Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९

ऑस्कर पुरस्कार विजेत्या केट विन्स्लेटचे दोन चित्रपट या आठवडय़ात प्रदर्शित झाले आहेत. पहिला ज्या चित्रपटातल्या भूमिकेसाठी तिला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे, तो ‘द रीडर’ आणि दुसरा ‘द रेव्होल्युशनरी रोड’. या दोन्ही चित्रपटांतल्या तिच्या भूमिका एकमेकींहून अगदी वेगळ्या आणि त्यामुळे तिच्या अभिनय कौशल्याची वेगळी परिमाणे, त्यातलं वैविध्य जणू अधोरेखित करणाऱ्या अशा आहेत. ‘द रीडर’ - १९४४, १९५८, १९६६, १९८० आणि १९९५ असे काळाचे टप्पे मांडणारी (ते मांडणीत अर्थात याच क्रमानं येत नाहीत) कथा गहिरं नाटय़ घेऊन येते. नाटय़ आहे घटनांत आणि व्यक्तिरेखांतही. आणि ही कथा आहे मायकेल बर्ग आणि हॅना श्मिट्झ या दोन व्यक्तिरेखांच्या संबंधाची. टीनएजर मायकेल बर्ग आणि त्याच्याहून दुप्पट वयाच्या हॅन्नामधल्या प्रेमसंबंधाची - शारीर आकर्षणाची - आणि काळाच्या पुढच्या टप्प्यात शरीरापलीकडे जाऊन उरलेल्या भावसंबंधाची - त्यावर व्यक्तिमत्त्वातल्याच रहस्यमय गंडाची (कॉम्प्लेक्सची) दाट छाया आहे.
‘द रीडर’
दिग्दर्शक- स्टीफन डालड्राय;
मूळ लेखक- बर्नहार्ड श्लिंक; पटकथा- डेव्हिड हेर.
कलावंत : केट विन्स्लेट (हॅना), डेव्हिड क्रॉस (१५ वर्षांचा मायकेल), राल्फ फिनेस (मोठा मायकेल).
केट विन्स्लेटचीच अतिशय उत्कट भूमिका असलेला ‘द रेव्होल्युशनरी रोड’ हा या आठवडय़ातला दुसरा चित्रपट. तेवढाच उत्कट आणि सहज अभिनय लिओनाडरे डिकॅप्रिओचा आहे.
आपण इतर सामान्यांपेक्षा वेगळे आहोत, असामान्य आहोत असा विश्वास बाळगणाऱ्या एका सामान्य दाम्पत्याच्या आयुष्यातल्या परस्पर ताणतणावांचा, वैफल्यांचा हा आलेख आहे. त्या दृष्टीनं या चित्रपटातलं नाटय़ हे सामान्य दैनंदिन जीवनात असेल इतपतच ‘नाटय़पूर्ण’! रिचर्ड येट्सच्या कादंबरीवर हा चित्रपट आधारित असून ‘टाइम’ मॅगझिननं २००५ साली निवडलेल्या १०० सवरेत्कृष्ट इंग्रजी कादंबऱ्यांमध्ये या कादंबरीचा समावेश करण्यात आला होता. कादंबरी प्रकाशित झाली होती १९६१ मध्ये आणि या कथेतला काळ आहे ५० च्या दशकाचा. २००८ सालच्या या चित्रपटात हा काळ- त्यातलं सामान्यांचं वैफल्य आणि अस्वस्थता ही कुठे शिळी झालेली नाही.
‘द रेव्होल्युशनरी रोड’
दिग्दर्शक : सॅम मेंडिस.
कलावंत : लिओनाडरे डिकॅप्रिओ, केट विन्स्लेट, कॅथी बेट्स, मायकेल शॅनॉन.