Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९

तक्रारीची दखल न घेतल्याने सांगलीत आत्मदहनाचा प्रयत्न
सांगली, ६ मार्च/प्रतिनिधी

शासकीय यंत्रणेकडे वारंवार न्यायाची मागणी करूनही त्याची साधी दखलही घेतली जात नसल्याच्या कारणावरून मिरज तालुक्यातील बेळंकी येथील गोरख बनाप्पा केंगार (वय ५०) यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न अयशस्वी ठरला.

‘महालक्ष्मी मंदिर परिसर विकासात रहिवासी, व्यापाऱ्यांची दखल घेणार’
कोल्हापूर, ६ मार्च / विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत महालक्ष्मी मंदिर परिसराचा विकास करताना तेथील रहिवाशी, व्यापारी यांच्या भावनांची योग्य ती दखल घेतली जाईल, अशी दखल घेतल्याखेरीज विकासाचे कोणतेही पाऊल उचलले जाणार नाही, असे आश्वासन महापौर उदय साळोखे यांनी शुक्रवारी मंदिर परिसरातील नागरिकांच्या एका व्यापक शिष्टमंडळाशी बोलताना दिले.

हातकणंगलेतून काँग्रेसचे नानासाहेब महाडिक बंडखोरीच्या पवित्र्यात?
आष्टा, ६ मार्च / शीतल पाटील

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून सांगली जिल्हा काँग्रेसचे खजिनदार नानासाहेब महाडिक हे बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत. मात्र महाडिक यांची बंडखोरी ही कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर अवलंबून असून कोल्हापुरातून धनंजय महाडिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यास नानासाहेब महाडिक यांची बंडखोरी निश्चित असल्याचे राजकीय संकेत मिळत आहेत.

संजय पाटील खूनप्रकरण : फरारी प्रमुख सूत्रधार बाबा मोरेला अटक
१७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी
कराड, ६ मार्च/वार्ताहर
महाराष्ट्र केसरी पैलवान संजय पाटील हत्या प्रकरणातील संशयित मुख्य सूत्रधार बाळासाहेब ऊर्फ बाबा मोरे यास सापळा रचून अटक करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी पोलिसांनी आज पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास फत्ते केली. बाबा मोरे याच्याकडून सुमारे ७५ हजार रुपये किमतीचे ९ एमएम पिस्तुल जप्त करण्यात आले असून, त्यास न्यायालयात हजर केले असता १७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

वाईत एकाचवेळी तीन चित्रपट व दोन जाहिरातपटांचे चित्रीकरण
वाई, ६ मार्च/वार्ताहर

हिंदी, मराठी चित्रपट, दूरदर्शन मालिका, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय जाहिरातींच्या चित्रीकरणाचं नव केंद्र म्हणून वाई आता पुढे येत आहे. या परिसरात चित्रीकरणाची लगबग आता नित्याची बाबच ठरली आहे. हिंदी, मराठी चित्रपटांच्या चित्रीकरणाचा गेल्या रविवारी विक्रम झाला. एकाच वेळी तीन चित्रपटांचे चित्रीकरण याठिकाणी झाले.यामध्ये श्रेया क्रियेशनच्या ‘भाग्यविधाता’ ‘वळू’ या मराठी चित्रपटांच्या निर्मात्यांचा नवा चित्रपट ‘विहीर’, स्वस्तिक पिक्चर प्रॉडक्शनचा ‘अगले जनम में हमे बिटिया ही बनाओ?’ याचा समावेश आहे. समाजवादी पक्षाच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या जाहिरातीचे चित्रीकरण पसरणीमध्ये झालं. तसेच एका आंतरराष्ट्रीय जाहिरातीचं चित्रीकरण सुरू होतं.

तोटय़ातील शाखा बंद करण्यास हिरवा कंदील
बॅक विलीनीकरणाबाबत रिझव्‍‌र्ह बँकेची अनुकूल भूमिका
इचलकरंजी, ६ मार्च/दयानंद लिपारे
लाखावरील रकमेच्या ठेवीदारांना आश्वासक वातावरण निर्माण झाले आहे, तद्वतच विलीन करून घेणाऱ्या बँकांनाही रिझव्‍‌र्ह बँकेच्या नव्या नियमावलीमुळे व्यवहार्य विश्वास व आर्थिक बळ मिळण्यास मदत होणार आहे. विशेषत: सलग तीन वर्षे तोटय़ातील शाखा बंद करण्याबरोबरच गुंतवणूक, कर्जे, रोकड व बँक खात्याकडील जमा, फर्निचर, अचल मालमत्ता, देणी याबाबतीत अशा बँकांसाठी अनुकूल अटी लागू केल्या आहेत.

सोलापुरात चादर कारखान्यास आग लागून ५० लाखांची हानी
सोलापूर, ६ मार्च/प्रतिनिधी

अशोक चौक परिसरात एका जेकॉर्ड चादर कारखान्यास अचानकपणे आग लागून घडलेल्या दुर्घटनेत संपूर्ण कारखाना भस्मसात झाला. यात सुमारे ५० लाखांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास ही दुर्घटना घडल्यानंतर आग आटोक्यात आणायला महापालिकेच्या अग्शिामक दलास बरेच प्रयत्न करावे लागले.दत्तात्रेय राघवलू गोली यांच्या मालकीच्या या चादर कारखान्याच्या पाठीमागील बाजूस प्रथम आग लागली. त्यावेळी कारखान्यातील कामगार व रखवालदार कारखान्याच्या समोरील बाजूस विश्रांती घेत होते. आगीमुळे मोठय़ा प्रमाणात धूर येत असल्याचे लक्षात येताच त्याची माहिती महापालिकेच्या अग्शिामक दलास कळविण्यात आली.

सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना ५० लाखांचे नोंदणीकरण मिळणार
सोलापूर, ६ मार्च/प्रतिनिधी
राज्यातील सुशिक्षित बेरोजगार स्थापत्य अभियंत्यांना वर्ग ५ अ प्रमाणे ३० लाखांच्या कामाचे नोंदणीकरण मिळणार म्हणून येत्या काही महिन्यांत ५० लाखांचे नोंदणीकरण मिळण्याची शक्यता असल्याचे महाराष्ट्र राज्य सुशिक्षित बेरोजगार स्थापत्य अभियंता संघटनेचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी सांगितले. मुंबई येथे मंत्रालयात नुकतीच संघटनेचे पदाधिकारी आणि बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत बांधकाम खात्याचे राज्य उपसचिव पी. वाय. देशमुख, उपसचिव एन. डी. रघोजीवार, मंत्रालय कार्यासन अधिकारी च. वि. भातखंडे तसेच संघटनेचे राज्य अध्यदक्ष दिलीप मेदगे, कार्यकारी अध्यक्ष मिलिंद भोसले, शिवाजी सांबळे यांच्यासह तेरा जिल्हाध्यक्षांनी चर्चेत भाग घेतला होता.राज्यातील सर्व सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना वर्ग ५ अ प्रमाणे ३० लाखांचे नोंदणीकरण द्यावे, दहा वर्षांची अट रद्द करावी, त्यासाठी ११ फेब्रुवारी २००४ चा शासन नियर्णयानुसार कार्यवाही करावी असा आदेश राज्यातील सर्व बांधकाम खात्यांना देण्यात आल्याचे भोसले यांनी सांगितले.

गोविंद कुलकर्णी यांचे निधन
सोलापूर, ६ मार्च/प्रतिनिधी

मोहोळ येथील सेवानिवृत्त मंडल अधिकारी गोविंद काशिनाथ कुलकर्णी (वय ८०) यांचे प्रदीर्घ आजाराने व वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ग्राहक पंचायतचे जिल्हा सदस्य मुकुंद कुलकर्णी आणि पत्रकार मदन कुलकर्णी यांचे ते वडील होत.

सोलापूरच्या विमानसेवेची वेळ बदलण्याची चेंबरची मागणी
सोलापूर, ६ मार्च/प्रतिनिधी

किंग फिशर एअरलाइन्स कंपनीच्या गेल्या महिन्यात सुरू झालेल्यामुंबई-सोलापूर-मुंबई विमान सेवेची वेळ बदलण्याची मागणी सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सने केली आहे.या संदर्भात चेंबरचे मानद सचिव श्रीनिवास वैद्य यांनी किंग फिशर एअरलाइन्सचे अध्यक्ष डॉ. विजय मल्ल्या यांना निवेदन पाठविले असून त्यावर डॉ. मल्ल्या यांनीही सकारात्मक विचार करून निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. सध्याची वेळ पूर्णत: गैरसोयीची असून त्यात बदल झाल्यास या विमानसेवेला सोलापूरकरांचा सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असे श्री. वैद्य यांनी डॉ. मल्लय़ा यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले होते.

शिंदे यांच्या नियुक्तीवर टांगती तलवार
बेल्हे, ६ मार्च/वार्ताहर

शिवसेनेच्या संचालकांनी साखर आयुक्तांकडे तक्रार केल्याने विघ्नहर सहकारी साखर कारखान्यातील संचालक मंडळाचा वाद चव्हाटय़ावर आला आहे. त्यामुळे श्रीहरी शिंदे यांची संचालकपदाची नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात अडकली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे शिवसेनेचे संचालक प्रसन्न डोके यांनी दिलेल्या राजीनामा विद्यमान संचालक मंडळाने मंजूर करून, त्यांच्या जागेवर माजी संचालक श्रीहरी शिंदे यांची नियुक्ती केली.

सिन्हा, करपे, कोल्हापुरे यांना लक्ष्मीबाई पुरस्कार
सातारा, ६ मार्च/प्रतिनिधी

जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून सातारा येथील सायक्लो उद्योग समूहातर्फे राणी लक्ष्मीबाई पुरस्कारासाठी या वर्षी माणदेशी महिला बँकेच्या संस्थापक चेअरमन श्रीमती चेतना सिन्हा, कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कुसुमताई करपे, वाईची राष्ट्रीय मलखांब खेळाडू आरती कोल्हापुरे यांची निवड झाली आहे.राणी लक्ष्मीबाई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सातारा जिल्ह्य़ातील कर्तृत्ववान व विशेष कामगिरी करणाऱ्या महिलांना हा पुरस्कार देण्यात येतो. या वेळी आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या अंध महिलांचा सत्कार पुण्याचे विक्रीकर आयुक्त संजय भाटिया व सायक्लो उद्योग समूहाचे प्रमुख पांडुरंग शिंदे यांच्या उपस्थितीत शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता शानभाग विद्यालय, सातारा येथे संपन्न होणार आहे.