Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

केट विन्स्लेटचा आठवडा
‘द रीडर’ आणि ‘द रेव्होल्युशनरी रोड’

ऑस्कर पुरस्कार विजेत्या केट विन्स्लेटचे दोन चित्रपट या आठवडय़ात प्रदर्शित झाले आहेत.

 

पहिला ज्या चित्रपटातल्या भूमिकेसाठी तिला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे, तो ‘द रीडर’ आणि दुसरा ‘द रेव्होल्युशनरी रोड’.
या दोन्ही चित्रपटांतल्या तिच्या भूमिका एकमेकींहून अगदी वेगळ्या आणि त्यामुळे तिच्या अभिनय कौशल्याची वेगळी परिमाणे, त्यातलं वैविध्य जणू अधोरेखित करणाऱ्या अशा आहेत.
‘द रीडर’ - १९४४, १९५८, १९६६, १९८० आणि १९९५ असे काळाचे टप्पे मांडणारी (ते मांडणीत अर्थात याच क्रमानं येत नाहीत) कथा गहिरं नाटय़ घेऊन येते. नाटय़ आहे घटनांत आणि व्यक्तिरेखांतही. आणि ही कथा आहे मायकेल बर्ग आणि हॅना श्मिट्झ या दोन व्यक्तिरेखांच्या संबंधाची. टीनएजर मायकेल बर्ग आणि त्याच्याहून दुप्पट वयाच्या हॅन्नामधल्या प्रेमसंबंधाची - शारीर आकर्षणाची - आणि काळाच्या पुढच्या टप्प्यात शरीरापलीकडे जाऊन उरलेल्या भावसंबंधाची - त्यावर व्यक्तिमत्त्वातल्याच रहस्यमय गंडाची (कॉम्प्लेक्सची) दाट छाया आहे.
१९९५ साल - मध्यमवयीन वकील मायकेल बर्गची सकाळ. रात्रभराचीच सोबत करून त्याच्या फ्लॅटवरून निघालेल्या स्त्रीला निरोप देतो. दोघांच्या संवादात कुठे उत्कट संबंधाचं दर्शन नाही. आहे ते कोरडं काहीसं तुटकच वातावरण. त्यातून त्यांचं (नसलेलं) नातं कळावं. तिला निरोप देताना त्या दिवशी आपण पॅरिसहून आलेल्या आपल्या मुलीला भेटणार असल्याची माहिती मायकेल देतो. ती माहिती कथेच्या बांधणीच्या दृष्टीनं महत्त्वाची. तसंच या एकटय़ा राहणाऱ्या मायकेलच्या व्यक्तिरेखेचंही सूतोवाच या प्रसंगातून होतंय.
ती जाते, तेव्हा सहजपणे खिडकीतून बाहेर पाहणाऱ्या मायकेलला रस्त्यावरून जाणारी बस, बसच्या खिडकीतली माणसं- खिडकीतला कुणी तरुण दिसतो..
बसची जागा आता ट्रॅम घेते. ट्रॅममधला मुलगा. ट्रॅम थांबते, पुढे जाते तेव्हा पलीकडे दिसतो तो १९५८ सालातला परिसर. त्या शाळकरी, १५ वर्षांच्या मुलाला बरं वाटत नाहीय, म्हणून तो मध्येच उतरलाय. अखेर एका इमारतीच्या प्रवेशद्वारापाशीच त्याला उलटी होते. परिसर निम्नमध्यमवर्गीयांचा, कामकऱ्यांचा जुनाट असा. इमारतीत राहणारी कुणी पस्तीस एक वर्षांची बाई त्या आजारी मुलाला आधार देते, त्याचं तोंड पुसते. पाणी ओतून तिथली जागा साफ करते आणि मुलाला त्याच्या परिसरापर्यंत पोहोचवते. मायकेल बर्गच्या भूतकाळातला हा एक दिवस. त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्यावर, त्याच्या व्यक्तिमत्त्वावर, त्याच्या कामजीवनावर कायमचा प्रभाव टाकणारा ठरतो.
कथा अशी सहजपणे फ्लॅशबॅकमध्ये शिरते. १९९५ मधल्या आजच्याच दिवशी मायकेलला तो १९५८ मधला दिवस का आठवावा? त्याला उत्तर आहे - पुढे!
आजारातून उठल्यावर १५ वर्षांचा मायकेल या बस कंडक्टरची नोकरी करणाऱ्या बाईचे आभार मानायला जाते. मायकेलच्या सुखवस्तू घरातलं वातावरण आणि या बाईचं निम्नमध्यमवर्गीय एकाकी जीवन यातली तफावत सहजपणे समोर येते. बाई तटस्थपणेच मायकेलनं मानलेल्या आभारांचा स्वीकार करते. ती कामावर जायला निघालीय. थांब, बरोबरच निघू म्हणून त्याला घराबाहेर थांबवते आणि तयार होऊ लागते. १५ वर्षांचा मायकेल कैशोर्यसुलभ कुतूहलानं डोकावतो आणि एक नवंच पर्व सुरू होतं. बाई मायकेलच्या कुतूहलाला प्रतिसाद देते..
मायकेल अनिवार आकर्षणानं शाळा सुटताच समवयस्क मुला-मुलींमध्ये न रमता थेट बाईचं घर गाठू लागतो. याच दरम्यान केव्हा तरी तो तिला तिचं नाव सांगायला लावतो - हॅना. पुस्तकं वाचून दाखवलेली तिला आवडतात हे लक्षात आल्यावर तो उत्तमोत्तम साहित्यकृती आणून तिला वाचून दाखवू लागतो. कधी होमरचं ‘ओडिसी’, कधी चेखॉवचं ‘लेडी विथ द डॉग’. हॅनाबरोबरचा आपला हा संबंध अर्थातच मायकेल गुप्त राखतो. एकलकोंडा, अंतर्मुख होत जातो. आपला स्टॅम्प्सचा अल्बम विकून तो तिला पिकनिकलाही घेऊन जातो. तिथल्या टपरीवर तिच्यापुढे मेनू ठेवतो, तेव्हाही ‘तुला आवडेल ते मला आवडेल’ म्हणून ती मायकेलवरच काय ऑर्डर करायचं ते सोपवते, हॅनाबरोबर मायकेलचा असा गुप्त, निषिद्ध संबंध बहरत असतानाच हॅनाचा वरिष्ठ तिला प्रमोशन मिळाल्याचं सांगतो. मात्र दुसऱ्याच दिवशी हॅना गायब होते!
हॅना कुठे गेली, का गेली हे प्रश्न सतावत राहतात, अस्वस्थ करत राहतात.
हॅना जशी त्याच्या आयुष्यात अचानक येते तशी अचानक निघून जाते. पण मनात, व्यक्तिमत्त्वात एक कायमचं काहूर राखून. कारण त्याचं कामजीवनच या रहस्यमय हॅनापासून सुरू झालेलं असतं- समाजमान्य नसणाऱ्या, किशोरवयीन मुलामध्ये अपराध भावना पेरणाऱ्या प्रेमसंबंधापासून!
१९६६. मायकेल आता लॉ स्कूलमध्ये शिकतोय. दुसऱ्या महायुद्धात छळछावण्यांमध्ये ज्यूंचं हत्याकांड करण्यात सहभागी झालेल्यांवर भरण्यात आलेल्या खटल्यांचा अभ्यास म्हणून त्यांचे वयोवृद्ध प्राध्यापक विद्यार्थ्यांना न्यायालयात घेऊन जातात. तिथे खटल्यातली एक आरोपी म्हणून दिसते ती हॅना श्मिट्झ! ऑश्र्िवट्झच्या छळछावणीत ज्यू स्त्रियांना वेचून वेचून मृत्यूच्या हवाली करणाऱ्या, छावणीला आग लागल्यानंतर त्यांना बाहेर पडू न देणाऱ्या पहारेकरी स्त्रियांपैकी एक! हॅना आपल्या जबाबात, ‘नियम म्हणजे नियम, मी पहारेकरी होते आणि स्त्रियांना बाहेर जाऊ दिलं असतं तर गोंधळ माजला असता’ असं अगदी आत्मविश्वासपूर्वक, कोणत्याही अपराध भावनेविना प्रतिपादन करते. इतर आरोपी स्त्रिया जेव्हा नेतृत्व केल्याची, रिपोर्ट लिहिल्याची जबाबदारी हॅनावर टाकतात, तेव्हा हॅना ‘मी अनेकींपैकी एक होते, मी रिपोर्ट लिहिला नाही’ म्हणून परोपरीनं सांगू पाहते. हस्तलिखित रिपोर्ट न्यायालयापुढे असतो. हॅनाचं हस्ताक्षर तपासून पाहण्यासाठी तिच्यापुढे पॅड आणि पेन ठेवलं जातं, तेव्हा मात्र ती ‘याची गरज नाही’ म्हणत गुन्हा कबूल करते! या हॅना श्मिट्झला कैदी स्त्रियांकडून पुस्तकं वाचून घेण्याचा छंद असल्याची माहितीही उजेडात येते.
मायकेलला हॅनाचं एक रहस्य एव्हाना उलगडलेलं आहे. ती ते अक्षरश: प्राणांची पर्वा न करताही जपते आहे, हेही त्याला कळलेलं आहे. ‘आपल्यापाशी अशी काही माहिती आहे जी आरोपीला शिक्षेपासून वाचवू शकते,’ असं तो प्राध्यापकांना सांगतोही; परंतु हॅना जे रहस्य जपते आहे ते सांगून टाकणं हेही त्याचं त्याला पटत नाही. हॅनाला तुरुंगात भेटायला गेलेला तोही आपल्या अपराध भावनेपायी तिला न भेटताच परततो.
१९८०. मायकेल बर्गला एक लहान मुलगी आहे. विवाह मात्र असफल झालेला आहे. कुटुंबापासून तुटलेला, अलिप्त अशा मायकेलला जुना पुस्तकांचा संग्रह हाती लागतो आणि मायकेल ही पुस्तकं टेप करून हॅनाला पाठवू लागतो. त्या कॅसेट्स, तुरुंगातल्या लायब्ररीतली पुस्तकं यांच्या आधारानं पुढचा काळ हॅना स्वत:च लिहा-वाचायला शिकते. वेडय़ावाकडय़ा अक्षरांत त्याला एक-दोन ओळींची पत्रंही लिहिते. मायकेल आपल्या आयुष्यातलं हे रहस्य ‘गार्ड’ करत, ना तिला भेटतो, ना तिला पत्र पाठवतो.
१९९५. हॅनाच्या सुटकेआधीच्या आठवडय़ात मात्र तुरुंगाधिक्षीकेच्या सूचनेनुसार तिला भेटतो, सुटकेनंतर तिच्या उपजीविकेची सोय करून ठेवतो. पण ही भेट तुटक, वरून तटस्थशीच त्याच्या बाजूनं राहते.
सुटकेपूर्वीच हॅना आत्महत्या करते. छळछावणीतून वाचलेल्या मुलीला आपले जमलेले पैसे मायकेलनं नेऊन द्यावे म्हणून मृत्युपत्र करून जाते.
आता न्यूयॉर्कमध्ये असलेल्या या ‘मुली’ला हॅनाचा पैशांचा डबा सोपवताना मायकेल प्रथमच आपल्या संबंधाची कबुली देतो. संपूर्ण आयुष्यभर छाया करून राहिलेल्या रहस्याची कबुली.
..आणि मग आपल्या तरुण लेकीला तो हॅनाच्या आणि आपल्या संबंधाची हकीकत सांगू लागतो.
ही कथा आहे मायकेल-हॅना यांच्यातील संबंधाच्या आयुष्यावर पसरलेल्या छायेची; अपराधबोधाची गाठ आत जपत तिच्यापायी भोगलेल्या आयुष्यव्यापी शिक्षेची. मायकेलनं भोगलेल्या आणि हॅनानंही - आपलं निरक्षरपणाचं रहस्य जपत भोगलेल्या शिक्षेची. १५ वर्षांच्या मुलाच्या आणि पस्तिशीच्या स्त्रीच्या संबंधाचं आघाती होऊ शकणारं नाटय़ असूनही दिग्दर्शक स्टीफन डालड्राय ते तसं आघाती होऊ देत नाही. तर संपूर्ण चित्रपटाच्या प्रवासाला खळखळाट नसलेल्या प्रवाहाची लय ठेवण्यात आलेली आहे. या खळखळाट टाळण्यात रहस्य जपण्याचा भाव आहे. त्या भावनेचं, मनातल्या कॉम्प्लेक्सचा दृश्यात्मक अनुवाद म्हणजे ‘द रीडर’ हा चित्रपट. काळाचे विविध टप्पे दाखवताना त्यानं साधी सरळ निवेदनशैली वापरली आहे. हॅनाचा भूतकाळ हा तिच्याही कॉम्प्लेक्सला कारणीभूत झालेला आहे. अशा कॉम्प्लेक्स व्यक्तिमत्त्वाचा वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरचा प्रवास साकार करणाऱ्या केट विन्स्लेटला ऑस्कर पुरस्काराच्या रूपानं पावती मिळाली आहे. १५ ते २३ वर्षांच्या मायकेल बर्गच्या रूपात डेव्हिड क्रॉसनेही अतिशय प्रभावी अभिनय केला आहे.