Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९

युपीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार कोण?
महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांपुढे ‘पेच’

नवी दिल्ली, ६ मार्च/खास प्रतिनिधी

राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस युती होणार हे निश्चित असले तरी काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार डॉ. मनमोहन सिंग आहेत, तर राष्ट्रवादीनेही पंतप्रधानपदासाठी शरद पवार यांचे नाव जाहीर केले आहे. त्यामुळे प्रचार ‘कोणत्या’ पंतप्रधानासाठी करायचा, असा जटील प्रश्न महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांपुढे पडला आहे. आज महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांसोबत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला तेव्हा हा मुद्दा चर्चेला आल्याचे समजते.

अंतुले यांचे तळ्यात-मळ्यात!
मुंबई, ६ मार्च / खास प्रतिनिधी

आपली ही शेवटची निवडणूक असल्याने विजयी करा, असे यापूर्वी दोनदा भावनिक आवाहन करून मतदारांची सहानभुती मिळविलेले केंद्रीय अल्पसंख्याक खात्याचे मंत्री बॅ. ए. आर. अंतुले हे रायगड लोकसभा मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढविणार का, याबाबत सारेच अनिश्चित आहे. निवडणूक लढवायची की नाही याबद्दल स्वत: अंतुले यांनी आपले पत्ते खुले केलेले नाहीत. यामुळे काँग्रेसचे प्रदेश पातळीवरील नेतेही बुचकळ्यात पडले आहेत.

‘दो का पच्चीस’ भाजपचा बिजदला प्रस्ताव
नवी दिल्ली, ६ मार्च/पी.टी.आय.

देशावर राज्य करायचे असेल तर दिल्लीवर लक्ष केंद्रित करावे लागेल. राज्यांकडे थोडे दुर्लक्ष झाले तरी चालेल हे सूत्र भाजपने पुरेपूर अंमलात आणण्याचे ठरविले आहे. या सूत्रानुसारच ओरिसातील भाजपचा मित्रपक्ष बिजू जनता दलाला त्याने ‘दो का पच्चीस’ असा प्रस्ताव दिला आहे. ओरिसामध्ये बिजू जनता दलाचे नवीन पटनाईक हे मुख्यमंत्री असून भाजपही या सरकारमध्ये सहभागी आहे. लोकसभा निवडणुकांबरोबरच तेथे विधानसभा निवडणुकाही होत आहे.

बसपबाबत सर्वाधिक उत्सुकता
पुणे, ६ मार्च/विशेष प्रतिनिधी

‘‘आम्हाला बहेन मायावतींना पंतप्रधान करायचे आहे,’’.. बहुजन समाज पक्षाच्या अशा वेगळ्याच ध्येयाने प्रेरित झालेला कार्यकर्त्यांचा संच एका बाजूला तर दलित मतदारांच्या जोरावर आतापर्यंत राजकारण करणारे रिपब्लिकन पक्षांचे विविध गट आणि काँग्रेस पक्ष दुसऱ्या बाजूला.., यापैकी कोणाकडे दलित समाज वळेल, या प्रश्नाबाबत सर्वाधिक उत्सुकता निर्माण झाली आहे.

‘हुश्श सुटलो बुवा’ शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिकांची प्रतिक्रिया
मंचर, ६ मार्च /प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार लोकसभा निवडणुकीसाठी माढय़ातून उभे राहणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होताच बाहेर पडताच ‘हुश्श सुटलो बुवा’ अशी स्वाभाविक प्रतिक्रिया सामान्य शिवसैनिकांमधून व्यक्त होत आहे. पवार यांच्या उमेदवारीचे संकट टळल्याने पुन्हा एकदा सामान्य शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे.

सारेकाही वारसदारासाठी..
नवी दिल्ली, ६ मार्च / पी.टी.आय.

स्वत:च्या राजकीय वारसदारासाठी पारंपरिक मतदारसंघ मोकळा करून स्वत:साठी नवा सुरक्षित मतदारसंघ निवडण्याची प्रथा या निवडणुकीत रुढ होणार आहे. अनेक राजकीय दिग्गजांनी स्वत:च्या लाडक्या लेकाला किंवा लेकीला ही संधी उपलब्ध करून दिली असून केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी यात आघाडी घेतली आहे. पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून लढण्याचा निर्णय घेऊन परंपरागत बालेकिल्ला असलेल्या बारामतीची जागा कन्या सुप्रिया सुळेसाठी सोडली आहे. दोन्ही मतदारसंघात बापलेकीचा विजय निश्चित समजला जात आहे.

कामालागा!
‘निवडणूक ही खऱ्या अर्थानं रोजगार हमी योजना असते.’ सदूनं त्याच्या बायकोला सांगितलं आणि तिला ते लगेच पटलंही. निवडणूक आली की तिची चंगळ असे. साहेबांच्या घरी वर्दळ वाढे त्यामुळं काम वाढे. काम वाढलं की पैसेही वाढत. निवडणूक जाहीर झाली रे झाली, की बाई तिला बोलावून घेत आणि सांगत, ‘‘आता तीन महिने सगळं इकडेच हं! लेकरांचा डबा घेऊन जात जा घरी, पण दिवसातले पंधरा तास वाडय़ावरच राहायचं!’’
साहेबही तसेच. ते सदूला म्हणत, ‘सदोबा, आता दोन महिने तुमचा मुक्काम वाडय़ावरच बरं!’ आणि मग ठरलेलं अन्न, उरलेला ‘दारू’गोळा, टाकून दिलेले कपडे असं बरंच काही सदूच्या, त्याच्या बायकोच्या आणि मुलांच्या वाटय़ाला यायचं!

खरी काँग्रेस !
निवडणूक म्हटली की अगोदर जागा वाटपासाठी व नंतर तिकीटासाठी रस्सीखेच आलीच. त्यानुसार सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीत जागावाटपासाठी लठ्ठालठ्ठी सुरू आहे. नाशिक जिल्ह्य़ातील दोन्ही जागांवर राष्ट्रवादीने दावा सांगितल्यामुळे स्थानिक काँग्रेसजनांमध्ये अस्वस्थता आहे. त्यातच नाशिक मतदारसंघातील इच्छुकांकडून काँग्रेसतर्फे जे अर्ज मागविण्यात आले, त्यामध्ये तीन जणांनी आपापले अर्ज सादर केले. पण, प्रत्यक्षात त्यातील एकच अर्ज म्हणे प्रदेश काँग्रेसकडे पाठविण्यात आला. हा अर्जही जणू औपचारिकतेपुरताच असल्याने त्याचा पाठपुरावा करण्याचा प्रश्नच नव्हता. पण, निवडणुकीची हवा तापू लागली तशी अन्य दोन इच्छुकांपैकी एकाने प्रदेश कार्यालयात विचारणा केली असता आपला अर्जच नसल्याचे त्याच्या लक्षात आले. एका रोखठोक पक्षातून अलीकडेच काँग्रसवासी झालेल्या या नेत्याने मग, तातडीने आपल्या मुंबईतील दूताकरवी आवश्यक तो पक्षनिधी भरला व त्याची पावतीही आवर्जून घेतली. ही पावती म्हणजेच आपल्या तिकीटाची पहिली पायरी असल्याचे सांगताना आमच्याच मंडळींनी स्वत:च्या स्वार्थासाठी आता पक्ष दावणीला बांधल्याचे खडे हे महोदय फोडत असले तरी बाहेरून आलेल्यांना अशा अनुभवांतूनच ‘खरी काँग्रस’ कळेल, अशी मिश्किल प्रतिक्रिया जाणत्या काँग्रेसजनांकडून त्यांना ऐकावी लागत आहे.

‘थर्ड फ्रंट कसली, ही तर थर्ड ग्रेड फ्रंट’
बंगलोर, ६ मार्च

लोकसभा निवडणुकीतील प्रमुख प्रतिस्पर्धी काँग्रेस आणि भाजप हेच असणार आहेत यावर जवळजवळ सगळ्याच राजकीय निरीक्षकांचे एकमत आहे. मात्र या दोघांना पर्याय निर्माण करण्याचे प्रयत्नसुद्धा सातत्याने होतच असतात. कधी तिसरी आघाडी या नावाने तर कधी धर्मनिरपेक्ष आघाडीच्या रूपाने. या दोन्ही पक्षांशी ज्यांचे पटत नाही अथवा हे दोन्ही पक्ष ज्यांना जवळ करीत नाहीत अशी मंडळी एकत्र येऊन हा तिसरा पर्याय निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत. परंतु ही कसली थर्ड फ्रंट, ही तर ‘थर्ड ग्रेड’ फ्रंट, अशा शब्दांत भाजपचे उपाध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी या तिसऱ्या पर्यायाची खिल्ली उडविली आहे.प्रचार मोहिमेच्या निमित्ताने बंगलोरमध्ये आलेल्या व्यंकय्या नायडू यांनी ही निवडणूक भाजप आणि काँग्रेस याच दोन शक्तींमधील असेल, असे भाकित वर्तविले. थर्ड फ्रंटच्या नावाने एकत्र येणारे पक्ष नेहमीच अयशस्वी ठरले असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. मुलायमसिंग एकेकाळी थर्ड फ्रंटचे अध्यक्ष होते. परंतु त्यांनीच यूपीएला पाठिंबा दिला. मायावती यासुद्धा एकेकाळी थर्ड फ्रंटबरोबर होत्या. परंतु त्यांनीही आता पाठ फिरविली आहे. तर जयललिता यांनी आपण काँग्रेसबरोबर जाणार असल्याचे जाहीर केले आहे. स्वाभाविकच थर्ड फ्रंटचा प्रयोग या वेळी सुद्धा फसणार हे निश्चित, असे नायडू म्हणाले.या निवडणुकीत दहशतवाद आणि राष्ट्रीय सुरक्षा हेच मुद्दे प्रामुख्याने येतील, असे ते म्हणाले. राष्ट्रीय लोकशाही आघाडी निवडून आली तर पहिल्या १०० दिवसांत पोटा कायदा आणू, असे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले.