्रीय जैवइंधने धोरण आखण्यात व त्यालारे भारतात पुनर्वापरक्षम इंधने सादर करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

व्यापार संक्षिप्त
वेस्टर्न युनियनच्या दक्षिण आशिया क्षेत्राची सूत्रे अनिल कपूर यांच्याकडे
व्यापार प्रतिनिधी: रोख हस्तांतरण क्षेत्रात जागतिक पातळीवर अग्रगण्य असलेल्या द वेस्टर्न युनियन कंपनीने आपल्या दक्षिण आशिया व आग्नेय आशिया विभागाचे एकात्मिकरण करून त्याच्या प्रमुखपदी अनिल कपूर यांची नियुक्ती केली आहे. अनिल कपूर यांना मुंबईतील नव्या एकात्मिक

विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्षपद देण्यात आले आहे.
कंपनीच्या प्रादेशिक सेवा वाढवून ग्राहकसंख्या वृद्धिंगत करणे तसेच विकासाला अधिक चालना देण्यासाठी या दोन विभागाचे एकात्मीकरण करण्यात आले आहे. नव्या विभागाला दक्षिण व आग्नेय आशिया विभाग या नावाने ओळखले जाईल आणि त्यात भारत, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, भूतान, मालदीव, सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया व ब्रुनेई या देशांचा समावेश आहे. ‘आमचे ग्राहक व बाजारपेठ यांना त्वरित प्रतिसाद देता येण्याजोगी सर्वोत्तम विभागरचना असावी यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील होतो,’ असे उद्गार वेस्टर्न युनियन फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे युरोप, आखाती देश, आफ्रिका आणि आशिया प्रशांत विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष हिकमेट एस्सेक यांनी काढले.

व्होडाफोनवरून ६० पैशात लोकल कॉल

व्यापार प्रतिनिधी: सेल्युलर फोन सेवा क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या व्होडाफोन एस्सार ने आज आपल्या प्री पेड ग्राहकांसाठी ‘बोनस कार्ड ३९’ ही खास सेवा सादर केली आहे. या सेवेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना महाराष्ट्र आणि गोव्यात कुठेही तसेच दिवसातील कोणत्याही वेळी फक्त ६० पैसे प्रति मिनिट या दराने लोकल कॉल करता येतील. या कार्डाची किंमत ३९ रुपये आहे. महाराष्ट्र आणि गोव्यात कुठेही वापरता येणाऱ्या या कार्डाची वैधता ३० दिवसांची आहे.

‘आरकॉम’चा फ्लाय टेक्स्टबरोबर करार
व्यापार प्रतिनिधी: रिलायन्स कम्युनिकेशन्सने आपल्या ग्राहकांसाठी निऑन ही मार्केटिंग साठीची सॉफ्टवेअर प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. या प्रणालीचा वापर करून आता व्यापारी संस्था आपल्या उत्पादनांची अथवा सेवांची प्रसिद्धी आणि मार्केटिंग मोबाईल फोनवरून करून एकाच वेळी हजारो ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतील. ही सेवा देण्यासाठी रिलायन्स टेलिकॉम्स आणि नेदरलॅन्डची फ्लाय टेक्स्ट यांच्यात करार झाला असून त्यानुसार मोबाईल मार्केटिंगच्या क्षेत्रातील फ्लाय टेक्स्ट च्या जागतिक पातळीवरील दीर्घ अनुभवाचा फायदा रिलायन्सच्या ग्राहकांना घेता येणार आहे. मोबाईल तंत्रज्ञानाचा वापर करत लक्षावधी ग्राहकांशी संपर्क साधून संबंधांचे व्यवस्थापन करण्याची क्षमता फ्लायटेक्स्टच्या निऑन मध्ये आहे. या कराराची घोषणा करताना रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या मार्केटिंग आणि मूल्यवर्धित सेवा व्यवसायाचे प्रमुख कृष्ण दुर्भा म्हणाले, ‘या नव्या सेवेचा वापर करणाऱ्या व्यवसायांना आपल्या उत्पादनाची माहिती अतिशय कमी खर्चात लक्षावधी ग्राहकांपर्यंत नेऊन विक्रीत लक्षणीय वाढ करणे शक्य होणार असल्यामुळे, ही सेवा रिलायन्स कम्युनिकेशन्सला मोठी स्पर्धात्मक शक्ती देईल. रिलायन्स कम्युनिकेशन्सने मोबाईल मार्केटिंग आणि जाहिरात या व्यवसायाचा भारतात पाया घातला. या तंत्रज्ञानाचा वापर करून स्वत:च्या सेवांची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवत असतानाच इतर कंपन्यांनाही आपल्या उत्पादनांची/सेवांची प्रसिद्धी करण्याची सुविधा रिलायन्स कम्युनिकेशन्सने उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा एफएमसीजी, वित्तीय सेवा, वाहन उद्योग अशा विविध क्षेत्रांतील ५० पेक्षा अधिक कंपन्यांनी लाभ घेतला आहे.

‘आयडिया’चीही ‘ब्लॅकबेरी’ सेवा
व्यापार प्रतिनिधी: भारतात जीएसएम मोबाईल सेवा पुरविण्यात आघाडीवर असलेल्या आयडिया सेल्युलर कंपनी आणि रिसर्च इन मोशन (रिम) यांनी आजपासून भारतात ब्लॅकबेरी सेवा सुरू करीत असल्याची घोषणा केली. आयडिया ब्लॅकबेरी स्मार्टफोन व सेवांची विस्तृत मालिका देशातील वैयक्तिक ग्राहक व कंपन्यास पुरविणार आहे. ब्लॅकबेरी सोल्युशन अंतर्गत ग्राहकांना सहज बिनतारी ई-मेल, फोन, कॅलेंडर, वेब आणि मल्टीमीडिया अ‍ॅप्लीकेशन्स पुरवली जातात. तसेच ग्राहकांना ब्लॅकबेरीच्या माध्यमातून अन्य हजारो मोबाईल व्यवसाय व अ‍ॅप्लीकेशन्स उपलब्ध होतात. आयडिया सेल्यूलर जाळे असलेल्या १५ सर्कलमधील आयडिया स्टोअर्स, प्रमुख आधुनिक दुकाने, मल्टीब्रँड स्टोअर्समध्ये ब्लॅकबेरी स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. ग्राहकांना ब्लॅकबेरीच्या अनेक मॉडेलमधून आवडीचे मॉडेल निवडण्याचे स्वातंत्र्य आता उपभोगता येणार आहे.