Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
लोकमानस

विज्ञानाच्या प्रयत्नांना मर्यादा आहेत

 

त्रिकालवेधमध्ये पृथ्वीच्या निर्मितीपासून भविष्यकाळातील पृथ्वी, सूर्य, तारे यांच्या अंतापर्यंतचे दालन उघडले आहे. सजीवांमध्ये उत्क्रांतीदरम्यान सुधारणा होते परंतु निर्जीवांबाबत असे होत नाही. प्रगत विज्ञानामुळे भूगोल, जगाची लोकसंख्या, हवामान, तंत्रज्ञान, नवतंत्रज्ञानाचा वेध घेता येऊ शकतो. तरीही प्रगत विज्ञानाने भूकंप अवर्षण सुनामीच्या संदर्भात पूर्ण प्रगती केली नाही. भविष्यासाठी माणसे बचतीचे नियोजन वर्तमानकाळातील परिस्थितीशी ताडूनच करीत असतात. हे सर्व सजीव गोष्टींसाठी आहे. म्हणून आपण सजीव व निर्जीव गोष्टींना एकत्र न केल्यास बरे होईल.
पृथ्वीची उत्पत्ती अब्जो वर्षांपूर्वी झाली. सूर्याचा स्फोट होऊन पृथ्वी, चंद्र, तारे निर्माण झाले. विश्वरचनेचा इतिहास साडेतेरा अब्ज वर्षांपूर्वीचा आहे. त्याबरोबरच विज्ञानाने सुनामी, धूमकेतू, उल्कापात याचा शोध लावला. प्रगत विज्ञान भविष्यात अजून प्रगत होऊन पृथ्वीचा अंत न होण्यासाठी शास्त्रज्ञ संशोधन करतील असं वाटतं. कारण जेव्हा एखादा धूमकेतू किंवा अशनी पृथ्वीवर आदळणार असेल तेव्हा धूमकेतू किंवा अशनीची दिशा बदलून पृथ्वीवरील दुर्घटना टाळणे शक्य आहे. त्याकरिता उपग्रह, अतिप्रगत दुर्बीण, शास्त्रीय उपकरणांचा उपयोग केला जाईल असे वाटते. विज्ञानाने वेळोवेळी पृथ्वीचा उगम, पृथ्वीवरील मानव, वातावरण, पशुपक्षी, प्राण्यांच्या उगमांचा ठाव घेण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच पृथ्वीतलावर डायनॉसॉरसारख्या प्राण्याचा झालेला उगम व अस्त शास्त्रोक्तरीत्या सिद्ध केला आहे.
शास्त्रज्ञांनी तर्क करून असे विधान केले की, विश्वाच्या पलीकडे पृथ्वीतलावरील जीवसृष्टीपेक्षा अतिप्रगत सृष्टी असण्याची शक्यता आहे. त्याकरिता आपण वेगवेगळे प्रयोग केले. अंतराळात सांकेतिक चिन्हं, यानं सोडली. परंतु आजतागायत आपणाला कोणतेही प्रत्युत्तर आले नाही. जर विश्वाच्या पलीकडे आपल्यापेक्षा अतिप्रगत जीवसृष्टी असेल तर त्यांनी आपल्यापर्यंत येण्याचा प्रयत्न का केला नाही? किंवा त्यांच्या अस्तित्वाची अशी एकही बाब आपल्या निदर्शनास का आली नाही? मला असं वाटतं आजही विज्ञान अपुरे आहे. भूतलावरील मानव संशोधन करण्यासाठी अंतराळात गेला आहे. चंद्रावर जाऊन भविष्यात वस्ती करण्यासाठी शोध घेत आहे. परंतु अप्रत्यक्षरीत्या आपण अंतराळात एवढा कचरा केला आहे की भविष्यात त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत. अंटाक्र्टिकाच्या क्षेत्रात ओझोन वायू कमी झाला आहे. विज्ञानाला वरील गोष्टींबद्दल समाधानकारक स्पष्टीकरण देता आलं नाही. याच गोष्टीचा गैरफायदा भविष्य सांगणारे घेतात.
शिवनाथ गायकवाड, ठाणे

बाबूराव सामंत यांच्या द्य आठवणी
निस्पृह वृत्तीच्या बाबूराव सामंत यांची प्रत्यक्ष भेट कमी झाली पण त्यांची साधी राहणी तेवढय़ातही मनात घर करणारी ठरली. त्यांनी उभारलेली गोरेगाव येथील शाळा आणि नागरी निवारा परिषद पाहून वाटले की अशा मंडळींची भारताला खरी गरज आहे! मी एक मध्यमवर्गीय स्त्री. सहज काश्मीरभेटीसंबंधी दोन लेख वर्तमानपत्रात लिहिले आणि बाबूरावांनी त्यांची दखल घेत मला लिहिते केले आणि त्यातूनच ‘मोहतरमा ते अम्मा’ हे पुस्तक माझ्या हातून घडले. बाबूराव सामंत यांची शिस्त, वागण्यातला, कृतीतला अचूकपणा व व्यवस्थितपणा आणि समोरच्या व्यक्तीबद्दल आदर दाखवण्याची वृत्ती यांचा मी पुरेपूर अनुभव त्या थोडक्या सहवासात घेतला. या थोर व्यक्तीकडून सन्मानाची वागणूक मिळाली, ही माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीचे भाग्यच.
सुधा गोखले, पुणे